गीता (२२ ते २५)/२: चैतन्यरुपाच्या जवळीकीचा परीणाम

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥


वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।

तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥ गीता २२:२ ॥

नैनं छिन्दंति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।

न चैनं क्लेदयंत्यापो न शोषयति मारुतः ॥ गीता २३:२ ॥

अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।

नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातन: ॥ गीता २४:२ ॥

अव्यक्तोऽयमचिंत्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।

तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥ गीता २५:२ ॥

भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात अर्जुनाच्या शोकहरणाकरीता उपदेश करीत असतानाच्या मागील श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ‘आपले अस्तित्व अनेक पातळीवर आहे, त्यामधील जी पातळी सर्वात मूलभूत आहे तिकडे, म्हणजे स्वतःच्या निर्गुण स्वरुपाकडे तुझे लक्ष निरंतर ठेव’ असे सांगितले. अर्जुनाने स्वतःच्या निर्गुण अस्तित्वामध्ये रममाण होण्याचा परीणाम म्हणजे मी कुणाची हत्या होण्यास कारणीभूत होत आहे या त्याच्या मनातील कल्पनेचा नाश होणे होय. ज्याप्रमाणे झाडाला पाणी घातल्यावर जवळील गवतालाही आपोआप जल मिळते त्याचप्रमाणे भगवंतांच्या उपदेशाचा अर्जुनाला निव्वळ कुरुक्षेत्रावरील युध्दातच फायदा होणार नसून त्याच्या संपूर्ण जीवनात आत्ता लाभलेल्या या नव्या दृष्टीने रंग भरणार आहेत. पूर्वी थ्री-डायमेन्शनल्‌ कार्डे मिळायची. निव्वळ रेघोट्या मारल्या आहेत असे वरकरणी दिसणाऱ्या ग्रीटींग कार्डकडे एका विशिष्ट दृष्टीने निरखून पाहील्यास दडलेले विहंगम दृष्य स्पष्ट दिसायचे आणि ज्याला ही नजर सापडलेली नाही त्याला शेवटपर्यंत वेड्यावाकड्या रेघांशिवाय काहीही दिसायचे नाही! अगदी त्याचप्रमाणे जेव्हा स्वतःच्या निर्गुण अस्तित्वाची जाणीव होते तेव्हा सध्या तापदायक वाटणारा संसार अतिशय सुंदर आणि समर्पक दिसायला लागून आपल्या जीवनातील शोक या दृष्टीद्वारे जणू नाहीसाच होतो. आपल्या स्वरुपाची ज्याला ओळख झालेली नाही त्याला शेवटपर्यंत आयुष्य तापदायकच राहते. हीच गोष्ट वरील श्लोकांमधून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत:

ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रांचा (निरीच्छपणे) त्याग करुन नूतन वस्त्रे धारण करतो, त्याचप्रमाणे (प्रारब्ध पूर्ण झालेल्या) जुन्या देहाला टाकून चैतन्य नव्या देहाद्वारे आपणास प्रगट करते (२२). (देहावर अशी सत्ता गाजविणाऱ्या त्या चैतन्याला) कुठलेही शस्त्र कापू शकत नाही, अग्नी दाह देऊ शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि पवन शुष्क करु शकत नाही (२३). कधीही कापता न येणारे, जळू न शकणारे, भिजू न शकणारे आणि कोरडे न होणारे हे चैतन्य सतत सगळीकडे व्यापून राहीलेले आहे. (चैतन्याने व्यापलेली नाही अशी दुसरी जागाच नसल्याने) ते दुसरीकडे जाऊ शकत नाही (‘अचल’) आणि ते असेच निरंतर अस्तित्वात राहणार आहे (२४). (आपल्या इंद्रियांमार्फत हे कळू शकणारे नसल्याने) असे हे निर्गुण चैतन्य कधीही दृष्य होत नाही आणि आपल्या बुध्दीनेही हे जाणणे अशक्य आहे. त्यामुळे या चैतन्यात बदल झाला आहे असे कोणीही म्हणू शकत नाही (कारण ‘बदल झाला आहे’ असे म्हणण्यासाठी आधी ती वस्तू कशी होती याचे संपूर्ण ज्ञान होणे आवश्यक आहे. म्हणून ‘अविकार्यो’). चैतन्याचे हे गुण जाणल्यानंतर तू (जिथे शोक होतो त्या पातळीवर राहणार नाहीस आणि) शोकरहीत जीवन जगण्यास अधिकारी होशील (२५).

कल्पना करा की आपल्याला एक नवीन मनगटी घड्याळ कुणीतरी प्रेमाने भेट दिले आहे. अनेक सोयी असलेल्या ते आधुनिक घड्याळ हातात लावून आपण आनंदात फिरत असताना एकदा त्यातील ‘अलार्म’ लावायची सुविधा वापरण्याची वेळ आली की आपण घड्याळ्यासोबत आलेल्या माहिती पत्रिकेत बघून गजर लावतो आणि आपली त्या घड्याळ्याबद्दलच्या ज्ञानाची पातळी उंचावते. नंतर परत त्याची बॅटरी बदलायला यायला लागली की अजून आनंद होतो. नंतर जेव्हा ते दुरुस्त करता येईल एवढे ज्ञान आपणास येते तेव्हा आपण म्हणतो की आता मला घड्याळाचे पूर्ण ज्ञान झाले. अगदी त्याचप्रमाणे आपला देह आपणास भगवंताने प्रेमाने भेट म्हणून दिलेला आहे, अचानक जवळ आलेला आहे. तो घेऊन आपण सगळीकडे फिरत आहोत आणि प्रत्येक दुःखाच्या क्षणी आपल्या देह-मनाबाबत आपणास नवी माहिती कळत आहे! जेव्हा कसेही बिघडलेले घड्याळ दुरुस्त करायला आपण शिकतो तेव्हा आपणास घड्याळ असल्याचा संपूर्ण आनंद होतो त्याचप्रमाणे आपल्या ज्या अस्तित्वाला हा देह भेट दिला गेला आहे त्या अस्तित्वाचे दर्शन झाल्यावर (म्हणजे आत्मबोध झाल्यावर) आपणास असा आनंद मिळतो की देहाच्या बिघडण्याने तो कमी होऊ शकत नाही. जोपर्यंत घड्याळ दुरुस्त करता येत नाही तोपर्यंतच ते बिघडेल का याच्या काळजीत आपण असतो. त्याचप्रमाणे जोपर्यंत आपल्या स्वरुपाचा अन्वय आपणास झालेला नाही तोपर्यंतच आपणास स्वतःचे अस्तित्व जपण्याची बोचणी असते. आपला नाश होणार आहे या जाणीवेमुळेच आपण दुसऱ्यांचा नाश होऊ शकतो असा विचार करतो. एकदा स्वतःला अविनाशी समजले आणि आपल्याप्रमाणे बाकी सर्व जीवही चैतन्यरुप आहेत हे कळले की कुणाच्या हत्येबद्दल शोक मनात उत्पन्न कसा होईल? निव्वळ युध्दक्षेत्रात दिसणाऱ्या मृत्यूच्या थैमानाबद्दल विषाद होणार नाही असे म्हणता-म्हणता अर्जुन शोक या क्रियेची पात्रताच (म्हणजे अर्हता) गमावेल असे भगवान म्हणत आहेत!

जरा विचार केल्यावर असे स्पष्ट होते की आपल्या जीवनातील सर्व दुःख हव्या असलेल्या वस्तू जवळ नसल्याने निर्माण झाला आहे. ज्या अस्तित्वाला वस्तू हव्या असतात अशा देह-मनाने सीमीत असलेल्या आपल्या सामाजिक व्यक्‍तिमत्वापलिकडे आपण रहात आहोत असे एकदा कळले की आपल्या मनाला हवीहवीशी वाटणारी वस्तू जवळ असली काय किंवा नसली काय आपणास काही फरक पडत नाही. ज्याप्रमाणे मी बंगलोरमधील सुखद वातावरणात रहात असताना परदेशातील कडाक्याच्या थंडीचा वा प्रचंड उष्णतेचा त्रास मला होत नाही वा तेथील ऐश्वर्ययुक्‍त जीवनशैलीचा फायदा मला मिळत नाही त्याचप्रमाणे चैतन्याला जाणून त्या पातळीवर राहणाऱ्या ज्ञानी माणसाला देहादीक उपाधींचा ना त्रास होतो ना लाभ. आपल्याला जे काही हवे आहे आणि भविष्यात जे काही हवेसे वाटेल ते सर्व आत्ताच आपल्याकडे आहे अशी अवस्था असलेल्या माणसाची मानसिक स्थिती किती दुःखरहीत असेल याची कल्पना आपण करु शकतो. परंतु चैतन्याचे ज्ञान झालेल्या मानवाच्या मनातील शांती याहीपेक्षा अचल आणि सखोल असते कारण ‘काही हवे आहे’ हा विचारच तो करु शकत नाही. एकदा हव्यास गेला की शोक करण्याच्या आपल्या पात्रतेलाच त्याने गमाविलेले असते!

या श्लोकांद्वारे (श्लोक १६ ते २५, अध्याय २) अर्जुनाला पारमार्थिक तत्वांची ओळख करुन देण्याचे आणि अध्यात्मिक ज्ञानाद्वारे काय प्राप्त होते हे सांगण्याचे भगवंताचे कार्य पूर्ण झाले आहे. आता या सत्याची सविस्तर उकल करुन देण्याचे कार्य सुरु होईल!

॥ हरि ॐ ॥

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: