माउलींची विराणी -११: सर्व सुखाचे मूळ

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

जीवाचिया जीवा प्रेमभावाचिया भावा । तुज वांचूनि केशवा अनु नावडे ॥ १ ॥

जीवें अनुसरलिये अझून का नये । वेगी आणा तो सये प्राण माझा ॥ २ ॥

सौभाग्यसुंदरु लावण्यसागरु । बापरखुमादेविवरु श्रीविठ्ठलु ॥ ३ ॥

 

उन्हाळ्याचे दिवस आले की घरातील बायकांना वर्षभराचे लोणचे भरुन ठेवायचे वेध लागतात. कच्च्या, करकरीत कैऱ्या निवडून त्यांचे लोणचे चिनी मातीच्या सटांमध्ये दादरा लावून भरले की त्यांची वर्षभराची तोंडीलावण्याची सोय होते. गॅसवर तापवून निर्जंतुक केलेल्या चमच्याने भरलेल्या बरण्यांतून मोजकेच लोणचे बाहेर काढून त्या वर्षभर लोणचे टिकेल याची खात्री करतात. प्रत्येक लोणच्याच्या बरण्यासुध्दा ठरलेल्याच असतात. आंब्याच्या लोणच्याच्या बरणीत पुढल्या वर्षी लिंबाचे लोणचे भरुन ठेवले जात नाही. आपल्या मनाची अगदी अशीच अवस्था असते. नेहमीच्या जीवनातून आनंद मिळविण्यासाठी जरुरी असलेल्या विषयरुपी लोणच्याच्या भरणीस आपल्यास जणू संपूर्ण वर्षभर आपणासाठी उन्हाळाच असतो! त्यामुळे जेव्हा इंद्रियांच्या दृष्टीस विषय पडतो तेव्हा दरवेळी तो आपलासा करुन जवळ ठेवण्यासाठी मनाची धावाधाव सुरु होते. जरा विचार केला की असे लक्षात येते की संपूर्ण आयुष्य आपण एका मागे एक अशा विषयभरणीतच घालविले आहे. भविष्यात सुखाची चव हवी असली की आपण भूतकाळात जमा केलेल्या विषयांपैकी एखादा बाहेर काढून त्याच्या चवीत आनंद मिळविण्याचा प्रयत्‍न करतो. आता काही भाग्यवान साधक असे असतात की त्यांना स्वतःच्या सुख मिळविण्याच्या या प्रक्रीयेमागील पाया जाणून घ्यायची उत्सुकता लागते. कधी रविवारची पुरवणी वाचून, तर कधी सचिन शतक ठोकताना पाहून, कधी चमचमीत मिसळ खाऊन तर कधी जिवलगाबरोबर वेळ घालवून जी सुखे मिळतात ती कुठल्या आधारावर उभी आहेत? हा प्रश्न त्यांच्या मनात डोकावू लागतो. अशा आणिबाणीच्या क्षणी सत्संगती लाभून त्यायोगे गुरुकृपेचा अनुभव मिळाला तर साधकाच्या लक्षात येते की भगवंताचे अस्तित्व नसते तर या जगात कुणालाच कधीही सुख लाभलेच नसते. त्या ज्ञानाच्या बळावर तो आपणास सुख कसे लाभेल याबद्दल विचार न करीता ‘आपणास सुख लाभू शकते’ हे आपण कुठल्या समजुतीवर ठरविले इकडे लक्ष द्यायला लागतो! त्याच्या लक्षात येते की या जगात कुठलाही प्राणी वा वस्तू अशी नाही की जीला सुख लाभणे अशक्यच आहे असे वाटत आहे. प्रत्येकाला खात्री आहे की अमुक-अमुक प्रयत्‍न केले तर सुख मिळण्याची शक्यता आहे. (ते सुख प्रत्यक्षात त्यांना मिळेल का नाही ही बाब वेगळी आहे!) प्रत्येक जीव आपले अस्तित्व या समजुतीच्या पायावरच उभे करीत आहे. या दृष्टीने पाहिल्यास असे म्हणता येईल की प्रत्येकजण आपणास भगवंत लाभू शकेल या विश्वासावरच जगत आहे.

या परिस्थितीत अशा काही सिध्द व्यक्‍ती जन्माला येतात की इतरांच्या या जगातील धडपडींकडे बघून लगेचच त्यांना वरील सत्याची जाणीव होते. या जगात सुख आहे असे आपणास वाटते या घटनेमधूनच ते भगवंताच्या अस्तित्वाची चाहूल घेतात व त्याच्या प्राप्तीकरीता त्यांचा जीव कासाविस व्हायला लागतो. वरील अभंगातून माउली एका गोपिकेच्या रुपकातर्फे अशा साधकांची भावावस्था प्रगट करीत आहे असे वाटते. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की: ‘आपण जीवंत आहोत या भावनेला आणि या जगात प्रेम नावाचा भाव अस्तित्वात असण्याला जे अधिष्ठान आहे त्या भगवंतावाचून मला दुसरे काहीही अणुमात्र आवडेनासे झाले आहे (१). माझ्या जीवाला त्याच्याबद्दल इतका कासाविसपणा आलेला असूनही अजून मला भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन का होत नाही? सख्यांनो तुम्ही तुमच्या योगबळानेतरी त्या भगवंताला मजपाशी लवकरात लवकर आणा, त्याच्यावाचून माझे प्राण जायची वेळ आलेली आहे (२) श्री ज्ञानदेवांना केवळ श्रीविठ्ठलच सर्व सोभाग्याचे आणि सर्व सौंदर्याचे मूळरुप आहेत असे स्पष्टपणे उमजून आलेले आहे (३).’

भगवंताच्या प्राप्तीची वा संतांच्या सहवासाची ओढ आपणास इतक्या निर्मळ कारणासाठी जेव्हा लागते तेव्हा परमार्थाचे ध्येय दूर नसते. ज्याप्रमाणे एखादा शास्त्रज्ञ समोरील घटनेमागील तत्व निव्वळ ज्ञानप्राप्तीसाठी जाणून घ्यायचा प्रयत्‍न करतो त्याचप्रमाणे आपण सर्व सुखाचे मूळ काय आहे याचा शोध घ्यायला सुरुवात केली पाहीजे. भगवंताकडे मागण्यांची यादी घेऊन वा सद्‍गुरुंकडे व्यावहारिक अडचणी घेऊन जाण्यामध्ये आपण सुखाच्या मूळापासून दूर हो‍उन त्याच्या एक ठराविक दृष्य रुपामध्ये अडकत आहोत हे ध्यानात घ्या. श्री रामकृष्ण परमहंसांकडे अनेक श्रीमंत मारवाडी लोक प्रसाद घेऊन जायचे पण त्याचे भक्षण ते ना स्वतः करायचे ना आपल्या खास शिष्यांना करुन द्यायचे! ते म्हणायचे की ‘त्यांनी दिलेल्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी आपल्या मागण्यांनी आच्छादिले आहे. एकही वस्तू प्रेमापोटी दिलेली नाही!’ भगवंताकडे जेव्हा आपण मागणी करतो (मग ती कितीही उच्च पातळीची असो) तेव्हा आपणही श्री रामकृष्ण परमहंसांच्या त्या मारवाडी भक्‍तांप्रमाणे भगवंतप्रेमापासून दूर होतो. वरील अभंगातून माउली आपणास असे सांगत आहे की एक भगवंत जवळ आला की सर्व प्रेमभावच हातात आला, सौभाग्याचे भांडार आणि सौंदर्यामधील सुंदरता प्राप्त झाली. आता अजून काही हवे असे उरलेच नाही. इतक्या पवित्र आणि निर्मळ भावनेपोटी माउलींच्या ह्रुदयात विरहवेदना रुतलेली आहे हे आपण जाणून घेणे फार महत्वाचे आहे. खरे म्हणजे माउलींप्रमाणेच आपणा सर्वांनाही भगवंत जवळ हवा असे प्रामाणिकपणे वाटते. पण आपल्यातील विरहवेदनेचे मूळ त्याच्याद्वारे भौतिक वा मानसिक सुख मिळविण्यात आहे. आणि हा मूलभूत फरक आपणास भगवंतदर्शनापासून वंचित करतो. पंडित जसराजांच्या सुरेल स्वरांतून ‘मै तो कर आयी पियासंग रंगरलिया’ असे आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपणास आपल्या प्रियकराची आठवण होते, माउलींप्रमाणे भगवंताची वा सद्‍गुरुंची आठवण होत नाही. आणि यातच आपल्या विरहातील आणि माउलींच्या विराणीमधील फरक दडलेला आहे.

॥ हरि ॐ ॥

 

Advertisements

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s