श्लोक ५९/२: विषयवासना निवृत्ती

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।

रसवर्ज्यं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥ गीता ५९:२ ॥

ज्याप्रमाणे कासव आपले अवयव पाहिजे तेव्हा कवचाखाली ओढून घेतो त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ मनुष्याने आपल्या इंद्रियांवर ताबा मिळविलेला असतो असे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गेल्या श्लोकात (गीता ५८/२) सांगितले. आता ज्ञानी माणसाचा अवयवांवरील ताबा कष्टाने साध्य केलेला नसतो तर आपोआप आलेला असतो ही अत्यंत महत्वाची गोष्ट ते अर्जुनाला विषद करुन सांगत आहेत. वरील श्लोकातून भगवान म्हणत आहेत की ‘जेव्हा इंद्रियांना त्यांच्या आहारापासून (म्हणजे विषयांपासून) दूर ठेवले जाते तेव्हा त्यांची विषयांकडे धाव घेण्याची प्रवृत्ती निघून जाते. परंतु ‘विषयांच्या उपभोगातूनसुद्धा सुख मिळू शकते’ ही आपल्या मनातील भावना निघून जात नाही. जेव्हा स्वरुपाचे दर्शन होते तेव्हाच मनातील विषयांबद्दलची ही सूक्ष्म आस्थाही निवृत्त होते.

पुढे जाण्याआधी श्लोकाच्या वरील अर्थाविषयी काही सांगावेसे वाटते. मूळ गीता ही इतकी त्रोटक आहे की तीच्या श्लोकांचा सुसंगत अर्थ लावणे गुरुंच्या उपदेशाशिवाय अतिशय कठीण आहे. प्रत्येकाच्या जीवनात भगवद्गीतेचा खरा अर्थ जाणणारा शिक्षक भेटेलच अशी खात्री नसल्याने श्री ज्ञानेश्वर महाराजांना त्यांच्या सद्‌गुरुंनी, म्हणजे श्री निवृत्तीनाथांनी, गीतेवर भाष्य करण्याची आज्ञा केली. त्या गुर्वाज्ञेनुसार माउलींनी त्यांच्या प्रतिभेला पणाला लावून श्रीज्ञानेश्वरी (भगवद्गीता भावार्थ दिपिका) या अलौकिक ग्रंथाची निर्मिती केली. परंतु आता कालांतरानुसार ज्ञानेश्वरीची भाषादेखील अनोळखी झाल्याने हा ग्रंथ सर्वसामान्य जनांना अवघड झाला आहे. समाजाची ही अवस्था बघून अनेक सद्‌गृहस्थांनी श्रीज्ञानेश्वरीचा प्रचलित भाषेत अर्थ प्रकाशित केला आहे. त्यामुळे ‘सार्थ ज्ञानेश्वरी’ या नावाने अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. परंतु सार्थ ज्ञानेश्वरीतील अर्थ लेखकाच्या समजुतीवर अवलंबून असल्याने तो शास्त्रमंजूर असेलच याची खात्री नसते. ही वस्तुस्थिती इथे सांगायचे कारण म्हणजे गीतेच्या वरील श्लोकातील ‘निराहार’ आणि ‘रसना’ या दोन शब्दांचा अर्थ बहुतांशी लेखकांनी ‘खाणे’ आणि ‘विषयवासना’ असा घेतला आहे. त्यामुळे त्यांच्यामते एकदा खाण्यावर ताबा मिळविला की विषयांपासून इंद्रिये दूर होतात असा वरील श्लोकातील पहिल्या पदाचा अर्थ निघतो. परंतु आपणा सर्वांच्या जीवनात वृद्धापकाळामुळे वा तरुणपणीसुद्धा एखाद्या व्याधीमुळे आहारावर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्‍ती आल्या आहेत आणि अशा माणसांची बाकीची इंद्रिये विषयांपासून निवृत्त झालेली आहेत असे दिसून येत नाही! यामुळे आहार या शब्दाचा ‘खाणे’ हा अर्थ उचित वाटत नाही. आधारासाठी या श्लोकावरील माउलींचे भाष्य बघितले तर त्यांनी असे म्हटले आहे ‘श्रोत्रादि इंद्रिये आवरिती । परी रसने नियम न करिती । ते सहस्त्रधा कवळिजती । विषयीं इंही ॥ ३०४:२ ॥’ म्हणजे परत ‘रसना’ या शब्दाचा अर्थ ‘रसिकता उर्फ मनातील आवड’ असा घ्यायचा की ‘जिभेची चव’ असा घ्यायचा हा संदेह उरतोच! अशावेळी आपणास ज्या महान मानवाने जगास गीता या ग्रंथाला महाभारतातील एक लाख श्लोकांच्या जंजाळातून बाहेर काढून जगासमोर ठेवले त्यांची, म्हणजे आदिशंकराचार्यांची मदत होते. ‘आहार’ या शब्दाचा जगद्गुरु आदि शंकराचार्यांनी ‘ज्याच्या सेवनाने एखाद्या गोष्टीला पुष्टी येते’ असा फार व्यापक अर्थ काढला आहे. त्यामुळे इंद्रियांच्या वाढीला जे पोषक आहे तो त्यांचा आहार होतो. उदाहरणार्थ, श्रवणेंद्रियांना आवाज, घ्राणेद्रियाला सुवास आणि जिभेला सुग्रास अन्न. त्याचप्रमाणे गीतेतील वरील श्लोकातील दुसऱ्या चरणात वापरलेल्या ‘रस’ या शब्दाचा अर्थ त्यांनी ‘रसिक’ या शब्दाप्रमाणे घेतलेला आहे. म्हणजे ज्याला विषयांच्या आवडीबद्दल ममत्व आहे असा मानव. दुसरा तितकाच आदरणीय आधार म्हणजे पावसचे महाराज श्री स्वामी स्वरुपानंदांनीही आपल्या ‘अभंग ज्ञानेश्वरी’ या ज्ञानेश्वरीवरील विस्तृत भाष्यामध्ये ज्ञानेश्वरीतील ‘रसना’ या शब्दाचा अर्थ ज्याला विषयांबद्दल गोडी आहे असा मानव असा लावलेला आहे. तेव्हा वरील श्लोकाचा अर्थ या दोन आधारांनुसार लावलेला आहे आणि लेखकाला तो जास्त संयुक्तिक वाटतो. असो.

भगवंतांना ही गोष्ट सांगायची आहे की जबरदस्तीने इंद्रियांना त्यांच्या आहारापासून (म्हणजे विषयांपासून) दूर ठेवले तर काही काळाने त्यांना विषयोपभोग कसा घ्यावा हे कळणे बंद होईल यात शंका नाही, (हा सर्व सवयींचा परिणाम आहे.) परंतु त्यामुळे मनातील वासना दूर होणे अशक्य आहे. याचा दैनंदिन जीवनातील प्रत्यय असा आहे: आपण भगवंताच्या प्राप्तीकरीता विषयांपासून दूर गेलो तरी आपला मित्र जेव्हा त्याच्या विषयोपभोगांनी मिळालेल्या आनंदाचे वर्णन करतो तेव्हा ‘अरे, अशा मार्गानेसुद्धा आनंद मिळतो की! मग आपण कशाला विषयनिवृत्तीच्या मागे लागलो आहोत?’ असा आपल्या मनात संदेह निर्माण होणे! कुणा एका त्रयस्थाला भारी कपडे घालून बायको-मुलांबरोबर हसत-खेळत समोरुन जाताना बघितले की मनात ‘असे जीवनसुद्धा सुखमय आहे’ ही भावना निर्माण होणे हेसुद्धा आपल्या मनातील विषयांबाबतीतील रस पूर्णपणे गेलेला नाही याचेच लक्षण आहे. हा अंतर्गत रससुद्धा जर जायचा असेल तर लांबून का होईना पण स्वरुपदर्शन होणे जरुरी आहे असे भगवंतांचे अर्जुनाला सांगणे आहे.

वरील श्लोकातील भगवांतांच्या ‘परंदृष्ट्वा’ या शब्दाकडेसुद्धा फार बारकाईने पहायला हवे. इथे भगवान श्रीकृष्णांनी ‘परंलब्ध्वा’ असे शब्द वापरलेले नाहीत हे लक्षात घ्या. श्लोकातील यमकाच्या नजरेतून पहायला गेले तर दृष्ट्वा आणि लब्ध्वा हे दोन्ही शब्द इथे चपखलपणे बसतात. परंतु ‘दर्शन होणे’ आणि ‘प्राप्ती होणे’ यात जो मूलभूत फरक आहे तो भगवंतांना सांगायचा आहे असे वाटते. जेव्हा आपणास स्वरुप म्हणजे काय हे अंदाजाने कळते, तेव्हढे अपुरे ज्ञानसुध्दा मनातील विषयांबाबतीतील रसिकता निघून जायला पुरेसे आहे. याचा अर्थ असा की आपण स्वरुपानुसंधानात संपूर्णपणे स्थिर झालेलो नसलो तरी अशा स्थितप्रज्ञतेला पात्र होण्यास ज्या अडचणी आहेत त्यांचे निवारण झालेले आहे असे भगवान सांगत आहेत. ही गोष्ट आपणा सर्वांना फार आश्वासनदायी आहे. संतपणाला आपण पोहोचू का नाही हे आपणास माहीत नाही. पण भगवंतांनी इथे एक आपणाजवळील टप्पा सांगितलेला आहे तो तर आपण गाठायचा प्रयत्‍न करु शकतो! चला आपण सर्वजण विषयांचा ‘व्यतिरेक’ आणि स्वरुपाचा ‘अन्वय’ करण्याच्या ध्यासात मग्न होऊ या. सद्‌गुरु आपणास शक्‍ति देतीलच!!

॥ हरिः ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: