गीता श्लोक ३८ आणि ३९: झालेल्या बोधाचा उपयोग करा

 ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।

ततो युध्दाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥ गीता ३८:२ ॥

 एषा तेऽभिहिता सांख्ये बुध्दिर्योगे त्विमां शृणु ।

बुध्दया युक्‍तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥ गीता ३९:२ ॥

भगवद्गीतेच्या द्वितीय अध्यायात अर्जुनाने आपल्या मनातील संभ्रम स्पष्ट करुन दाखविल्यावर भगवान श्रीकृष्णांनी अकराव्या श्लोकापासून त्याला योग्य मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. ‘जिथे शोक करण्याचे काही एक कारण नाही तिथे शोक करतोस आणि आम्हाला शहाणपण शिकवितोस!’ अशा शाब्दिक फटकाऱ्याने त्याचे स्वदुःखात मग्न असलेले मन सावध करुन श्रीकृष्णांनी आत्तापर्यंत जो उपदेश केला आहे तो श्री कपिल मुनींच्या सांख्य योगाचा सारांश आहे. आपणास इंद्रियांद्वारे जाणीव होणाऱ्या या नश्वर चराचरामागे जे एक अचल तत्व आहे तिकडे लक्ष ठेवून आपले जीवन व्यतीत करणे हे या योगाचे मूळ सूत्र आहे. सर्व व्यक्‍त गोष्टी एकाच अव्यक्‍तातून निर्माण होतात आणि तिथेच विलीन होतात. इतकेच नव्हे तर या अगणित निर्मिती आणि विनाशरुपी क्रियांनी त्या मूळ अव्यक्‍तात काहीही फरक पडत नाही ही बाब समजून घेण्याचा प्रयत्‍न करणे म्हणजे सांख्य योगाच्या मार्गावर चालणे होय.

खरे म्हणजे इथेच सर्व परमार्थ संपलेला आहे. अव्यक्‍त, निर्गुण स्थिती अस्तित्वात आहे आणि आपण तिचेच एक रुप आहोत याची खात्री पटणे हाच भगवंताचा साक्षात्कार आहे. यापुढे अजून काही नवीन शिकण्यासारखे उरत नाही. परंतु इथे अध्यात्म आणि व्यावहारिक जीवन यातील फरकाचा प्रारंभ होतो. आपल्या दैनंदिन जीवनात एकदा एका गोष्टीचे ज्ञान झाले की परत अजून काही करायची गरज नसते. उदाहरणार्थ, एकदा दहावीची परीक्षा पास झाली की आयुष्यभर आपण दहावी पासच असतो. खरे म्हणजे आज दहावीच्या परीक्षेला बसलो तर पास होऊ की नाही याची खात्री आपण देऊ शकत नाही! परंतु अध्यात्मात अशी बनवाबनवी चालत नाही. आपणास जे ज्ञान झालेले आहे त्याच्या बोधात सतत राहणे जरुरी असते. उदाहरणार्थ, समजा तुम्ही नवीन टी.व्ही. घरी आणलात आणि काही दिवसांनी तुमचा मित्र तुम्हाला म्हणाला की त्याच्या घरचा टी.व्ही. बिघडला आहे आणि त्याला काही कार्यक्रम बघायची इच्छा आहे. तर लगेच तुम्ही त्याला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण द्याल ना. कारण आपल्या घरी दूरदर्शनचा संच आहे याची जाणीव तुम्हाला सूक्ष्म रुपाने सतत आहे. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा तुम्हाला स्वतःच्या निर्गुण अस्तित्वाची जाणीव होईल तेव्हा मनामध्ये आलेल्या सर्व विकारांना असे सांगता येईल की माझ्या स्वरुपाच्या घरी तुझ्या सर्व मागण्यांचा शेवट आहे!

स्वरुपाचे ज्ञान झालेले असूनही परत व्यावहारिक जगात मोठेपणा मिळविण्यासाठी धडपड करणे म्हणजे घरी सर्व संपत्ती असून बाहेर भिक्षा मागत बसण्यासारखे होईल हे लक्षात घ्या. त्यामुळे सांख्य योगाची सांगता करताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करीत आहेत की झालेल्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनात वापर करणे जरुरी आहे. ते म्हणत आहेत की: ‘(स्वतःच्या स्वरुपाची जाणीव ठेवून) सुख आणि दुःख, लाभ आणि तोटा, जय आणि पराजय या व्यावहारिक जगातील परस्पर विरोधी गोष्टींकडे समान नजरेने बघ आणि मग युध्दास तयार हो. असे केलेस तर तुझ्या वर्तनात पापाचा संचार होणे शक्य नाही (३८). आत्तापर्यंत जे आम्ही तुला सांगितले त्याला सांख्य शास्त्र असे नाव आहे. आता याचे व्यवहारात आचरण करण्याची बुध्दी कशी येते हे स्पष्ट करण्याचा योग मी तुला सांगतो. त्यामुळे तू सर्व कर्मबंधनांतून मुक्‍त होशील (३९).’

मूळ सिध्दांताची ओळख करुन झाल्यावर आपल्या दैनंदिन जीवनात तो कसा वापरावा हे भगवान आता अर्जुनाला सांगणार आहेत. अद्वैत प्रणाली फक्‍त जगाला मिथ्या मानण्यात समाधान मानत नाही ही एक फार सूक्ष्म बाब आहे. जोपर्यंत आपणास या जगाचा भास होत आहे तोपर्यंत आपण कसे जीवन जगावे याचे सविस्तर वर्णनही इथे उपलब्ध आहे. मूळ सिध्दांतावरुन काढलेले सर्व निष्कर्ष इथे उपयोगी पडतात. असे बघा, आपण एखादे घर विकत घेतो तेव्हा कचेरीतून दररोज तिथेच परत जातो. घर विकत घेण्याच्या क्रियेतच हे सर्व अंतर्भूत आहे. त्याचप्रमाणे एकदा स्वरुपाचे ज्ञान झाले की व्यावहारिक जगात वावरताना सतत आपल्या स्वरुपी जायची आठवण ठेवणे जरुरी आहे. कधीकधी सहकाऱ्यांबरोबर मस्ती करताना घरचा विसर पडतो अशी अवस्था होऊ नये याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. कर्मांमध्ये गुतून स्वरुपाचा विसर पडणारे साधकच बहुतांशी आढळतात. आपली अशी अवस्था होऊ नये याकरीता काय करावे याचा एक उपाय आता भगवान आपणास सांगणार आहेत. चला जीवाचे कान करुन आपण ते ऐकायला बसू!

 ॥ हरिः ॐ ॥

Advertisements

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s