गीता श्लोक (१६-१८)/२ : तडजोड करण्याच्या प्रवृत्तीचे परीणाम

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील सोळाव्या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असे सांगतात की ज्या गोष्टी असत्‌ आहेत, खोट्या आहेत त्या कधीच अस्तित्वात नव्हत्या आणि जी वस्तू खरी आहे तीचा कधीच नाश होऊ शकत नाही. आपल्या व्यावहारिक जीवनाची निव्वळ क्षणभंगुरता न दाखविता ते त्याचे अस्तित्वच या श्लोकातून पूर्णपणे नाकारतात.

जीवनात अनेक साधारण गोष्टी आपण सवयीने करीत असतो आणि अचानक अशी एक घटना घडते की त्यानंतर आपल्य जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळते. टी.व्ही. येण्यापूर्वी आकाशवाणीवर नवीन येणाऱ्या हिंदी सिनेमाच्या जाहीरातीत कहाणी सांगताना निवेदक म्हणायाचा ‘और कहानीने एक नया मोड लिया …’. त्याप्रमाणे आपल्या आयुष्यातही क्वचित अशा घटना घडतात. सर्वसामान्यपणे एखाद्या महत्वाच्या परीक्षेतील भरघोस यश वा अनपेक्षितपणे लाभलेले अपयश, अत्यंत जवळच्या मित्राचे वर्तन बदलल्याची झालेली जाणीव, जवळील व्यक्‍तीचे असाध्य आजारपण अशा रुपात या घटना आपल्यासमोर येतात. परंतु काही भाग्यवान लोकांच्या जीवनात सद्‌गुरुवचनाच्या निमित्ताने नवी दिशा प्राप्त होते. उदाहरणार्थ, श्रीसंत निसर्गदत्त महाराजांना अनुग्रह देताना त्यांच्या गुरुंनी सांगितले की ‘जन्मावेळी तू जसा होतास तसाच आत्तासुध्दा आहेस. तुझ्यात काही फरक पडलेला नाही हे जाणून घे.’ आणि त्या वाक्याला प्रमाण मानून त्याची सत्यता स्वतः अनुभवायचे प्रयत्‍न त्यांनी केले आणि आपल्या जीवनाचे सोने केले. इथे हे सर्व सांगायचे कारण म्हणजे श्रीकृष्णांचे वरील उद्‍गार याच प्रतीचे आहेत.

परंतु हे शब्द ऐकून आपण तात्पुरते भारावून जरी गेलो तरी आपल्या जीवनात यांच्यामुळे आमुलाग्र बदल होईल असे काही आपणास वाटत नाही. आजपर्यंत अनेक मनमोहक शब्दांचे श्रवण केले, त्याचप्रमाणे हे शब्द आहेत असे वाटून साधारणपणे आपले आयुष्य आहे तसेच चालू राहते. आज आपण आपल्या जीवनातील या वस्तुस्थितीबद्दल मनात कुठलाही न्यूनगंड न ठेवता विचार करु. सद्‍गुरुंचे एक वचन ऐकून मुंबईत पान-बिडी विकण्याची दुकाने चालविणाऱ्या श्री. मारुती कांबळी या गृहस्थाने स्वतःला निसर्गदत्त महाराज बनविले पण आपण आहेत तसेच राहतो याचे एक प्रमुख कारण म्हणजे आपली ‘जीवनात तडजोड करण्यात समाधान मानण्याची’ वृत्ती होय.

आता, तडजोड करणे हा सामाजिक जीवनाचा पाया आहे यात संदेह नाही. किंबहुना समाजात कुणालाही संपूर्णपणे आपल्या मनासारखे वागता येत नाही म्हणूनच आपले दैनंदिन जीवन सुरळीत चालू आहे हे स्पष्ट आहे. एक अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले तर ते शिक्षणाचे देत येईल. इथे, मुलाला शाळेत जायची इच्छा नसते, आईला त्याच्या शाळेसाठी लवकर उठून डबा बनवायचा कंटाळा आलेला असतो आणि बाबांना त्याला चांगल्या शाळेत घालण्याकरीता पैसे कमवायला जाताना ताण आलेला असतो!! परंतु तरीही मुलगा शाळेत जातोच आणि तसे गेल्याने आपले जीवन चांगले झाले असे मोठेपणी मान्य करतो. आपले सर्व जीवन याचप्रमाणे चालू आहे. याचा एक परीणाम म्हणजे एखादी गोष्ट करायची झाली की ती अत्यंत शुध्द रीतीने करण्यापेक्षा इतरांना पसंत पडेल इतकीच करतो. दररोज पोळ्या लाटताना त्या अगदी गोल आणि नरम झाल्या पाहीजेत असे बघण्यापेक्षा खाणाऱ्याला समाधान होईल इतपतच चांगल्या करतो! नाहीतरी यापेक्षा अधिक करुन कुणाच्या लक्षात येईल असे नाही, मग कशाला उगाच डोक्याला ताप करुन घ्यावा? ही विचारसरणी आपल्यात अगदी आतपर्यंत मुरलेली असते. आपल्या रक्‍तातच जणू कामचलाऊ वृत्ती भिनलेली आहे. त्यामुळे जेव्हा स्वतःच्या मानसिक उन्नतीचा आपण विचार करु लागतो तेव्हासुध्दा हे सर्व कुणासाठी? हा विचार आपल्या डोक्यात घोळू लागतो. ‘आहे तसे जीवन काय वाईट चालले आहे की त्यामुळे आपण ते अधिक चांगले करण्याचा प्रयास करावा?’ हा विचार आपणास मागे ओढत आहे हे लक्षात घ्या. हा विचार आपल्या सर्व दुःखाचे मूळ आहे. आणि हा विचार केवळ आपणास समाजात रहायचे आहे या जाणीवेमुळे आहे. निव्वळ स्वतःकरीता काही करणे म्हणजे एक आहे आणि त्याकरीता आपले आयुष्य व्यतीत करणे एका तऱ्हेने अनैतिक आहे असे आपणास वाटते.

या तडजोडीचा दृष्य परीणाम म्हणजे ‘बाकीच्यांपेक्षा आपणास कितीतरी जास्त कळले आहे, आता याहून जास्त काय कळायचे आहे’ अशी भावना मानत निर्माण होणे होय. या वृत्तीत समाधान न मानण्याची ज्याची मनोधारणा आहे त्याच्या जीवनात कधीतरी मूलभूत बदल होण्याची शक्यता आहे. ‘आई-वडिलांना आपल्या जाण्याने त्रास होईल’ या विचाराच्या प्रभावाखाली जर स्व. पंडित भीमसेन जोशी यांनी त्यांच्या गावातच कुठल्यातरी मास्तराकडे शिकण्यात धन्यता मानली असती तर ते भारतरत्‍न झाले असते काय? एखाद्या विद्येचे पराकोटीचे ज्ञान आपणास व्हावे अशी तळमळ त्यांनी कुठलीही तडजोड न करता जवळ बाळगलेली होती म्हणूनच त्यांचे जीवन असामान्य झाले. भगवंतांचे जगाच्या भासमय स्थितीबद्दलचे वरील उद्‍गार कानी पडल्यावर एक जीवघेणी बेचैनी ज्याच्या मनात आली त्याचे काम झाले असे समजले पाहीजे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणायचे की सद्‍गुरुंचे शब्द बोचले पाहीजेत. का म्हणून आपणास त्यांच्या शब्दांच्या सत्यतेचे दर्शन होत नाही याबद्दलची खंत मनात असली की आपोआप जीवनशैलीत फरक पडायला लागतो. जेव्हा बाह्य वर्तन आतील विचारांशी सुसंगत होते तेव्हाच पुढील मर्ग स्पष्टपणे दिसायला लागतो. जोपर्यंत ‘मनातून मी शांत आहे हो, पण या जगात स्वतःचा मान राखायचा म्हणजे कधी-कधी आरडा-ओरडा करावाच लागतो’ असे जो म्हणतो तो पुढील काही काळात सध्या असलेली शांतीसुध्दा गमावून बसतो. मग त्या शांतीपलिकडील सत्याचे दर्शन होणे दूरच राहीले.

तेव्हा आपण अनेक प्रवचनांना जाऊन, वा कित्येकवेळा श्रीज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाची पारायणे करुनदेखील का बदलत नाही याचे कारण आपले प्रारब्ध वा पूर्वसंचित नसून मनाचा निबरपणा आहे असे वाटते. काय खरे आणि काय खोटे याबद्दलचा आपला निकष फार कामचलावू आहे. त्यामुळे आपण जे खरे म्हणतो ते खरे असतेच असे नाही. आपल्याला आवडलेल्या कुठल्यातरी दगडाला घासून सोन्याची प्रत ठरविणे जसे चुकीचे आहे त्याचप्रमाणे तडजोड करण्याची प्रवृत्ती मनात ठेवून सत्यता जोखणे आहे हे लक्षात घ्या. संतांनी वेदरुपी सोनाराच्या दगडावर घासून जे सिध्द झाले त्यावरच विश्वास ठेवला आणि त्यामुळे त्यांना बावन्नकशी सत्य प्राप्त झाले. परंतु आपण ‘अशा शुध्द सोन्याचा सामाजिक मान्यतारुपी निरनिराळे खडे भरलेला दागिना बनविण्यास उपयोग नसतो’ असा विचार करतो आणि १८ कॅरेटच्या सोन्यातच धन्यता मानतो. याला काय करावे?

॥ हरि ॐ ॥

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: