श्लोक ४७ आणि ४८ / २: दैनंदिन जीवनातील कर्मयोग

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ गीता ४७:२ ॥

योगस्थ कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय ।

सिध्दयसिध्दयोः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ गीता ४८:२ ॥

गेल्या श्लोकामध्ये वेदांताचे अनन्य महत्व स्पष्ट करुन झाल्यावर परमदयाळू भगवान श्रीकृष्ण त्यांचा उपदेश दैनंदिन जीवनात कसा आचरणात आणावा याचे स्पष्टीकरण अर्जुनाला वरील श्लोकांतून देत आहेत. श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथाचे महत्व हजार वर्षांनंतरही टीकून राहीलेले आहे याचे एक कारण म्हणजे या ग्रंथामधील तत्वप्रणाली निव्वळ शाब्दीक कसरत नसून दररोजच्या व्यवहारात या विचारांचे प्रतिबिंब कसे पडते याचे अतिशय सुंदर आणि समर्पक वर्णन येथे ठीकठीकाणी दिलेले आहे. भगवद्गीतेनंतरच्या काळात मानवाची भौतिक प्रगती कितीही झालेली असली तरी आपण ज्या आधारावर आपली कर्मे करीत असतो तो पाया तसाच आहे. तो म्हणजे आपली निरंतर समाधानाची भूक. अर्जुनाच्या कर्मांचा हेतूसुध्दा हाच असल्याने त्याला मिळालेला उपदेश अजूनही तितकाच लागू आहे. या श्लोकांतून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असे सांगत आहेत की: फक्‍त समोर आलेले कर्म करण्याचाच अधिकार तुला दिलेला आहे, होणाऱ्या कर्मांच्या फलाचा कधीही दिलेला नाही. (त्यामुळे) कर्मांच्या फलांच्या अपेक्षेने कर्म करण्यास तू प्रवृत्त होऊ नकोस. (त्याचवेळी, फलांची आशा सोडल्याने) समोर आलेली कर्मे करण्यास टाळण्याच्या मोहालासुध्दा तू बळी पडू नकोस (४७). अर्जुना, कर्मांपासून अलिप्त राहून, कर्मयोगात मग्न रहात त्यांच्या सफलते वा विफलतेकडे समान नजरेने पहात कर्मे करीत रहा. या समान नजरेलाच कर्मयोग असे म्हणतात (४८).

केलेल्या कर्मांपासून अपेक्षित फल मिळाले नाही तर मनाला वाईट का वाटते? तर आपल्या कष्टांचा मोबदला मिळाला नाही ही भावना आपणास नकोशी वाटते. वर्षभर फुलझाडाची व्यवस्थित निगराणी घेतल्यावर पहिली फुले कुणी वाटसरु चालता चालता तोडून नेतो आणि आपल्या मनात वैतागाचे वावटळ उठते. आपणा सर्वांच्या मनात केलेल्या कष्टाचे चीज झाले पाहिजे अशी अपेक्षा असते. या अपेक्षेचे मूळ काय आहे तर केलेल्या कर्मांच्या फलांवर आपणास आपला अधिकार वाटतो. ‘मी अमुक कष्ट केले आहेत, तेव्हा फलाणे फल मला मिळालेच पाहिजे’ या सर्वसंमत विचारांवरच भगवंत आघात करीत आहेत हे लक्षात घ्या.

कर्मफल म्हणजे काय?: आता आपण कर्मे कुठली आणि त्यांची फले म्हणजे काय यांचा विचार करु. त्याकरीता एक उदाहरण म्हणून पालकांच्या सांगण्यानुसार दहावीच्या एका विद्यार्थ्याने वर्षभर अभ्यास करुन शेवटी परीक्षा देणे या घटनेकडे पाहू. इथे अभ्यास करुन परीक्षा देणे हे कर्म आणि परीक्षेतील गुण हे त्या कर्मांचे फल अशी आपली सर्वसाधारण व्यावहारिक समजूत असते. परंतु हे सत्य आहे काय? मुलाचे अभ्यास करणेसुध्दा कर्म नसून कर्मफल आहे असे आपण का मानत नाही? जर त्याने आपल्या पालकांचा मान राखला पाहिजे असा विचार केला नसता तर त्याच्या हातून अभ्यास घडला असता का? मनामध्ये ‘आई-वडिलांचा आदर राखणे’ हे कर्म त्याने केले की ज्याचे एक फल म्हणून त्याला अभ्यास करावासा वाटला असे आपण म्हटल्यास काय वावगे आहे? आता इथेसुध्दा न थांबता पालकांचा आदर राखणे हे सुध्दा त्यांनी त्याच्याकरीता जे कष्ट केले आहेत त्याची जाणीव असणे या कर्माचे फल आहे! जर आई-वडिलांच्या मनातील त्याच्याबद्दलचे प्रेम त्याच्या नजरेला पडले नसते (म्हणजे ते बघण्याचे कर्म त्याने केले नसते) तर मनात आदर निर्माण झालाच नसता. तेव्हा तो आदरसुध्दा एक कर्मफलच आहे! अशा तऱ्हेने आपण प्रत्येक ‘कर्माच्या’ मागे मागे जात गेलो तर जन्म घेतल्यानंतर केलेली यच्चयावत कर्मे आधीच्या कुठल्यातरी कर्मांचे फलच आहे असे दिसून येईल. अर्थात यातील काही कर्मे निव्वळ मानसिक आहेत (उदा. पालकांचा आदर राखणे ही भावना), त्यांचे रुप बाह्य जगात दिसत नाही. परंतु म्हणून ती कर्मे नाहीत असे आपण म्हणू शकत नाही. तेव्हा ‘जन्म घेणे’ हे एकच कर्म आपण केल्यासारखे दिसून येते. परंतु आपले जन्म घेणे हेसुध्दा कर्मांच्या न्यायानुसार पूर्वजन्मातील वासना अपुऱ्या असण्याच्या कर्माचे वा परमार्थाबद्दल अज्ञानी असण्याचे फल आहे! तेव्हा आपल्या संपूर्ण जीवनात आपण फक्‍त कर्मफलांनाच तोंड देत आहोत हे लक्षात घ्या. त्यामुळे भगवंतांच्या सांगण्याचा सखोल विचार केला असता आपल्यासमोर काय यायला हवे याबद्दल मागण्या करण्याचा आपणास काहीही अधिकार नाही असे मानले तर काय चुकीचे आहे?

एकदा कर्मफल या शब्दाची संपूर्ण व्याप्ती लक्षात आली आणि त्या फलांवर आपला अधिकार नाही हे कळले की आपल्या मनात कर्म करण्याबद्दल कंटाळा आल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यभर कुठल्यातरी अपेक्षा ठेवूनच कर्मे करीत असल्याने सर्व अपेक्षा काढून टाकल्यावर कर्म करण्याच्या क्रियेचा पायाच निघून जातो असे प्रथमदर्शनी वाटते. म्हणून त्याच श्लोकात भगवान म्हणत आहेत की कर्मांपासून जबरदस्तीने दूर जाणेसुध्दा चुकीचे आहे. आपण स्वतःहून कुठलीही क्रिया करणे म्हणजे कर्म करणे आहे त्यामुळे जबरदस्तीने समोर आलेल्या कर्मांना चुकविणे हेसुध्दा एक कर्मच आहे! हे लक्षात घेऊन कुठलीही पळवाट न शोधता आपण कर्मे करायला हवी. भगवान म्हणतात की ‘योगस्थ कुरु कर्माणि’ म्हणजे मी केलेली सर्व कर्मे ईश्वरार्पण होत आहेत या भावनेने आपण कर्मे करायला हवी. इथे ‘यामुळे ईश्वर प्रसन्न होईल’ ही अपेक्षा आपण ठेवली तर परत आपण अडकलो! इथे ईश्वर ही एक कल्पना आहे. त्याला विष्णू वा शंकर वा गणेश असे ठराविक रुप नसल्याने तो प्रसन्न होईल असे म्हणणे मूलतःच चुकीचे आहे. समोर आलेली कर्मे निरपेक्ष रीतीने करणे हेच त्या ईश्वराचे रुप आहे असे लक्षात घेऊन कर्मे झाली पाहीजेत.

कर्मसिध्दी म्हणजे काय?: कर्मांबद्दल असा दृष्टीकोन ठेवला की ती सिध्दीला गेली का नाही याचा काय निकष असू शकेल? आधी आपण अपेक्षा ठेवून कर्मे करीत असल्याने त्यांची पूर्तता हे कर्म सिध्द झाले असे बघण्यास उपयोगी पडत होते. आता अपेक्षेविना कर्म केल्यावर ते पूर्णत्वास गेले कसे पहावयाचे? कर्मयोगाने सांख्ययोगाचे तत्वज्ञान मिळते हे भगवंतांनी सांगितल्यामुळे आपणास आपला कर्मयोग सिध्द झाला की नाही हे कळण्याचे साधन मिळते. याचा अर्थ असा की, आपल्या अशा वर्तनामुळे चित्तशुध्दी होऊन पारमार्थिक ज्ञान प्राप्त झाले तर आपले कर्म सिध्दीस गेले, नाहीतर नाही. आपली कर्मे अशातऱ्हेने सिध्दीस जावी याबद्दलसुध्दा आपण उदासीन राहीले पाहीजे. हीच कर्मांबाबतची संपूर्ण तटस्थता होय. हा दृष्टीकोन ठेवून कर्मे करीत राहणे म्हणजेच कर्मयोग म्हणतात असे भगवंतांचे म्हणणे आहे.

किती खोलवर विचार केलेला आहे हे बघा. आपले संपूर्ण व्यावहारिक जीवन कर्मफलांनीच भरलेले आहे तेव्हा त्याबाबत तटस्थता ठेव, इतकेच नव्हे तर अशी अलिप्तता ठेवल्याने माझे चित्त सात्विक भावांनी भरुन त्यायोगे परमार्थाचे ज्ञान होत आहे का नाही याबद्दलही विचार करु नकोस आणि तरीसुध्दा सामोरी आलेली कर्मे प्रामाणिकपणे कर असे भगवंत सांगत आहेत. कचेरीतील कामातच दिवसरात्र घालविणे वा स्वतःच्या मुलांच्या कल्याणाकरीता आपली स्वतःची मह्त्वाकांक्षा दूर सारून आयुष्य व्यतीत करणे म्हणजे कर्मयोग नव्हे. आलेली कर्मे शक्यतितक्या प्रामाणिकपणे पार पाडणे म्हणजेसुध्दा कर्मयोग नव्हे. आपल्या जीवनात अशा तऱ्हेचा कर्मयोग करणारे पुष्कळ भेटतात. परंतु हे सर्व अर्थ अत्यंत संकुचित असल्याने त्यांच्या वर्तनामुळे जीवनात पराकोटीचा आनंद सतत भरलेला आहे असे दिसून येत नाही. कधीही न ढळणारा सततचा आनंद हेच सर्व योगाचे सार असल्याने आपण कर्मयोगाचा असा कुठलातरी संकुचित अर्थ काढण्याची चुकी न करीता ‘योगस्थ’ रहाण्याचा प्रयत्‍न करणे आपल्या हातात आहे. यावर पुढे काय घडायचे ते गुरुकृपेने घडेलच!!

॥ हरिः ॐ ॥

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: