श्लोक ५४ आणि ५५/२ : स्थितप्रज्ञ म्हणजेच आत्मसंतुष्टता

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

अर्जुन उवाच :

स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।

स्थितधीः किं प्रभाषेत किमासित व्रजेत किम्‌ ॥ गीता ५४:२ ॥

श्रीभगवानुवाच :

प्रजहाति यदा कामान्‌ सर्वान्‌ पार्थ मनोगतम्‌ ।

आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥ गीता ५५:२ ॥

भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील एकोणपन्नासाव्या श्लोकापासून त्रेपन्नाव्या श्लोकापर्यंत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ‘दैनंदिन जीवनात भगवंताचे अखंड अनुसंधान असणे’ ही कर्मयोगाची फलश्रुती सांगितली आणि अशा अचल बुद्धीचे श्रेष्ठत्व गौरविले. ‘इच्छारहित राहून जीवन व्यतीत करणे’ ही एकच बुद्धी खरी आहे आणि बाकी सर्व चुकीचे आहे असे वचन भगवंतांच्या मुखातून ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात साहजिकच ‘इच्छा गेली तर हातून कर्मे कशी होतील?’ हा प्रश्न उद्भवला. आयुष्यभर सर्व कर्मे कुठल्यातरी फलाची आशा ठेवूनच केलेली असल्याने कर्मफलांचा त्याग कर असे शब्द ऐकल्यावर त्याच्या बुद्धीने असा निष्कर्ष काढला की कर्मांचा त्याग करायला हवा. परंतु स्वतःचे शरीर अस्तित्वात ठेवण्यासाठी आहारादि कर्मे करावी लागणार त्यांचे काय? त्यांचासुद्धा त्याग करायचा असे म्हटले कर्मयोगात परायण झालेल्या सिद्धाने शरीराचाही त्याग करावा का? त्याने आपले चालणे, बोलणे सोडावे काय?

अर्जुनाच्या मनातील या प्रश्नांतून जगाच्या विचार करण्याच्या पद्धतीवर प्रकाश पडतो असे वाटते. आपली विचारसरणी ज्या गोष्टीवर अवलंबून आहे ती म्हणजे बुद्धी होय. आणि या बुद्धीची नैसर्गिक मर्यादा अशी आहे की ती फक्‍त माहित असलेल्या गोष्टींवरच प्रक्रिया करु शकते. सध्या माहित असलेल्या गोष्टींवर बुद्धी काम करते आणि काहीतरी वेगळे आपणा समोर ठेवते. उदाहरणार्थ, मी बंगलोरमध्ये असताना मला शिकागो शहरात आज बाहेर जाताना छत्री घ्यावी लागेल का? या प्रश्नाचे उत्तर बुद्धी कितीही पणाला लावली तरी मिळणार नाही. परंतु संगणकाद्वारे त्या शहरातील हवामानाचा अंदाज मिळाला की आपण लगेच उत्तर देऊ शकतो! बुद्धीच्या या मर्यादेचा परिणाम म्हणजे जेव्हा एखादी व्यक्‍ती जेव्हा आपणास एक संपूर्णपणे नवी गोष्ट सांगायला लागते तेव्हा आपल्या बुद्धीचा काहीच उपयोग होत नाही. त्या गोष्टीवर विश्वास ठेऊनच (किंवा कारणविरहित नाकारुन) पुढे सरकावे लागते. त्याचप्रमाणे ऐकलेल्या गोष्टीमध्ये जर काही कळण्यासारख्या व काही संपूर्णपणे नवीन अशा वस्तू असल्या तर आपण माहित असलेल्या बाबींचाच जास्त विचार करतो. ही वस्तुस्थिती आपल्या संपूर्ण जीवनाला लागू पडते. अर्जुनाच्या मनात उद्भवलेल्या शंकांचे मूल याच वस्तुस्थितीत आहे. भगवान श्रीकृष्णांनी त्याला निव्वळ कर्मफलत्याग (म्हणजे व्यतिरेक) सांगितलेला नव्हता तर त्याचबरोबर स्वतःच्या निर्गुण अस्तित्वाबद्दलचे प्रेम वाढवायलाही सांगितलेले होते (म्हणजे अन्वय). कर्मफलाची आस्था ही अर्जुनाला माहित असलेली गोष्ट होती आणि आपले चैतन्यरुपी अस्तित्व ही नवी गोष्ट होती. त्यामुळे त्याच्या बुद्धीने कर्मफलत्याग म्हणजे काय हे लगेच जाणले आणि मग वरील शंका उत्पन्न केल्या! त्यांच्या प्रभावाखाली येऊन अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतो की ‘ज्याची बुद्धी (कर्मयोगावर) संपूर्णपणे स्थिर झालेली आहे त्याचे कसे वर्णन करता येईल? तो स्वतः कसा बोलतो? (किंवा त्याच्याबद्दल बाकी लोक काय बोलतात?) तो कसा बसतो? तो कसा चालतो? (५४).

भगवंतांना हे प्रश्न ऐकल्यावर कळून चुकले की अर्जुनाच्या मनात कर्मयोगाची फलश्रुती झालेला माणूस जिवंत कसा राहील हा प्रश्न उद्भवलेला आहे. म्हणून तो त्याच्या सर्वसाधारण क्रिया कशा असतील असे विचारत आहे. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे गुरुमाउली अतिशय कृपाळू असते. आपल्या शिष्यांना दहावेळा सांगूनही कळले नाही असे समजल्यावर ती अकराव्यांदा परत तेच नवीन रीतीने सांगण्यास ना म्हणत नाही. जोपर्यंत शिष्याची ऐकण्याची तयारी असते तोपर्यंत त्याला बोध होत राहतो. म्हणून माउलींनी चवथ्या अध्यायात म्हटलेले आहे की ‘तैसा मनाचा मार न करीता । आणि इंद्रिया दुःख न देता । एथ मोक्ष असे आयता । श्रवणाचिमाजि ॥२२४:४॥’ त्यामुळे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्थितप्रज्ञाने केलेला व्यतिरेक आणि अन्वय परत एकदा सांगतात. समाधिस्थ मानवाच्या जीवनात व्यतिरेक केल्याने पोकळी निर्माण झालेली नसून अन्वयाच्या आधाराने एक परिपूर्ण अवस्था प्राप्त झाली आहे असे ते अर्जुनाला सांगत आहेत. म्हणून अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर म्हणून भगवान म्हणतात की ‘जो आपल्या हृदयातील सर्व कामनांबद्दल संपूर्णपणे उदासीन आहे आणि जो स्वतःच्या स्वरुपाच्या अनुसंधानामध्ये पूर्णपणे संतुष्ट आहे त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे म्हणतात (५५).’ स्थिर बुद्धीचा मनुष्य कसा चालतो, बोलतो बसतो याचे वर्णन न करीता भगवान आता त्याच्या सर्व बाह्यगुणांचे वर्णन करतील. त्यांचे वर्णन इतके सखोल आहे की पुढच्या श्लोकापासून ते अध्यायाच्या अंतापर्यंतचे सर्व श्लोक स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगण्याकरीता रचलेले आहेत.

तर सांगायची गोष्ट म्हणजे कुठलीही नवीन गोष्ट कळण्यासाठी आपल्या बुद्धीची नव्हे तर विश्वासाची गरज असते. आधी विश्वास आणि मग नंतर अपरोक्ष ज्ञानाने शिक्कामोर्तब असा परमार्थाचा प्रवास असतो. व्यवहारात अत्यंत बुद्धीमान असणारी, आपल्या हुशारीचे सदैव प्रदर्शन करणारी माणसे परमार्थात पुढे का जात नाहीत आणि अतिशय भोळीभाबडी माणसे सहजरीत्या संत कशी बनतात याचे हे स्पष्टीकरण आहे. स्वतःच्या हुशारीला कवटाळून बसायचे की साधा विश्वास आपल्यात निर्माण करायचा प्रयत्‍न करायचा हे आपणास ठरविले पाहिजे. मग परमार्थाच्या गोष्टी बोलत येतील!

॥ हरिः ॐ ॥

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: