माउलींची विराणी -७: कृष्णा सारखा कृष्ण आहे!

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥


सांवळिये बुंथी सांवळिया रुपें । सांवळिया स्वरुपें वेधियेलें ॥ १ ॥

काय करुंगे माये सांवळे न सोडी । इंद्रियां इंद्रियां जोडी एकतत्वें ॥ २ ॥

कैसे याचे तेज सांवळे अरुवार । कृष्णीं कृष्ण नीर सतेजपणे ॥ ३ ॥

ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचे खुणे । सांवळेची होणे यासी ध्यातां ॥ ४ ॥

भगवंताचे वर्णन कसे करावे? शब्द जिथे पोहोचू शकत नाहीत त्या गोष्टीचे वर्णन करणे अशक्यप्राय आहे यात शंका नाही. परंतु जरा विचार केला तर आपण आपल्या आयुष्यात एकातरी गोष्टीचे पूर्ण वर्णन करु शकलो आहोत का? ‘चहा कसा झाला आहे?’ या प्रश्नाचे उत्तरसुध्दा आपण ‘छान’ या एका शब्दात देतो वा ‘नेहमीसारखा झाला आहे, का विचारतेस?!’ असा प्रतिप्रश्न करुन देत नाही! यातील गंमतीचा भाग जरी सोडला तरी मूळ मुद्दा यातून स्पष्ट होतो की अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टीचेसुध्दा आपण पूर्ण वर्णन करु शकत नाही. याचे कारण असे की ज्या आपल्या इंद्रियांद्वारे आपणास जगाचे ज्ञान होते त्यांची ग्रहणशक्‍ती फार मर्यादीत असल्याने आणि एकावेळी एकाच इंद्रियाद्वारे ज्ञान होत असल्याने आधी आपणास संपूर्ण जाणीव कधी होतच नाही. आणि त्यात स्वतःची शब्दसंपत्ती तोकडी असल्याने झालेल्या अपुऱ्या माहितीलासुध्दा शब्दांकित करणे आपल्या आवाक्याबाहेर असते. आणि त्यातून महत्वाची गोष्ट म्हणजे या जगात कुणाला एवढी सवड आहे की एखाद्या गोष्टीला संपूर्णरीत्या जाणावे आणि सांगावे? कामचलावू ज्ञान झाले की आपले पूर्ण समाधान होते. उदाहरणार्थ, सायकल कशी चालवावी हे कळले की आपले सायकलबद्दलची जिज्ञासा शमते. पडू न शकता तिच्यावर बसू शकण्यामागील शास्त्रीय सिध्दांत काय आहे आणि बसण्यासाठी नक्की कुठल्या अवयवांचा कसा उपयोग आपण करीत आहोत हे जाणून घ्यायला कोण उत्सुक आहे?! पण गंमत बघा की आयुष्यभर अर्धवट ज्ञानात सुख मानणारे असे आपण परमार्थात मात्र संपूर्ण ज्ञानाची अपेक्षा ठेवतो! भगवंत कसा आहे हे तुम्ही मला सांगा असा गुरुंजवळ हट्‍ट धरुन बसतो. कल्पना करा की जर आपण दररोज घडणाऱ्या सामान्य गोष्टींना स्वतःच्या जाणीवेने संपूर्ण समजू शकत नाही, तर भगवंत कसा आहे याचे ज्ञान दुसऱ्यांच्या अनुभवातून कसे मिळवू शकू? म्हणूनच भगवंताचे वर्णन वृक्षाची शाखा दाखवून त्याच्या पलिकडील आकाशातील अंधुकशी दिसणारी चंद्राची बारीकशी कोर निदर्शनास दाखविण्यासारखे सर्व संत करतात.

श्री रामकृष्ण परमहंसांना त्यांच्या प्रिय शिष्यांनी अनेकदा त्याच्या अत्युच्च भावावस्थेचे वर्णन करण्याचा आग्रह केला होता. भक्‍तांवरील प्रेमाने ‘आज मी त्या अवस्थेत गेलो की जरुर सांगीन’ असे त्यांनी बरेचवेळा सांगितलेसुध्दा. परंतु त्या अवस्थेत पोहोचल्यावर ते संपूर्णरीत्या स्तब्ध व्हायचे. नंतर ते म्हणायचे की ‘मुलांनो, मी खरोखर मनापासून स्वतःला थोडे वेगळे ठेवून जे दिसत आहे त्याचे वर्णन करण्याचा प्रयत्‍न केला. परंतु जेव्हा समाधी लागते तेव्हा मुखातून शब्द उच्चारायला हवेत याची जाणीव व्हायला जरुरी असणारे देहभानच हरपते. मग कोण कुणाला काय सांगणार?’ नंतर ते म्हणायचे की ‘या जगात ज्या गोष्टींबद्दल बोलले गेले आहे त्या सर्व वस्तू आपल्या वाचेमुळे जणू ‘उष्ट्या’ झालेल्या आहेत. त्यांचा सोवळेपणा नष्ट झालेला आहे. या विश्वात संपूर्णरीत्या पवित्र गोष्ट एकच आहे. ती म्हणजे भगवंताशी एकरुप झाल्यावरची समाधीवस्था!’ या उच्चारांमधून ब्राह्मणाने ‘सोवळ्यात’ रहावे या नेहमी वापरण्यात येणाऱ्या शब्दांचा एक वेगळाच अर्थ लागतो! असो.

परंतु या वस्तुस्थितीतही आपल्या उपजत परमदयाळू स्वभावामुळे सर्व संतांनी आपापल्या परीने त्यांच्या इष्टदेवतेचे वर्णन करण्याचा प्रयत्‍न केलेला आहे असे दिसून येते. याचे कारण असे की ज्या भगवंताशी एकरुप झाल्याने त्यांना जिवापलिकडील आनंद प्राप्त झालेला असतो त्या आनंदाला सर्व जगाला वाटण्याचा त्यांचा प्रयत्‍न होय. वरील विरहिणीमध्येसुध्दा माउली आपल्या आराध्याचे वर्णन करीत आहेत असे दिसून येते. अभंगामध्ये श्री ज्ञानदेव महाराज असे म्हणत आहेत की ‘सांवळ्या रंगात बांधलेल्या सावळ्या रुपाच्या सांवळ्या आकृतीने माझे मन पूर्ण वेधून घेतले आहे (१). मैत्रिणींनो, आता मी काही केले तरी या सांवळ्या रुपाचा ध्यास काही सुटत नाही. माझी सर्व इंद्रिये या एकाच रुपाच्या चिंतन करण्याच्या प्रयत्‍नांत एकरुप झालेली आहेत (२). या सांवळ्या रुपाचे तेज सांवळेपणाने झळकत आहे! जणू काळ्या रंगाच्या डोहात माझा कृष्ण सावळ्या तेजाने चमकत आहे (३) ज्ञानदेवाला श्री निवृत्तींच्या कृपाप्रसादाने सांवळ्यात सामावून जाण्याचा ध्यास लागला आहे (४).’

ज्या माउलींनी श्री ज्ञानेश्वरीत अनेक नवीन शब्द निर्माण करुन आपल्या भावनांना स्पष्टरीत्या मांडले त्यांनासुध्दा आपल्या भावावस्थेतील सांवळ्याचे वर्णन करीत असताना ‘सांवळा’ याशिवाय दुसरा कुठलाही शब्द वापरावासा वाटला नाही यातच भगवंताचा अनिर्वाच्यपणा स्पष्ट होतो. बावन्न भाषांवर पूर्ण प्रभुत्व असलेल्या माउलींनाही ‘सावळा’ या शब्दाशिवाय दुसरा एकही शब्द त्यांच्या शब्दसंपत्तीमधून वापरावासा वाटला नाही हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. भगवान कृष्ण कृष्णरुप आहे याशिवाय माउली सांगू इच्छित नाही तर दुसरे कोण काय बोलणार? हीच गोष्ट अनंत काल चालू आहे. आपले वेदसुध्दा ‘हे नाही, ते नाही’ यापलिकडे भगवंताचे वर्णन करु शकले नाहीत. ख्रिश्चन धर्मातही अशी कथा आहे की साडे-तीन हजार वर्षांपूर्वी जेव्हा आपल्या योग्य अनुयायांना मार्गदर्शन मिळावे म्हणून मोझेसने सिनाई पर्वतावर जाऊन भगवंताची आराधना केली आणि देवाने त्याला एका झुडुपातील अग्नीरुपात दर्शन दिले व लोकांना उपदेश म्हणून ‘दहा आज्ञा (Ten Commandments)’ दिल्या. तेव्हा मोझेसने देवाला विचारले की ‘तूच मला भेटलास यावर लोकांचा विश्वास बसावा म्हणून मला तुझे वर्णन करावे लागेल. तर तू कसा आहेस म्हणून मी त्यांना सांगू?’ तेव्हा त्याला उत्तर मिळाले ‘मी माझ्यासारखा आहे हे त्यांना सांग! (I am that I am)’. अहो अनादीकाळापासून भगवंताचे वर्णन असेच होत आहे. परमार्थामध्ये दुसऱ्याच्या वर्णनाचा आधार घेऊन भगवंताशी भेट होत नाही तर सद्‍गुरुकृपेमुळे स्वतःला ध्यास लागल्यावर होते असे माउली आपणास अभंगाच्या शेवटच्या चरणातून सांगत आहे. माउली अभंगातून आपणास असे सांगत आहे की भगवंताचा ध्यास लागणे म्हणजेच गुरुकृपा झाली असे समजणे होय. या ध्यासानंतर स्वतःच्या पायावर उभे राहूनच भगवंतदर्शन घ्यायचे आहे. याकरीता जे पाठबळ लागते ते द्यायला आपले सद्‌गुरु समर्थ आहेतच!

॥ हरि ॐ ॥

2 Responses to माउलींची विराणी -७: कृष्णा सारखा कृष्ण आहे!

 1. sandeep म्हणतो आहे:

  नमस्कार श्रीधर जी

  आपल्या ४ ऑक्टोबर च्या लेखात आपण म्हटले आहे. की ज्ञानेश्वरी माऊलींना ५२ भाषा अवगत होत्या तरी त्यांनी विठ्ठलाला सावळ्या म्हटले . आपण कृपया सांगु शकाल का त्या काळी माउलीं ना कोणत्या भाषा येत होत्या.

  हे मी जाणू ईच्छितो . सर्व नाही तरी आपणास ज्या माहीती असतील त्या सांगाव्या

  आपला वाचक

  संदीप

 2. Shreedhar म्हणतो आहे:

  संदिप,
  परंपरेनुसार असे मानले जाते की श्रीज्ञानेश्वरीत छपन्न भाषेतील शब्द आहेत. (बहुतेक श्री नामदेवांच्या एका अभंगामध्ये अशा पध्दतीचा उल्लेख आहे). काही काळापूर्वी मी कुठेतरी यावर एक विद्वत्ताप्रचुर लेख वाचला होता. आता त्याचा नक्की संदर्भ आठवित नाही. त्या आलेल्या निरनिराळ्या भाषांच्या शब्दांचा कोशही केलेला आहे असे वाचनात आलेले आहे. मराठी, संस्कृत, फारसी, उर्दू, कोंकणी, गुजराथी, अहिराणी, वगैरे भाषांवर श्रीज्ञानेश्वरांचे प्रभुत्व होते असे मानले जाते.
  श्रीधर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: