श्लोक (६२ आणि ६३)/२: विषयांच्या ध्यास म्हणजे आगीशी खेळणे

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 ध्यायतो विषयान्पुंसः संगस्तेषूपजायते ।

संगात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥ गीता ६२:२ ॥

क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः ।

स्मृतिभ्रंशाद्‌बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ गीता ६३:२ ॥

भगवद्गीतेच्या द्वितीय अध्यायातील श्लोक ५९ पासून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ‘नुसत्या बाह्य त्यागाने वासना नष्ट होत नाही’ या सूक्ष्म वस्तुस्थितीची जाणीव करुन द्यायला सुरुवात केली. याचे कारण असे की अगदी लहानपणापासून समाजातील आपले बाह्य वर्तन एका मर्यादेत ठेवण्याचे संस्कार आपल्यावर झालेले आहेत आणि त्यामुळे आपली विचारसरणी त्या मर्यादा पाळण्यामध्येच सर्वस्व मानायला लागली आहे. आपल्या नकळत झालेल्या अशा संस्कारांचे प्रतिबिंब अगदी क्षुल्लक बाबतीतही आपण बघू शकतो. जेव्हा एखादे लहान मूल त्याच्या पद्धतीने काढलेले चित्र दाखविते तेव्हा ते बघितल्यावर आपल्या तोंडातून ‘हे कशाचे (वा कुणाचे) चित्र आहे?’ असे शब्द अगदी सहजपणे निघतात. जर त्याने सांगितले की ही अमुक वस्तू (वा व्यक्‍ति) तर आपले समाधान होते. त्याने ‘मला जे वाटले ते काढले’ असे म्हटले तर आपले संपूर्ण समाधान होत नाही. या अतिशय किरकोळ घटनेमधूनसुद्धा असे दिसून येते की सर्वात अमूर्त आणि नैसर्गिक कलेतसुद्धा आपण बाह्य जगाचेच प्रतिबिंब बघायचा प्रयत्‍न करीत असतो. ही सवय आपल्या हाडीमांसी इतकी भिनलेली आहे की बाह्य जगात आपण कसे वागतो यावरुन आपण खरे कसे आहोत याबद्दल निष्कर्ष काढायला मागेपुढे पहात नाही. त्यामुळे आपल्याला ‘तू बदल’ असा सल्ला मिळाला की साहजिकपणे बाह्य वर्तनात बदल घडवून आणण्याकडे आपला कल असतो. परंतु ज्याप्रमाणे नवीन फुटणारी पालवी सतत खुडल्याने झाड नष्ट होत नाही त्याचप्रमाणे निव्वळ बाह्य वर्तनावर निर्बंध घातल्याने आपल्या मनातील प्रवृत्ती नष्ट होत नाहीत. जेव्हा पालवी खुडण्याची क्रिया थांबते तेव्हा ते रोप फोफावून परत मोठा वृक्ष होणारच आहे!

अर्थात, या विवेचनाचा अर्थ मनुष्याने बाह्य निर्बंध घालूच नयेत असा नाही. सांगायची गोष्ट अशी आहे की ज्याप्रमाणे बागेतील आगंतुक झाडाचा विनाशाकरीता ते मूळापासून उपटावे लागते त्याचप्रमाणे व्यावहारिक जगापासूनच्या संपूर्ण निवृत्तीसाठी आपल्या मनामधील विषयसुखांबाबतचा रसिकपणालासुद्धा काढून टाकले पाहिजे. असे जर केले नाही तर कालांतराने आपली अवस्था काय होईल याचे फार सुंदर विश्लेषण वरील श्लोकांतून भगवान श्रीकृष्ण करीत आहेत. या श्लोकांचे अर्थ आपण माउलींच्या शब्दांतच बघू! भगवान म्हणत आहेत की ‘ जरी हृदयीं विषयस्मृति । तरी निःसंगाही आपजे संगती । संगे प्रगटे मूर्ती । अभिलाषाची ॥ ज्ञा. ३२१:२ ॥ जेथ काम उपजला । तेथें क्रोध आधींचि आला । क्रोधीं असे ठेविला । संमोह ॥ ३२२:२ ॥ संमोहा आलिया व्यक्‍ती । तरी नाश पावे स्मृती । चंडवाते ज्योती । हत जैसी ॥ ३२३:२ ॥ ऐसा स्मृतिभ्रंश घडे । मग सर्वथा बुद्धी अवघडे । तेथ समूळ हे उपडे । ज्ञानजात ॥ ३२७:२ ॥ चैतन्याच्या भ्रंशी । शरीरा दशा जैसी । तैसे पुरुषा बुद्धीनाशी । होय देखें ॥ ३२८:२ ॥

माउलींनी मनातील ध्यासाला ‘हृदयातील स्मृती’ असे अतिशय सुंदर नाम दिले आहे. ( माउलींच्या या शब्दांचा आधार घेऊन श्रीलक्ष्मी सहस्रनामामध्ये ‘हृदयग्रंथीविनाशिनी’ असे जे नाव आहे त्याचा अर्थ ‘मनातील विषयांवर आधारीत सर्व कामनांचा नाश करणारी’ असावा असे वाटते! असो.) परंतु या शब्दांचा अर्थ मनातील स्मरण असे नाही हे ध्यानात घेणे जरुरी आहे. विषय म्हणजे काय हे विसरुनच जाण्याचा प्रयत्‍न करणे निष्फळ आहे. आत्तापर्यंतच्या सवयीने कदाचित इंद्रिये विषयांकडे धावतील, परंतु त्यांच्या प्रयासांना आपण प्रोत्साहन देणे संपूर्ण थांबवायला हवे असे माउलींना म्हणायचे आहे. आणि प्रोत्साहन न देणे म्हणजे त्यांचा विनाश करणे नव्हे हे लक्षात घ्या! ‘वाईट विचार’ मनात येऊच नये ही आत्यंतिक इच्छासुद्धा त्यांनाच उत्तेजित करत असते. असे म्हणतात की एखाद्या व्यक्‍तिबद्दल द्वेषभावना असणे हेसुद्धा प्रेमाचेच एक रुप आहे. जर कुठलीच भावना नसती तर का म्हणून शत्रुत्व उपजले असते? तेव्हा प्रोत्साहन न देण्यासाठी निव्वळ तटस्थपणाच कामास येतो. आपले लक्ष सदोदित भगवंताच्या वा सद्‌गुरुंच्या स्मरणात ठेवले की आपल्या इंद्रियांच्या व्यवहाराकडे आपोआप दुर्लक्ष होते. कामावरुन घरी परत आल्यावरसुद्धा कचेरीच्या कामात जर आपण गुंतलेलो असलो तर मुलांमध्ये आपसात भांडण चालू आहे हे कळतसुद्धा नाही अशी ही गोष्ट आहे. वास्तविक आपले कान त्यांचे सर्व शब्द ऐकत असतात पण त्यातून अर्थ काढण्याच्या शक्‍तीला आपण दुसरीकडे गुंतविलेले असते. म्हणूनच विषयांच्या ध्यासापासून हृदयाला सोडवायचे असेल तर भगवंतांच्या शब्दात आपली स्थिती ‘युक्‍त आसीत मत्परः (गीता ६१:२)’ अशी असायला हवी. ज्याप्रमाणे एखाद्या घटात अमृत भरलेले असेल तर त्यात दुसरा कुठलाही पदार्थ ठेवायला जागाच उरणार नाही त्याचप्रमाणे एकदा जीवनात महत्वाचे काय आहे हे निश्चितपणे ठरविले की इतर गोष्टींबाबत आसक्‍ती राहत नाही. एकदा आसक्‍ती निघून गेली की हळूहळू जीवनातून विषयांचे निरसन व्हायला लागते. आणि विषयवासनेचा पडदा नष्ट झाला की गुरुकृपेचा उजेड दिसायला लागतो. त्या लख्ख प्रकाशात न्हाहण्यात जे सुख आहे ते अनुभवण्यासाठीच तर आपला जन्म झाला आहे. होय ना?!

॥ हरिः ॐ ॥

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: