श्लोक ४०/२: जमेल तेव्हढे करणे पुरेसे आहे

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।

स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्‌ ॥ गीता ४०:२ ॥

इंद्रियांद्वारे जाणल्या जाणाऱ्या (आणि म्हणून अनित्य असणाऱ्या) सर्व गोष्टींमागे कुठलेतरी शाश्वत अस्तित्व असणे जरुरी आहे. त्याशिवाय बदलाची संपूर्ण जाणीवच होणे अशक्य आहे. ज्याप्रमाणे शांतता असल्याखेरीज शब्द ऐकू येऊ शकत नाही त्याचप्रमाणे अचल, निरंतर स्तब्ध वस्तूशिवाय सतत बदलणारे विश्व भासूच शकत नाही. कुठल्याही चित्रपट दिसण्यासाठी स्वतःचा रंग नसलेला पडदा जसा जरुरी असतो तशीच निव्वळ अस्तित्वरुपी वस्तूचे अस्तित्व मान्य करणे आपणास भाग आहे. हे अस्तित्व म्हणजेच वेदांतातील पुरुष होय. सांख्य योगात या पुरुषाकडे लक्ष ठेवून आपले जीवन व्यतीत करण्यास सांगितले आहे. भगवान श्रीकृष्णांनी मागील श्लोकांत अर्जुनाला सुख आणि दुःख यांना समान नजरेने बघून युध्द कर असा सल्ला दिला त्यामागे हेच तत्व आहे.

खरे म्हणजे सुख आणि दुःख यातील फरक दिवस आणि रात्र यांमधील फरकांसारखा स्पष्ट आहे. आपण सर्वजण सुखाच्या मागे लागलो आहोत आणि दुःखाला दूर सारण्याच्या प्रयत्‍नांत मग्न आहोत. अशा या दोन विरोधी गोष्टींमध्ये समता कशी दिसणार या प्रश्नाने आपण गोंधळून जाणे साहजिक आहे. हा संदेह अर्जुनाच्या मनात उत्पन्न होणार हे माहित असल्यानेच श्रीकृष्णांनी अर्जुनाला आधी अव्यक्‍त पुरुषाची ओळख करुन दिली आहे. असे बघा, व्यावहारिक जगातदेखील वरकरणी वेगवेगळ्या दिसणाऱ्या वस्तूंना आपण समान मानतो. उदाहरणार्थ, मी वर्गात शिकवित असताना समोर बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची बौध्दीक क्षमता भिन्न आहे, त्यांचे रंग, रुप भिन्न आहेत हे स्पष्टपणे दिसत असूनदेखील त्या सर्वांना मी ‘विद्यार्थी’ या दृष्टीने समान मानतोच की. किंवा कुत्र्यांच्या भिन्न जातींपैकी दोन नमुने माझ्यासमोर आले तर त्यांच्यापैकी एकाचे कान मोठे असतील तर एकाचे पाय लांबडे असतील. एकाच्या अंगावर भरपूर केस असतील तर दुसऱ्याच्या देहावर लवसुध्दा नसेल. कुणी विचित्र दिसत असेल तर दुसरा अतिशय देखणा असेल. परंतु असे असूनसुध्दा देहांच्या भिन्नतेकडे जास्त लक्ष न देता मी दोन श्वान दिसले असेच मानतो. त्याचप्रमाणे इंद्रियांना सुख आणि दुःख हे भिन्न भासले तरी बुध्दीने आपण त्यांच्या अशाश्वतेमध्ये समानता पाहू शकतो. सुख आणि दुःख हे दोन्ही चिरकाळ टिकणारे नाहीत ही त्यांच्यामधील एक समानता आहे. त्यांच्यामधील दुसरी समानता म्हणजे त्यांचे सापेक्षपण. म्हणजे प्रत्येकाची सुख आणि दुःख यांची व्याख्या भिन्न असणे हे होय. “व्यक्‍ती तितक्या प्रकृती” असे म्हणतात आणि आपल्या प्रकृतीवर सुखाची कल्पना अवलंबून असते. तेव्हा सुखाला आणि दुःखाला समान लेखण्यासाठी त्यांच्या व्यक्‍तीसापेक्षता या गुणाचा उपयोग होऊ शकतो.

आता सर्व अस्तित्वच अशाश्वत असते आणि व्यक्‍तिसापेक्ष असते तर या समानतेला काहीच अर्थ राहीला नसता. कुठेतरी अशी एक वस्तू आहे की जी कधीही बदलत नाही आणि व्यक्‍तींच्या आकलनशक्‍तीवर अवलंबून नाही. अशा वस्तूचे अस्तित्व आपणास दाखविण्यामध्ये संतांचे आपल्यावर खरे उपकार आहेत. असे जर नसते तर, तापलेल्या जमिनीवर अनवाणी पायाने चालताना जसे आपण एका ठीकाणी फारकाळ थांबत नाही त्याचप्रमाणे आपण एका सुखावरुन दुसऱ्या सुखावर उडी मारण्यात जीवनाची धन्यता मानली असती. (आपण सध्या असेच जीवन जगत आहोत यात शंका नाही!) अस्थिरपणे आयुष्य जगत राहण्याला राहण्याला पर्याय आहे म्हणून जीवनाला अर्थ आहे. नाहीतर तात्विकरीत्या आपणांत आणि इतर पशूंमध्ये फरक राहीलाच नसता. सर्व संत आपणास सध्याच्या चंचल जीवनाला पर्याय सांगण्याचेच काम करतात. आपल्या जीवनातील सुख आणि दुःख यांच्या खेळापासून आपणास मुक्‍त होण्याचा मार्ग सांगतात. जी गोष्ट बदलत नाही तीचा शोध घेणे हा त्यांचा पर्याय ‘हा आपणास का सुचला नाही’ असे वाटावे इतका सरळ आहे.

पण संत इथेच थांबत नाहीत. कधीही न बदलणारी वस्तू कुठे मिळेल हे सुध्दा ते आपणास स्पष्टपणे सांगतात. ही दुर्लभ वस्तू मिळवायची असेल तर दूर हिमालयात जाण्याची, वा अतिशय कष्ट करायची गरज नाही असे त्यांचे सांगणे आहे. आत्ता या क्षणी तुमच्या समोर ती वस्तू हजर आहेच. गरज कष्ट करण्याची नसून डोळे उघडण्याची आहे. जीवनात काय खरे आणि काय खोटे आहे याबद्दल आपण आत्तापर्यंत जो विचार केला आहे त्याला झुगारुन देऊन परत संशोधन करण्याची गरज आहे. आपणास संतांची शिकवण कळत नाही कारण आत्तापर्यंतच्या चुकीच्या विचारांनी आपण बऱ्याच गैरसमजुतींमध्ये गुरफटलेलो आहोत. ज्याप्रमाणे जादुगाराच्या हातचलाखीमध्ये फसून त्याच्या जादूमागील मूळ क्रिया आपण नजरेआड करतो त्याचप्रमाणे आपण ठरविलेले सुख हवेच हवे आणि दुःख अजिबात नको या आग्रहात फसून मूळ अस्तित्वाला आपण दूर केले आहे. असो.

सांगायची गोष्ट अशी की स्वतःचे जीवन कसे जगावे याबद्दल आपण परत पहिल्यापासून विचार करायला हवा. इथे ‘माझ्या आयुष्याची इतकी वर्षे गेली आहेत, आता परत ‘ग, म, भ, न’ शिकत बसण्याची ताकद आमच्यात नाही’ हा विचार आपणास खच्ची करु शकतो याची जाणीव भगवंतांना आहे. म्हणून ते अर्जुनाला पुढे करुन आपणास म्हणत आहेत की ‘बुध्दीयोगात मग्न राहून कर्मे करण्याने आरंभिलेल्या कर्मांचा नाश होत नाही वा ती पार पडण्यास बाधा येत नाही. या (कर्मयोगी) बुध्दीचे अल्प आचरणदेखील मनुष्याला (संसारातील मायेच्या) महाभयातून मुक्‍तता देते (४०)’

भगवान म्हणत आहेत की जीवनात आमुलाग्र बदल घडवायचा आहे ही वस्तुस्थिती असली तरी त्या बदलाची सुरुवात छोटीशीच असते. असे बघा, आषाढी वारीत माउलींबरोबर पंढरपूरच्या वारीला जाताना आपणास प्रस्थानस्थलापासून दूर असलेल्या विठोबाकडे जायचे आहे याची जाणीव असली तरीसुध्दा आपण पहिले पाउल नेहमीप्रमाणेच छोटेसे टाकतो. जंगलात भलामोठा वणवा लागलेला दिसला तरी त्याची सुरुवात एका छोट्याशा ठीणगीनेच झालेली असते! अगदी त्याचप्रमाणे आपण स्वतःच्या जीवनात एक छोटासा बदल करायचा आहे. तो बदल म्हणजे भगवंतांच्या जवळ जाण्यातच जीवनाचे सर्वस्व आहे, त्यातच खरा पुरुषार्थ आहे ही खात्री मनात ठेवणे. असे करायला आपणास कोण अडविते? या अत्यंत अल्प सुरुवातीमध्येच पुढील कायापलटाची चावी दडलेली आहे हे लक्षात घ्या आणि करा हा छोटासा फरक. मग बघा जीवनाच्या पटात कसे नवीन रंग भरतात ते!

 ॥ हरिः ॐ ॥

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: