माउलींची विराणी – ५: सगुणरुपाचा ध्यास

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥


ज्याचिये आवडी संसार त्यजिला ।

तेणे का अबोला धरिलागे माये ॥

पायां दिधली मिठी घातलीं जीवें गांठी ।

साउमा न ये जगजेठी उभा ठेला गे माये ॥ १ ॥

भेटवा वो त्यासी चरण झाडीन केशीं ।

सगुणरुपासि मी वो भाळलिये ॥ ध्रु. ॥

क्षेमालागीं जीऊ उतावेळ माझा ।

उचलोनि चारी भुजा देईन क्षेम ॥

कोण्या गुणें का वो रुसला गोवळु ।

सुखाचा चाबळु मजसी न करीगे माये ॥ २ ॥

ऐसें अवस्थेचे पिसें लाविलेसे कैसें ।

चित्त नेलें आपणियां सारिसेंगे माये ॥

बापरखुमादेविवरें लावियेले पिसें ।

करुनि ठेविले आपणिया ऐसेंगे माये ॥ ३ ॥

भगवंताच्या भेटीसाठी जीव उतावीळ झालेला असला आणि सात्विक वृत्तींची पूर्ण वृध्दी झालेली असली तरीसुध्दा ईष्टदेवतेचे दर्शन लगेच होते असे नाही. श्रीसंत नामदेवांना बालपणीच केवळ एका हट्‍टामध्येच श्रीविठोबांचे दर्शन झाले हा एक सन्माननीय अपवाद आहे असे दिसून येते. श्रीस्वामी स्वरुपानंदांनी असे म्हटले आहे की तब्बल दोन वर्षे त्यांना विष्णूंच्या चतुर्भुज अवताराची अनन्य आस सहन करावी लागली तेव्हा त्यांना सगुण रुपाचे दर्शन झाले. श्री रामकृष्ण परमहंसांच्या जीवनाकडे बघितले तरीसुध्दा असे दिसून येते की लहानपणीच त्यांना पूर्णपणे कळून चुकले होते की नामांकित पंडितसुध्दा आपल्या विद्येचा उपयोग शेवटी द्रव्य व सन्मान मिळविण्यासाठीच करीतात. या जाणीवेतून त्यांच्या मनात पुस्तकी ज्ञानाबद्दल पूर्ण उबग निर्माण झाला आणि भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे याबद्दल खात्री पटली. नंतर दैवयोगाने त्यांच्याकडे श्रीकालीमातेची पूजा करण्याचे काम चालून आले आणि त्यांच्या वैराग्यवृत्तीला अजूनच बळ आले. काही काळाने त्यांची अवस्था अशी झाली की ते देवीच्या दर्शनासाठी वेडेपिसे होऊन दिवसरात्र ‘तू कुठे आहेस?’ असे म्हणत फिरायचे. कपड्याची शुध्द नाही, दिवस आहे का रात्र आहे याचे भान नाही अशा अवस्थेत ते जमिनीवर गडबडा लोळून अजून तू मला का भेटत नाहीस? असे आर्तपणे विलाप करायचे. त्या वेड्या पुरोहिताचे वर्तन बघण्याऱ्यांची लोकांची मोठी गर्दी जमायची! ‘त्याकाळात मला एका भगवंताच्या ध्यासाशिवाय काहीही कळत नव्हते. भोवताली जमा झालेली माणसेसुध्दा अंधुक-अंधुकच दिसायची’ असे स्वस्थितीचे वर्णन त्यांनी नंतर केले होते. शेवटी एक दिवशी अजून मातेचे दर्शन झाले नसल्याने आता या जीवनाचा अंत करणेच योग्य आहे असे पक्के ठरवून त्यांनी श्रीकालीमातेच्या हातातील तलवार काढली व स्वतःचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्‍न केला तेव्हा प्रत्यक्ष कालीमातेने पुढे येऊन त्यांचा हात पकडला व दिव्य दर्शनाचा आनंद दिला. या व इतर कित्येक उदाहरणांवरुन असे दिसते की संतांच्या जीवनातही भगवंत लगेच येतो असे नाही. आपल्या प्रिय भक्‍तालाही दर्शनासाठी इतकी वाट बघायला लावण्यास भगवंताचा काय उद्देश्य असेल?!

माउलींच्या वरील विराणीमध्येही त्यांच्या भगवंतदर्शनाची आस दिसून येत आहे. काहीतरी प्रमाद घडल्यावर शिक्षा म्हणून प्रियकराने प्रेयसीशी अबोला धरल्यावर तिची जी अवस्था होते तो भाव मनात ठेऊन करुण स्वरात माउली म्हणत आहे: ‘ज्या भगवंताच्या गोडीने मी व्यावहारिक जगाचा त्याग केला त्याने का म्हणून माझ्याशी अबोला धरला आहे? स्वतःच्या व्यक्‍तिमत्वाला तिलांजली देऊन (जीवाला गाठ मारुन!)त्याच्या पायाला मी घट्‍ट मिठी घातली तरी तो आपल्याच ठिकाणी स्वस्थ उभा राहून माझ्यासमोर येण्याचे का टाळत आहे? (१) कुणीतरी त्याला मला भेटवा हो! त्याच्या चरणांची धूळ मी माझ्या केसांनी झाडायला तयार आहे, त्याच्या सगुणरुपाच्या ध्यासात मी विरुन गेले आहे (ध्रु.) त्याच्या भेटीसाठी माझा जीव अत्यंत उतावीळ झाला आहे. त्याच्या चारी भुजांनी मला आलिंगन दिले तरच मला सुख लाभणार आहे. मी काय केले म्हणून तो माझ्यावर रुसला आहे आणि त्यामुळे माझ्या सुखाला त्याने रोखून ठेवले आहे? (२) मी त्याच्या ध्यासात वेडी होऊन माझे सर्व चित्त त्याने व्यापून टाकले आहे. (भ्रमर-कीटक न्यायाने) त्याच्या सतत विचाराने मी आणि तो यातील फरकच आता मला कळेनासा झाला आहे आणि त्यातच सगुण दर्शनाची ओढ असल्याने (म्हणजे द्वैतामधील आनंद उपभोगायची इच्छा अजून असल्याने) मला वेड लागल्यासारीखे झाले आहे (३).’

संतांचा जन्म निव्वळ लोककल्याणासाठी झालेला असल्याने त्यांनी स्वतःसाठी काहीही मागणे करणे कदाचित भगवंताला पसंत नसावे. मग भले ती मागणी त्याच्या दर्शनाची का असेना! श्री रामकृष्ण परमहंसांच्या धर्मपत्‍नी म्हणजे श्री शारदामाता. त्यांनी त्यांच्या दक्षिणेश्वरामधील रहिवासाबद्दल असे सांगितले की ‘मी ठाकुरांच्या खोलीशेजारी असलेल्या इमारतीतील जिन्याच्या खाली जी छोटीशी जागा होती त्यात रहायचे आणि तिथेच दिवसभर त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांकरीता भोजन इत्यादी तयार करायचे. परंतु त्यांच्या इतक्या जवळ राहूनसुध्दा मला त्यांचे दर्शन कित्येक महिने व्हायचे नाही! दर्शनाची अगदीच उत्कट इच्छा झाली तर मी माझ्या खोलीच्या दाराला चटईचा पडदा होता त्याच्या एका बारीक छिद्रातून त्यांच्या पाठीकडे वा जवळ बसलेल्या एखाद्या शिष्याकडे बघून वा त्यांचा भजन गातानाचा आवाज ऐकून समाधान मानायचे.’ बघा म्हणजे ज्या रामकृष्णांना देवीच्या दर्शनाचा ध्यास लागला होता ते स्वतः भगवंतस्वरुप झाल्यावर त्यांचे दर्शनही दुर्मिळ झाले! ठाकुरांनी व श्री शारदामातांनी जे जीवन व्यतीत केले त्याच्या दिव्यपणाला तोड नाही. माउलींच्या विराणीतील सर्व भावांचे प्रत्यक्ष दर्शन या दैवी दंपतीच्या जीवनपटात वेळोवेळी दिसून येते! विराणीतील भाव निव्वळ कविकल्पना नसून त्यांची उत्कटता संतांनी प्रत्यक्षतेने भोगलेली आहे हे लक्षात घ्या.

॥ हरि ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: