श्लोक (४१ ते ४६)/२: खरा पुरुषार्थ एकच आहे

 ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

व्यवसायात्मिका बुध्दिरेकेह कुरुनन्दन ।

बहुशाखा ह्यनन्ताश्च बुध्दयोऽव्यवसायिनाम्‌ ॥ गीता ४१:२ ॥

यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः ।

वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥ ४२:२ ॥

कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम्‌ ।

क्रियाविशेषबहुलां भोगेश्वर्यगतिं प्रति ॥ ४३:२ ॥

भोगेश्वर्यप्रसक्‍तानां तयापहृतचेतसाम्‌ ।

व्यवसायात्मिका बुध्दिः समाधौ न विधीयते ॥ ४४:२ ॥

त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।

निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्‌ ॥ ४५:२ ॥

यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके ।

तावान्‌ सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥ ४६:२ ॥

जीवन जगत असताना प्रत्येकासमोर कुठलेतरी उद्दिष्ट असते, ध्येय असते. एकाच तत्वावर निष्ठा सतत ठेवायची ताकद आपल्याकडे नसल्याने आपण निव्वळ एका ध्यासामध्ये राहू शकत नाही. त्यामुळे एकाचवेळी आपण अनेक गोष्टींमागे लागलेलो असतो. या अनेक ध्येयांपैकी काही लगेच फळाला येतील अशी असतात (उदाहरणार्थ, ‘चला एक चांगला चहा मारु!’) तर काही नजीकच्या भविष्यात प्राप्त होणारी असतात (‘पुढच्या शुक्रवारचा सिनेमा बघायला हवा!’) आणि काही अत्यंत दूरगामी असतात (‘समाजात मान्यता मिळवावी’). स्वतःच्या सोयीप्रमाणे आयुष्याचा प्रत्येक क्षण आपण या तीन प्रकारच्या ध्येयांमागे पळण्यात घालवित असतो. काल ठरविलेल्या ध्येयांमध्ये आज थोडा फेरफार करत त्यांची प्राप्ती करण्यात आपले जीवन कधी संपून जाते हे कळतसुध्दा नाही.

एकदा जीवन जगण्याची पध्दत अशी आहे हे कळले की सूज्ञ माणसे ‘नक्की कुठल्या पायावर आपण आयुष्याची नवनवीन ध्येये ठरवित आहोत?’ असा विचार करतात. का म्हणून मी भरपूर पैसे कमविण्याचा अट्टाहास करीत आहे? किंवा माझ्या मुलाने अभियांत्रिकी पदवी मिळविलीच पाहीजे असा आग्रह मी का करीत आहे? असे विचार डोक्यात घोळू लागले की ‘या सर्व प्रयत्‍नांतून मी स्वतःला समाधानी बनविण्याचा प्रयत्‍न करीत आहे’ हे उत्तर समोर यायला वेळ लागत नाही. याचा अर्थ असा आहे की आपली सर्व ध्येयेदेखील एका अंतिम ध्येयाचे साधन आहे! स्वतः शाश्वत समाधानी वृत्तीमध्ये रहावे या भूकेचे शमन होण्याकरीता आपली धडपड चाललेली आहे हे लक्षात घेणे म्हणजे परमार्थाच्या मार्गावर पदार्पण करणे होय. या दृष्टीने बघितल्यास ‘जगात अनंत प्रवृत्तीच्या असंख्य व्यक्‍ती आपापल्या ध्येयांमागे धावत आहेत’ या वैविध्यामागील ‘सर्वांना सुखाची आवश्यकता आहे’ हा समान धागा जाणवायला लागतो. ज्याप्रमाणे एखादी ताणलेली स्प्रिंग आपल्या मूळ स्थितीला जाण्यास सतत प्रयत्‍न करीत असते त्याचप्रमाणे आपण स्वतःच्या सुखमय स्थितीला जाण्यास आतुरलेलो असतो. स्वतःला समाधानी बनविण्याकरीता जर दुसरा सोपा आणि सुलभ मार्ग उपलब्ध असेल तर व्यावहारिक ध्येये ठेवण्याचा पायाच नष्ट होतो. सनातन धर्मामध्ये शाश्वत समाधानाचीच प्राप्ती होण्यासाठी उपाय सांगितलेले आहेत (पहा: ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ गीता ३९:५॥). हा विचार करुन भगवंतांच्या सांगण्याप्रमाणे साधना करणे हा मार्गच आपणा सर्वांना श्रेयस्कर आहे यात संदेह नाही. ज्या बुध्दिने स्वतःला शाश्वत सुखाचा हा मार्ग स्पष्ट होतो ती एकच बुध्दि कामाची आहे, व्यावसायिक आहे. बाकी सर्व विचार राजमार्ग सोडून आडवाटांनी आपल्या लक्ष्याकडे जाण्यासारखे आहेत. अशा मार्गांमध्ये कधी विकल्परुपी गुंड आपला घात करतील याचा नेम नाही.

आपल्या जीवनातले हे सत्य अर्जुनाला सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत की ‘अर्जुना, आत्महिताची बुध्दि एकच आहे. ज्या विचारांनी स्वहित साधत नाही असे विचार मात्र फाटे फोडणारे आणि अनंत आहेत (४१). ज्यांची बुध्दि खऱ्या मार्गापासून ढळलेली आहे अशी माणसे अत्यंत गोड शब्दात वेदांचा आधार घेऊन आपल्या मतापेक्षा दुसरे काहीच खरे नाही हे सिध्द करीत असतात (४२). कामनांवर आधारीत त्यांचे सर्व उपदेश जन्म-मृत्यूच्या चक्राबाहेर न नेता भोग आणि ऐश्वर्यप्राप्ती मध्येच संपून जास्तीत-जास्त स्वर्गप्राप्ती मिळवून देतात (४३). ज्यांची बुध्दि भोग आणि ऐश्वर्यातच गुंतलेली आहे ते वेदांच्या यज्ञादिक क्रियेंमध्येच गुरफटून बसतात आणि ज्या बुध्दिने निरंतर शांति मिळू शकते ती त्यांना कधीही दिसत नाही (४४). वेदांतील सर्व क्रिया सत्व-रज-तम या तीन गुणांवर आधारीत आहेत. अर्जुना, तू या तिन्ही गुणांपलिकडे जा. ज्याने स्वरुपसुख अनुभविले आहे तो सर्व द्वंद्वांच्या, सर्व अभिलाषेच्या आणि इच्छांच्या पासून आपोआप दूर होऊन नित्यतृप्त होतो (४५). ज्याप्रमाणे मोठा जलाशय समोर असला तरी आपण स्वतःला पाहिजे तितकेच जल प्राशन करतो त्याचप्रमाणे ज्याने स्वरुप ओळखले आहे तो वेदांतील सर्व क्रिया बघूनसुध्दा फक्‍त वेदांताकडेच लक्ष देतो (४६).’

असे बघा, जेव्हा स्वतः ठरविलेल्या अनंत ध्येयांपैकी एक पूर्ण होते तेव्हा आपणास तात्पुरते सुख लाभते. अशावेळी ‘आता मी सुखी आहे’ ही भावना आपल्या सर्वांच्या मनात लगेच येते. याचा अर्थ असा की जात-पात, शिक्षण, व्यवसाय, आरोग्य इत्यादी अनेक फरक असलेल्या सर्व माणसांमध्ये ‘सुख म्हणजे काय’ ही जाणीव भरलेली आहे. आणि ही जाणीव बाह्य क्रियांवर अवलंबून नाही (उदाहरणार्थ, आज श्रीखंड खाल्यामुळे सुख मिळाले असे वाटले तरी उद्या तसेच श्रीखंड खाल्यावर तेव्हढेच समाधान होत नाही यावरुन श्रीखंड खाण्यावर सुख अवलंबून नाही हे सिध्द होते). वस्तुस्थिती अशी आहे की जन्मतःच आपल्यामध्ये सुखाचे भांडार भरलेले आहे. बाह्य क्रियांद्वारे आपण आपल्यामध्येच असलेल्या त्या भांडाराचे प्राशन करतो. ज्याने हा स्वतःमधील गुप्त खजिना मिळविलेला आहे तो कशाला बाह्य उपाधींमध्ये गुंतेल? ज्याप्रमाणे आवाज करीत ठिकठिकाणी भरकटणारी मधमाशी एकदा पुष्पावर बसली की शांत होऊन मध पीत बसते त्याचप्रमाणे स्वरुपज्ञानी सतत आत्म्याशी संवाद साधून स्तब्ध राहतो.

(तात्पुरते) सुख मिळण्यास असंख्य मार्ग आहेत. परंतु ज्या शाश्वत सुखाचा साठ्यावर सर्व व्यावहारिक सुखे उभी आहेत तिकडे जाण्याची बुध्दि एकच आहे हे लक्षात घ्या. आपल्या सर्वांमध्ये सुखाचा खजिना पुरुन ठेवलेला आहे आणि त्या गुप्तधनाला बाहेर काढून त्याचा योग्य विनियोग करणे हाच आपणा सर्वांचा पुरुषार्थ आहे!

॥ हरिः ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: