श्लोक (६० आणि ६१)/२: अनन्यतेचे महत्व

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः ।

इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ गीता ६०:२ ॥

तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः ।

वशे हि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ गीता ६१:२ ॥

जबरदस्तीने केलेल्या निव्वळ बाह्य त्यागाने इंद्रियांपासून विषय दूर गेले तरी त्यांच्या उपभोगाबाबतची मनातील आवड नष्ट होत नाही असे गेल्या श्लोकात भगवंतांनी स्पष्टपणे अर्जुनाला सांगितले. हाच मुद्दा आता ते परत एकदा सांगत आहेत. जेव्हा एखादी गोष्ट आपणास महत्वाची वाटते तेव्हा ती आपण पुन्हा पुन्हा सांगतो. (उदाहरणार्थ, प्रिय व्यक्तिला आमंत्रण देउन झाल्यावर निघताना परत ‘उद्या नक्की या बरं का’ असे म्हणणे!) अशा वर्तनातून त्या गोष्टीचे आपणास किती महत्व आहे हे दिसत असते. विषयांच्या काळोख्या गुंफेत खोलवर घुसल्याने मनुष्याला स्वरुपज्ञानाचा उजेड दिसेनासा झालेला आहे याची पूर्ण जाणीव भगवंतांना आहे. देहाभिमानाने स्वतःच निर्माण केलेल्या या गुहेबाहेर भगवंताच्या कृपेचा प्रकाश लखलखीत पडलेला आहे आणि त्याकरीता आपणास फक्‍त विषयांच्या विवरातून बाहेर यायला हवे असे ते परत परत सांगत आहेत. परंतु वर्षोनुवर्षांच्या विविध हव्यासाने आपल्या मनात अभिलाषांचे एक जंजाळच निर्माण झाले आहे. त्यामुळे आत्ता नजरेस दिसणाऱ्या ओढींचे निराकरण केले तरी परत पूर्वकर्मांमुळे नवीन इच्छा निर्माण होतात आणि आपण परत इच्छा-आकांक्षांमध्ये अडकून बसतो. या वस्तुस्थितीने ज्ञानी मनुष्यदेखील हताश होऊ शकतो. भगवान श्रीकृष्णांना या परिस्थितीची पूर्ण जाणीव असल्याने ते अर्जुनाला सांगत आहेत की: ‘अरे अर्जुना, ही इंद्रिये इतकी बलवान आहेत की आपले मन आवरण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्‍न करणाऱ्या ज्ञानी पुरुषांचे मनसुद्धा ते जबरदस्ती करुन (आपल्याकडे) पळवून नेतात (६०). (यावर उपाय म्हणजे) इंद्रियांना आवरुन माझ्या प्राप्तीमध्येच जीवनाचे सर्वस्व आहे याची जाणीव जो सतत जागृत ठेऊन (आणि त्या निरंतर अनुसंधानाने आपल्या इंद्रियांच्या हालचालींकडे लक्ष न दिल्याने) जो आपली इंद्रिये सहजतेने आपल्या ताब्यात ठेवतो त्याची बुद्धी संपूर्णपणे विकसित झाली आहे असे समज (६१).

भगवंतांच्या वरील वक्तव्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा मुद्दा लपलेला आहे. तो म्हणजे आपण इंद्रियांच्या आहारी स्वतःच्या अपूर्णतेच्या जाणीवेमुळेच जात असतो. आपले जीवन अधिक सुंदर होईल याची जाणीव ज्याक्षणी होते तेव्हाच (त्या ज्ञानाच्या आधारावर) आपण विषयांचा उपभोग घेण्यास प्रवृत्त होतो. एखाद्या हॉटेलमध्ये खाणे चांगले मिळत नाही हे कळल्यावर आपण तिकडे जाऊ का? जिथे जिव्हेला तृप्तता मिळेल याची खात्री असेल त्याच भोजनालयात आपण जेवायला जातो. आणि जर भूक लागलेली नसेल तर असे हॉटेल समोर आले तरी आपण आत शिरत नाही. सांगायची गोष्ट अशी आहे की मनाला भूक लागल्याशिवाय इंद्रिये आपल्यावर ताबा मिळवू शकत नाहीत. त्यामुळे जर मन सतत तृप्त असेल तर विषय आपल्यावर जबरदस्ती करुच शकत नाहीत. म्हणून भगवान म्हणत आहेत की ज्याच्या मनात माझ्याबद्दल आस्था निर्माण झालेली आहे त्याने आपल्या मनात अपूर्णतेचा भाव ठेवला तर त्यालासुद्धा इंद्रिये हरवू शकतात. म्हणजे काय तर भगवंताकडे जाण्याने सुख मिळते हे कळल्याने आपल्या जीवनातून विषय लगेच निघून जात नाहीत. आनंद मिळविण्यासाठी जे अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यात अजून एक परमार्थरुपी मार्ग मिळाला अशी जर आपली भावना असेल तर आपण दुसरे मार्ग (म्हणजे इंद्रियांचे समाधान करणे) कसे आहेत हे आपण मधून मधून बघणारच. आणि विषयांमध्ये अडकणारच.

विषयनिवृत्तिसाठी आपल्या ठीकाणी अशी भावना निर्माण व्हायला हवी की केवळ भगवंतप्राप्तीमध्येच सुख आहे, आनंद आहे आणि बाकी सर्व दुःखमयच आहे. एकदा ही जाणीव झाली की का म्हणून आपण साधनेशिवाय दुसरे मार्ग चोखाळू? आपल्या सर्व धडपडी सुखप्राप्तीसाठीच होत असतात आणि साधनेशिवाय बाकी सर्व गोष्टी शेवटी दुःखच देणार आहेत असे कळले तर आपोआपच आपण त्यांना आपल्या आयुष्यातून व्यर्ज करु. विषयांचा व्यतिरेक करु. म्हणून भगवंतांनी ‘युक्त आसीत मत्परः’ हे शब्द वापरलेले आहेत. पुढे नवव्या अध्यायातदेखील ते म्हणतात ‘अनन्याश्चिंतयन्तो मां ..(गीता २२:९)’. भगवंताबद्दल नुसते प्रेम असून चालत नाही. असे प्रेम आपणा सर्वांमध्ये आहेच. त्याच्या प्रेमाबद्दल ‘अनन्यता’ म्हणजे अन्य काहीच नको ही भावनासुद्धा हवी. आपण इथेच मार खातो! गणेशचतुर्थीला गणपतीबद्दल प्रेम वाटते हे खरे आहेच परंतु शुक्रवारी ‘पहिल्या शो’बद्दलही तेव्हढेच आकर्षण वाटते, किंवा धन-पुत्र-दारा यांचेसुद्धा आकर्षण असतेच. म्हणून वारंवार भगवंतप्राप्तीखेरीज पर्याय नाही याचे ज्ञान झाले तरी आपली इंद्रिये आपल्या मनाला पळवून नेतात आणि आपण परत मोहजालात अडकतो. या दुष्टचक्रातून सुटायचे असेल तर आपण ठाम निश्चय केला पाहिजे की निव्वळ भगवंतप्राप्तीमध्येच खरा पुरुषार्थ आहे. आणि या निश्चयाच्या बळावर सतत भगवंताचे अनुसंधान मनात ठेवले पाहिजे. ज्या साधकाने असे केले नाही त्याची अधोगती होणार असे भगवान अर्जुनाला सांगत आहेत. साधक कसा परत मायाजालात फसतो याचे फार दारुण वर्णन भगवंतांनी पुढील श्लोकांतून केलेले आहे ते आपण पुढच्यावेळी बघू!

॥ हरिः ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: