श्लोक ५८/२: स्वरुपज्ञानाचे कवच

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः ।

इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ गीता ५८:२ ॥

सर्वसाधारणपणे आपण कर्म या शब्दाचा अर्थ बाह्य जगात घडलेली कृती असा करतो. त्यामुळे एकटाच स्वतःच्या मनोराज्यात रमलेलो असताना जर ‘काय करतोस?’ असे कुणी विचारले, तर ‘काही नाही. नुसताच बसलोय’ असे म्हणण्यात अप्रामाणिकपणा आहे याची जाणीवसुद्धा आपणास नसते. परंतु व्यापक नजरेने बघितल्यास प्रत्येक कर्माची सुरुवात आणि शेवट मनात होत असतो असे दिसून येते. मनात काहीतरी करावे अशी भावना झाल्याशिवाय आपल्या हातून कर्मे होत नाहीत (उदा. रविवारी सकाळी पत्नीने तगादा लावला तरी आपण वर्तमानपत्र वाचणे सोडत नाही!) आणि जेव्हा ‘आता पुरे’ असे मन म्हणते तेव्हाच कर्माचा शेवट होतो. या दोन टोकाच्या घटनांमध्ये घडलेल्या आपल्या हातून कृतींनाच कर्म म्हणणे संयुक्‍तिक नाही हे साहजिकच आहे. आता यापेक्षाही सूक्ष्म विचार करायचा झाला तर जेव्हा मनात काही करण्याचा विचार येतो त्या आधी एक कुठलातरी हेतू मनात निर्माण झालेला असतो. आणि कर्माची खरी सुरुवात या हेतूपासून होते. उदाहरणार्थ, ‘चविष्ट खावे’ हा हेतू मनात आल्यावर भेळ-पुरीची गाडी बघावी असा विचार येतो आणि स्कूटरची चावी हातात घेण्याची कृती घडते. जेव्हा आपला नेहमीचा स्टॉल समोर येतो तेव्हा ‘आता पुरे’ असे मन म्हणते आणि आपली स्कूटर चालविण्याची क्रिया थांबते. याचा अर्थ असा की बाह्य जगातील आपली दृष्य क्रिया केव्हा थांबवावी हे आपला हेतू काय आहे यावर अवलंबून असते.

हे विवेचन सांगण्याचे कारण असे की परमार्थात सद्‌गुरु जेव्हा कुठलीतरी बाह्य क्रिया करायला सांगतात तेव्हा निव्वळ त्या क्रियेला पार पाडण्यात त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन होत नाही. ती क्रिया करताना हेतू कुठला असावा याचेसुद्धा आपणास भान असले पाहिजे. ते जर नसेल तर नुसत्या बाह्योपचारात आपण अडकण्याची शक्यता असते. आज विवेचनाला घेतलेल्या गीतेमधील वरील श्लोकामध्ये प्रथम नजरेत असे दिसून येते की स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगताना भगवान बाह्य जगातील क्रिया करण्याचा उपदेश करीत आहेत. ते म्हणत आहेत की ‘ज्याप्रमाणे (गरज असेल तेव्हा) कासव आपले अंग संसाराच्या संगापासून काढू शकते त्याचप्रमाणे जो मनुष्य इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून दूर ठेवू शकतो त्याची प्रज्ञा पूर्ण विकसित झाली आहे असे समज (५८).’ इंद्रियांना त्यांच्या विषयापासून दूर करणे हे झाले बाह्य कर्म. आता हे कर्म आपण अनेक हेतूंनी करु शकतो. उदाहरणार्थ, मधुमेह झाला आहे याची जाणीव झालेला मनुष्य स्वतःची प्रकृती जपण्यासाठी आपल्या जिभेवर ताबा ठेवतो. या कर्माचा हेतू स्वतःच्या देहाला जपणे असा असल्याने त्याच्या या कृतीने तो स्थितप्रज्ञ झाला आहे असे म्हणणे चुकीचे होइल. कारण अशा माणसाच्या मनात त्या कृतीमुळे शांति उत्पन्न झाली आहे असे दिसून येत नाही आणि ज्ञानाच्या प्राप्तीचे एकमेव निशाण म्हणजे चित्तात निरंतर असलेली निरामय शांतता होय (पहा: ज्ञानं लब्ध्वा परां शांति अचिरेणाधिगच्छति (गीता ३९:४), सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति (गीता २९:५) इत्यादि). यावरुन निव्वळ इंद्रियांवर संयम केल्यामुळे आपण स्थितप्रज्ञ होत नाही हे सिद्ध होते.

तेव्हा आपणास इंद्रियसंयम का ठेवावा यावरसुद्धा विचार केला पाहिजे. योग्य हेतू मनात ठेवून मगच यम आणि नियम यांचा अभ्यास आपण करायला हवा. आणि आपणास बाह्य क्रियांमागील हेतू कळावा म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी स्थितप्रज्ञ म्हणजे काय याची व्याख्या अर्जुनाला सांगून मगच लक्षणे सांगायला सुरुवात केली होती. त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे ‘आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते’. म्हणजे जो स्वतःच्या स्वरुपानुसंधानामध्येच संपूर्णपणे सुखी आहे त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात असे भगवंतांनी सांगितलेले आहे. तेव्हा स्वतःच्या स्वरुपाबद्दल गोडी निर्माण करण्याच्या हेतूने आपण निग्रहकर्म करायला हवे हे सिद्ध होते. आणि जसा हेतू असतो त्याप्रमाणे क्रिया थांबविण्याचा निकष असतो. त्यामुळे आपणास संपूर्णपणे स्वरुपज्ञान होईपर्यंत इंद्रियनिग्रह करायला हवा. याचा अर्थ असा की योग्यवेळी यम-नियमांचा (म्हणजे सात्विकतेचा) हव्याससुद्धा सोडणे जरुरी असते. मगाशी सांगितलेल्या उदाहरणामध्ये भेळेची गाडी दिसल्यावरसुद्धा जर आपण गाडी चालवितच बसलो तर काहीच साध्य होणार नाही!

वरील विवेचनावरुन कासवाचे उदाहरण किती समर्पक आहे याची जाणीव आपणास झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याप्रमाणे कासव पाठीवरील टणक कवचाचा आधार घेऊन आपले अंग आत ओढून घेतो त्याचप्रमाणे स्वरुपनुसंधानाच्या ध्यासाच्या कवचाकरीता आपण स्वतःच्या इंद्रियांना आवरले पाहिजे. या कवचाच्या अस्तित्वाशिवाय अंग चोरण्याने सुरक्षितता लाभणार नाही. ज्या क्रिया ज्ञानी मनुष्य सहजपणे करतो त्या आपण प्रयत्‍नपूर्वक करण्याची साधना आपल्या दृष्टीस पडावी या हेतूने भगवान स्थितप्रज्ञाची लक्षणे वर्णन करीत आहेत. परंतु शुद्ध हेतूशिवाय निव्वळ बाह्य क्रिया करण्याने आपले भले होईल असे कुणीही मानू नये.

शेवटी कितीही चांगले उदाहरण असले तरी ते सत्यस्थिती संपूर्णपणे कसे दाखवू शकत नाही हे बघू. कासवाच्या अंग चोरण्याचा हेतू स्वतःच्या देहाला सुरक्षित ठेवणे असा असतो. कासवाची बाह्य क्रिया देहनाशाच्या भितीमुळे झालेली असते. परंतु स्थितप्रज्ञ आपली इंद्रिये स्वरुपाच्या आनंदात मग्न झाल्याने आवरतो. त्याच्या दृष्टीने इंद्रियवैराग्य ही एक सकारात्मक, आनंददायी घटना आहे. आपणास वैराग्याचे ओझे वाटते तशी नकारात्मक नाही. ही गोष्ट कासवाच्या उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही. तेव्हा परमार्थात दिलेले कुठलेही उदाहरण आपण फार ताणू नये! इति.

॥ हरिः ॐ ॥

Advertisements

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s