श्लोक (६४ आणि ६५)/२: पारमार्थिक त्यागाचे भिन्नत्व

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 रागद्वेषवियुक्‍तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन्‌ ।

आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ गीता ६४:२ ॥

प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते ।

प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥ गीता ६५:२ ॥

गेल्या श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी मनामध्ये विषयोपभोगाची आसक्‍ती ठेवण्यातील धोका अर्जुनास स्पष्ट केला. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे विषयांबद्दलची लालसा जाणतेपणाने नष्ट केली पाहिजे. विषय म्हणजे काय हे माहितच नसल्याने त्यांच्या उपभोगाची इच्छा न होणे या स्थितीपेक्षा त्यांची पूर्ण माहिती असूनही निरिच्छ असणे भगवंतांना अभिप्रेत आहे. अज्ञानात सुख असते असे म्हणतात. पण तशा सुखात असण्याचा परमार्थाशी काहीही संबंध नाही! आणि ही गोष्ट आपल्या मनावर संपूर्णपणे बिंबविण्यासाठीच प्रत्येक संताच्या जीवनामध्ये भगवान मोहाचे क्षण आणतात. उदाहरणार्थ, जगद्‍गुरु श्रीसंत तुकारामांच्या पुढे अचानक शिवाजी महाराजांकडून पालखीसहित नजराणा आला, श्री रामकृष्ण परमहंसांना श्री माथुरबाबूंतर्फे जमीन इनाम द्यायचा प्रयत्‍न झाला आणि श्रीसंत गोंदवलेकर महाराजांना कोर्टाकडून वडिलोपार्जित संपत्ति भाऊबंदांच्या ताब्यातून परत मिळाली. अशा प्रत्येक मोक्याच्या क्षणी संतांचे वर्तन बघितले की त्यांच्या तत्वनिष्ठतेची खोली कळते. असे म्हणतात की योगी पुरुषांचे वर्तन लहान मुलांसारखे असते. परंतु त्यांना जगाच्या व्यवहारांमागील सत्याची जाणीव झाल्यामुळे ते बालकांसमान वर्तन करतात, बालकांप्रमाणे त्यांचे वागणे अज्ञानाधिष्ठीत नसते! विषयांबद्दलची आसक्ती गेली असे आपण त्यांचे संपूर्ण स्वरुप जाणून घेऊन त्यांचा त्याग केल्यावरच म्हणू शकतो. भगवंतानी पुढे ‘ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते । आद्यंतवंत: कौंतेय न तेषु रमते बुधः ॥ गीता २२:५ ॥’ असे म्हटले आहे. त्यामुळे विषयसुखाची मर्यादा संपूर्ण ओळखल्याने योगी विषयांपासून निवृत्त झालेला असतो हे (परत एकदा) स्पष्ट होते. परंतु योग्याने व्यावहारिक सुखांपासून मनोनिवृत्ति केली असली तरी पूर्वसंचितानुसार त्याच्या समोर आपल्यासारखीच प्रलोभने येतात. अशावेळी त्याचे वर्तन कसे असते हे सांगण्याकरीता भगवान वरील श्लोकांतून म्हणत आहेत की ‘मनामध्ये कुठलीही इच्छा वा द्वेष न ठेवता जो इंद्रिये आणि विषय यांचा संयोग (आपोआप होत असेल तर) होऊ देतो आणि स्वतःच्या मनाला (सहजपणे) आपल्या ताब्यात ठेवतो. त्यायोगे त्याचे अंतःकरण सदा प्रसन्न असते (६४). चित्त प्रसन्न असल्याने (विषयांमध्ये असूनही) त्याच्या सर्व दुःखांचा (आपोआप) नाश होतो व नवी दुःखे निर्माण होण्याचा धोका नसतो. बुद्धी आत्मस्वरुपी निरंतर स्थिर होण्यासाठी चित्ताची प्रसन्नता आवश्यक असते (६५).

ज्याप्रमाणे भूक लागली तरच आपण भोजनाला बसतो त्याचप्रमाणे जेव्हा आपणास स्व‍अस्तित्वात कमीपणा जाणवतो तेव्हाच आपण इंद्रियसुखाद्वारे जीवनाला परिपूर्ण करण्याचा प्रयत्‍न करतो. विषयात गुंतल्याने आयुष्यभर तडफड झाली आणि या वस्तुस्थितीची संपूर्ण जाणीव असली तरी आपण परत त्यांच्याकडेच खेचलो जातो कारण त्यांच्याशिवाय आपल्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा दुसरा मार्गच आपणास दिसत नसतो. आपले भगवंतप्राप्तीचे प्रयत्‍नसुद्धा सध्याच्या अपूर्ण जीवनात निरंतर आनंद शोधण्यासाठीच असतात. आणि असा आनंद म्हणजे काय याची व्याख्या आपल्याकडे तयार असतेच. कुणाला आप्तजनांचे सुख हवे तर कुणाला मनाची शांति हवी तर कुणाला या दोन्ही गोष्टी हव्यात. आणि जोपर्यंत आपल्याला असा आनंद मिळण्याचा ठोस पर्याय मिळत नाही तोपर्यंत आपण सध्या हातात असलेली गोष्ट सोडायला तयार नसतो. आपली साधना अशा मनोभूमिकेवर आधारित असते. परंतु भगवंतांनी स्थितप्रज्ञ होण्यासाठी या जगातील सुखांना आधी सोडा असे सांगितले आहे. त्यांच्या शब्दात सांगायचे म्हणजे ‘आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादम्‌ अधिगच्छति’. आधी पूर्ण ताबा मिळवा की मग तुम्हाला सत्याची जाणीव होइल, तुमचे जीवन प्रसादमय होईल. आणि हा ‘प्रसाद’ मिळाला की आपोआप आपले जीवन दुःखमुक्‍त होऊन बुद्धी परिपक्व होते असे त्यांनी पुढच्या श्लोकात सांगितले आहे. म्हणजे काय मिळणार आहे याची कल्पना नसतानाच आधी जे काही ते सोडा असे त्यांना सांगायचे आहे!

अशा दृष्टीने बघितल्यास या श्लोकांतून व्यावहारिक जीवनातील त्याग आणि पारमार्थिक त्याग यांमध्ये जे सूक्ष्म फरक आहेत ते ध्यानात येतात. जेव्हा आपण सिगारेट पिणे वा मधुमेहाच्या व्याधीमुळे गोड खाणे सोडतो तेव्हा हा त्याग करायच्या आधीच आपणास त्यामुळे आपले आरोग्यवर्धन होणार आहे हा फायदा माहित असतो. एखाद्या व्यक्‍तीपासून वा तत्वापासून दूर होताना अशी संगत सोडल्यावर काय मिळेल याची जाणीव असते. ही व्यावहारिक त्यागाची रीतच आहे. परंतु परमार्थात आधी त्याग करावा लागतो आणि मग आपणास कळते की अशा त्यागाने काय मिळेल. थोडक्यात सांगायचे म्हणजे आयुष्यभर त्याग करुन काहीही मिळणार नाही अशा शक्यतेचे भूत सतत आपल्यासमोर असताना त्याग करावा लागतो! इतकेच नव्हे तर ‘त्याग केला’ असे म्हणण्याचे निकषसुद्धा व्यावहारिक जीवनापेक्षा कठोर असतात. उदाहरणार्थ, ज्याला दिवसातून विस-पंचवीस सिगारेट लागायच्या त्याची अवस्था अनेक दिवसांतून कधीतरी एकदा सिगारेट लागते अशी झाली की तो मनुष्य ‘मी व्यसनावर ताबा मिळविला’ असे म्हणायला लागतो. परंतु परमार्थामध्ये अशी सूट नसते! मनातून इच्छा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुमची सिगारेट सुटलेली नाही असे पारमार्थिक विश्वात म्हणावे लागते! मग भले तुम्ही कित्येक वर्षे पान-बिडीच्या दुकानावरसुद्धा गेला नसलात तरीसुद्धा अजून त्याग झालेला नाही असेच म्हणावे लागते! तेव्हा पारमार्थिक जीवनातील ‘पुढे काय मिळणार आहे याची कल्पना नसणे’ आणि ‘त्याग म्हणजे काय याबद्दल अतिशय पराकोटीचा कठोर निकष असणे’ या दोन गोष्टी व्यावहारिक जीवनात दिसून येत नाहीत असे या श्लोकांवरुन लक्षात येते.

हीच गोष्ट दुसऱ्या शब्दांत सांगायची झाली तर ‘साधनेच्या कष्टांचे पुढे सुखदायक फल मिळेल’ अशी आशा आणि ‘साधनेचा बोजा कधी संपेल’ याबद्दलची उत्सुकता ज्या साधकाच्या मनात नसेल त्यानेच अध्यात्माची नस पकडली आहे असे आपण म्हणू शकतो. आणि अशी अवस्था कधी निर्माण होऊ शकते? निव्वळ प्रेमामध्येच अशी मनोधारणा निर्माण होऊ शकते. जेव्हा एखाद्या व्यक्‍तीवर वा वस्तूवर वा तत्वावर निखळ प्रेम असते तेव्हा ते प्रेम करण्यामध्येच आनंद असतो. प्रेमाची फलश्रुती केव्हा व कशी होईल याबद्दल विचार करायलासुद्धा वेळ नसतो. असे पराकोटीचे प्रेम आपण श्री राधा आणि मीरा यांच्या जीवनात प्रकर्षाने बघू शकतो. परंतु सर्व संतांच्या जीवनातसुद्धा याच प्रेमाचे प्रतिबिंब पडलेले असते. जोपर्यंत आपल्या मनावर इच्छा-आकांक्षांची पुटे पडलेली आहेत (मग भले आपल्या इच्छा कितीही परोपयोगी असोत!) तोपर्यंत हे प्रेम आपणास दिसणारसुद्धा नाही. मग त्यानुसार जीवन जगणे दूरच राहीले. आणि एकदा आपल्या मनाचा आरसा काम-क्रोध इत्यादी विकारांपासून स्वच्छ झाला की आपोआप या प्रेमाचा प्रसाद आपणास मिळून जीवनतील सर्व दुःखांचा समूळ विनाश होतो. वरील श्लोक म्हणजे भगवंतांनी आपणास दिलेली अशी ग्वाहीच आहे!

॥ हरिः ॐ ॥

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: