श्लोक (६६ ते ६८)/२: शब्दांचा मूळ अर्थ लक्षात घ्या

 ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

नास्ति बुद्धिरयुक्‍तस्य न चाऽयुक्‍तस्य भावना ।

नचाभावयतः शांतिरशांतस्य कुतः सुखम्‌ ॥ गीता ६६:२ ॥

इंद्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते ।

तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावभिवांभसि ॥ गीता ६७:२ ॥

तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः ।

इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ गीता ६८:२ ॥

साधनेमध्ये सर्वात प्राथमिक धोका म्हणजे इंद्रियांवरील आपला विश्वास. जन्मल्यापासून त्यांच्या आधाराशिवाय सुख न भोगल्याने आपणास इंद्रियांखेरीज दुसरे काहीही महत्वाचे दिसत नाही. आपण तारुण्यात पदार्पण करेपर्यंत असे वर्तन केल्यामुळे इंद्रिये स्वतःचा हट्ट पुरवून घेण्यास अतिशय लाडावलेल्या मुलांप्रमाणे इतकी तरबेज होतात की आपण त्यांचे जणू गुलामच होतो. म्हणून गीतेमधील द्वितीय अध्यायात साठाव्या श्लोकापासून इंद्रियांवर ताबा मिळविण्याचे महत्व अर्जुनास पटवून देण्यास भगवान श्रीकृष्णांनी सुरुवात केली. वरील श्लोकांत इंद्रियांवर भरंवसा ठेवून जीवन जगण्यात जो धोका असतो तो दाखवून देण्याच्या उपदेशाचा अंत आहे. भगवान म्हणत आहेत की ‘ज्याची इंद्रिये व मन स्वतःच्या काबूत नाहीत त्याची बुद्धी कधीही अंतर्मुख होत नाही आणि खरे सुख स्वतःमध्येच आहे अशी भावनासुद्धा त्याच्या मनात येत नाही. स्वतःच सुखरुप आहोत ही भावना ज्याला नाही त्याच्या चित्ताला (शाश्वत) शांति लाभत नाही आणि (ज्याच्या मनातील शांति अस्थिर आहे अशा) अशांत जीवाला (खरे, निरंतर जवळ असणारे) सुख कसे मिळणार? (६६). ज्याचे मन इंद्रियांच्या सुखाकरीता सतत कार्यरत असते त्याची बुद्धी वादळात सापडलेल्या नौकेप्रमाणे भरकटायला लागते (६७). म्हणून हे शक्‍तिशाली अर्जुना, ज्यांनी आपली इंद्रिये त्यांच्या विषयांबद्दलच्या नैसर्गिक ओढीपासून आवरली आहेत त्यांचीच बुद्धी पूर्णपणे विकसित झाली आहे असे समज. (६८)

इथे भगवंतांनी जे शब्द वापरले आहेत त्यांचा अतिशय व्यापक अर्थ आपण ध्यानात घ्यायला हवा. शांति व सुख हे दोन शब्द आपण दैनंदिन व्यवहारात वापरुन इतके गुळगुळीत केले आहेत की त्यांचा खरा अर्थ काय आहे हेसुद्धा आपण विसरुन गेलो आहोत. भुकेने व्याकुळ झालेलो आपण भोजन केल्यावर सुखी होतो असे आपण समजतो. परंतु हे सुखच पुढील भोजनसमयी अशांति प्रदान करणार आहे याची जाणीवसुद्धा आपणास नसते. लक्षात घ्या की मनासारखे जेवण मिळाल्यावर जर आनंदाचा अतिरेक झाला नसता तर मनाविरुद्ध खाणे पुढे आल्यावर अतिशय खेदसुद्धा झाला नसता ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मनासारखी पोटपूजा झाल्याने जो आनंद झाल्यासारखा वाटतो त्यात पुढच्या दुःखाची सुरुवात असल्याने त्याला आनंद म्हणणेच वास्तविकरीत्या चुकीचे आहे. ज्या गोष्टीने कधीही दुःख वा अशांति निर्माण होऊ शकत नाही अशाच गोष्टीतून निर्भेळ आनंद मिळू शकतो हे लक्षात घ्या. तेव्हा आपण परत भगवान नक्की काय म्हणत आहेत यावर विचार करु.

ज्या साधकाची इंद्रिये आणि मन स्वतःच्या काबूत नसतात त्याचे लक्ष इंद्रिये विषयांकडे खेचून नेतात. त्यामुळे सर्व विषयांरहित निव्वळ स्वतःच्या अस्तित्वामध्ये सुख असू शकेल ही भावनासुद्धा त्याच्या मनात येत नाही आणि अशा भावनेशिवाय शांति मिळणे अशक्य आहे असे भगवान म्हणत आहेत. आणि आपण सर्वसाधारणपणे काय म्हणतो? जीवनात जेव्हा सर्व आपल्या मनासारखे होते तेव्हा मनःशांति असते आणि एखादी गोष्ट जरी मनाप्रमाणे नाही झाली तर लगेच दुधात मिठाचा खडा पडल्यासारखी आपली अवस्था होते. याचा अर्थ असा की आपल्या शांतिचे मूळ मनाच्या समाधानात आहे आणि भगवंतांना जी शांति अपेक्षित आहे तीचे मूळ ‘स्वतःचे सुख दुसऱ्या गोष्टींवर अवलंबून नाही’ या ज्ञानावर आधारीत आहे. एखाद्या हट्टी मुलाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय तो शांत बसणार नाही म्हणून आपण त्याचे लाड पुरवितो. त्याचप्रमाणे मनःशांतिसाठी जे मनाला हवे आहे ते पुरविण्याचा आपला उपद्व्याप सुरु आहे. तो थांबल्याशिवाय आपणास खरी शांति मिळणार नाही हे लक्षात घ्या.

भगवंतांनी वापरलेला दुसरा महत्वाचा शब्द म्हणजे ‘सुख’. ज्याच्या मनात अशांति आहे त्याला सुख मिळणे अशक्य आहे असे भगवान वरील श्लोकांतून म्हणत आहेत. आणि याउलट आपण मनाला शांत करण्यासाठी सुख मिळविण्याचा प्रयत्‍न करतो. म्हणजे सुख ही इमारत ज्या पायावर उभारली जाते तीची पायाशिवाय उभारणी करुन त्यायोगे आपोआप पाया तयार होईल अशी आपण अपेक्षा करतो! खरे म्हणजे भगवंतांना सुख या शब्दातून अशी अवस्था सुचवायची आहे की जीचा परत उपयोग करुन अजून पुढे काही मिळवावे अशी गोष्ट शिल्लकच रहात नाही. आणि आपण सुखालासुद्धा एक कामचलावू वस्तू बनविलेले आहे. सुखात राहीलो की मन शांत होइल ही अपेक्षा या वस्तुस्थितीचेच दर्शन करवित आहे. याउलट भगवंतांनी सूचित केलेले सुख कालातीत आहे. हे सदा असतेच आणि जेव्हा आपले मन शांत होते तेव्हा आपोआप ते दृष्यरुपात प्रगट होते. या सर्व विवेचनाचा अर्थ इतकाच आहे की गीतेमध्ये वापरलेल्या शब्दांच्या व्यावहारिक जगातील व्याख्या मनात ठेऊन जर आपण अभ्यास करायला लागलो तर विसंगतीशिवाय काही हातात येणार नाही. आत्तापर्यंत माहित असलेल्या शब्दांना मुलभूतपणे नवा अर्थ द्यायची आवश्यकता आहे हे आपण या श्लोकांवरुन ध्यानात घेऊ. नवा शोध लावण्याचा हा उत्साह ज्याच्या मनात आहे त्याला ज्ञान फार झटपट प्राप्त होते. नवीन गोष्ट शिकायचा उत्साह तरुणपणीच सर्वात जास्त असल्याने ‘परमार्थ हा फक्‍त वृद्धापकाळी करण्याचा विषय आहे’ हे सर्वमान्य वचन किती चुकीचे आहे हे लक्षात येते. श्रीरामकृष्ण परमहंस म्हणूनच तरुण साधकांना विशेष उत्तेजन द्यायचे.

आता शेवटी भगवान श्रीकृष्ण वरील श्लोकात अर्जुनाला ‘महाबाहो’ म्हणजे अत्यंत शूरवीर या नावाने संबोधितात इकडे लक्ष देऊ. इथे असे वाटते की आपल्या परमभक्‍ताला या नावाने पुकारुन श्रीकृष्ण जणू अर्जुनाला सांगत आहेत की खरा पराक्रम आपल्या इंद्रियांवर आणि मनावर ताबा मिळविण्यातच आहे. अत्यंत बलवान शत्रूला पादाक्रांत करण्यात खरे शौर्य दिसून येते असे आपण समजतो. पण जरा विचार करता स्वतःच्या इंद्रियांचे हट्ट आणि मनाची धावपळ यापेक्षा अधिक प्रबळ प्रतिस्पर्धी कोण असू शकेल असे वाटत नाही. यांना नामोहरम करण्याचे जे जे उपाय करु ते यांनाच अधिक बळ देतात! त्यामुळे जीवनातील खरा पुरुषार्थ दुसऱ्यांवर सत्ता गाजविण्यापेक्षा स्वतःवर ताबा मिळविण्यातच आहे असे भगवान अर्जुनाला सांगत आहेत असे वाटते. आणि गंमत म्हणजे हा पराक्रम गाजविण्याची संधि फक्‍त काही निवडक लोकांना नसून या विश्वातील सर्व मानवांना हे शक्य आहे. चला, आपणसुद्धा हा पराक्रम करण्याचा प्रयत्‍न करु. अध्यात्मिक मार्गापासून पळून जाण्याकरीता असलेले व्यावहारिक सुखाच्या कल्पनांचे दोर तोडून जो तानाजीच्या मावळ्यांसारखा जीवाच्या आकांताने प्रयत्‍न करील त्याला हा सिंहगड प्राप्त होईलच!

॥ हरि ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: