माउलींची विराणी -१०: सद्‍गुरुंची चरणसेवा हाच विठ्ठलाचा ध्यास

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

भेटिसी गेलिये तंव तीच जालिये । भुलली ठेलिये मज न कळे काही ।

जंव मागुता न्याहाळी । तंव काळी ना सावळी, मूर्ति चोजवेना ॥ १ ॥

काय सांगो माये न कळे तयाची सोये । येणे मनाचे मोडुनि पाये, वेधियेले ॥ २ ॥

आंतु बाहेरी कैसी भरलेनि अंगे । क्षेम देऊ गेले अंगे, तंव तो जडूनि ठेला ।

वारिता नावरे काय सांगो माय गोटी । करुनि ठेला साठी, जीवित्वेसी ॥ ३ ॥

आशेचिये हावे तंव तो परतीचा धावे । निराशेसी पावे, वेळु न लागता ।

बापरखुमादेविवरु विठ्ठली उपावो । ज्ञानदेवा भावो, निवृत्तीपायीं ॥ ४ ॥

श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की ‘अद्वैतप्रणाली सर्व तत्वज्ञानांचे अंतिम रुप आहे. द्वैत, विशिष्टाद्वैत वगैरे प्रणाली चुकीच्या नसून साधकाच्या प्रगतीचे ते टप्पे आहेत. परंतु त्या अंतिम अवस्था नसून साधकाने कुठल्याही मार्गाने साधना केली तरी त्या सर्वांची पराकोटी अद्वैतातच होते.’ श्री रामकृष्ण परमहंसांनी केवळ भारतीय सनातन धर्मांतील विभिन्न मार्गांनुसारच साधना केली होती असे नसून त्यांनी मुस्लीम व ख्रिश्चन धर्मांच्या नियमांचे पालन करुन त्यांचे अंतिम ध्येयही गाठले होते (मुस्लिम धर्माच्या मार्गाचे पालन करताना त्यांना अत्यंत प्रिय असलेल्या श्री कालीमातेच्या दर्शनातला रसच त्यांच्यातून निघून गेला होता!). त्यामुळे त्यांच्या या उच्चारांमागील स्वानुभवयुक्‍त सत्यतेचे पाठबळ अधिकच मजबूत आहे यात शंका नाही. ‘ज्याप्रमाणे एकाच नदीला अनेक घाट असतात आणि ते सर्व एकाच पाण्याचे प्राशन करण्यास मदत करतात, त्याचप्रमाणे एकाच भगवंताच्या निरंतर सान्निध्यासाठी विभिन्न धर्मांचे निरनिराळे मार्ग आहेत’ असे ते नेहमी म्हणायचे. साधकाच्या मनात गुरुपोनिर्दिष्ट साधनेचा अभिमान जरुर असावा, परंतु त्या भावनेचे रुपांतर एकांगीपणात होत नाही याबद्दल त्याने सावध राहणे आवश्यक असते. याकरीता आपण स्वतःच्या मार्गामध्ये अडकून न राहता तो मार्ग आपणास कुठे नेत आहे इकडे लक्ष ठेवणे उपयुक्‍त होते. संस्कृतमधील ‘ध्यानमूलम्‌ गुरुर्मूर्ती, पूजामूलम्‌ गुरोपदम्‌। मंत्रमूलम्‌ गुरोवाक्यम्‌, मोक्षमूलम्‌ गुरोकृपा ॥’ या श्लोकामध्ये असे स्पष्टपणे सांगितले आहे की गुरुकृपेशिवाय मोक्ष मिळणे अशक्य आहे. जोपर्यंत आपल्यावर सद्‌गुरुंची कृपा होत नाही तोपर्यंत आपल्यावरील मायेचे वर्चस्व दूर होणार नाही. आणि या सर्वव्यापी गुरुकृपेमध्येच अनंत साधनामार्ग लोप पाऊन एकत्रित होतात हे आपण निरंतर ध्यानात ठेवलेले बरे.

वरील अभंगामध्ये माउलींनी अशाच एका साधनेचे अंतिम रुप दर्शविले आहे. द्वैतातील भक्‍तीमधून अद्वैतात कसे जाता येते याचे फार सुंदर वर्णन या विरहिणीमध्ये केले आहे. वृंदावनातील एका गोपीचा आधार घेऊन तिच्या अवस्थेचे वर्णन करीत माउली म्हणत आहे: ‘जेव्हा भगवंताच्या भेटीला मी गेले, तेव्हा मीच तो झाले, या अनाकलनीय करणीने माझी मति भुलून आता मला काही कळेनासे झाले आहे. त्यामुळे आता भगवंताकडे बघितल्यावर तो काळा आहे का सावळा आहे हे सुध्दा नीट उमगत नाही (१). सख्यांनो, त्याची लीला काय आहे हे कळणे अशक्य आहे. (ज्या मनाचा आधार घेऊन मी त्याचा ध्यास धरला होता त्या) मनाचा विध्वंस करुन याने मला त्याचे वेड कसे आणि कुठे लावले आहे हेच कळत नाही (२). त्याच्याच रुपाने आता मी आतून-बाहेरुन भरुन गेली आहे. त्याला मिठी मारावी म्हटले तर त्यासाठी जरुरी असलेले त्याच्यात आणि माझ्यातील अंतर नाहीसे होऊन तो माझ्यातच आला आहे (म्हणून ते शक्य नाही) आणि आता त्याला दूर ठेवावे असे म्हटले तरी ते शक्य होत नाही (कारण ते स्वतःलाच आपणापासून दूर करण्यासारखे आहे!). सख्यांनो काय तुम्हाला सांगू, त्याने माझे वेगळे अस्तित्वच जणू स्वतःत जमा करुन नष्ट केले आहे (३). त्याच्या पुनर्भेटीची आशा धरली की त्याचक्षणी तो आपल्या घरी परत जातो आणि निराशा संपूर्णरीत्या मनात भरली की तो लगेच जवळ येतो (हे माझ्या ध्यानात आले आहे!). (या विरहिणीचा हा अनुभव पाहून) श्री ज्ञानदेवांना विठ्ठलप्राप्तीचा उपाय सापडला! तो म्हणजे श्रीनिवृत्तीनाथांची सेवा होय (४).’

वरील अभंगामधून माउली आपणास सांगत आहेत की भक्‍तीमार्गाने होणारी भगवंताची प्राप्ती घरात एखादी नवीन वस्तू आणून ठेवल्यासारखी न होता त्याच्यामध्ये आपल्या अस्तित्वाचे विलीन होण्यातच होते. श्री रामकृष्ण परमहंस आपल्या कालीमातेची पूजा करीत असताना भावावस्थेत जाउन स्वतःलाच गंध लावायचे व देवीचा प्रसाद स्वमुखात ठेवायचे. त्यांच्या ‘वेडेपणाची’ तक्रार दक्षिणेश्वर मंदिराच्या मालकाकडेसुध्दा गेली होती! आता स्वतःच्या अस्तित्वाचा नाश होण्यात आपल्या सर्व आशा-आकांक्षांचे नष्ट होणार हे वेगळे सांगायची जरुरी नाही. त्यामुळे जोपर्यंत मनात आशा आहे तोपर्यंत भगवंत आपल्यापासून दूरच राहणार हे स्पष्ट आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्या मनात कुठल्यातरी गोष्टीचा हव्यास आहे तोपर्यंत भगवंत आपल्यापासून दूरच राहतो. आपल्या मनाचा कुठल्यातरी गोष्टीचा ध्यास धरणे हाच स्वभाव असल्याने भगवंताची प्राप्ती आपणास होणे अशक्य आहे असे आपणास वाटणे साहजिकच आहे. परमदयाळू माउलींनी म्हणूनच आपणास या न्यूनगंडातून बाहेर काढण्यासाठी मनाला कुठला ध्यास ठेवण्याची परवानगी आहे हे सांगितले आहे. आपल्या सद्‌गुरुंच्या चरणांवर जेव्हा आपली नजर स्थिर होऊन बाकी सर्व इच्छा-आकांक्षांचा नाश होईल तेव्हा आपोआप विठ्ठलप्राप्ती होईल असे माउली अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणत आहे. श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की जर स्वतःचे अस्तित्व वेगळे ठेवायचेच असेल तर ते भक्‍त या रुपात ठेवावे. याने साधकाला बाधा उत्पन्न होत नाही. या अभंगाद्वारे माउलींनी भक्‍त म्हणजे काय याची फार सोपी व्याख्या आपणास दिली आहे: ती म्हणजे सद्‍गुरुंच्या आज्ञेचे तंतोतंत पालन निरपेक्षपणे जो करतो तोच भगवंतभक्‍त होय. अभंगातील शेवटच्या चरणात त्यांनी ‘ज्ञानदेव’ या नावाने स्वतःचे शिष्यत्व दाखवून सर्वशिष्यांना मार्ग दर्शविला आहे असे वाटते (याशिवाय स्वतःला दोन नावांनी संबोधायचे उद्दिष्ट काय असणार?). या दृष्टीने पाहील्यास, या रचनेत आलेला ‘निराशा’ हा शब्द नकारात्मक नसून सद्‍गुरुंवरील विश्वास दर्शविणारा या अर्थाने पूर्णपणे अतिशय सकारात्मक आहे. ज्या साधकाचे ध्येय गुरुवचनाचा अर्थ जाणून घेऊन त्याप्रमाणे वर्तन करण्यात स्थिर झाली आहे तो अर्जुनाप्रमाणे आपले लक्ष्य साधणार (मग ते दूरवरील पक्ष्याच्या डोळ्यासारखे सूक्ष्म असले तरी हरकत नाही!) हे माउलींचे आश्वासनच या अभंगातून आपणास मिळाले आहे!

॥ हरि ॐ ॥

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: