गीता श्लोक (१९ – २१)/२ : अपरोक्ष ज्ञानाची खूण

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

य एनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतम्‌ ।

उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ गीता श्लोक १९ : २ ॥

न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।

अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २० : २ ॥

वेदाविनाशिनं नित्यं य एनजमव्ययम्‌ ।

कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हंति कम्‌ ॥ २१ : २ ॥

श्रीमद्‍ भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील सोळाव्या श्लोकापासून भगवंतांनी अर्जुनाला परमार्थाचा पाया समजावून सांगायला सुरुवात केली आहे. आधी मूळ तत्व सांगून मग त्याचे दैनंदिन जीवनातील रुप दाखविण्याच्या क्रियेचा हा पहिला भाग आहे. ज्ञानी माणसे देहादिक नाशिवंत वस्तूंचे अस्तित्वच नाकारतात असे सांगून झाल्यावर त्याचा प्राथमिक परिणाम म्हणजे देहनाशाकडे तटस्थतेने बघण्याची क्षमता आपोआप येणे. ज्याप्रमाणे आपल्या देहाच्या सावलीला कुणी मारले तर आपणास राग येत नाही वा आपली छाया फक्‍त स्वच्छ जमिनीवरच पडावी याकरीता आपण अट्टाहास करीत नाही त्याचप्रमाणे ज्ञानी मनुष्य प्राप्त परीस्थिती बदलण्याचा कुठलाही प्रयत्‍न न करीता देहाच्या प्रारब्धाकडे तटस्थपणे बघायला लागतो. आपल्या आयुष्यात अशी अवस्था येण्याआधी इथे एक मेख अशी आहे की नुसते आपण काय नाही हे जाणणे म्हणजे अर्धेच काम असणे. त्याचबरोबर दुसरा महत्वाचा भाग म्हणजे आपण कोण आहोत हे दिसणे. फक्‍त आपल्या देह-मनाचे अस्तित्व नाकारुन चालत नाही. कारण अशा नकारात्मक भावनेने (म्हणजे व्यतिरेकाने) मनुष्याला सामर्थ्य यायाच्याऐवजी जीवनाचा पाया निघून गेल्याची जाणीव होऊन खचल्यासारखे होण्याची शक्यता असते. म्हणून व्यतिरेकाबरोबरच सकारात्मक भावनेची (म्हणजे अन्वयाची) नितांत आवश्यकता आहे. आजच्या श्लोकांमधून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ही गोष्ट समजावून सांगत आहेत असे वाटते.

श्री भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत: स्वतःला मारणारा म्हणणारे आणि स्वतःला मरणारा समजणारे असे दोघेही चुकीच्या समजूतीत आहेत. त्यांचे खरे अस्तित्व ना कुणाला मारते ना स्वतः नाश पावते (श्लोक १९). चैतन्य ना कधी जन्माला आले आहे ना ते कधी मरणार आहे. असे निरंतर अस्तित्वात असणारे शाश्वत चैतन्य जगाच्या सुरुवातीपासून आहे आणि शरीरांच्या नाशाने हे नष्ट होण्याची शक्यतादेखील उद्भवत नाही (श्लोक २०) अरे अर्जुना, ज्याने या अविनाशी, निरंतर, जन्म-मरण्याच्या रहाटगाडग्यापासून दूर असणाऱ्या चैतन्याला जाणले आहे तो कुणाचा घात व्हायला कारणीभूत तरी कसा होईल? मग त्याने प्रत्यक्ष कुणाचा घात करणे तर दूरच राहीले! (श्लोक २१).

जेव्हा आपले व्यावहारिक अस्तित्व अंधारात फिरविलेल्या फुलबाजीनंतर भासणाऱ्या प्रकाशवर्तुळाप्रमाणे निव्वळ स्मरणशक्‍तीचा खेळ आहे असे सांगितले जाते तेव्हा ही स्मरण करण्याची क्रिया कोण करीत आहे हा प्रश्न अगदी सहजरीत्या उद्भवतो. श्री निसर्गदत्त महाराजांनी असे सांगितले आहे की ‘अमूर्त चैतन्यामध्ये अनेक स्मरणरुपी गाठोडी बांधून ठेवलेली आहेत. जेव्हा सहजपणे त्यापैकी एका गठ्ठ्याकडे चैतन्य जमा होते तेव्हा एक स्वतंत्र अस्तित्व जन्माला आले असे दिसते आणि त्या पूर्वकर्मांचा अर्धवट थांबलेला प्रवास परत नव्या व्यक्‍तीद्वारे सुरु होतो.’ श्री रामकृष्ण परमहंस हीच गोष्ट सांगताना म्हणायचे की ‘भगवंताच्या अमूर्त अस्तित्वाच्या सागरात आकर्षणरुपी शीतलता आली की व्यक्‍तीरुपी अस्तित्व हिमनगासारखे निर्माण होते. मग ज्ञानरुपी सूर्याच्या उष्णतेने तो हिमनग वितळून जातॊ आणि परत आपल्या मूळ रुपाचे दर्शन होते!’ तेव्हा सांगायची गोष्ट अशी की ‘आपले स्वरुप जाणून घेणे’ या एकाच उपायाने आपण संसारजालातून सुटका करुन घेतो. ज्याने आपले मूल रुप काय आहे हे जाणून घेतले आहे तोच साधू संसाराच्या कुरुक्षेत्रात निर्भयपणे लढू शकतो.

आता इथे स्वरुपाला जाणून घेणे म्हणजे नक्की काय आहे हे माहीत असणे जरुरी आहे. व्यावहारिक ज्ञानाच्या निकषावर बघितले तर निव्वळ ‘आपले स्वरुप कुणालाही घात करु शकत नाही’ हे जाणल्यावर आपोआप आपल्या क्रिया थांबतात ही गोष्ट बुध्दीला पटणे अशक्य आहे. उदाहरणार्थ, लहानपणापासून काहीही संबंध नसलेली व्यक्‍ती आपली नातेवाईक आहे असे कळल्यावर लगेच तीच्याबद्दल प्रेम उत्पन्न होते का? किंवा लग्न झाल्यावर सासरच्या माणसांबद्दल मुलीला लगेच ममत्व वाटायला लागते का? इथे ‘नाही!’ हे उत्तर आपण ठामपणे देऊ शकतो. परंतु अध्यात्मातील ज्ञान व्यावहारीक ज्ञानापेक्षा वेगळ्याच पातळीवर असते. म्हणून ज्ञान झाल्यावर लगेच आपल्यामध्ये मूलभूत फरक पडतो. परमार्थात जाणून घेणे या शब्दांचा अर्थ म्हणजे ‘ती गोष्ट स्वतः होणे’ असा अर्थ अध्यारुत आहे. ‘आपला नातेवाईक आहे’ या शब्दांचा बुध्दीने शब्दकोशातील अर्थ काढणे म्हणजेच ज्ञान अशी जी आपली समजूत आहे तीचा परमार्थासाठी काही उपयोग नाही. असे ज्ञान म्हणजे काय याकरीता उदाहरण हवे असेल तर ते असे: स्वतःच्या मुलाबद्दल विचार करताना आपण ‘पालक’ या शब्दाचे एक दृष्य रुपच होतो हे होय. कुठल्याही शब्दकोशाचा आधार न घेता स्वतःच्या पालकत्वाची संपूर्ण जाणीव मनात भरलेली असते. एकदा स्वतःला पालक या शब्दाचे असे ज्ञान झाले की मग त्यानंतर मुलावर प्रेम कर असे वेगळे सांगावे लागत नाही, ते आपोआप होतेच. अशा स्वतः बनून जाणलेल्या ज्ञानाला अपरोक्ष ज्ञान असे म्हणतात. या ज्ञानात दुसरा कुठलाही संदर्भ न लावलेला नसतो. स्वयंभू जाणवणारी, कुठल्याही प्रयत्‍नाशिवाय उद्बवणारी ही जाणीव म्हणजेच परमार्थामधील ज्ञान आहे. बाकी सर्व शाब्दीक कसरत आहे, जी आपणास कधीही संसारापासून दूर नेऊ शकणार नाही.

आपल्या जीवनात संतांच्या सांगणे ऐकल्यामुळे स्वतःचे निर्गुण अस्तित्व सामोरे आले आहे. परंतु सध्या त्याच्याशी आपला संबंध आत्तापर्यंत कधीही न पाहीलेल्या नातेवाईकाप्रमाणेच आहे. त्याबद्दल ममत्व निर्माण होण्यास आपल्या चैतन्यरुपी अस्तित्वाला जो मुलाप्रमाणे कवटाळतो त्याला ज्ञान झाले असे म्हटले पाहीजे. भगवंतांच्या ‘स्वतःच्या चैतन्यरुपी अस्तित्वाला जाणणारा’ या शब्दांचा अर्थ असा आहे. ज्याला हे ज्ञान झाले आहे त्याला आपल्या या अस्तित्वाबद्दल एवढे प्रेम वाटत असते की आपल्या देह-मनाच्या छायारुपी अस्तित्वाकडे त्याचे आपोआप दुर्लक्ष होते. ज्याप्रमाणे चित्रपटातील व्यक्‍तिमत्वांमध्ये आपण फार अडकत नाही त्याप्रमाणे तो या संसारातील यच्चयावत गोष्टींपासून अलिप्त असतो.

तेव्हा गीतेच्या दुसऱ्य अध्यायातील १६ ते २१ श्लोकांतून कळून घ्यायची गोष्ट अशी आहे की परमार्थात दोन गोष्टी करायच्या असतात. एक म्हणजे व्यतिरेक (वजाबाकी). इथे संसाराला जीवनातून वजा करायचे असते. आणि दुसरी म्हणजे अन्वय (बेरीज). यात स्वतःच्या चैतन्यरुपी अस्तित्वाबद्दल प्रेम निर्माण करायचे असते. पहिली गोष्ट आपण सर्वजण काही प्रमाणात करतोच. कारण असलेल्या गोष्टींचा विनाश करणे केव्हाही नवनिर्मिती करण्यापेक्षा सोपेच असते! एखादी नवीन गोष्ट निर्माण करणे जितके कठीण असते त्यापेक्षा अनंतपटीने अशक्यप्राय गोष्ट म्हणजे स्वरुपाबद्दल प्रेम निर्माण होणे. आणि हा अन्वय केल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण ज्याप्रमाणे पाण्यावरील सध्या बाजूला ढकलेले शेवाळे काही काळाने स्वच्छ केलेल्या जागेला परत आच्छादून टाकते त्याचप्रमाणे अन्वय केला नाही तर संसाराबद्दलचा व्यतिरेक करुन शांत झालेले मन परत आधीपेक्षा निराळा मोह निर्माण होऊन अशांत होते. वरकरणी असाध्य वाटणारा हा अन्वय स्वरुपाबद्दलचे प्रेम आपल्यात जन्मजात असल्यानेच साधू शकतो (यावर अधिक पुढे कधीतरी बघू!). आपल्यामधील सध्या अदृष्य असलेले हे स्वरुपावरचे प्रेम व्यक्‍त होण्यामध्ये असणाऱ्या संकुचित व्यक्‍तिमत्वाच्या अडथळ्याकडे दुर्लक्ष करणे ज्याला जमले त्याने सर्व काही साधले!!

॥ हरि ॐ ॥

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: