गीता श्लोक (१६ ते १८)/२: मूळ तत्वाचे दर्शन

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।

उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥ गीता श्लोक १६ : २

अविनाशि तु तद्विध्दि येन सर्वमिदं ततम्‌ ।

विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्‍कर्तुमर्हति ॥ गीता श्लोक १७ : २

अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्‍ताः शरीरिणः ।

अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ॥ गीता श्लोक १८ : २

शिक्षक जेव्हा विद्यार्थांना शिकवितात तेव्हा वर्गामधील भिन्न विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेंमध्ये फरक आहे याची पूर्ण जाणीव त्यांना असते. एकाच वर्गामध्ये अतिशय हुशार विद्यार्थ्यापासून एकदम मठ्ठ मुले बसलेली असतात आणि त्यांना सर्वांनाच धडे शिकवायचे असतात. जर ते मंदबुध्दी मुलांकरीता हळू शिकवायला लागले तर हुशार मुलांचे लक्ष वर्गातून बाहेर जाते आणि बुध्दीमान विद्यार्थ्यांच्या गतीने गेल्यास बाकी मुले हताश होतात. अशावेळी एक उपाय म्हणजे आपणास जी गोष्ट आजच्या तासाला शिकवायची आहे ती पहिल्यांदाच सर्व मुलांना सागणे आणि मग हळूहळू त्याची फोड करुन देणे हा होय. या पध्दतीमध्ये हुशार मुलांना स्वतः शिकायला स्वातंत्र्य असते आणि ढ मुले शिक्षकाच्या स्पष्टीकरणाची वाट पाहू शकतात. वरील श्लोकांमध्ये कैवल्याद्वैतसारख्या गूढ तत्वज्ञानाचा मूळ सिध्दांत अर्जुनाला सांगून भगवान श्रीकृष्णांनी हीच पध्दत वापरलेली दिसत आहे! इथे सांगण्यासारखी एक गोष्ट म्हणजे श्रीज्ञानेश्वरांनीही आपल्या भावार्थदीपिकेची सुरुवात करताना पहिल्याच ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या । जयजय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥ या ओवीमध्ये सर्व परमार्थ उलगडून सांगितला आहे आणि मग आपल्यासारख्यांच्या करीता नंतर नऊ हजार ओव्या लिहील्या आहेत! केवल अद्वैताचे मूळ तत्व म्हणजे या संसाराच्या अस्तित्वालाच नामंजूर करणे. ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधारात जळती मशाल गोलाकार फिरविल्यावर आपणास प्रकाशवर्तुळ दिसते (पण त्याच्या अस्तित्वाला आपल्या स्मरणशक्‍तीशिवाय दुसरा आधार नसतो) त्याचप्रमाणे हे जग निव्वळ भासमय आहे असा हा सिध्दांत आहे. या सिध्दांताचे व्यावहारीक जीवनातील प्रतिबिंबच वरील श्लोकांमधून भगवान अर्जुनाला समजावून सांगत आहेत. ते म्हणत आहेत की: जी गोष्ट खरी नसते तीला कधीही अस्तित्व नसते आणि जी खरी गोष्ट आहे ती कधीच नष्ट होऊ शकत नाही. या सिध्दांताचे सत्यत्व ज्यांनी सत्य वस्तू बघितली आहे त्यांनाच होते (१६). ज्या मूळ वस्तूच्या अधिष्ठानावर हे सर्व चराचर भासत आहे केवळ तीचाच नाश होऊ शकत नाही. अरे, जी कधीही बदलतच नाही तीचा नाश करणे कसे शक्य आहे? (१७) त्या नित्य सत्तेच्या पार्श्वभूमीवर जे हे देह दिसत आहेत ते सर्व नष्ट होणारे आहेत (आणि त्यामुळे त्यांना जन्मताच मृत्यु आलेला आहे असे समज!) तुझे सर्व लक्ष मूळ अविचलित सत्तेकडे ठेव आणि (त्यामुळे ठराविक देहांच्या नाशाबद्दल असलेला विषाद बाजूला ठेवून) अर्जुना, तू निःशंकपणे युध्द कर (१८).

आपण मातीपासून घट तयार करतो आणि त्याच्या अस्तित्वाला घट्ट धरुन बसतो. मग काही काळाने तो भंगला की दुःखी होतो. ज्या मूठभर मातीपासून तो घट बनला होता ती माती तशीच आहे याचे महत्व आपणास वाटत नाही कारण त्या मातीबद्दल आपणास ममत्व नसते. इथे तुम्ही म्हणाल की घट भाजून तयार केला असल्याने त्याच्या भंगाने परत जी माती आपणास मिळते तीच्यात आता नवा घट तयार करण्याची शक्‍ति नसते म्हणून त्या मातीला बघून आनंद होत नाही. बरोबर आहे. कुठलेही उदाहरण आपण एका मर्यादेपर्यंतच वापरु शकतो. घटभंगानंतरची माती आधीसारखी नसते परंतु आपल्या जन्म ज्या चैतन्यातून झालेला आहे ते चैतन्य मातीप्रमाणे आपल्या देहनाशाने बदलणारे नाही हे ध्यानात घ्या. इथे दुसरे उदाहरण द्यायचे झाले तर ते असे: जेव्हा रंगमंचावर पडदा उभारुन त्यावर मागून प्रकाशझोत टाकला जातो तेव्हा त्या प्रकाशात कसबी कलाकार आपल्या हाता-बोटांच्या हालचालीद्वारे पटावर अनेक निरनिराळ्या सावल्या दाखवून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. जर काही कारणाने प्रकाश बंद झाला तर तो सर्व खेळ संपुष्टात येतो. पण म्हणून पडद्यामागील कलाकाराच्या हाताला काही इजा होत नाही. परत दुसऱ्या प्रकाशात तो तेव्हढ्याच कसबीने आपले कौशल्य दाखवू शकतो. आपले देह म्हणजे त्या खेळातील सावल्यांप्रमाणे आहेत. त्यांच्या अस्तित्वाला जबाबदार असलेला चैतन्यरुपी प्रकाश जेव्हा लुप्त होतो तेव्हा सावल्यांप्रमाणेच तो क्षणार्धात नष्ट होतो. (माउलींच्या शब्दांत: माशी पांख पाखडी । तंव हे सरे ॥ म्हणजे की आपला प्राण या देहातून माशीला पंख फडफडावायला जेव्हढा वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळात निघून जातो). परंतु ज्या सत्तेतून आपणास हे जीवन लाभलेले आहे ती सत्ता बदलत नाही.

असे बघा, चैतन्याच्या निरंतर अस्तित्वाची ही गोष्ट आपणास सांगण्यात येते आणि स्वतःवरील संस्कारांच्या प्रभावामुळे आपला त्यावर लगेच विश्वास बसतो. परंतु तरीसुध्दा आपले लक्ष निरंतर चैतन्याकडेच रहात नाही तर या जगातील इतर गोष्टींतही गुंतलेले असते. केवळ तत्वज्ञ संतांचेच दैनंदिन जीवन या सत्याशी सुसंगत असते. माउली म्हणते ‘या उपाधिमाजी गुप्त । चैतन्य असे सर्वगत । ते तत्वज्ञ संत । स्वीकारती ॥ १२६:२ ॥’. याचे कारण आपण वरील श्लोकांमधील दुसरे तत्व स्वीकारले नसते हे होय. ते दुसरे तत्व म्हणे ज्या गोष्टीचा नाश होणार आहे ती कधीच अस्तित्वात नव्हती हे होय. आपण ही बाब मानत नाही. आणि इथेच आपल्या संसाररुपी मायापाशात गुंतले जाण्याचे कारण दडलेले आहे. आपण ‘जोपर्यंत हा देह चांगला आहे तोपर्यंत आपण याचा उपभोग घेऊ आणि जेव्हा त्याची शक्‍ति क्षीण होऊ लागेल तेव्हा चैतन्यरुपी तत्वाचा अंगिकार करु’ असा विचार करतो आणि फसतो. मूळ तत्वात या देहादिक उपाधींच्या अस्तित्वावरच घाला घातला आहे हे लक्षात घ्या. या उपाधी आपल्या इंद्रियांद्वारे आपणास स्पष्ट दिसत असताना त्या नाहीत असे कसे मानावे ही शंका आपल्या मनात येते. या शंकेला लगेच उत्तर मिळत नाही आणि आपण परत तात्पुरत्या अस्तित्वालाही खरे मानू लागतो. परंतु हा संदेह अत्यंत मूलभूत असल्याने त्याचे लगेच निरसन होणे शक्य नाही हे लक्षात घेऊन आपण धीर ठेवला पाहीजे. खरे म्हणजे आपल्या मनातील या संदेहाचे पूर्ण निरसन करणे हीच परमार्थाची साधना आहे असे समजल्यास हरकत नाही. प्रत्येक साधकाने आपल्या जीवनाकडे तटस्थपणे बघून स्वतःची अशी खात्री केली पाहीजे की या जगात निव्वळ एकच वस्तू अस्तित्वात आहे आणि तीच्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही.

जरी साधकाने मनातील संदेहावर स्वतःच विचार करुन समाधान प्राप्त करायचे असले तरी साधकाच्या विचारसरणीला चालना देण्यास इथे एक मुद्दा सांगावासा वाटतो. तो असा की जर देहादिक वस्तूंचा नाश होणार असेल तर प्रत्येक क्षणी त्या नाशाची प्रक्रिया सुरु असली पाहीजे. लहानपणची आपल्या देहाची वाढसुध्दा या विनाशाचेच एक रुप आहे हे लक्षात घ्या! (माउली नवव्या अध्यायात म्हणते की या जगात लोक वाढदिवस साजरा करतात यापेक्षा दुसरी विसंगती कुठे आहे का? जेव्हा आपण मृत्युच्या अजून जवळ गेलो म्हणून गंभीरता यायला पाहीजे तेव्हा आपण दिवाळी साजरी करतो!) देह आणि मन सतत बदलत असल्याने जेव्हा आपण एका व्यक्‍तीची आठवण काढतो तेव्हा ती व्यक्‍ती आपल्या आठवणींतील रुपापासून भिन्न स्थितीत असते, बदललेली असते. म्हणजे आपले सर्व प्रेम सध्या अस्तित्वात नसलेल्या व्यक्‍तीवर, देहावरच असते. भूतकाळातील आठवणींवरच आपले सर्व ममत्व अवलंबून आहे आणि त्या आठवणींना कारणीभूत असलेल्या व्यक्‍ती केव्हाच नष्ट पावल्या आहेत हे ध्यानात येणे म्हणजेच देहांच्या अस्तित्वाचे खंडन करणे होय. संत सदा याच विवेकरुपी प्रकाशात न्हात राहतात आणि अज्ञानाच्या अंधःकारापासून दूर होतात. वरील श्लोकांतून भगवान श्रीकृष्ण आपल्या परमप्रिय शिष्याला हा धडा सुरुवातीलाच देऊन त्याच्या अध्यात्मिक शिक्षणाला प्रारंभ करीत आहेत असे वाटते.

॥ हरि ॐ ॥

 

One Response to गीता श्लोक (१६ ते १८)/२: मूळ तत्वाचे दर्शन

  1. raj म्हणतो आहे:

    very good nirupan

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: