श्लोक (५१ ते ५३)/२: ध्येय निश्चित ठरवा

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

कर्मजं बुद्धियुक्‍ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः ।

जन्मबन्धविनिर्मुक्‍ताः पदं गच्छन्त्यनामयम्‌ ॥ गीता ५१:२ ॥

यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति ।

तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥ गीता ५२:२ ॥

श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला ।

समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥ गीता ५३:२ ॥

आपल्या समोर जीवनसाफल्याचे इतके पर्याय असतात की आपण नेहमी गोंधळलेल्या अवस्थेत असतो. उदाहरण म्हणून आपण आपली नेहमीची दिनचर्या बघू या. उठल्यावर घरातील लहान मुलांना योग्यवेळी तयार करुन त्यांना शाळेत सोडणे हा आपला सकाळ व्यवस्थित जाण्याचा निकष. नंतर कचेरीत वरीष्ठांच्या मनाप्रमाणे काम पार पाडले तर नोकरीचे सार्थक होते आणि संध्याकाळी घरी गेल्यावर पत्‍नी/पतीचे मनोरंजन केले तर दिवस कारणी लागतो. याशिवाय आपल्या मित्रांबरोबरचे संबंध आणि स्वतःच्या आवडी-निवडी सांभाळण्याची बंधने आहेतच. अनेक दिवसांतून कधीतरी एकदा इतक्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायला जमतात आणि तेव्हा कुठे आपले मन शांत होते. ज्याप्रमाणे एखादा कसरतपटू एकाचवेळी अनेक व्यवधाने सांभाळत दोरीवर चालतो तशी आपली दैनंदिन जीवनात कसरत चाललेली असते. जरा आपले लक्ष दुसरीकडे वेधले गेले की मांडलेला सगळा पसारा कोलमडून पडतो. या वस्तुस्थितीची जाणीव असल्याने नवीन काही गोष्ट सुरु करण्यास आपण मनापासून तयार नसतो. आणि नवीन ध्येयाची थंडगार झुळूक जीवनात आल्याशिवाय आपल्या तप्त मनाला शांतता मिळत नसल्याने आयुष्यभर आपण होरपळतच राहतो. कुरुक्षेत्रातील अभिमन्यूप्रमाणे आपण या दुष्टचक्रात अडकलेलो असतो. म्हणूनच एखाद्या प्रवचनात ऐकलेल्या उच्च विचारांचे आकर्षण वाटल्यावरही ‘सध्या हे अध्यात्म आपणास करणे अशक्य आहे. नंतर वेळ मिळाला की बघू’ असे म्हणून आपण आहे तसेच बसतो. स्वतःसमोर पडलेली सोन्याची नाणी दिसूनही हात-पाय व्यवधानात अडकल्यामुळे आपणास त्यांना खिशात टाकता येत नाही अशी जणू आपली अवस्था असते! अशा परिस्थितीत काही भाग्यवंतांना अचानक उपरति होते आणि ते गुरुंच्या शोधात निघतात. अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांच्या अनेक सेवेकऱ्यांमधील प्रसिद्ध सेवेकरी श्री बाळप्पा उर्फ ब्रह्मानंद सरस्वती (अक्कलकोट) यांना अशीच अचानक उपरति झाली आणि कर्नाटकातील हवेरी गावातील घरदार मागे सोडून ते अक्कलकोटला आले आणि स्वतःच्या जीवनाला त्यांनी संपूर्णपणे नवीन वळण दिले. त्याचप्रमाणे घरचे कुळकर्णी वतन असूनही श्री गोंदवलेकर महाराजांनी घर सोडून गुरुंच्या शोधात सबंध भारतवर्षात भ्रमण केले आणि श्री तुकाईंची कृपा प्राप्त करून स्वतःचे व इतरांचे कल्याण केले. श्री रामदासस्वामींची ऐनवेळी स्वतःच्या लग्नघरातून निघून जाण्याची गोष्ट तर सर्वश्रुतच आहे.

गंमत म्हणजे अशा पराकोटीच्या उपरतीच्या कहाण्या ऐकल्या की आपले मन अजून घाबरते! गीतेचे तत्वज्ञान कितीही आवडले तरी आपली वरील संतांसारखी सर्वस्व सोडायची तयारी नसल्याने आपण अध्यात्माचा नाद सोडायचाच विचार करु लागतो. पराकोटीचा परमार्थ जमत नसेल तर अर्धवट करुन काय उपयोग असा विचार आपल्या डोक्यात येतो. परंतु इथे श्री रामकृष्ण परमहंस काय म्हणायचे ते आपण ध्यानात ठेवले पाहिजे. ते म्हणायचे की ‘तुम्हाला रामाबरोबर चालता येत नसेल तर लगेच श्यामबरोबर चाललेच पाहिजे असे नाही!’ अर्थात, इथे श्याम म्हणजे कृष्ण नसून (‘राम और शाम’ नावाच्या चित्रपटातील व्यक्तीसारखा) रामाच्या विरुद्ध प्रवृत्ती असणारा मनुष्य अभिप्रेत आहे. म्हणजे काय तर रामदास स्वामींसारखे घर सोडता येत नाही म्हणून घरालाच कवटाळून बसायला हवे असे नाही. जमेल तेव्हढा वेळ साधनेला द्यायला सुरुवात करायला काय हरकत आहे? व्यवहारातही आपण टाटा-बिर्लांसारखे श्रीमंत होणार नाही हे कळले तरी जमेल तेव्हढा पैका मिळवायचा प्रयत्‍न करतो तसा दृष्टीकोन परमार्थात आपण ठेवत नाही. याचे कारण म्हणजे आपल्या मनात एक प्रकारची भिती असते की या ‘नादाला’ लागलो तर भविष्यात संसार सोडावा वाटेल की काय? आणि आपल्या मनात ही शंका नसेल तर आपल्या स्वकीयांच्या मनात येते आणि ते आपल्याला ‘का हे सर्व करायला सुरुवात केली आहेस? तुला संसारात सुख मिळत नाही की काय?’असा प्रश्न विचारुन आपणास नाउमेद करतात. या भितीला उत्तर म्हणून आपणा सर्वांच्या समोर कर्मयोगाचे साधन उपलब्ध आहे. व्यवहारातील कर्मे आहेत तशीच चालू ठेवत मनात भगवंताचे अनुसंधान ठेवणे ही गोष्ट इतकी खाजगी आहे की कुणाला न कळता आपण सहजपणे करु शकतो. आणि अशा अल्प सुरुवातीनेदेखील आपणास परमार्थ प्राप्त हो‍उ शकतो असे श्रीभगवान म्हणत आहेत ही आपणा सर्वांच्या दृष्टीने एक अतिशय आश्वासक गोष्ट आहे.

ज्यांच्या मनात वरील शंका नाहीत त्यांनीसुद्धा कर्मयोग करावा कारण आपल्या सर्वांची अंतिम अवस्था सदासर्वकाळ भगवंतांच्या अनुसंधानात राहण्याची असली तरी ती लगेच आपणास प्राप्त होणारी नाही. ज्याप्रमाणे शेगडीवर तांदूळ उकडत ठेवले की भात मिळणार आहे याची खात्री असते पण म्हणून ठेवताक्षणीच ते मिळत नाहीत त्याचप्रमाणे आपल्या कच्च्या मनोबुद्धीस आपण विवेकाच्या धगीवर ठेवल्यानंतरच आपणास भगवंताबद्दल खरी, निर्भेळ गोडी वाटणार आहे. स्वतःमधील अमूर्त भगवंताकडे सतत नजर ठेवून यच्चयावत कर्मे करणे म्हणजे कर्मयोग होय. केवळ हीच एक ‘व्यावसायात्मिक बुद्धि’ आहे आणि या बुद्धीची प्रशंसा करताना भगवान म्हणत आहेत: जो मनुष्य (सम)बुद्धियुक्‍त होऊन मनातून सर्व कर्मफलांची इच्छा सोडून कर्मे करतो त्याला त्यापासून (कर्मजं) जन्ममरणाच्या फेऱ्यापासून मुक्‍ति देणारे सर्वदुःख विरहित (अनामयम्‌) पद प्राप्त होते (५१). जेव्हा सर्व मोहापासून मुक्‍ति होइल तेव्हाच अशी (व्यावसायात्मिक बुद्धियुक्त) अवस्था प्राप्त होते. अशा अवस्थेत आत्तापर्यंत ऐकलेल्या वा पुढे कधीतरी ऐकायला मिळणाऱ्या सर्व तत्वांबद्दल अलिप्तता मिळते (५२). (ही अशी बुद्धि मिळण्यास) वेदांमध्ये असलेल्या (म्हणजे आपल्यासमोर आलेल्या) सर्व ध्येयांमधून एका निश्चल ध्येयात स्थिर राहणे आवश्यक आहे. अशा एकाग्र, अचल बुद्धिनेच कर्मयोगाचे सार प्राप्त होते (५३).

इथे ‘अनामयम्‌’ या शब्दाचे ‘निरामय’ असे रुप घेतले आहे म्हणून भाषांतर ‘सर्वदुःखविरहित’ असे केले गेले आहे हे लक्षात घ्या. स्वतःच्या निर्गुण अस्तित्वाची निरामय शांतता तिथे असते. माउली या अवस्थेबद्दल म्हणते की मग निरामयभरित । पावती पद अच्युत । ते बुद्धियोगयुक्त । धनुर्धरा ॥ २७९:२॥

सांगायची गोष्ट अशी आहे की हळू हळू सर्व कर्मफलांबद्दलचे वैराग्य आपल्या अंगात भिनविल्याशिवाय सांख्ययोगाची फलश्रुती (म्हणजे मोक्ष) आपणास मिळणार नाही. फलापेक्षा सोडून द्यायला हवी हे एकदा कळले की बाकी सर्व वेदांमध्ये काय सांगितले आहे इकडे दुर्लक्ष करुन एकाग्रतेने जीवनात वैराग्य आणण्याचा प्रयत्‍न जो साधक न चळता करतो त्याला परमपद मिळणार आहे. मग जीवनातल्या दररोजच्या कसरतींकडे बघायची आपली नजर बदलते आणि ज्या गोष्टींपासून ताण निर्माण होत होता त्याचगोष्टी आनंद देऊ लागतात. आपल्या भोवतालचे जीवन न बदलता आपणास सुख आणि शांति प्राप्त व्हायला लागते. हे कर्मयोगाचे मर्म आहे. 

॥ हरिः ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: