माउलींची विराणी -६: कृष्णाविण जीवनाचे शून्यत्व

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥


कृष्णें वेधली विरहिणी बोले ।

चंद्रमा करीतो उबारा गे माये ।

न लावा चंदनु न घाला विंजणवारा ।

हरिविणे शून्य शेजारुगे माये ॥ १ ॥

माझे जीवींचे तुम्हीं का वो नेणा ।

माझा बळिया तो पंढरीराणा वो माये ॥ २ ॥

नंदनंदनु घडीघडी आणा ।

तयाविण न वचति प्राण वो माये ।

बापरखुमादेविवरु विठ्ठलु गोविंदु ।

अमृतपानगे माये ॥ ३ ॥

परमार्थामध्ये आपण सर्वजण फक्‍त एका शब्दाचा पूर्ण अर्थ समजण्याचा प्रयत्‍न करीत आहोत. प्रत्येकाचे मार्ग भिन्न असतील, पण सर्वांची मूळ जन्मजात जिज्ञासा एकच आहे. त्या शब्दांत न सांगता येणाऱ्या वा कितीतरी वेळा स्वतःलाच न जाणविलेल्या ओढीपोटीच आपल्यापैकी कुणी रामनाम घेत असेल, तर कुणी सोहम्‌ साधनेत मग्न असेल तर आणि कुणी योगसाधनेमध्ये व्यग्र असेल. कुणी हिंदु असेल तर कोण मुसलमान. कोणीतरी श्रीज्ञानेश्वरीचे पठण करीत असेल तर कोण दासबोधाचे तर अजून कुणी कुराणाचे. परंतु साधकांमधील सर्व फरक त्या एका शब्दाचा अर्थ शोधण्यातील मार्गांमधील फरक आहे. मूळ शब्द एकच आहे. तो म्हणजे ‘गुरुकृपा’. या कृपारुपी मधाचे बोट जिभेला लावूनच आपणास जन्म येतो आणि मग आयुष्यभर त्या चवीला शोधण्यात आपला जन्म जातो! ज्याला गुरुकृपा म्हणजे काय हे पूर्णपणे कळले तो साधक सिध्द झालेला आहे. या शब्दाचा अर्थ इतका गूढ आणि गहन आहे की तो पूर्ण कळण्यास आपली शब्दसंपत्ती संपूर्णरीत्या विकसित व्हावी लागते. श्रीज्ञानेश्वरी वा इतर संतसाहित्य नित्यवाचनात ठेवल्याचा फायदा असा की त्यातील शब्दांद्वारे आपण स्वस्थितीला जाणू शकतो. तेव्हढे शब्दभांडार जवळ नसले तर साधक नुसता ‘किती सुंदर’ या पलिकडे काही म्हणू शकत नाही किंवा एव्हढे शब्दसुध्दा त्याच्या तोंडातून न फुटता तो केवळ स्तब्ध राहून भावावस्थेत मग्न होतो. साधनेमधील ही एक अतिउच्च अवस्था आहे. अशावेळी भगवंतकृपेने आपले सद्‌गुरु मानवी रुपात अस्तित्वात असले तर त्यांच्या सहवासाची ओढ अनिवार होऊन साधकाला त्यांच्या दर्शनाची तळमळ लागते. आता ही तळमळ अध्यात्मिक पातळीवरील असली तरी ती मूर्तरुपात अवतरताना साधकाच्या साधनाप्रकारानुसार येते. त्यामुळे यशोदामातेला बाळकृष्णाची ओढ लागते तर सुदामाला आपल्या मित्राची. ज्याप्रमाणे जमिनीत खोल असलेला एकच झरा ठिकठिकाणी वेगळ्या कूपांतून बाहेर येतो आणि मग त्यांच्या आकारानुसार त्या जलाचे रुप होते त्याचप्रमाणे सर्व साधकांच्या मनातील एकाच अद्वैतानंदाचे दृष्य रुप विभिन्न होते.

वरील अभंगामध्ये माउलींनी भगवान श्रीकृष्णांची पूर्ण कृपा झालेल्या एका गोपीची अवस्था कथन केलेली आहे. भगवान श्रीकृष्णांना आपला सखा मानलेल्या गोपीच्या अवस्थेबद्दल माउली म्हणत आहे: ‘कृष्णाच्या ध्यानात मग्न झालेली एक विरहिणी बोलत आहे की शीतल चांदणेही आता मला प्रखर सूर्यप्रकाशाप्रमाणे दाह देत आहे. या विरहाग्नीला शमविण्यासाठी तुम्ही मला चंदनाचा लेप लावू नका वा पंख्याने गार वारा घालू नका. माझ्या हरिविण हे सर्व निरुपयोगी आहेत (१). माझ्या या दुःखाचे मूळ तुम्हाला कसे कळत नाही? सख्यांनो, आता माझे सर्व जीवन कृष्णमय झालेले आहे (२). त्यामुळे नंदकुमाराला सतत माझ्यासमोर आणल्याशिवाय आता माझे प्राण वाचणार नाहीत. श्री ज्ञानदेवांनाही विठ्ठल, गोविंद या नावांचा जप अमृत प्राशन केल्यासमान आहेत (३).’

सदर गोपीच्या मधुरभावात पूर्ण अध्यात्म भरलेले आहे असे म्हणण्याचे कारण म्हणजे भगवंतांशी भेट झाल्यावर ती आपल्या पंचेंद्रियांचे समाधान होईल असे म्हणत नाही तर माझे जाणारे प्राण परत येतील असे म्हणत आहे. हे प्रेम देहभावनेवर आधारीत नाही तर चैतन्याच्या पातळीवर आहे. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये विश्वरुपाचे दर्शन झाल्यावर परम भक्‍त अर्जुनसुध्दा असे उद्गारतो की भगवंता तुझे चतुर्भुज रुप परत माझ्यासमोर पुढे येऊदे, नाहीतर जीव काय आता चैतन्यसुध्दा जायची वेळ आलेली आहे! समजा गोपिकेच्या मागणीला मान देऊन अचानक श्रीकृष्ण समोर आले तर ती काय करेल? तिची अवस्था काय करु आणि काय नको असे होऊन ती संपूर्णपणे भांबावून जाईल. श्री रामकृष्ण परमहंस एकदा कलकत्याला राहणाऱ्या दोन बहिणींच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या घरी गेले तर त्यातील एक बहीण आतल्या खोलीतच ‘आज माझ्या घरी प्रत्यक्ष ठाकुर आले आहेत’ असे म्हणून त्या अत्यानंदात नुसती बसून राहीली. त्या अत्युकट आनंदावेगाने पूर्ण बहरुन गेल्याने तिला खोलीबाहेर येऊन त्यांचे दर्शनसुध्दा घेता आले नाही, मग त्यांची सरबराई करणे दूरच राहीले! दुसरी बहीण श्री रामकृष्णांकडे तक्रार करु लागली की ‘बघा, सगळ्यांची सेवा करण्याची सर्व कामे मला एकटीलाच करावी लागत आहेत. बहीण असूनसुध्दा काही उपयोग नाही!’ अहो, सद्‍गुरु समोर आल्यावर आपले संसारिक देहभान हरपणे यापेक्षा अधिक उच्च अध्यात्मिक अवस्था असू शकेल काय? आणि अशी अवस्था व्हावी म्हणूनच सद्‍गुरुंचे स्मरण सतत केले पाहिजे. अभंगाच्या शेवटी माउली म्हणूनच असे म्हणत आहे की ‘विठ्ठल, गोविंद’ या नामांचा जप करणे म्हणजे आपले गमाविलेले अध्यात्मिक जीवन परत मिळण्याचे अमृत प्राशन करण्यासारखे आहे. हा अमृताचा सागर अखंड समोर असताना व्यावहारिक विश्वात मग्न राहण्याने आपणच आपल्या ओठांची वज्रमिठी घालून बसलो आहोत याला कोण काय करणार?

॥ हरि ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: