माउलींची विराणी – ९: करुणापर आळवणी

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

रंगा येईवो ये रंगा येईवो ये । विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई ॥ १ ॥

वैकुंठनिवासिनी वो जगत्रयजननी । तुझा वेधु ये मनी वो ॥ २ ॥

कटीं कर विराजित मुगुटरत्‍नजडित । पीतांबरु कासिया तैसा येई कां धावत ॥ ३ ॥

विश्वरुप विश्वंभरे कमळनयने कमळाकरे वो । तुझे ध्यान लागो बापरखुमादेविवरे वो ॥ ४ ॥

आपण जे बीज पेरु त्याचप्रमाणे पीक येते आणि हाच नियम आपल्या सर्व कर्मांनासुध्दा लागू होतो. आपल्या कर्मफलाचे रुप निव्वळ दृष्य कर्मांवर ठरत नसून केलेल्या कृतींमागे आपला हेतू कुठला होता यावर जास्त अवलंबून असतो. उदाहरणार्थ, एखाद्या कसायाने मरणास टेकलेल्या बोकडाचा जीव वाचवून त्याला पुष्ट केले असे सकृतदर्शनी सात्विक कर्म केले तरी त्यामागील हेतू नंतर त्याचे मांस विकून उदरभरण करण्याचाच असल्याने या वरकरणी सात्विक वाटणाऱ्या कर्मांचे फल तामसिकच होते, त्याला मोक्षपदास नेण्यास उपयुक्‍त होत नाही. या उदाहरणामध्ये एक सूक्ष्म गोष्ट दडलेली आहे ती आपण ध्यानात घेतली पाहिजे. ती म्हणजे वरील उदाहरणात कसायाला स्वहेतूची पूर्ण जाणीव असल्याने ‘मी किती पुण्य केले आहे’ असे तो स्वतःसुध्दा म्हणत नाही. परंतु समजा त्याचा ‘मी बोकडाच्या भल्यासाठीच हे सर्व करत आहे’ असा गैरसमज झाला असता तरीसुध्दा त्याचे कर्मफल बदलणार नाही! कारण त्याने काहीही म्हटले तरी सत्य परिस्थिती बदलत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपणास स्वतःच्या साधनेबद्दल कितीही चांगली समजूत असली तरी सत्यपरिस्थिती भिन्न असली (आणि ती भिन्न असतेच!) तर आपणास भगवंतचरणकमलप्राप्तीचे फल मिळत नाही. सर्वसाधारणपणे वस्तुस्थिती अशी असते की आपणही त्या कसायाप्रमाणेच कुठल्यातरी फलांकडे नजर ठेवून वरकरणी सात्विक दिसणारी पारमार्थिक साधना करीत असतो. याचे एक उदाहरण म्हणजे आपण सद्‌गुरुंना मान देतो हे खरे पण त्यांनी कसे वर्तन करावे याबद्दलच्या आपल्या मनातील अपेक्षांची जाणीव कितीजणांना असते? ज्यावेळी आपल्या गुरुंनी अमुक एक वर्तन कसे केले अशी शंका आपल्या मनात येते त्या प्रत्येकवेळी आपल्याच मनातील अपेक्षांचे दर्शन होत असते. आणि त्यांच्यामुळे आपणास साधनेचे फल न मिळता आपण भक्‍तीप्रेमाच्या अमृतवर्षावापासून कोरडेच राहतो.

तेव्हा लक्षात घ्या की आपण किती खडतर साधना केली यापेक्षा आपला साधनेचा हेतू किती पवित्र आहे यावर आपली प्रगती जास्त अवलंबून आहे. आपण साधनेला सुरुवात का केली याला फारसे महत्व नाही. परंतु सद्‍गुरुंबाबत ‘व्यावहारिक अडचणींवर मात करण्यासाठी एक समर्थ शक्‍ति’ हाच दृष्टीकोन आयुष्यभर ठेवला तर आपली साधनेतील प्रगती एका ठराविक पातळीच्या पुढे जाणार नाही यात शंका नाही.

काही साधक गुरुंच्या मदतीने आपल्या सुरुवातीच्या अडचणींवर मात करुन आता परत संसाराकडे बघायचे नाही असा सुनिश्चय करतात. परंतु अशा भाग्यवान साधकांमध्येही बहुतेकजण आपल्या गुरुंकडे ‘भूतकाळात अडचणींवर मात करण्यास मदत करणारे व भविष्यात भगवंतदर्शनाचा मार्ग दाखविणारे’ या कृतज्ञतायुक्‍त भावनेने बघत असतात. सकृतदर्शनी काहीच वावगे न दिसणाऱ्या या भावनेतूनसुध्दा वास्तविक आपण अजून संसारातून बाहेर आलेलो नाही हेच सिध्द होते हे लक्षात घ्या. त्यामुळे असे साधकही भगवंतभक्‍तिप्राप्तीपासून वंचित राहतात.

आता फारच विरळा साधक असे असतात की सद्‍गुरुंशी आपला संबंध कुठल्या निमित्ताने आला हे पूर्ण विसरुन त्यांच्याविषयीच्या निव्वळ प्रेमापोटी त्यांच्या सान्निध्यात राहतात. ज्याप्रमाणे न चुकता आणि विनाहेतू आपण मित्रांशी गप्पा मारायला दर संध्याकाळी नाक्यावर जातो त्याप्रमाणे ते आपली साधना नित्यपणे करतात. साधनेतून काय मिळाले, काय मिळणार आहे आहे वगैरे विचार त्यांच्या मनातसुध्दा येत नाहीत. हे साधक सद्‍गुरुंबद्दलच्या प्रेमात सतत न्हाऊन आपल्यातील सर्व मनोमळांना दूर सारतात आणि ध्येयाला सहजपणे गाठतात! श्रीसंत गोंदवलेकर महाराज म्हणायचे की ‘इथे इतके जण येतात, पण रामनामाची गोडी मनाला लावून घेऊन स्वतःचे सार्थक करुन घेणारे श्री ब्रह्मानंदांसारखे विरळाच आहेत!’ थोडक्यात सांगायचे म्हणजे ज्या साधकांचा साधनेमागील हेतू प्रेमाशिवाय दुसरा नसतो त्यांना आणि त्यांनाच भगवंतभक्‍तीची प्राप्ती होते. कारण निर्हेतुक प्रेमामध्येच भगवंत आहे.

आपल्या मनात भगवंताबद्दलचे निर्मळ प्रेम उद्भवणे हीच खरी गुरुकृपा आहे. एकदा ही कृपा झाली की भक्‍त भगवंताची कशी आळवणि करतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माउलींची वरील विरहिणी आहे. या स्थितीसाठी भगवंताच्या येण्यातच आपले सर्वस्व आहे ही भावना जागृत हवी! वरील अभंगातून माउली म्हणत आहे की: ‘हे पांडुरंगा ये रे, पांडुरंगा ये. माझी विठाई, कृष्णाई (ये ये तू आता ये) (१). ज्यापासून या त्रिभुवनांची निर्मिती झालेली आहे आणि जो वैकुंठात रहात आहे, त्या तुझ्या रुपाचाच ध्यास या मनात भरलेला आहे (२). भरजरी पीतांबर नेसून, रत्‍नजडित मुकुट घालून कंबरेवर हात ठेवलेल्या रुपात जसा आहेस तसा धावत ये (३) ज्याने आपल्या रुपाने हे विश्व पूर्ण भरलेले आहे आणि म्हणून विश्वरुप झाला आहे त्याच्या कमळधारी रुपाच्या सुंदर नयनांच्या ध्यानात श्री ज्ञानदेवांना जीवनाचे सर्वस्व वाटू दे (हीच प्रार्थना आहे) (४).’

अहो, भगवंताबद्दल असे निर्मळ प्रेम असलेल्या साधकामध्ये आणि भगवंतात काय फरक असतो? ज्याक्षणी हे पवित्र प्रेम उद्भवते त्याचक्षणी तो आपल्यामध्ये आलेलाच आहे! म्हणूनच स्वामी विवेकानंद जेव्हा पहिल्यांदा श्री रामकृष्ण परमहंसांकडे गेले तेव्हा त्यांना आपला जिवलग भेटल्यासारखा आनंद झाला आणि ‘अरे, इतके दिवस तू कुठे होतास?’ असे म्हणून स्वामींच्या गळ्यात हात घालून त्यांनी अश्रू ढाळले! तसे बघायला गेल्यास श्री रामकृष्ण परमहंसांकडे अनेक साधक सदा यायचे. परंतु त्यांची सत्‍संगाची भूक त्यांच्या सहवासात भरुन निघायची नाही. ते म्हणायचे ‘मी इथे रत्‍न, माणके द्यायला बसलो आहे आणि माझ्याकडे हिग-जीरे विकत घेण्यात रस असणारेच येत आहेत!’ त्यातच श्रीकालीमातेने दृष्टांत देवून तुझे खरे शिष्य येणार आहेत हे दाखविलेले असल्याने त्यांची वाट बघण्यात ते अगदी कासावीस व्हायचे. संध्याकाळ झाली की दक्षिणेश्वर मंदिराच्या छतावर जाऊन आक्रोश करायचे की ‘अजून एक दिवस गेला पण अजून तुम्ही आला का नाहीत?’ श्री रामकृष्णांची त्यांच्या ‘आतल्या गोटातील’ भक्‍तांची अशी वाट म्हणजे बघणे भगवंताची वाट बघण्यासारखेच आहे यात शंका नाही. या पार्श्वभूमीवर जेव्हा स्वामी ठाकुरांना प्रथम भेटले तेव्हा त्यांना असा पराकोटीचा आनंद होणे साहजिकच आहे. अर्थात, स्वामींना या पार्श्वभूमीची काहीच कल्पना नसल्याने कुठल्या वेड्या माणसाकडे मी आलो आहे असेच वाटले! परंतु आपण बघितलेले आहेच की स्वामींना आपल्यामधील पवित्रतेची जाणीव नसली तरी ते सत्य बदलले नव्हते! त्या सत्याच्या प्रभावानेच श्री रामकृष्णांना हर्षाचा अत्यावेग झाला. सद्‍गुरु दिसताक्षणी असा आवेग ज्यांच्या मनात येतो त्यांची साधना फळास आली असे समजावे.

॥ हरि ॐ ॥

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: