मला आवडलेले ‘सर’

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

एखाद्या व्यक्‍तिबद्दल प्रथमदर्शनी प्रेम कसे उत्पन्न होते? निव्वळ त्या व्यक्‍तीच्या मोठेपणामुळे आवड निर्माण होत असती तर सद्‍गुरुंच्या शोधत असलेल्या श्री. भाऊ केतकरांची नजर श्रीसंत टेंबेस्वामींच्या कृश देहाकडे वा अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांच्या आक्रमक भाषेकडे गेलीच नसती. त्यांना श्रीसंत गोंदवलेकर महाराज आवडले ते त्यांच्या आत्मज्ञानाबरोबर असलेल्या सुदृढ शरीरयष्टी आणि प्रेमळ वाणीमुळेसुध्दा. ज्याप्रमाणे रत्‍नपारख्याची नजर सर्वसाधारण स्फटीकांमध्ये दडलेला अनमोल हिरा शोधण्यात गुंगलेली असते, त्याचप्रमाणे संसारात वावरताना आपली अंतरदृष्टी सतत आपल्या अपुऱ्या व्यक्‍तिमत्वाला पूर्ण करणाऱ्या शक्‍तीच्या अस्तित्वाला शोधण्यात मग्न झालेली असते. जेव्हा आपणास हवाहवासा वाटणारा गुण एखाद्या व्यक्‍तीत दिसतो तेव्हा आपोआपच त्या व्यक्‍तिमत्वाबद्दलचे प्रेम मनात उत्पन्न होऊन आपण तिकडे खेचले जातो. सरांनी ही अतिशय सूक्ष्म गोष्ट सहजपणे एकदा सांगितली होती. या लेखाचे शीर्षक देताना या शब्दांची आठवण होऊन असे वाटले की या लेखातील मला सर आवडण्याची सर्व ‘दृष्य कारणे’ त्यांच्यातील पूर्णतेबरोबरच माझ्यातील अपूर्णतेची साक्ष देणारीसुध्दा आहेत. सरांच्या सहजोद्गारांतसुध्दा स्वतःवर अंकुश लावण्याचे सामर्थ्य देण्याची किती शक्‍ती आहे हे यातून स्पष्ट होते.

१. परमार्थाच्या मार्गावर जिकडे-तिकडे दिसणाऱ्या भावनिक अतिरेकाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा श्री. म. अं. च्या प्रथमभेटीतच त्यांच्यामधील तत्वनिष्ठतेकरीता व्यक्‍तिपूजेला तिलांजली द्यायची वृत्ती दिसून आली तेव्हा त्यांच्या सहवासाबद्दलचे आकर्षण मनात उत्पन्न होणे साहजिकच होते. खरोखर, आपल्या गुरुपरंपरेबद्दल अतोनात आदर मनात असूनसुध्दा स्वतःचा परखडपणा कसा टिकवावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे आमचे ‘सर’ असे कुणीही निःसंदेह सांगू शकतो. वैयक्‍तिक लाभाच्या आशेने ज्याने स्वतःच्या तत्वांशी तडजोड केलेली आहे असा मनुष्य आपल्या मतांना कधीही परखडपणे मांडू शकत नाही. त्यामुळे सरांच्या स्वभावातील सडेतोडपणा त्यांच्या मनातील व्यावहारिक लाभाबद्दलची संपूर्ण अनास्थाच दर्शवितो. ‘अपरिग्रह’ या गुणाचे यापेक्षा अधिक स्पष्ट रुप दुसरे असू शकेल काय

२. एकदा एका प्रवचनानंतर चर्चा सुरु असताना श्रीज्ञानेश्वरीतील भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातील चौदाव्या श्लोकावरील भाष्यात वर्णन केलेल्या कुंडलिनी जागृतीच्या क्रियेच्या वर्णनाचा विषय निघाला. त्यावेळी सर म्हणाले की ‘आत्तापर्यंत अनेक संतांना मी भेटलो आहे. त्यापैकी कित्येकांशी खूप जवळीकही झालेली आहे. परंतु त्यापैकी एकानेही माउलींनी वर्णन केल्याप्रमाणे आपणास अनुभव आले आहेत असे मला सांगितले नाही! तेव्हा माउलींच्या या ओव्यांमधील सत्यता कुठेतरी काव्यालंकारांच्या आत दडलेली असावी असे वाटते.’ ज्याने स्वतःच्या अनुभूतींबद्दल लोकांच्या मनात शंका उत्पन्न होऊ शकेल असे आपणास जाणविलेले सत्य जाहीरपणे वीस-पंचवीस लोकांसमोर कुठल्याही शाब्दीक कसरतीचा आधार न घेता निर्भेळपणे सांगणे यातून सरांच्या ‘अदंभित्व’ या गुणाचे स्पष्ट रुप दिसून येते.

३. सरांशी बोलताना चुकूनसुध्दा श्रीमामांचा विषय निघाला की त्यांना किती बोलू आणि किती नको असे होते हे सर्वश्रुत आहेच. श्री अमलानंद स्वामी उर्फ मामांवरील त्यांची श्रध्दा अत्यंत अढळ आहे. परंतु निव्वळ आपल्या गुरुंबद्दल बोलताना भावनाविवश होण्यातून गुरुभक्‍ती प्रगट होत नाही. आपणास प्रचंड मदत केलेल्या व्यक्‍तीबद्दल उपजलेल्या कृतज्ञतेला गुरुभक्‍ती म्हणणे रास्त नाही कारण कुठलीही कृतज्ञता बुध्दीच्या पातळीवर असते आणि गुरुभक्‍ती म्हणजे बुध्दीपलिकडील निखळ प्रेम होय. हा सूक्ष्म फरक बघायचा असल्यास कुणीही सरांकडे पहावे! या गुरुभक्‍तीपोटीच कुठल्याही व्यावहारिक अपेक्षा न धरीता त्यांनी मामांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचे पालन केले. एकदा बोलण्याच्या ओघात ते म्हणाले की श्रीमामांनी त्यांना कोल्हापुरातील श्रीमहालक्ष्मीच्या देवळात नेऊन तेथील श्रीयंत्रापाशी काही क्रिया करुन सिध्दीसंपन्न केले आणि सांगितले की यांचा कधीही वापर करायचा नाही. त्या गुरुआज्ञेचे पालन त्यांनी कुठल्याही मोहाला बळी न पडता आजतागायत ज्या सहजतेने केले आहे त्यावरुन सध्याच्या काळात खरी गुरुभक्‍ती कशी असावी हे थोडेअंशी स्पष्ट होते.

४. जो कोणी सरांच्या घरी जाईल त्याला त्यांच्या साध्या राहणीमानाची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही. स्वतःच्या ज्ञानाला संपूर्णपणे झाकून समोरील व्यक्‍तीच्या पातळीवर जाऊन ते गप्पा मारीत सूक्ष्म ज्ञान इतक्या सहजतेने सांगतात की आपल्या नकळत मनातील शंका दूर होऊन एक शांतता प्रत्ययास येते. परंतु परमार्थाचे गूढ तत्व इतके आत्मसात केल्यावरसुध्दा अजूनही प्रवचनाआधी पूर्ण तयारी करुन, त्यातील संदर्भांची टीपणे काढल्याशिवाय ते घराबाहेर निघत नाहीत. ‘आता इतकी वर्षे प्रवचने करीत आहोत, तेव्हा तयारी करायची काय गरज?’ असा अहंकारी विचार मनात यायच्याऐवजी आपल्या प्रवचनाला जी लोक येतात त्यांच्या मनातील आपल्या भाषणाबद्दलच्या अपेक्षांची परीपूर्ण पूर्तता झाली पाहीजे इकडे त्यांचा कटाक्ष असतो. स्वतःच्या व्यावहारिक प्रगतीबरोबरच पारमार्थिक ज्ञानाबद्दलसुध्दा जो असा जाणीवपूर्वक उदासीन आहे त्यानेच ‘अमानित्व’ या शब्दाचा खरा अर्थ जाणला आहे यात शंका नाही.

५. एकदा सहजपणे त्यांनी आपल्या शिक्षकाच्या नोकरीमधील अडचणींचे वर्णन केले. एखादी खाष्ट सासू सुनेबरोबर जसा व्यवहार करते तशी वागणुक त्यांना नोकरीत सतत सहन करावी लागली. स्वतःच्या कामात अत्यंत चोख असूनसुध्दा प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींतून होणारी सततची उपेक्षा सर्वसाधारण माणसाला खचवून टाकायला पुरेशी होती. परंतु सरांच्या हसतमुख प्रसन्न व्यक्‍तिमत्वावर या प्रतिकूल परीस्थितीचा काहीही परीणाम झाला नाही. इतकेच नव्हे तर व्यावसायिक अडचणींवर मात करण्यासाठी सद्‍गुरुंचा उपयोग करायचा नाही या तत्वावरील त्यांची श्रध्दाही ढळली नाही. त्या अढळ तत्वनिष्ठतेमुळेच जेव्हा स्वतः मामांनी ‘मी नोकरीतील अडचणी कमी करण्यास मदत करु काय?’ असे विचारले असता त्यांनी ‘इतक्या क्षुल्लक कारणांसाठी तुम्ही आपला बहुमूल्य वेळ वाया घालवू नका’ असे तात्काळ सांगितले. पारमार्थिक गुरुंकडून निव्वळ ज्ञेयदर्शनाचीच इच्छा ठेवावी असे सर्व संतांनी जे सांगितले आहे त्याचे इतके ज्वलंत उदाहरण आजकाल क्वचितच दिसते.

माझा सरांशी संबंध गेल्या पाच-सहा वर्षांतच जुळून आला आहे. परंतु इतक्या अल्प सहावासातूनही अगदी सहजपणे मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. सरांचे दैनंदिन जीवन म्हणजे साधकांसाठी पारमार्थिक तत्वे आचरणात कशी आणायची याचे प्रात्यक्षिकच आहे. त्यांच्याबरोबरील इतक्या कमी भेटींमधून मनात जी आत्मीयता निर्माण झाली आहे त्याचे कारण काय असू शकेल याबद्दल विचार करीत असताना जे सुचले ते इथे लिहायचा प्रयत्‍न केला आहे. परंतु या प्रेमाचे खरे लागे-बांधे नक्की कुठून सुरु झाले आहेत हे फक्‍त सरांनाच पूर्ण माहीत आहे असे वाटते. मला एवढेच माहीत आहे की त्यांच्याकडे जाऊन परमार्थावर मनमोकळ्या गप्पा आणि काकूंच्या हातची कॉफी वा लिंबू सरबत वा डिंकाचे लाडू इत्यादी खाऊ खाल्याशिवाय कोल्हापूरची भेट पूर्ण झाल्याचे समाधान वाटत नाही!

सरांच्या उत्साहाकडे बघून त्यांचे वय पंच्याहत्तरीच्या आसपास असेल अशी शंकासुध्दा मनात येत नाही. भगवंताच्या कृपेने आम्हांला त्यांच्या सहवासाचा आनंद असाच निरंतर मिळत राहो.

॥ हरि ॐ ॥

सर म्हणजे प्रा. म. अ. कुलकर्णी (स्वामी प्रज्ञानंद), कोल्हापूर.

सरांची गुरुपरंपरा: आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ (त्रंबकेश्वर), ज्ञानेश्वर (आळंदी), देवनाथ (पैठण), चुडामणीनाथ (देगलूर), गुंडानाथ (पंढरपूर), रामचंद्र बुटी महाराज (नागपूर), महादेवनाथ (चिंचणी), रामचंद्र तिकोटेकर महाराज (विजापूर), विश्वनाथ महाराज (रुकडी), गणेशनाथ/बाबा महाराज (पुणे), स्वामी स्वरुपानंद (पावस), स्वामी अमलानंद (पेण).

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: