श्लोक (५६,५७)/२: संसाराबद्दलची तटस्थता

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।

वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ गीता ५६:२ ॥

यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम्‌ ।

नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ गीता ५७:२ ॥

परमार्थाबद्दल आस्था निर्माण होण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे संतांचे साहित्य होय. आणि संत साहित्य आपणास मनापासून आवडण्याचे प्रधान कारण म्हणजे त्यांनी बाह्या उभारुन दिलेली दुःखापासून सोडविण्याची ग्वाही. कुठलेही संत असत्य वचन बोलूच शकत नाहीत. त्यामुळे जेव्हा त्यांच्या मुखातून आपणास ताप देणाऱ्या दुःखाची निवृत्ती होईल आणि कधीही न संपणाऱ्या आनंदाची प्राप्ती होईल असे ऐकायला मिळाले की आपला साधना करण्याचा उत्साह द्विगुणित होतो. परंतु त्यांच्या या उच्चारांमध्ये एक ग्यानबाची मेख आहे. ती म्हणजे त्यांनी आश्वासित केलेला आनंद कसा आहे हे त्यांनी सांगितलेले नसते. कल्पना करा की शंभर टक्के चमचमीत भोजन करण्याऱ्या माणसाला फुकटात पाहिजे तेव्हढे चविष्ट भोजन मिळेल असे सांगितले आणि जेवण्याच्या थाळीत जास्त मसाले नसलेले अत्यंत मिळमिळीत पदार्थ वाढले तर त्याचे समाधान होईल का? ‘चविष्ट’ या शब्दाचा नक्की काय अर्थ आहे याबद्दल त्याचे आणि स्वयंपाक करणाऱ्याचे एकमत नसेल तर भोजनाशेवटी मनात असमाधानच निर्माण होणार यात शंकाच नाही. अगदी त्याचप्रमाणे आपल्या मनात आनंद किंवा सुख या शब्दांची अतिशय चमचमीत व्याख्या ठाम बसलेली आहे. उदाहरणार्थ, आपल्या दृष्टीकोनातून ‘चांगले’ सुख म्हणजे सात्विक सुख आणि सात्विक सुखाची परमावधी म्हणजे कुटुंबीय सुखी रहावेत आणि त्याचबरोबर जगाचेसुद्धा कल्याण व्हावे. याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ किंवा श्रीसंत गजानन महाराज यांच्या लीलांची वर्णने ऐकून परमार्थात प्रगती केल्याने संसारातही जे पाहिजे ते घडवू शकतो अशी काहीतरी भावनासुद्धा आपल्या मनात असते. या पूर्वग्रहांचे गाठोडे आपल्या जवळ ठेवून जेव्हा आपण संतांच्या शाश्वत सुखाच्या आश्वासनाकडे बघतो तेव्हा साहजिकच आपणास या मार्गाच्या शेवटी काय मिळणार आहे याची कल्पना निश्चित होते. परंतु अशा अपेक्षेने अध्यात्माच्या मार्गावर पाउल ठेवण्यापूर्वी आपली समजूत कितपत रास्त आहे यावर विचार करणे जरुरी आहे. संतांना अभिप्रेत असलेला आनंद नक्की कसा आहे हे आपण बघितले पाहिजे कारण प्रत्येक माणसाच्या मनात आनंद म्हणजे काय याबद्दलच्या कल्पना भिन्न असतात.

आता संतांचे मनोगत ओळखण्यासाठी आपली आणि त्यांची अत्यंत जवळीक असणे जरुरी आहे. श्री ज्ञानेश्वर, श्री तुकाराम इत्यादी संतांच्या आतल्या गोटात प्रवेश करणे आपणासारख्यांना कसे शक्य आहे या विचाराने खचून जाऊ नका. इथे दुसरा मार्गही उपलब्ध आहे. तो म्हणजे ज्या शब्दकोशाच्या आधारावर संत आपले शब्द वापरतात त्या शब्दकोशाचा संदर्भ घेऊन आपण संतांच्या मनातील अर्थ ओळखू शकतो. सर्व संत वेदशास्त्राच्या आधारावरच बोलत असल्याने आपण त्यांचा आधार घेऊ शकतो. परंतु इथेही वेदांसारख्या अवघड पोथींचे वाचन करणे जरुरी आहे! आपले हे कठीण कर्म अतिशय सोपे करण्यासाठीच भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचे निमित्त करुन गीता या ग्रंथाची उत्पत्ती केली आहे. त्यामुळे वेदांच्या जटील भाषेतून अर्थ काढण्याचीही आपणास जरुरी नाही. श्रीमद्‌भगवद्गीतेच्या संदर्भाने आपण संतांच्या वक्तव्यांमागील अभिप्रायांचा शोध घेऊ शकतो. गीतेमध्ये ज्या ज्या ठिकाणी साधनासिद्ध लोकांचे वर्णन आलेले आहे त्यातून परमार्थातील आनंद नक्की कसा आहे याचा मागोवा आपण घ्यायला हवा. त्यावरुन आपणास अध्यात्माच्या मार्गाचा अंत कुठे होणार आहे हे कळेल. ज्या माणसाची प्रज्ञा स्थिर झालेली आहे असा साधक अध्यात्माच्या अत्युच्च शिखरावर उभा आहे. त्याच्या सहज वर्तनावरुन त्याला काय मिळाले आहे याची थोडीबहुत कल्पना आपणास यावी या हेतूने भगवान श्रीकृष्ण सतरा श्लोकांतून त्याच्या स्थितीचे वर्णन करीत आहेत. सांख्ययोगावरील अध्यायातील पंचवीस टक्के भाग स्थितप्रज्ञाच्या लक्षणांचे गुणगान करण्यासाठी आहे हे लक्षात आल्यावर या श्लोकांचे महत्व आपणास आपोआपच पटेल.

लक्षणांच्या सुरुवात भगवान त्याच्या तटस्थतेपासून करीत आहेत. ते म्हणत आहेत की ‘ज्याचे मन दुःख समोर आल्याने उद्विग्न होत नाही आणि सुखाला चिकटून रहावे असे ज्याला वाटत नाही, ज्याने अभिलाषा, भय आणि क्रोध यांना जीवनातून बाहेर काढले आहे त्या मुनीला शाश्वत स्थिती प्राप्त झाली आहे (५६). शुभ वा अशुभ गोष्टी जेव्हा केव्हा मिळतात तेव्हा जो त्यांना धरुन बसत नाही, त्यांची अभिलाषा करीत नाही आणि त्यांचा द्वेषही करीत नाही त्याची प्रज्ञा पूर्णपणे विकसित झाली आहे (५७).

इथे लक्षात घ्या की सिद्ध झालेल्या साधकाला संसारातील गोष्टींवर प्रभुत्व मिळविता येते ही गोष्ट सांगितलेली नाही (अर्थात, ते मिळविता येतच नाही असेही इथे सांगितलेले नाही!) व्यावहारिक जग आणि तो यांमधील दुरावा वरील श्लोकांतून दर्शविला आहे. श्लोकांतून जरी फक्‍त सुखद आणि दुःखद वा शुभ आणि अशुभ गोष्टींचा उल्लेख केला आहे तरी त्यातून संसारातील यच्चयावत घटनांचा सूचित होतात. कारण सुख आणि दुःख या अतिशय प्रकर्षाने जाणविणाऱ्या टोकाच्या घटनांनीसुद्धा जर तो विचलित होत नाही तर नेहमी घडणाऱ्या सर्वसाधारण गोष्टींनी तो आपल्या स्थितीपासून ढळेल असे संभवतच नाही. त्यामुळे भगवंतांना ‘स्थितप्रज्ञ मनुष्य संसारातील सर्व गोष्टी वा घटनांपासून अतिशय दूर असतो’ असेच सांगायचे आहे यात संदेह नाही. आणि आपल्या मनातील सुखाची किंवा आनंदाची व्याख्या या संसारापासून दूर जाण्यामध्ये आहे का?! जर ‘परमार्थ करुन या प्रपंचामध्येच सुखाने रहावे’ असाच आपला विचार असेल तर आपण कधीही स्थितप्रज्ञ बनणार नाही हे स्पष्ट आहे. सर्व शास्त्रे संसाराला भासमय मानतात हे आपणास कबूल आहे. मग साधनेची परीसीमा म्हणजे संसारापासून निवृत्तीच असणार यात शंकाच नाही. कुठले शास्त्र ‘तुम्ही झोपेतच राहून स्वप्न बघत रहा’ असे सांगणार आहे? सर्व शास्त्रे तुम्हाला सध्याच्या निद्रावस्थेतून जागे करण्याचाच प्रयत्‍न करणार. एकदा जागृती आली की बाकी काही करणे शिल्लकच रहात नाही आणि स्वप्नातील गोष्टींशी संबंध संपूर्णपणे तुटून जातो. अशारीतीने संतांच्या मनातील आनंद या जगातील कुठल्याही वस्तूवर वा घटनांवर वा तत्वप्रणालीवर अवलंबून नाही हे सिद्ध होते.

इथे वरील श्लोकांमधील सुख आणि दुःख, शुभ आणि अशुभ या शब्दांना स्थितप्रज्ञ माणसाच्या नजरेतून लिहीलेले नसून अर्जुनाच्या नजरेतून लिहीले आहे हे ध्यानात घेणे जरुरी आहे. स्थितप्रज्ञ मनुष्याला सर्व गोष्टी समान असल्याने तो असा भेद करुच शकत नाही. स्वामी विवेकानंद परिव्राजक अवस्थेत भारतभ्रमण करीत असताना काशीमध्ये त्यांना एक सिद्ध मनुष्य भेटला. व्यावहारिक जगात त्याला वेडा म्हणून मानले जात होते. एकदा स्वामींनी त्याच्या मागे काही व्रात्य पोरे दगड मारीत आहेत आणि तो पळत आहे अशा स्थितीतून सोडविले. सोडविल्यावर तो स्वामींना म्हणायला लागला ‘आज काय मस्त खेळ खेळलो. मुलांनी दगड मारायचा आणि मी पळायचे. हे पहा किती छान रक्‍तसुद्धा आले आहे!’ जी गोष्ट आपल्या नजरेतून अतिशय दुःखद असते त्याचे भानसुद्धा स्थितप्रज्ञांना नसते. संसारापासून एव्हढी फारकत आपणास हवी आहे काय?

॥ हरिः ॐ ॥

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: