माउलींची विराणी – ८: सर्व सुखाचे मूळ

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

त्रिभुवनींचे सुख पाहावया नयनीं । दिनरात्रीं धणी न पुरे माझी ॥ १ ॥

विटेवरी सांवळा पाहतां पैं डोळां । मन वेळोवेळां आठवितु ॥ २ ॥

सागरीं भरीतें दाटे तैसे मन नटे । वाट पाहों कोठें तुझी रया ॥ ३ ॥

बापरखुमादेविवरु पूर्ण प्रकाशला । कुमुदिनी विकासला तैसे जालें ॥ ४ ॥

या जगात वैविध्य ठासून भरलेले आहे. इथे कुणी श्रीमंत आहे तर त्याच्या एका बंधूला दोन वेळच्या खाण्याची ददात आहे. कोण आपल्या कुटुंबियांबरोबर रहात आहे तर आणखी कुणी नोकरीनिमित्त स्वकियांपासून दूर परदेशी जाऊन एकटा रहात आहे. येथील एक राजा आहे तर अनेक रंक आहेत आणि नैतिकतेचा पुतळा असलेल्यांचे शेजारी गुन्हेगार आहेत. परंतु या सर्व विभिन्नतेमध्ये एक समानता आहे. ती म्हणजे सर्वांची आपापल्या परीने जीवनात सुख शोधण्याची चाललेली धडपड. प्रत्येकजण आपली बुध्दी चालवून स्वतःला जे पटेल त्याप्रमाणे सुखी राहण्याचा प्रयत्‍न करीत आहे. भरपूर चावी दिलेल्या खेळण्याला जमिनीवर ठेवले की त्याच क्षणी जिकडे तोंड असेल तिकडे जोराने पळू लागते. त्याचप्रमाणे जन्मापूर्वीच आपल्या मनात स्वसुखाच्या आस्थेचा इतका ताण भरलेला आहे की जन्माला आलेल्या क्षणापासून आपण सुखाचा उपभोग घेण्यास सतत पळत आहे. पाठीवर जीवघेणे ओझे लादलेल्या गाढवासमोर एका काठीला गाजर टांगून ठेवतात आणि त्याच्या प्राप्तीच्या आशेत तो भरभर चालायला लागतो असे म्हणतात. त्याचप्रमाणे भूतकाळात मिळलेल्या सुखाला स्वाहा करुन आपले मन भविष्यातील आनंदाची तरतूद करण्यास वर्तमानकाळात आपणास नाना प्रकारे नाचविते. या सर्व गडबडीमध्ये आपण मूलभूत प्रश्न विचारायचे विसरतो. ते म्हणजे, या जगात इतक्या विविध प्रकारची सुखे भरुन ठेवलेली आहेत त्या सर्वांमध्ये काही समानता आहे का? की प्रत्येक सुख आपल्या स्वतंत्र पायावर उभे आहे? हे प्रश्न मूलभूत आहे असे म्हणण्याचे कारण असे की समजा सर्व सुखांचे मूळ एकच असले तर सूज्ञ मनुष्य त्या पायाला प्राप्त करण्याचा प्रयत्‍न करील. तलावावरील तरंगावर हेलकावे खाण्यापेक्षा खोल डुबकी मारुन शांत पाण्यात मासा राहतो तसे आपण एका मागे एक सुखांच्या शोधापेक्षा सर्व सुखांच्या मूळालाच कवटाळून बसू.

आपल्या मनात हे प्रश्न उद्भवतसुध्दा नाहीत याचे कारण दृष्य जगतातील उपरोनिर्दिष्ट वैविधता होय. ज्याप्रमाणे पत्यांची जादू करणारा मनुष्य आपले व्यवधान बोलण्यात गुंतवून हळूच दुसरीकडे हातचलाखी करतो त्याचप्रमाणे आपल्या नजरेसमोरील विविधता त्यांच्यामध्ये काही साम्य असेल या भावनेला उद्भवूदेखील देत नाही. कल्पना करा की कचेरीमधून दमून आल्यावर हसतमुख पत्‍नीच्या हातून मिळालेल्या गरम-गरम चहाच्या प्यालातील आनंद आणि ती माहेरी गेल्यावर शेजारणीशी खेळकरपणे मनसोक्‍त गप्पा मारण्यातील सुख आणि त्या दोघींना पूर्ण विसरुन भगवंताच्या उपासनेत संपूर्णपणे मग्न होण्यामधील मिळालेले समाधान यामध्ये काही समानता असू शकेल याची आपण कल्पनातरी करु शकतो का?! परंतु आपल्या जीवनातील सर्व सुखांमध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे प्रत्येक सुखी क्षण आपल्या मनाची अजून काही शोधण्याची धडपड थांबलेली असते तेव्हाच येतो.

जरा विचार केल्यावर आपल्या लक्षात येईल की जेव्हा केव्हा आपणास आनंद होतो तेव्हा त्या आधी ‘आता अजून काही हवे आहे’ ही भावना आपल्या मनातून गेलेली असते आणि आपले मन त्या स्तब्धतेमध्ये विलीन हो‍उन गेलेले असते. काय गंमत आहे बघा. जे मन सुख मिळविण्यासाठी आपणास नाना संकटातून नाचविते ते स्वतः कधीही सुखाचा उपभोग घेऊ शकत नाही (कारण त्या प्रत्येकवेळी तो ‘मनोरुपी पटु’ फाटलेला असतो). मिठाची बाहुली अथांग सागराचा तळ शोधण्यास गेली असता स्वतःच्या अस्तित्वाच्या लोपामध्येच सत्य प्राप्त करते तशी ही गोष्ट आहे. मग परत स्वतंत्र अस्तित्व आल्यावर त्या बिचाऱ्या मनाचा सुखाचा शोध सुरु होणारच. कारण त्याने फक्‍त भूतकाळात मिळालेल्या सुखाची गोष्ट ऐकलेली असते, प्रत्यक्ष काहीच अनुभवलेले नसते! आता असे बघा की ज्यावेळी आपले मन नष्ट होते त्या प्रत्येकवेळी आपण भगवंतानजीक असतो. ही भगवंतप्राप्तीची व्याख्याच आहे असे समजा. म्हणूनच माउली आपल्या वरील अभंगामध्ये भगवंताच्या निर्गुण रुपाला ‘त्रिभुवनींचे सुख’ या नावाने पुकारत आहे. भगवंत म्हणजे केवळ सात्विक लोकांचे सुख नसून या सर्व जगातील यच्चयावत सुखांचा पाया तोच आहे हे ध्यानात घ्या. म्हणूनच संत असे म्हणतात की सर्व विश्व एकाच भगवंताच्या ध्यासात आहे.

वरील विरहिणीमध्ये माउली म्हणत आहे: ‘या त्रिभुवनातील सर्व सुखांचा पाया असलेल्या निर्गुण भगवंताला नयनांनी प्रत्यक्ष पाहण्यासाठी दिवसरात्र माझी आस्था फोफावत आहे (१). (पंढरपुरी) विटेवर उभा असलेल्या सांवळ्याला डोळा भरुन बघितल्याची आठवण मनात वारंवार येत आहे (२) पूर्ण भरलेल्या सागरालाही जलौघांनी पाणी आणावे असे वाटते त्याप्रमाणे तुझ्या आठवणींने पूर्ण झालेल्या मनाने मी वाट बघत आहे की तुझी मूर्ती कुठे दिसेल (३) (तुझ्या दर्शनाने) श्री ज्ञानदेवांना सुखाची पूर्ण प्राप्ती झाली आहे, आणि ज्याप्रमाणे रविउदयाबरोबर कमळ संपूर्णरीत्या विकसित होते त्याप्रमाणे मतीची स्थिती झाली आहे (४).’

आपल्या मनाची दोलायमान स्थिती जेव्हा निर्गुण भगवंताच्या सान्निध्याने नष्ट हो‍उन स्थिरता प्राप्त होते तेव्हा सुख मिळते. आणि त्यात सगुण रुपाची आस्था असणे म्हणजे पूर्ण भरलेल्या सागरामध्ये वर्षाऋतूतील ओसंडून वहात असलेल्या गंगेने आणलेले पाणी मिसळल्यासारखे होते. अशावेळी आपली मर्यादा न सोडता तो सागर अधिकच उचंबळून येतो आणि त्याचे रुप अधिकच भव्य होते. अगदी त्याचप्रमाणे विठ्ठलाच्या दर्शनाने संतांच्या हृदयाला भर येतो असे माउली म्हणत आहे! जसा सागर आधीच पूर्ण होता त्याचप्रमाणे संतही अनुसंधानात संपूर्णच असतात. आणि अशा स्वरुपानुसंधानात मग्न असलेल्या स्थितीत संतांच्या चित्ताचे अर्धवट उमलेले कमळ सुंदर असते यात शंकाच नाही. पण सगुण रुपाच्या ध्यासात ते जेव्हा संपूर्ण उमलते तेव्हा त्याचे सौंदर्य अधिकच बहरुन येते. श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की ‘स्वतः साखर होण्यात मला आनंद वाटतोच पण ती साखर चाखण्यातसुध्दा कधी कधी रस वाटतो!’. अलंकापुरीत आत्मानंदात डुंबत असणाऱ्या माउलीला पंढरपुरला जाण्याची आस लागते ती कुठल्या कारणाने हे इथे स्पष्ट होत आहे असे वाटते.

॥ हरि ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: