श्लोक ३१ आणि ३२, अध्याय २: परमार्थ जाणण्याचा एक मार्ग

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।

धर्म्याध्दि युध्दाच्छ्रेयोऽन्यत्‌ क्षत्रियस्य न विद्यते ॥ गीता ३१:२ ॥

 यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम्‌ ।

सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युध्दमीदृशम्‌ ॥ गीता ३२:२ ॥

मागील श्लोकांमधून आपण असे बघितले की जीवनातील सत्य आपल्या कल्पनेपलिकडे आहे. त्या सत्याचे दर्शन ज्यांना झाले आहे ते सर्व आश्चर्यचकित होऊन जातात आणि त्यांना झालेल्या ज्ञानाचे वर्णन आपल्या कुठल्याही इंद्रियांमार्फत ते करु शकत नाहीत. या सत्याशी सुसंगत असलेला श्री स. स. गणपतराव महाराजांचा ‘कुठल्याही कल्पनेचा आधार न घेता एकदम स्वरुपावरच उडी मारावी’ असा स्पष्ट आदेशही आपण बघितला. हे सर्व ऐकल्यावर आणि त्यावर सखोल विचार करुन पटल्यावर सुध्दा आपल्या मनात ‘असे काय असू शकेल की त्याने सर्वांना आश्चर्य वाटेल?’ हा प्रश्न उद्भवयाची शक्यता आहे. खरे म्हणजे या प्रश्नातून आपण परत अकल्पनाप्य सत्याची कल्पना करण्याचाच प्रयत्‍न करीत असल्याने ही चुकीची विचारसरणी आहे. परंतु तरीही आपल्या मनाची वस्तू मिळविण्या आधी त्याबद्दल माहिती काढण्याची सवय जाता जात नसल्याने आपण परत विचार करतो की परमार्थ प्रचंड अवाढव्य आहे म्हणून कल्पनेच्या बाहेर आहे की अत्यंत सूक्ष्म आहे म्हणून इंद्रियांच्या शक्‍तीबाहेर आहे? या प्रश्नाचे उत्तर आपणास सत्याचे पूर्ण रुप जाणून घ्यायला उपयोगाचे नाही. केवळ त्याचा आकार या गुणाबद्दल हा प्रश्न असल्याने हे कदाचित आपणास कळेल असा विचार करुन आपण याचे उतर शोधायचा प्रयत्‍न करु लागतो.

 इथे लक्षात घ्या की एखादी प्रचंड मोठी गोष्ट जाणून घ्यायची असली तर आपल्या इंद्रियांच्या संवेदनशीलता कमी करायला हव्यात. जेव्हा अतिशय प्रखर प्रकाश बघायची क्षमता हवी असेल तेव्हा थोड्याशा उजेडाने डोळे दिपून कसे चालेल? सूर्याकडे बघायची शक्‍ती येण्यासाठी मिणमिणत्या दिव्याची जाणीवसुध्दा न होणे जरुरी आहे. उदाहरणार्थ, संपूर्ण सूर्यास्ताचे दर्शन हवे असेल तर असे दृष्य बघण्यासाठी आपल्या पायावर चढलेल्या छोट्या मुंगीमुळे होणाऱ्या संवेदना न जाणविणे जरुरी आहे! याउलट जर सूक्ष्म गोष्टीकडे ध्यान द्यायचे असेल स्वतःला अत्यंत संवेदनाशील बनवावे लागते. उदाहरणार्थ, जमिनीवर मातीत मिसळलेला छोटा रत्‍नाचा तुकडा शोधायचा असेल तर आपली नजर अत्यंत एकाग्र करुन आजूबाजूला चालणाऱ्या रहदारीकडे दुर्लक्ष करुन पायाखालील एक चौरस सेंटीमीटर जागेमध्ये शोध घ्यावा लागतो. अगदी छोटासा फरक शोधावा लागतो. वरील उदाहरणांवरुन असे सिध्द होते की एखादी प्रचंड मोठी वस्तू मिळवायची असेल तर नेहमीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन त्यापेक्षा मोठ्या अपेक्षा ठेवाव्या लागतात आणि अत्यंत सूक्ष्म वस्तू हवी असेल तर नेहमीच्या जीवनाकडे दुर्लक्ष करुन कुणालाही माहिती होणार नाही अशा लहानातील लहान वस्तूच्या प्राप्तीचा ध्यास हवा. असे हे दोन परस्पर विरोधी मार्ग आहेत. परमार्थ प्राप्त होण्यासाठी यातील कुठला मार्ग उपयुक्‍त आहे हे कळले की अंतिम सत्याच्या आकाराची कल्पना आपणास होईल असे आपणास वाटते.

 गंमतीची गोष्ट अशी आहे की हे दोन अत्यंत परस्परविरोधी मार्ग जिथे मिळतात तिथे सत्य आहे! आपण एका मोठ्या वर्तुळाच्या परीघावर उभे असलो तर तो परीघ एका सरळ रेषेसारखाच दिसतो कारण त्याची वक्रता अतिशय सूक्ष्म असते. त्यामुळे आपणास स्वस्थानापासून दोन विरुध्द दिशेला जाणारे मार्ग दिसतात. परंतु वास्तविकतेमध्ये ते वर्तुळाकार असल्याने परत एके ठिकाणी मिळतात तसा हा प्रकार आहे. परमार्थ अत्यंत मोठा आहे कारण ज्या क्षणिक आनंदाच्या शोधात आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत होत आहे तो आनंद या सत्यात दिवसाचे चोवीस तास प्रखरपणे प्रगट आहे! आणि हाच जीवनातील सत्याचा आनंद सूक्ष्मही आहे कारण ते आपल्या जिव्हेवरील लाळेसारखे सतत आपल्या बरोबरच आहे. आपल्या सूक्ष्मातल्या सूक्ष्म विचारांना आधारसुध्दा परमार्थच आहे (म्हणजे ते त्याहून सूक्ष्म आहे!). ज्ञानी लोक जेव्हा सत्याच्या दर्शनाने आश्चर्यचकित होतात तेव्हा ते पूर्णपणे चकित झालेले असतात. निदान त्या सत्याचा आकार तरी कळला असे अर्धवट ज्ञानसुध्दा त्यांना झालेले नसते. ते स्वतः सत्यात विलीन होतात हीच त्यांची परमार्थ जाणण्याची क्रिया असते.

 वरील श्लोकांतून भगवान श्रीकृष्ण परमार्थाला अगदी सहजतेने जाणण्याचा मार्ग सांगत आहेत. परंतु हा केवळ एकच मार्ग आहे असे नाही. प्रचंड तपश्चर्या करुनही (म्हणजे परमार्थ अवघड आहे ही भावना ठेवून) सत्याला मिळविता येते आणि काहीही जगावेगळे न करीता परमार्थ जाणता येतो हे आपण कधीही न विसरणे चांगले. भगवान म्हणत आहेत: (सर्वांमध्ये स्थित असलेले शाश्वत सत्य जाणण्यासाठी) तू परीस्थितीनुसार स्वाभाविकपणे तुझ्यासमोर आलेल्या कर्मांना निःसंदेहपणे करणे पुरेसे आहे. तुझा अर्जुनरुपी देह क्षत्रिय कुळात जन्मला असल्याने योग्य कारणाकरीता जरुर पडल्यास युध्द करणे हे कर्मच तुला उचित आहे (३१). अरे अर्जुना, अतिशय भाग्यवान क्षत्रियांच्या आयुष्यातच असे युध्द करण्याची वेळ येते. या युध्दाच्या रुपाने जीवनातील परमार्थ जाणण्याची संधीच तुला प्राप्त झाली आहे (स्वर्ग म्हणजे लचकदार बायकांचे मनमोहक नृत्य हातात मद्याचा पेला घेऊन, रुचकर पदार्थांचे सेवन करीत आयुष्यभर बघत बसणे ही कल्पना इथे रास्त वाटत नाही. ‘स्वर्गद्वार अपावृतम्‌’ म्हणजे मोक्षप्राप्तीची संधी असेच संदर्भानुसार इथे घेतले पाहिजे) (३२).

भगवान म्हणत आहेत की एकदा स्वतःच्या अहंकारामुळे निर्माण झालेल्या आप्तस्वकियांबद्दलच्या ममत्वाकडे दुर्लक्ष करुन तू समोर आलेले युध्द सहजपणे, हा माझा धर्मच आहे या भावनेने केलेस तर तुला निर्भेळ आनंदाची प्राप्ती होईल. स्वतःवर लादलेल्या सर्व बंधनांकडे दुर्लक्ष कर आणि स्वधर्माच्या यज्ञात रममाण हो. या सहज कृतीमुळे तुझ्या आयुष्यात एक नवीन क्रांती होईल आणि नेहमीचेच जीवन अतिशय सुंदर आणि परीपूर्ण दिसू लागेल. अरे, हा स्वर्ग नव्हे तर दुसरे काय आहे? आणि याची प्राप्ती होण्यासाठी देहाचा नाश व्हायला हवा असे अजिबात नाही. चल, हो पुढे आणि कर आपल्या भावनाविवशतेचा त्याग आणि एखाद्या क्षत्रियाप्रमाणे वाग. बाकी काही करायची जरुरी नाही….

 आपल्यासमोर स्वतःच्या प्रामाणिक साधनेमध्ये उगीचच व्यत्यय आणणाऱ्या स्वकीयांचा, शक्य असणाऱ्या सर्व तडजोडी करुनही, त्याग करण्याची पाळी आली तर तो त्याग भावनेच्या आहारी न जाता ‘मला करणे भाग आहे’ हा दॄष्टीकोन ठेवून तुम्ही केलात तर तुमची साधना एका वेगळ्याच पातळीवर जाईल. मग अजून दुसरे काही न करीता सच्चिदानंदरुपी मोक्ष आपणाकरीता वाट बघत आहे हे ध्यानात घ्या. स्वकीयांबद्दल असा निर्णय घेण्याचे क्षण आपल्या आयुष्यात येणे हीसुध्दा एक परमभाग्याची घटना आहे असे भगवान अर्जुनाचे निमित्त करुन आपणास सांगत आहेत. मग या परीस्थितीबद्दल शोक कशाला?

 ॥ हरिः ॐ ॥

Advertisements

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

One thought on “श्लोक ३१ आणि ३२, अध्याय २: परमार्थ जाणण्याचा एक मार्ग”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s