श्लोक २८ ते ३०, अध्याय २: परमार्थ कल्पनेच्या पलिकडे आहे

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

अव्यक्‍तादीनि भूतानि व्यक्‍तमध्यानि भारत ।

अव्यक्‍तनिधनान्यैव तत्र का परिवेदना ॥ गीता २८:२ ॥

आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद्वदति तथैव चान्यः ।

आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रृत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्‌ ॥ गीता २९:२ ॥

देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।

तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥ गीता ३०:२ ॥

 

मागच्या दोन श्लोकांतून आपण असे बघितले की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की निव्वळ सध्याच्या विषादातून तूला मुक्‍तता हवी असेल तर बुध्दीचा योग्य वापरसुध्दा पुरेसा आहे. या जगाचे रहाटगाडगे कसे चालू आहे हे निरपेक्ष बुध्दीने तू बघितलेस की तुझा शोक कधी निघून जाईल हे तुला कळणारसुध्दा नाही. त्यांच्या या सांगण्यातून असे वाटते की जीवनातील शोक निघून जावा ही आपली पराकोटीची इच्छा असू नये. शोकरहित अवस्थेपलिकडेही काही एक वस्तू आहे आणि परम अर्थ यातच आहे की आपले ध्यान निरंतर तिकडे असावे.

इथे तुमच्यापैकी काही जणांना हे विवेचन पटणार नाही आणि काहीजण असे म्हणतील की ‘ठीक आहे, तुमचे बोलणे आम्हांस पटले. आता तुम्ही सांगा की ही परम अर्थाची वस्तू कशी आहे आणि तिकडे जाण्याचा मार्ग कुठला आहे?’ गंमतीची गोष्ट अशी की वरील दोन्ही विचारसरणी चुकीच्या आहेत! ज्यांना पटले नाही ते चुकीचे आहेत कारण आमच्यामागे शास्त्रांचा आधार आहे, इतिहासाचे पाठबळ आहे. बहुतांशी संतांनी आपल्या दुःखाने भरलेल्या जीवनाला न बदलण्याच्या आचरणातून हेच दाखविले आहे की दुःखरहित जीवन जगणे मानवाचे अंतिम ध्येय असू शकत नाही. त्यांनी आपणास मानवी जीवनातील अंतिम पुरुषार्थ प्राप्त झाला आहे असे निःसंदेह सांगितले (संतांच्या स्वानुभवावर आधारीत अभंगांतून दुसरे काय लिहीले आहे?!) आणि त्याचवेळी स्वतःच्या जीवनातील ‘दुःखदायक घटना’ तशाच ठेवल्या याचा दुसरा काय अर्थ होऊ शकतो? (उदाहरणार्थ, श्रीसंत गोरा कुंभारांकडून त्यांचे मूल पायाखाली तुडवून मरणे (कुटुंबदुःख), जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे आयुष्यभर गरीबीत खिचपत राहणे (सामाजिक दुःख), स्वामी स्वरुपानंदांनी आयुष्याची ३५ पेक्षा जास्त वर्षे असाध्य दुखण्यामुळे बिछान्यावर घालविणे (स्वास्थ्यदुःख) इत्यादी). तेव्हा वरील विवेचन ज्यांना पटले नाही त्यांना उपरनिर्दिष्ट सर्व संतांचा मोठेपणा नामंजूर केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि अशा लोकांना कोण काय सांगू शकणार? परंतु जी माणसे ‘चला, आता सुख-दुःख या द्वैतापलिकडील अवस्थेचे ज्ञान प्राप्त करुन घेऊन तिकडे जाण्याचा प्रयास करुया’ असे म्हणतात तीसुध्दा चुकीची आहेत ही महत्वाची गोष्ट आहे.

याचे कारण असे की त्यांनी अजून व्यावहारिक अनुभवांवर आधारीत ‘आधी वस्तूला जाणायचे, आणि नंतर तीच्या प्राप्तीसाठी प्रयत्‍न करायचे’ ही कल्पना सोडलेली नाही. आपण जाहीराती बघून नव्या टी.व्ही.ची माहिती मिळवितो आणि दुकानात जाऊन तो विकत आणतो वा लग्न करायचे आहे असे ठरवितो आणि मग मुली (किंवा मुले) बघणे सुरु करतो तशीच परमार्थाबद्दलची कल्पना करणे मूलतः चुकीचे आहे हे लक्षात घ्या. आपले चैतन्यरुप सर्व कल्पनांच्या पलिकडील असल्याने ते आधी जाणून घेऊन मग प्राप्त करावे हा दृष्टीकोन निरुपयोगी आहे. विजापूर जवळील कन्नूर या गावात श्री समर्थ सद्‍गुरु गणपतराव महाराजांचा आश्रम आहे. आयुष्याची सर्व ९५ वर्षे अध्यात्माला वाहून घेतलेल्या या थोर मानवाने इसवी सन २००४ साली देह ठेवला. आपल्या निर्याणा आधी आठ दिवस त्यांनी सर्व साधकांना मदत म्हणून दहा तत्वे सांगितली. त्यातील एक तत्व वरील श्लोकांना सांगत आहे असे वाटते. ते म्हणतात की ‘आत्मरुपाची ओळख करुन घेण्यासाठी मध्ये कुठलाही आधार न घेता एकदम स्वरुपातच उडी मारावी!’ (मूळ कानडीत: नडुवे कल्पने इत्यादी एनन्नू तारदे वोम्मेले स्वरुपक्के उड्डाण माडबेकु). या वस्तुस्थितीचेच वर्णन करीत असताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत: ‘अर्जुना, सर्व भूते अव्यक्‍तातून व्यक्‍त दशेत येतात आणि परत अव्यक्‍तातच लीन पावतात. (हे चक्र जाणल्यावर) यात शोक करायचे कारणच काय? (२८) (अव्यक्‍त कसे असते हे तू विचारलेस तर त्या अव्यक्‍ताला जाणल्यावर) कुणी आश्चर्याने थक्क होऊन तिकडे बघत बसतात तर कुणी त्याचे वर्णन करताना आश्चर्यचकीत होतात तर कुणी त्या अव्यक्‍ताचे श्रवण करताना आश्चर्यचकीत होऊन आपल्या सर्व जाणीवांचे विसर्जन करुन निर्विकल्प स्थितीला पोहोचतात (२९). या सर्व नाशिवंत देहामधील या अव्यक्‍ताचे कधीही निधन होऊ शकत नाही. म्हणून (आणि निव्वळ म्हणूनच!) तू शोक करणे उचित नाही (३०).’

आपणास आश्चर्य केव्हा होते? तर आपल्या कल्पनेपेक्षा निराळे आपल्या समोर येते तेव्हा. बघणे, बोलणे आणि ऐकणे या तिन्ही क्रियांना आश्चर्य तेव्हाच वाटेल जेव्हा आत्तापर्यंत कधीही न बघितलेली, वाचलेली वा ऐकून अनुभवास न आलेली एक संपूर्णपणे वेगळीच वस्तू समोर येईल. याचा अर्थ असा की आधी माहिती मिळून मग स्वरुपाचे दर्शन होणे अशक्य आहे. असे असते तर स्वरुपदर्शन झाल्यानंतर आश्चर्यचकीत होण्याचे पाळी आपणास आली नसती. आत्तापर्यंत जीचे कधीही वर्णन केले गेले नाही आणि पुढेही त्याबद्दल स्पष्टपणे सांगता येणार नाही अशा स्वरुपाच्या प्राप्तीनंतर सर्व संदेह मिटतात, सर्व दुःखांचा लोप होतो. श्री रामकृष्ण परमहंस स्वरुपाच्या अवाच्यतेबद्दल म्हणायचे की ‘ही एक गोष्ट सोडली तर बाकी सर्व गोष्टी त्यांचे वर्णन केल्यामुळे ‘उष्ट्या’ झाल्या आहेत. भगवंताचे निर्गुण रुपच फक्‍त या जगात कुणीही न स्पर्श केलेली पवित्र आणि सोवळी वस्तू आहे!’ श्री जे. कृष्णमूर्ती म्हणायचे की ‘बुध्दीने विचार करुन वा आधी ठरवून मग प्राप्त केलेली कुठलीही वस्तू पूर्णपणे नवी असूच शकणार नाही. ते सर्व जुन्याचेच नवे रुप आहे. पूर्णपणे नवीन वस्तू स्वयंभूच असायला हवी. कुठल्याही प्रयत्‍नांशिवाय उद्भवायला हवी.’ अशा निरंतर आपल्यात अस्तित्वात असणाऱ्या वस्तूला आपण अर्जुनाप्रमाणेच लढाई करतानाच जाणले पाहीजे. ही एका क्षणार्धात होणारी घटना आहे. आपण तीच्या प्राप्तीसाठी प्रयत्‍न करण्याच्या नादात दुसऱ्याच मार्गाला लागतो!

आता सुरुवातीच्या मुद्यावर परत यायचे झाले तर असे म्हणता येईल की शोकरहित अवस्था म्हणजे काय याचे ज्ञान आपणास आहे. कित्येकवेळा आपण ती अवस्था अनुभवलेलीसुध्दा आहे. त्यामुळे त्या अवस्थेला मिळविल्यावर आपण आश्चर्यचकीत होऊ असे वाटत नाही. आत्मरुप ही एक वेगळीच गोष्ट आहे हे ध्यानात घ्या. स्वरुपप्राप्तीकरीता आपणास नक्की काय करायला हवे हे भगवान पुढच्या श्लोकातून सांगतील!

॥ हरिः ॐ ॥

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: