गीता श्लोक ३३ ते ३७: दुःख तात्पुरते दूर सारण्यात परमार्थ नाही

 ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

अथ चेत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ।

ततः स्वधर्मं कीर्तिंच हित्वा पापमवाप्स्यसि ॥ गीता ३३:२ ॥

अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम्‌ ।

संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥ ३४:२ ॥

भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः ।

येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्‌ ॥ ३५:२ ॥

अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः ।

निन्दस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्‌ ॥ ३६:२ ॥

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिम्‌ ।

तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युध्दाय कृतनिश्चयः ॥ ३७:२ ॥

परमार्थाचा ध्यास आपणास का लागत नाही? जी माणसे सुखोपभोग घेण्यात मग्न असतात त्यांना सद्यपरिस्थिती बदलण्याची इच्छा उत्पन्न होणे शक्य नसते. त्यामुळे जीवनाचा खोल अर्थ शोधून काढण्यास ते उत्सुक नसतात हे साहजिकच आहे. तेव्हा त्यांची गोष्ट सोडून द्या. अध्यात्माच्या मार्गावर वळण्यासाठी काहीतरी खोल बोचणारे दुःख आयुष्यात आले पाहीजे यात शंका नाही. ज्याप्रमाणे सततच्या धूम्रपानाने आपले हृदय कमजोर झालेले आहे हे माहीत असूनसुध्दा आपण छोटासा झटका आल्याशिवाय सिगारेट सोडत नाही तशीच ही गोष्ट आहे. म्हणूनच भगवद्गीतेची सुरुवात अर्जुनाच्या दुःखाने झाली आहे. परंतु अर्जुनाप्रमाणेच ज्यांच्यासमोर पर्वतप्राय दुःख आलेले आहे अशी माणसेसुध्दा अध्यात्मिक उपाय शोधण्याच्या भानगडीत का पडत नाहीत? आपल्यापैकी कुणी म्हणते की परमार्थ करायला अजून मी खूप तरुण आहे तर कुणी म्हणते या उतार वयात आता नवीन काही कळणे अशक्य आहे! अध्यात्म न करण्यास कुठल्यातरी सबबी शोधून आपण मूळ सत्य जाणून घ्यायला का टाळतो?

याचे एक कारण असे आहे की आपणास दुःखनाशाचा एक उपाय आधीच सापडलेला आहे. त्यामुळेच संतांच्या परमार्थाने सर्व दुःखांचा नाश होतो या उक्‍तीचा आपल्यावर फारसा परीणाम होत नाही. आपणा सर्वांचा दुःखमुक्‍तीचा सापडलेला उपाय म्हणजे आत्ता समोर आलेले दुःख काही काळाकरीता पुढे ढकलणे हा होय. आत्ता समोर आलेले दुःख काही दिवसांकरीता पुढे ढकलले की सध्या आपण दुःखमुक्‍त होतो हे आपणास जाणविलेले आहे. मग ते दुःख जेव्हा परत येते तेव्हा आपण परत पुढे ढकलतो आणि ही प्रक्रीया आयुष्यभर करत बसायला तयार असतो. एखाद्या संगणक विकणाऱ्या भल्या मोठ्या दुकानात जरुर पडल्यास दुरुस्ती करुन द्यायला एक किंवा दोनच माणसे नेमलेली असतात. त्या बिचाऱ्यांवर कामाचे एवढे ओझे असते की एका कॉम्पुटरमधील दोष काढत असतानाच दुसरी कुठलीतरी तक्रार आलेलीच असते. अशावेळी ते काहीतरी सबबी देऊन समोर आलेल्या जास्तीच्या कामाला तात्पुरते टाळतात. आपण आपल्यासमोरील दुःखाशी असाच व्यवहार करतो. उदाहरणार्थ, कचेरीच्या कामाच्या दडपणामुळे श्रम करीत असताना पत्‍नीला घरी बसून कंटाळा आला आहे हे जाणविले की एक दिवस तीला बाहेर नेऊन परत काही दिवस ती तक्रार करणार नाही याची तजवीज करण्यातच आपल्या विचारांची मर्यादा असते. अशावेळी आयुष्यात कुणाला कंटाळा का येतो, कंटाळा कधी येऊच नये याकरीता काय करावे इत्यादी विचार करायची आवश्यकतासुध्दा आपणास वाटत नाही. आज बायकोला खुश केले की परत आठवडाभर तिकडे बघायला नको हे आपणास पुरेसे असते. गंमत म्हणजे असे वागत असतानासुध्दा आपल्या जीवनाचे ध्येय कुटुंबाची काळजी घेणे आहे असे म्हणायला आपण मागेपुढे बघत नाही. “अरे, भल्या गृहस्था, ज्या बायकोचे मन सांभाळण्यासाठी तू आयुष्य वेचायला तयार आहेस, तीची आयुष्यात कधीच कंटाळा येणार नाही अशी मनोभूमिका तयार व्हावी असे प्रयत्‍न का करत नाहीस? निव्वळ आज आलेल्या वैतागाचे निरसन करण्यात का समाधान मानतोस?” आज मनोरंजनासाठी बघितलेल्या चित्रपटाच्या सुखातच पुढील कंटाळ्याचे बीज रोवलेले आहे हे लक्षात घेणे जरुरी आहे!

अर्जुनाने अगदी असाच विचार करुन आज समोर आलेल्या दुःखदायक युध्दाला टाळण्यासाठी यापेक्षा मी संन्यास घेऊन भिक्षा मागून जगणे पसंत करीन असे भगवंतांना सांगितले होते (पहा श्लोक ५:२). अशा कृतीने आजचे युध्द करण्याचे दुःख टळले तरी त्यामुळे उद्या नवीन समस्या उभ्या राहणार आहेत हे वरील श्लोकांतून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. ते म्हणत आहेत की:

जर तू हे समोर आलेले, स्वधर्म पाळण्यासाठी आवश्यक असलेले, युध्द करणे टाळलेस तर तुझ्या स्वधर्माचा आणि कीर्तिचा नाश होऊन त्यायोगे तू पापी होशील (३३). (नंतरच्या तुझ्या आयुष्यात) तुझ्या या पळपुटेपणाची आख्यायिका सर्वजणांनी सतत सांगण्यामुळे तुझ्या अपकीर्तिला सीमा राहणार नाही. ज्यांना आपले आयुष्य ताठ मानेने जगायचे आहे, त्यांच्याकरीता अपकीर्ति ही मरणाहून भयानक असते (हे विसरु नकोस) (३४). (तू जरी महान विचार मनात ठेऊन युध्दातून निघून गेला असलास तरी) सर्वजण युध्दात समोर आलेल्या महारथींना भिऊन तू पळून गेलास असेच म्हणतील आणि जे महान योध्दे तुला मान देत होते त्यांच्या नजरेत तुझी काहीच किंमत उरणार नाही (३५). मग जे तुझ्या अहिताकरीता टपूनच बसले आहेत ते तर तुझ्याबद्दल नाही नाही ते बोलायला सुरुवात करतील (यात शंका नाही). आपल्याबद्दल असे बोलणे ऐकून घ्यावे लागणे यापेक्षा अधिक दुःखदायक गोष्ट दुसरी नाही (३६). (म्हणून तात्पुरते दुःख टाळण्यासाठी) युध्द न लढण्याचा विचार सोडून देऊन ठामपणे हे युध्द लढ की ज्यात मरण आले तर स्वर्गप्राप्ती आणि जिंकलास पृथ्वीवर राज्य लिहीलेले आहे (३७).

आपल्या आधीच्या उपदेशानुसार वर्तन केलेस तर तुझ्या जीवनातील दुःख हा प्रकारच नाहीसा कसा होईल याचे विवरण भगवंतांनी आत्तापर्यंत केले होते. आता त्याशिवायचा दुसरा कुठलाही पर्याय दुःख फक्‍त तात्पुरते दूर सारतो (दुःख नष्ट करीत नाही) हे स्पष्ट करण्यास अर्जुनाने स्वतःचे डोके वापरुन जो उपाय काढला होता त्यातसुध्दा दुःख कसे भरलेले आहे हे भगवान श्रीकृष्ण या श्लोकांद्वारे स्पष्ट करीत आहेत. मी सांगितलेल्या उपायाखेरीज बाकी सर्व धडपड म्हणजे आगीतून फुफाट्यात पडणे आहे असे ते अर्जुनाला दाखवून देत आहेत. अर्जुनाची बुध्दीसुध्दा निर्मळ असल्याने भगवंतांनी केलेला हा बोध त्याला पटला. आपण अजूनही दुःखनिवारण करण्यासाठी ‘शॉर्टकट’ शोधत असल्याने परमार्थ आपणास भावत नाही. आपल्या जीवनातून दुःख नामक प्रकार मूळापासून काढण्यात ज्याला रस आहे त्याला संतांनी दाखविलेल्या मार्गाचे महत्व पटेल आणि त्याशिवाय त्यांना दुसरे काहीही योग्य वाटणार नाही. बाकीच्यांच्या विचारांची मजल परमार्थ हासुध्दा जीवन जगण्याचा अनेक पर्यायांपैकी एक आहे इथपर्यंतच राहील.

॥ हरिः ॐ ॥

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: