गीता श्लोक (१२ आणि १३)/२: जीवनाचे सत्य रुप

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः ।

न चैव नभविष्यामः सर्वे वयमतः परम्‌ ॥ श्लोक १२ : २ ॥

देहोनोऽस्मिन्यथा देहे कौ‍मारं यौवनं जरा ।

तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥ श्लोक १३ : २ ॥

कुरुक्षेत्रावरील युध्दभूमीवर अर्जुनाच्या मनात अचानक उत्पन्न झालेला विषाद बघून भगवंतांनी त्याला स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले. परंतु तरीसुध्दा अर्जुन आपल्या मनातील कल्पनांचे पुष्टीकरण देऊ लागला तेव्हा त्याला समज देण्यासाठी गेल्या श्लोकामध्ये भगवंतांनी एक शाब्दीक चपराक दिली. ते म्हणाले की ‘ज्या गोष्टीबद्दल शोक करु नये त्याबद्दल दुःख करतोस आणि जो तुला शहाणपण सांगत आहेस त्याच्याशी वाद घालतोस अशी तुझी मति भ्रंश पावली आहे हे लक्षात घे!’ शहाण्याला शब्दांचा मार! त्यामुळे झोपी गेलेल्या माणसाला जागे करण्यास शेवटचा उपाय म्हणून ज्याप्रमाणे आपण थंडगार पाण्याचा हबका त्याच्या तोंडावर मारतो त्याप्रमाणे भगवंतांच्या या उपहासात्मक वचनांमुळे अर्जुन सावध झाला. अर्जुनाला असा जागृत करुन आता भगवान श्रीकृष्ण स्पष्ट करुन सांगत आहेत की त्याची विचारसरणी का चुकीची आहे.

इथे जरा विचार करा. एखाद्याला त्याची समज चुकीची आहे हे सिध्द करण्यासाठी काय करायला पाहीजे? जर त्याने एखाद्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले असेल तर तो मुद्दा त्याला सांगता येईल. पण त्याला माहिती असलेल्या सर्व गोष्टींचा योग्य विचार करुन जर त्याने निर्णय घेतला असेल तर काय करणार? त्याला माहिती नाही परंतु त्याच्या प्रश्नाला संलग्न अशी नवी गोष्ट आधी त्याला सांगणे भाग आहे. म्हणजे त्याचे अज्ञान दूर करणे अशावेळी जरुरी आहे. उदाहरणार्थ, आयुष्यभर विहीरीत बसलेल्या बेडकाला कूपातील पाण्याचे संकुचित्व कळणार कसे? ज्याने आयुष्यात त्या विहिरीपेक्षा जास्त मोठे पाणी बघितलेले नाही त्याला एक मोठे तळे दाखविल्याखेरीज आपल्या बोलण्यावर विश्वास बसणार नाही. आणि जेव्हा तो कूपमंडुक तळे पाहील तेव्हा ते बघितल्याक्षणीच त्याला दुसरे काही सांगायची आवश्यकताच राहणार नाही! त्यामुळे एखाद्याचे जीवनाबद्दलचे मूलभूत अज्ञान दूर करावयाचे असेल तर त्याला आधी एक व्यापक दृष्टी दिली पाहिजे. आणि ती दृष्टी मिळाल्यावर त्याचे अज्ञान गेलेलेच आहे, आणखी काही करायची जरुरीच नाही. म्हणून अर्जुनाच्या मनातील संदेह दूर करण्यासाठी भगवंत त्याला जीवनाचे सत्य रुप समजावून सांगायचा प्रयत्‍न करीत आहेत. आणि वरील दोन श्लोकांपासून या प्रयासाची सुरुवात आहे. स्वतःच्या देहाची आणि मनाची युती म्हणजेच आपण अशी अर्जुनाची जी कूपमंडुकवृत्ती तयार झालेली आहे तीचे निर्मूलन करण्यासाठी त्याला त्याचेच अधिक व्यापक अस्तित्व दाखविण्याची ही सुरुवात आहे. यापुढील सर्व गीता या एकाच प्रयासाचे दृष्य रुप आहे. ज्याप्रमाणे आपण स्वतःच्या जीवनात कुठलाही मूलभूत फरक करण्याआधी त्याचा अपरिहार्यपणा तपासून बघतो त्याचप्रमाणे आपल्या तल्लख बुध्दीला पणाला लावून अर्जुन जिवापाड भगवंतांच्या सांगण्यामधील विसंगती शोधण्याचा प्रयत्‍न करतो आणि जेव्हा अठराव्या अध्यायात त्याच्या मनातील सर्व शंकांचे पूर्ण निरसन होते तेव्हा तो आपणहूनच म्हणेल की ‘गुंतलो होतो अर्जुनगुणे । तो मुक्‍त झालो तुझेपणे । … (ओवी १५६३/१८)’

अर्थात, इथे अर्जुनास युध्द लढायला लावण्याकरीता ‘तत्वज्ञान सांगणे’ हा एकच मार्ग भगवंतांसमोर उपलब्ध नव्हता. असे करण्याऐवजी ते ‘मी सांगतो म्हणून चुपचाप युध्द कर’ असे अधिकारवाणीने म्हणू शकले असते वा ‘अरे मला माहिती आहे की हे युध्द तू जिंकणार आहेस आणि या त्रैलोक्यात तुझ्या किर्तीची ध्वजा फडकणार आहे. म्हणून तू युध्द कर’ असे आश्वासनयुक्‍त भविष्यसुध्दा सांगू शकले असते. त्यांच्या या दोन्ही उच्चारांमध्येही अर्जुनाला युध्दास प्रवृत्त करण्याची ताकद होतीच. परंतु भगवंतांना अर्जुनात संपूर्ण बदल घडवून आणायचा होता. निव्वळ यावेळचे युध्द निभावून नेण्याएवढा त्यांचा संकुचित दृष्टीकोन कधीच नव्हता. वरील दोन्हीपैकी एका उच्चारांनी (वा इतर कुठल्याही उपायाने) अर्जुनास लढण्यास उद्युक्‍त केले असते तर त्याच्या वृत्तीमध्ये मूलभूत फरक पडला नसता. त्याचा भगवंतांवरील विश्वास अजून वृध्दींगत झाला असता (कारण शेवटी त्यांनी म्हटल्याप्रमाणे झाले हे त्याला कळले असते) एव्हढेच. पण भगवंत अर्जुनाचे गुरु असल्याने त्यांचे लक्ष सतत त्याला आत्मबोध करण्याकडेच होते. अर्जुनाच्या आयुष्यभर त्यांनी जणू या क्षणाचीच वाट बघितलेली होती. आता आपला शिष्य परिपक्व झाला आहे आणि शिवाय योग्य वेळ आलेली आहे हे बघताच त्यांनी दुसरे सोपे उपाय न करीता अर्जुनाचे जीवन व्यापक बनविण्याचा प्रयत्‍न केला. गुरुंचे आपल्या जीवनातील अस्तित्व असेच असते. आयुष्यभर त्यांची आपल्यावर कृपा असते आणि आपल्यावर दुःखाचे प्रसंग आणून ते आपल्या मनाला आत्मबोधास योग्य होण्याची परिपक्वता देत असतात. ‘आमचे गुरु असूनही आमच्यावर असे प्रसंग का येतात?’ अशी शंका असलेल्या साधकांनी ‘या आपत्तीमुळे आपण अधिक चांगले साधक होणार आहोत’ हा विचार सतत मनी ठेवावा. यातील सत्याची प्रचिती त्यांना आल्याखेरीज राहणार नाही. असो.

सांगायची गोष्ट अशी की वरील सर्व विचार करुन भगवान अर्जुनाला जीवनाचे सत्य रुप काय आहे हे प्रगट करण्यासाठी म्हणत आहेत: ‘ असा कधीही काळ नव्हता की मी अस्तित्वात नव्हतो, तू आणि इतर बाकी राजेसुध्दा असेच निरंतर अस्तित्वात आहेत आणि आपण सर्व असेच निरंतर जगत राहणार आहोत (श्लोक १२). ज्याप्रमाणे एकाच देहाच्या बालपण, तारुण्य आणि वृध्दापकाळ अशा अवस्था येतात आणि जातात, त्याचप्रमाणे आपल्या या मूलभूत अस्तित्वात असे अनेक देह येतात आणि जातात. ज्याची मति आपल्या मूळ स्वस्वरुपी स्थिर आहे असा धैर्यशाली मनुष्य देहांच्या येण्या-जाण्याने गोंधळून जात नाही (श्लोक १३).’ इति.

॥ हरि ॐ ॥

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: