माउलींची विराणी – १२: प्रेमाचे मूळ

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥


पंढरपुरींचा निळा लावण्याचा पुतळा । विठो देखियेला डोळां बाईयेवो ॥ १ ॥

वेधलें वो मन तयाचियां गुणीं । क्षणभर विठ्ठलरुक्मिणी न विसंबे ॥ २ ॥

पौर्णिमेचे चांदणे क्षणक्षणा होय उणे । तैसे माझे जिणें एक विठ्ठलेंविण ॥ ३ ॥

बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि पुरे । चित्त चैतन्य मुरे बाईये वो ॥ ४ ॥

या जगामध्ये कितीही प्रयत्‍न केला तरी प्रेमाशिवाय दुसरे काही दिसूनच येत नाही! आपल्या सर्वांचे अस्तित्व प्रेममयच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इथे काही सज्जन असे म्हणतील की हे खरे असेल तर आम्हास याची प्रचीती का येत नाही? या जगात सासू सुनेला, नवरा बायकोला तर छोटा मुलगा आपल्यापेक्षा लहानग्याला त्रास देत आहे ही वस्तिस्थिती प्रत्यक्ष दिसत असताना तुमचे म्हणणे आम्ही कसे योग्य मानू? या शंकेवर उत्तर म्हणजे प्रेम या शब्दाचा आपण फार संकुचित आणि सोज्वळ अर्थ मनात घेतो हा आहे. खरी गोष्ट अशी आहे की मनातील मिर्मळ, निर्गुण प्रेमाला आपण व्यवहारामध्ये जेव्हा वापरास आणतो तेव्हा आपल्या वैयक्‍तिक इच्छा-आकांक्षांच्या प्रदूषणांमुळे ती अतिपवित्र भावना कडूजहर हो‍उन येते आणि विपरीत दिसते. अहो, श्रीरामासारख्या भगवंतावरील प्रेमामुळे जर एखादा देश होरपळून निघत असेल तर स्वतःच्या सुंकुचित व्यक्‍तिमत्वावरील प्रेमाने आपले कुटुंबिय भरडून निघतील यात नवल ते काय? ज्याप्रमाणे विहिरीतील पाणी वरुन कचरा पडल्याने घाण झाले तरी मूळ पाण्याचा झऱ्यातील पाणी शुध्दच राहते त्याचप्रमाणे बाह्य संसारामध्ये विचित्र अवतारात प्रगट होण्यामुळे स्वतःमधील प्रेमाचे अस्तित्व अशुध्द होत नाही! कुठल्याही व्यक्‍तीच्या विचित्र वागण्यामागे तिच्या मनातील दुसऱ्या एखाद्या गोष्टीवरील प्रेमच दिसून येते. उदाहरणार्थ, सासूने सुनेला त्रास देण्यामागील महत्वाचे कारण आपले या घरावर असलेले वर्चस्व टिकून ठेवण्यावरील प्रेम आहे, पतीने पत्‍नीला स्वआज्ञेत ठेवण्यामागील स्वतःच्या शारिरीक सुखाला जपून ठेवण्याचे प्रेम आहे आणि आपल्यापेक्षा लहान मुलावर दादागिरी करण्यात आपली मनमानी करण्याबद्दलची आस्था आहे. जर आपल्याला खरोखर काही नको असेल तर आपण हातावर हात ठेवून स्वस्थपणे पडलो असतो. या जगातील आपली सर्व धडपड कुठल्या ना कुठल्यातरी हव्यासासाठीच आहे आणि मनाचा कुठलाही ध्यास आपल्यामधील निर्गुण प्रेमाचेच एक दृष्य रुप असतो. अगदी मद्यपानादी व्यसनेसुधा व्यक्‍ती आपल्या मनातील प्रेमाला व्यक्‍त करण्याच्या इच्छेपोटीच करतात. श्री रामकृष्ण परमहंस जेव्हा अपरात्री कलकत्याहून दक्षिणेश्वरी घोडागाडीने जात असत तेव्हा त्यांना कित्येकदा रस्त्यात मद्यपानाच्या धुंदीत झिंगून चालणारी माणसे दिसायची आणि ते दृष्य बघून ते भावावस्थेत जायचे व गाडीतून खाली उतरुन त्यांच्याबरोबर नाचायला लागायचे! लक्षात घ्या की आपण सर्वजण निव्वळ प्रेमाचे भांडार आहोत आणि स्वतःमध्ये दडलेले हे भांडार फोडून आतील अतीव सौख्यदायक भावनेचा उपभोग घेण्याच्या आपल्या उत्सुकतेमुळे आपल्या हातून या जगात अनंत प्रमाद घडत आहेत. आपलीच गोष्ट आपण दुसऱ्या व्यक्‍तिंच्या वा वस्तूंच्या मार्फत विकत घ्यायचा प्रयत्‍न करीत आहोत आणि या विसंगतीमध्ये सर्व दुःखाचे मूळ आहे.

कुणाच्या ‘प्रेमात पडलो’ हे शब्द आपण जेव्हा वापरतो तेव्हा आपण व आपल्यातील प्रेम यांच्यामध्ये असलेला स्वव्यक्‍तिमत्वाचा पडदा त्या व्यक्‍तीच्या द्वारे आपण फाडलेला असतो. म्हणूनच तुम्ही बघा की प्रेम म्हणजे काय असे कुणी विचारले तर आपण ‘स्वहिताकडे दुर्लक्ष करुन दुसऱ्याचा विचार करणे’ अशा पध्दतीचीच कुठलीतरी व्याख्या सांगतो. एखाद्या व्यक्‍तीकडे पाहून आपण आपले व्यक्‍तिमत्व जपायचे स्वतःवर घातलेले बंधन झुगारतो आणि प्रेमानंदात बुडून जातो. आपल्याकरीता ती व्यक्‍ती म्हणजे एक निर्मळ दर्पण बनलेली असते की ज्यात आपण स्वतःचे प्रेममयी रुप बघू शकतो. आणि आपण इतके मूढ आहोत की त्या आरशालाच आपण महत्व द्यायला लागतो! परंतु काही साधक असे असतात की मी प्रेमात पडलो आहे असे न म्हणता माझ्यातील प्रेम मला दिसून आले असे म्हणतात. आणि मग ते प्रेम निव्वळ एका ठराविक व्यक्ति वा वस्तू वा तत्वामार्फतच बघण्यात त्यांना रस वाटत नाही तर सदा त्या मधुर रसाचा आस्वाद घेण्याकडे त्यांचा कल राहतो. आपल्या सर्वांच्या या प्रेममय अस्तित्वामुळेच सर्व संत असे उच्चारतात की सर्व सृष्टी भगवंताचेच रुप आहे (कारण अमूर्त प्रेम म्हणजेच भगवंत होय).

भक्‍तियोगाने आपल्यातील भगवंताशी भेट झालेल्या एका गोपिकेच्या द्वारे श्री ज्ञानेश्वर महाराज वरील अभंगात हीच वस्तुस्थिती आपणास सांगत आहेत असे वाटते. माउली म्हणत आहे: ‘निळ्या कृष्णाच्या पंढरपुरमधील विठोबारुपात सर्व लावण्य दडलेले आहे आणि सख्यांनो ते सुखमय रुप मी प्रत्यक्ष या डोळ्यांनी पाहिलेले आहे (१). त्याच्या (निव्वळ प्रेममय असण्याच्या) गुणाने माझे मन संपूर्णपणे व्यापून गेले आहे आणि विठोबा-रखुमाईशिवाय आता मला एक क्षणभरही विरंगुळा लाभत नाही (२) श्रीविठ्ठलाच्या सान्निध्याशिवाय जगणे म्हणजे आपले जीवन त्यांच्या बरोबर असण्याच्या पूर्णतेमधून सांसारिक अपूर्णतेमध्ये येण्यासारखे आहे (३) सख्यांनो, माझे चित्तच नव्हे तर चैतन्यसुध्दा या विठोबाच्या ध्यासात मुरुन गेले आहे. श्री ज्ञानदेवांनासुध्दा (त्या गोपीप्रमाणेच) केवळ श्रीविठ्ठलाचा सहवासातच स्वारस्य आहे (४).’

आपल्यामध्ये प्रेम आहे ही एक बाब आहे आणि ते या दुनियेत आणून दाखवायचे आहे ही एक दुसरीच गोष्ट आहे. जो साधक स्वतःच्या प्रेममयी रुपाला निर्मळपणे पाहू शकला त्याने ‘सर्वसुखाच्या आगराला’ जाणून घेतल्यासारखे आहे. नंतर, ‘मी अमुक-अमुक व्यक्‍ती आहे आणि त्या व्यक्‍तीला या सुखाचा लाभ झाला पाहिजे’ ही भावना मनात आली की ज्याप्रमाणे पौर्णिमेचे चांदणे कालावशात क्षीण व्हायला लागते तसे आपण मूळ आनंदापासून दूर व्हायला लागतो असे माउली म्हणत आहे. प्रेमामध्ये आपल्या सारख्यांची भूक कधीच का भागत नाही याचे माउलींनी दिलेले हे उत्तर आहे! परंतु वृंदावनातील गोपींना, श्रीसंत मीराबाईला आणि माउलींना प्रेमाच्या अस्तित्वानेच सुख लाभते. मग त्यांच्या देह-मन रुपी अस्तित्वाला त्यातून काय फायदा होणार आहे याचा व्यावहारिक हिशोब मांडायचा ते प्रयत्‍नसुध्दा करीत नाहीत. जोपर्यंत आपणास इतक्या शुध्द प्रेमाचे अस्तित्व जाणवत नाही तोपर्यंत आपण ‘लावण्याच्या पुतळ्या’ला पाहिलेसुध्दा नाही. सद्‍गुरुगृही राहून स्वशरिराला क्लेश देऊन जेव्हा अचानक मानसिक स्तब्ध्दता प्राप्त होते तेव्हा आपल्यातील निर्गुण प्रेमाचे अस्तित्व आपणास जाणविते. त्यातून सतत तिथेच राहून आपणस सेवा करायची असा हट्ट वाढविणे म्हणजे मनातील चांदण्याचा नाश करणे होय. तिथे लाभलेली शांतता निरंतर आपणाजवळच आहे हे कळल्यानंतर जेव्हा मनाला तीचा विरह टोचायला लागतो तेव्हा आपणास माउलींच्या विराणीतील भाव कळतो! आणि हा भाव जाणून घेतल्याशिवाय जगण्यात काय अर्थ आहे?

॥ हरि ॐ ॥

 

One Response to माउलींची विराणी – १२: प्रेमाचे मूळ

  1. ABHIJEET म्हणतो आहे:

    wonderful!
    Maulee is fascinating poet !
    om maulee

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: