श्लोक २६ आणि २७ (अध्याय २): योग्य गोष्ट योग्य कारणाने करा

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम्‌ ।

तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ॥ गीता २६:२ ॥

 

जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।

तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥ गीता २७:२ ॥

व्यवहारामध्ये जेव्हा आपल्यासमोर कठीण प्रसंग येतो तेव्हा त्याच्यावर मात करण्यासाठी आपण माहीतगार व्यक्‍तींकडे जातो. आपल्या हिताबद्दल जागरुक असलेल्या अशा व्यक्‍तीकडून आपणास कल्पनेबाहेरील उपाय मिळतोच आणि त्याशिवाय तो उपाय कसा बरोबर आहे याचे तात्विक कारणही मिळते. कारण मनाला पटल्याशिवाय आपण मिळालेल्या सल्ल्याप्रमाणे वागू शकणार नाही याची जाणीव सल्लागारालाही असते. जर मिळालेल्या उपायामागील तत्व आपणास आत्तापर्यंत आलेल्या अनुभवांशी जुळत नसेल तर साहजिकपणे आपल्या मनात त्याबद्दल संदेह निर्माण होतो आणि त्या तत्वांवर अवलंबून असलेल्या तोडग्याबद्दलही शंका येते. परंतु त्याचवेळी ऐकलेल्या उपायांकडे आपण पूर्णपणे दुर्लक्षसुध्दा करु शकत नाही कारण त्यांच्या परीणामांचे आकर्षणही आपणास वाटत असते. शिवाय, दुसरा कुठला पर्यायही आपल्याकडे नसतो. अशावेळी आपण काय करतो? तर दुसऱ्याची तत्वे न स्वीकारता स्वतःचे डोके लढवून मिळालेल्या उत्तराचे आपल्यापरीने आपण समर्थन करतो आणि त्याच्या बळावर स्वतःला उपाय लागू करायला उद्युक्त करतो. बहुतेकवेळा आपल्या कृतीमागील कारण महत्वाचे नसल्याने व्यवहारात अशा वर्तनाचा दुष्परीणाम आपणास भोगावा लागत नाही. उदाहरणार्थ, नवऱ्याने आपल्याकडील नातेवाइकांवर प्रेम कर आणि म्हणून त्यांची योग्य सरबराई कर असे बायकोला सांगितले तर तीला त्यांच्याबद्दल ममत्व वाढविण्याची जरुरी कळतेच असे नाही. पण आपल्या पतीने सांगितले आहे म्हणून करावे असे आपले डोके लढवून ती त्यांचे योग्य स्वागत करुन वेळ निभावून नेते. कुणाला काही कळत नाही की बाह्यवर्तनामागील घरातील स्त्रीचा हेतू काय होता. पण मग पुढच्यावेळी तेच पाहुणे आले तर पतीला तीच गोष्ट परत सांगावी लागते कारण पत्‍नीने फक्‍त बाह्य उपाय केला असल्याने आतून पाहुण्यांबद्दल ममत्व नसते. तेव्हा पति-पत्‍नीमध्ये जो संघर्ष निर्माण होतो त्याचे मूळ आधी निव्वळ बाह्य उपाय केल्यात समाधान मानण्यामध्ये असते. यात गंमत म्हणजे, जर ते पाहुणे परत आलेच नाहीत, वा त्यांच्या परत येण्यापूर्वी काही अन्य कारणांनी पत्‍नीच्या मनात त्यांच्याबद्दल ममत्व निर्माण झाले तर पहील्यांदा केलेली तडजोड कुणाच्या लक्षातसुध्दा येत नाही!!

परमार्थामध्ये अशी फसवणूक अजिबात चालत नाही आणि इथेच बहुतांशी साधकांच्या प्रगती न होण्याचे मूळ आहे. तसे पहायला गेले तर मोक्ष मिळविण्यासाठी काहीच करावे लागत नाही. आपणा सर्वांच्या नजरेसमोर ‘तुझे मूल रुप देह-मनाच्या संकुलापेक्षा भिन्न आहे. आणि त्या स्वरुपाला ना कधी दुःख झाले आहे ना कधी सुख.’ अशी वाक्ये आलेली असतात आणि एकदा हे कळले की त्यातच कर्माच्या रहाटगाडग्यापासूनची मुक्‍ती आहे. परंतु या ऐकलेल्या वाक्यांमागील स्वरुपाचे तत्व आपणास संपूर्णपणे भावत नाही. आणि मग आपली साधनांची जमवाजमव करण्याची धावपळ सुरु होते. कुणी नाम घेतात तर कुणी ध्यान करण्यात मग्न होतात तर कुणी कुंडलिनी जागृतीच्या खटाटोपीस लागतात. मूळ तत्वांवर विश्वास न ठेवता केलेले सर्व उपाय पारमार्थिक प्रगतीस अडथळेच असतात. भगवान श्रीकृष्णांना या वस्तुस्थितीची जाण असल्याने ते अर्जुनाला वरील श्लोकांद्वारे सावध करीत आहेत असे वाटते.

मागील नऊ श्लोकांमधून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला पारमार्थिक सत्याची ओळख करुन दिली आणि सांगितले की एकदा स्वरुप म्हणजे काय हे तुला कळले की तुझ्या मनातील सर्व विषाद निघून जाईल. इथे ‘युध्द कर’ हा उपाय सांगून झाला आणि त्यामागील तत्व म्हणजे स्वतःचे खरे रुप ओळखणे हेही सांगून झाले आणि त्याचा परीणाम म्हणजे विषादरहित अवस्था स्पष्ट झाली. यातून, वर वर्णन केल्याप्रमाणे अर्जुनाला ‘भगवान मला युध्द करण्यास सांगत आहेत आणि ते केले तर मानसिक शांती मिळेल असे आश्वासन देत आहेत’ असे संकुचित ज्ञान होण्याची शक्यता होती. आपण युध्द का करावे हे जाणून न घेता ‘युध्द कर आणि शोकरहीत हो’ एव्हढेच जर त्याने जाणले तर त्याच्या डोक्यात असे कसे होईल हा विचार येणे साहजिक आहे. अशावेळी नैसर्गिकपणे तो आपल्याला आत्तापर्यंतच्या झालेल्या बोधाच्या आधारेच भगवंतांच्या मुखातून मिळालेल्या उपायांचे विश्लेषण करणार. एकदा काय सिध्द करायचे आहे हे कळले की ‘हुशार’ माणसे काहीतरी डोके लढवून आपल्या कृतींचे समर्थन करण्यात पटाइत असतात! त्यामुळे भगवान अर्जुनाला असे सांगत आहेत की ‘जर खरोखर तू असा विचार करीत असशील की मनुष्यांचा जन्म होतो आणि ते मृत्यु पावतात. तरीसुध्दा तूला (तुझ्या हातून नजीकच्या भविष्यात घडणाऱ्या संहाराबद्दल) शोक करण्याचे कारण नाही (२६). (कारण) जी माणसे मरणार म्हणून तू शोक करीत आहेस ती जन्माला आल्याक्षणीच त्यांचे मरण लिहीलेले होते (असे तू समजायला हवे) आणि ते मेल्यावर परत जन्माला येणार आहेत यात संदेह नाही. या अपरिहार्य चक्राचे अस्तित्व तू मान्य केले असल्याने आता शोक करण्याचे काय कारण? (२७)’

लक्षात घ्या की भगवान श्रीकृष्णांन्चे ध्येय अतिशय उच्चकोटीचे आहे. अर्जुनाने शोकमुक्‍त व्हावे इथपर्यंतच ते मर्यादीत नाही. खरे म्हणजे शोकमुक्‍त होणे फारसे कठीण नाही. मनुष्य बुध्दीचा वापर करुनही सर्व दुःखापासून मुक्‍तता प्राप्त करुन घेऊ शकतो. उदाहरणार्थ, एकदा हे मान्य केले की क्रिकेटच्या खेळात सहा चेंडूंचीच एक ओव्हर असते की मग सहाव्या चेंडूला आता हे षटक संपणार म्हणून गोलंदाजाला रडवेसे वाटते का? किंवा क्षणोक्षणी आपणास श्वासोश्वास करावा लागतो म्हणून होणाऱ्या कष्टांबाबत आपण खेद करतो का? नाही. कारण या गोष्टी अशाच असणार हे आपण स्वीकारलेले आहे. तसेच भीष्मादिकांच्या संभाव्य मृत्यूचे दुःख न करण्याचे हे जगाचे रहाटगाडगे असेच असते ही जाणीवसुध्दा पुरेशि आहे. खरे म्हणजे अस्सल बुध्दीनिष्ठाला कधीही दुःख व्हायला नाही पाहीजे. प्रत्येक घटनेमागील कारणाकडे ज्याचे लक्ष आहे त्याला रुदन करायला वेळच नाही! घनघोर लढाई चालू असताना आपला मित्र धारातीर्थी पडला याबद्दल शोक उत्पन्न होत नाही. युध्द संपल्यानंतर त्याची आठवण झाली की पोटात गोळा येतो.

तेव्हा अत्यंत गूढ परमार्थाच्या गोष्टी चालू असताना मध्येच या दोन श्लोकांमधून जगाच्या नियमांबाबत भगवान अर्जुनाला का सांगत आहेत याचा विचार केला तर असे वाटते की त्यांना असे सांगायचे आहे की माझा सल्ला व्यावहारिक समर्थनांचा आधार घेऊन तू अंमलात आणू नकोस. भगवद्गीतेच्या श्लोकांचा अर्थ संपूर्ण गीतेशी सुसंगत काढला पाहीजे. संदर्भाशिवाय कुठलातरी एकच श्लोक बाजूला करुन त्याचा शाब्दीक अर्थ बघून खरा भावार्थ कळतोच असे नाही. वरील दोन श्लोकांपूर्वी आणि नंतर लगेच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला प्राणीमात्रांचे स्वरुप काय आहे हे सांगत आहेत हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. स्वरुपाबद्दलचे भगवंतांनी सांगितलेले सत्य अर्जुनाच्या पचनी पडले नाही तरीसुध्दा त्याला शोक करण्याचे काही कारण आहे असे भगवंतांना वाटत नाही. तरीसुध्दा श्रीकृष्णांनी हे गूढ तत्व सांगितले त्याचे कारण निव्वळ ‘शोक करणे ही क्रिया तू थांबवावीस’ असे नसून चित्तात योग्य भाव ठेवलेस तर मग मनातील शोक आपोआप निघून जाईल हे अर्जुनाला कळावे अशी भागवंतांची इच्छा आहे. चुकीच्या कारणाने योग्य क्रिया केलीस तर ते शेणाच्या खोट्या फळांसारखे फक्‍त बाह्यदृष्ट्या योग्य दिसेल. त्या फळांचा ज्याप्रमाणे पोट भरण्यासाठी काही उपयोग होत नाही त्याचप्रमाणे तूझे शोक न करणे चुकीच्या कारणामुळे असेल तर वरकरणी अगदी योग्य वाटणाऱ्या त्या क्रियेनेसुध्दा मनात शांती उत्पन्न होणार नाही. मनातील शांतीकरीता योग्य क्रियेमागे योग्य कारणे असणे जरुरी आहे. नाहीतर पारमार्थिक साधनांद्वारे स्वतःच्या बुध्दीला आणि भावनांनाच आपण खतपाणी देत आहोत. मग त्यांच्या तावडीतून बाहेर पडणे कसे शक्य आहे? असो. अर्जुनाला व्यावहारिक कारणे शोधण्याच्या धोक्यापासून अशारीतीने सावध केल्यावर भगवान श्रीकृष्ण परत पारमार्थिक तत्वांकडे वळतील. ते आपण पुढच्यावेळी पाहू.

॥ हरिः ॐ ॥

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: