श्लोक ४९ आणि ५०/२: कर्मातील कुशलता

 ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

दूरेण ह्यवरं कर्म बुध्दियोगाद्धनञ्जय ।

बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥ गीता ४९:२ ॥

बुद्धियुक्‍तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।

तस्माद्योगाय युज्यस्व योगं कर्मसु कौशलम्‌ ॥ गीता ५०:२ ॥

‘माझ्या तरुणपणी, लग्न झाल्यावर पतींच्या नोकरीमुळे आम्ही बिहारमधील धनबाद येथील कोळशाच्या खाणीवर होतो. त्याकाळात तेथील गरीबी म्हणजे इतकी की तीचे वर्णनसुध्दा करवत नाही. परंतु त्याचवेळी साहेबलोकांचे चांगले पगार असल्याने ते श्रीमंतीत असायचे. स्वतःच्या घरातील सुबत्ता आणि कामाला आलेल्या मोलकरणीच्या आयुष्यातील गरीबी एकाचवेळी जाणवत असल्याने मन अगदी सुन्न व्हायचे. मग मी तेथील शाळेत शिकवायला जायचे आणि शक्य तितकी मदत सर्वांना करायचे. अजूनही ते दिवस आठविले की वाइट वाटते.’ त्या वृध्द बाईंना आपले मन मोकळे करावेसे वाटत होते. ‘गीतेचे तत्वज्ञान त्या गरीब लोकांना काय उपयोगाचे? त्यापेक्षा रोजगार कसा मिळवायचा हे त्यांनी शिकलेले बरे.’

आपण इथे जमतो ते स्वतःच्या मनात परिवर्तन करण्यासाठी. स्वतःसमोर आलेल्या तत्वज्ञानाचा धनबादमधील गरीब माणसांना वा पाकीस्तानातील पूरग्रस्त लोकांना काय उपयोग आहे हा विचार डोक्यात येण्याचे कारण काय असा विचार केला तर जास्त उपयुक्‍त आहे.

‘जगात सगळ्यांनाच सुखाचा शोध आहे आणि दुःखात बुडलेल्या माणसांना तर जास्तच आहे. जर भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाने शाश्वत सुख मिळत असेल तर त्यांना ते जास्त उपयोगाचे नव्हे काय?’

असे बघा, आपले जीवन अनेक पातळींवर जगता येते. उदाहरणार्थ, भुकेल्या माणसाला चांगले भोजन देऊन त्याचे समाधान करणे यात सुख आहे आणि त्याला अतिशय मौलिक तत्व सांगून त्याच्या जीवनाची दिशा बदलविण्याचे सामर्थ्य त्याच्या हातात देणे यातसुध्दा आनंद आहे. शाश्वत सुख हा शब्द जेव्हा वापरण्यात येतो तेव्हा त्या सुखामध्ये भौतिक गरजा पूर्ण होण्याचे समाधान मिळेल ही आपली समजूत चुकीची आहे. तसे असेल ज्ञानदेव, तुकारामादिक संतांना कपड्यालत्त्याची कमतरता भासलीच नसती.

‘पण मग व्याधीग्रस्त लोकांनी काय करावयाचे?’

तुम्ही जरा शांत व्हा. विचार करा की सुख मिळेल हे शब्द ऐकल्यावर दुसऱ्या लोकांचा विचार तुमच्या मनात का आला? याचा अर्थ असा की कुठेतरी आपल्यापेक्षा दुसऱ्या लोकांना सुखाची जास्त आवश्यकता आहे असे तुम्हाला वाटते. हे वाटणे कुठल्या पायावर उभे राहीलेले आहे? तुमच्याकडे भौतिक गोष्टी जास्त आहेत यावरच ना. परंतु त्याचवेळी बाह्य गोष्टींच्या साठ्यावर आंतरिक आनंद अवलंबून नाही हेसुध्दा तुम्हीच म्हणता. रस्त्यावर भीक मागत फिरणारी मुलेसुध्दा प्रसन्नतेने हसताना आपण कधीतरी बघितले आहेच ना. नैसर्गिक आपत्ती आल्याने हताश होऊन आक्रोश करणाऱ्या माणसांच्या मनात आनंद निर्माण करायला गीतेचे तत्वज्ञान उपयोगी नाही हा विचार डोक्यात येतो तेव्हा आपले लक्ष स्वतःवरुन दुसऱ्याकडे गेले आहे हे कळते. प्रत्येक गोष्टीला एक स्वतःची जागा असते, काळ असतो. परमार्थाचा विचार करतानाच्या काळात समाजाची उपस्थिती असू शकत नाही. लांबचा समाजच कशाला अगदी जवळच्या माणसांनादेखील, म्हणजे तुमची मुले, सुना, नातवंडे इत्यादिंनाही इथे प्रवेश नाही हे लक्षात घ्या! ज्याप्रमाणे स्नान करताना न्हाणीघरात शिरल्यावर तिथे फक्‍त तुम्ही आणि तुमचे शरीर यांनाच परवानगी असते त्याचप्रमाणे भगवद्गीतेवर चिंतन आणि मनन करताना फक्‍त स्वतःमधील वासना आणि आत्मसुखाची वंचना यांनाच जागा असते. स्नान करुन बाहेर आल्यावर आपण परत आपल्या कुटुंबात येतो त्याचप्रमाणे एकदा स्वतःमध्ये बदल झाला की मग तुम्हाला समाजाकडे बघायला बराच वेळ आहे! इथे कुणी ‘जगापासून दूर होऊन आत्मपरीक्षण करण्यात जो वेळ जातो त्यापेक्षा त्या वेळेचा जास्त उपयोग सामाजिक कर्म करण्यात होईल’ असे म्हटले तर त्यावर उत्तर म्हणून अर्जुनाला वरील श्लोकांतून भगवंत काय सांगत आहेत ते पहा. भगवान म्हणत आहेत की: (मागील श्लोकांत सांगितलेले) मनात समत्व आल्याशिवाय कुठल्यातरी फलाची अपेक्षा धरुन कर्म करणे हे अतिशय निकृष्ट आहे. अरे अर्जुना, आधी कर्मयोगाचे मर्म जाणून घेऊन त्या बुध्दिआधारे जीवन जग. कर्मफलांची अपेक्षा ठेवणाऱ्यांची कीवच केली पाहिजे (४९). एकदा मनात सद्‍बुध्दि जागृत झाली की मनुष्य पाप आणि पुण्य या दोन्ही कल्पनांचा त्याग करतो. ही नजर प्राप्त करुन घेण्याचे प्रयत्‍न आधी कर. अशा शुध्द नजरेला प्राप्त करुन कर्म करणे यालाच कर्मातील कुशलता म्हणतात आणि हाच कर्मयोग होय (५०).’

भगवंतांनी कर्मफलांमध्ये काहीही भेदभाव ठेवलेला नाही. जगाची उन्नती व्हावी म्हणून कर्म करणे आणि स्वार्थासाठी कुणालाही बुडविण्याचे कर्म करणे ही दोन्ही कर्मे फलापेक्षा ठेवून कर्म करणेच आहेत. आपल्या मनातील पाप आणि पुण्य या दोन्ही गोष्टी कल्पनेच्या पातळीवरच अस्तित्वात आहेत हे लक्षात घ्या आणि त्यापलिकडे पहा. समाजात राहून सर्वांच्या उध्दारासाठी प्रयत्‍न करावेत हा विचार स्तुत्य आहे यात शंकाच नाही. परंतु या विचारामागे आपला काय हेतू आहे हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे. संतांनी आपले जीवन समाजोध्दारासाठी व्यतीत केले म्हणून बाह्य जगात त्यांच्याप्रमाणेच आपण वागायचा प्रयत्‍न केला तर तोंडघशी पडल्याखेरीज राहणार नाही कारण त्यांच्या कृतींमागील असलेली समत्व बघणारी बुध्दि अजून आपणास प्राप्त झालेली नाही. बाह्य क्रिया करताना मन भगवंतचरणी स्थिर ठेवणे म्हणजेच कर्मयोग आणि यालाच म्हणतात कर्म करण्यातील कुशलता. समोरील कर्म पार पाडण्यातील सफाई याला व्यावहारिक दृष्टीने कर्मातील कुशलता म्हणतात परंतु पारमार्थिक नजरेने नाही. म्हणूनच रस्त्याच्या कडेला भेळेची गाडी चालविणारा मनुष्य बोलता बोलता सहजरीतीने एका हाताने सोलून कांदा कापतो हे बघितल्यावरसुध्दा त्याला आपण कर्मयोगी मानत नाही. कर्म करण्यातील खरी कुशलता आपण अंगात बाणविण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे. मग तुमची नजर इतकी साफ होईल की जगात जो बदल तुम्हाला घडवायचा आहे तो आपोआपच घडेल.

॥ हरिः ॐ ॥

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: