श्लोक ६९/२: ज्ञानी माणसाची दृष्टी

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।

यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ गीता ६९:२ ॥

गीतेच्या दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञ मनुष्याची लक्षणे सांगताना भगवान श्रीकृष्णांनी साठाव्या श्लोकांपासून अडसष्टाव्या श्लोकापर्यंत इंद्रियनिग्रह का करावा आणि कसा असावा याचे वर्णन केले आणि शेवटी ज्याने आपली इंद्रिये विषयांपासून सहजरीत्या आवरलेली आहेत त्याची प्रज्ञा पूर्णपणे विकसित झाली आहे असे ठाम प्रतिपादन केले. इथे एक लक्षात घ्या की ज्याप्रमाणे एखादी छोटीशी कळी पूर्णपणे उमलून स्वतःचे परिवर्तन एका मोठ्या फुलात करते तसे बुद्धीचे विकसित होणे नसते तर धरणात बांधून ठेवलेल्या नदीच्या प्रवाहाला मोकळे सोडल्यावर नदीचा पूर्ण विकास होतो तसे असते. याचा अर्थ असा की आपली बुद्धी काही नवीन रुप धारण न करीता तीच्यात उपजतच असलेल्या प्रतिभेला प्रगट होण्यास जे प्रतिबंध असतात त्यांच्या निरसनामुळे आपोआप मोठी होते. आपल्यातील नैसर्गिक ज्ञानालाच आपण जाणायला लागतो हे इथे अध्यारुत आहे. माउलींच्या भाषेत सांगायचे म्हणजे ‘मोटके गुरुमुखे उदैजत दिसे । आणि हृदयी स्वयंभूचि असे । प्रत्यक्ष फावो लागे तैसे । आपैसयाचि ॥ज्ञा. ४९:९॥’कळीचे अस्तित्व नष्ट होऊन तिथे फुलरुपी दुसरे अस्तित्व निर्माण होते तसा हा प्रकार नाही. आपले जे आयुष्य चालू आहे त्याचा अजिबात विनाश न करीता आपणास एक नवीन दृष्टी प्राप्त होते. ही नजर अशी असते की याहून अधिक व्यापक काही असूच शकत नाही आणि म्हणून मानवाची बुद्धी स्थित, म्हणजे अगदी स्थिर होते असे भगवान म्हणत आहेत.

ज्याप्रमाणे धरण नदीला बांधून ठेवते त्याप्रमाणे कुठल्या गोष्टीने आपल्या बुद्धीला संकुचित केले आहे? असा प्रश्न विचारल्यास ‘भिती’ हे उत्तर नजरेसमोर येते. ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी एक छोटेसे उदाहरण पहा: शालेय जीवनात असे अनेक विद्यार्थी आढळतात की जे इतर विषयांत हुशार असतात परंतु गणित हा विषय समोर आला की त्यांचे डोके चालेनासे होते. खरे म्हणजे गणित हा विषय इंग्लिश इतकाच सोपा (वा कठीण!) आहे आणि ज्याला गणितात नैसर्गिक गती असते त्याने असे सांगितले तरी अशा विद्यार्थ्यांची खात्री पटत नाही. याचे कारण त्यांच्या मनात गणिताबद्दल एक भिती असते. परंतु नशिबाने एखादा चांगला शिक्षक गणित शिकवायला लागला की अशा विद्यार्थ्यांनासुद्धा गणित सोपे वाटायला लागते. या उदाहरणावरुन असे स्पष्ट होते की विद्यार्थ्याच्या अंगभूत गुणवत्तेला प्रगट होण्यास त्याची भिती प्रतिबंध करीत होती. त्याचप्रमाणे आपणामध्ये असलेली ‘इंद्रियसुखाची निवृत्ती झाली तर जगण्यात काय अर्थ आहे?’ ही भिती आपली नजर इंद्रियातीत असलेल्या भगवंताकडे जाऊन देत नाही. खरे म्हणजे आपण सर्वजण आनंदस्वरुपच आहोत. परंतु आनंद म्हणजे काय याची आपली व्याख्या इंद्रियांवर अवलंबून असल्याने आपणास स्वरुपाचे ज्ञाने होऊ शकत नाही. इथे काही साधक असे म्हणतील की आमच्या कुटुंबियांचे वा जगाचे कल्याण होण्यात आम्हाला आनंद मिळतो. हा आनंद काही इंद्रियांच्या लाडावर अवलंबून नाही. पण असे म्हणण्यात तुम्ही एक मूलभूत गोष्ट विसरता की आपले कुटुंब वा हे जग अस्तित्वात आहे हे आपण इंद्रियांच्या आधारावरच म्हणतो. गाढ झोपेत कुठे असते कुटुंब आणि विश्व?! तेव्हा वरकरणी सात्विक वाटणारा आनंदही इंद्रियाधिष्ठीतच असतो हे आपण लक्षात घ्यायला हवे.

वरील विवेचनामुळे असे वाटते की खरे सुख वा आनंद कसा असतो याची जाणीवसुद्धा आपणास नसते. वास्तविकपणे ज्या अवस्थेत आपण आयुष्यभर राहू शकतो त्याच अवस्थेला सुखावह म्हणायला हवे. परंतु दैनंदिन जीवनात भासणाऱ्या उणीवेला भरुन काढणाऱ्या अवस्थेला आपण सुखद म्हणतो. म्हणून भूक लागलेली असताना भोजनसुख हवे असते तर एकटेपण जाणविल्यावर सोबतसुख हवे असते. परंतु आयुष्यभर खातच बसावे वा प्रिय व्यक्तीच्या सन्निध्यातच बसावे असे काही आपणास वाटत नाही आणि म्हणूनच काही काळ सध्या सुखद वाटणाऱ्या अवस्थेत गेला की ‘दुसरे काहीतरी करावे’ ही भावना परत आपल्या मनात येतेच. आणि याहून मुख्य म्हणजे असे जीवन जगण्यात काही चुकीचे आहे ही भावनासुद्धा आपल्या मनात येत नाही. याचा अर्थ असा की सुखाच्या रुपाबद्दलच आपण इतके अनभिज्ञ आहोत. मग ते आपणास मिळायची गोष्ट दूरच राहीली. याउलट ज्ञानी मनुष्याला फक्‍त सुखाचे ज्ञान असते आणि बाकी सर्व गोष्टींकडे त्याचे दुर्लक्ष असते. स्थितप्रज्ञ माणसाची ही विशेष अवस्था सांगण्यास वरील श्लोकातून भगवान म्हणत आहेत की: ‘आपण सतत आनंदातच आहोत या वस्तुस्थितीची सर्वसाधारण मानवांना माहितीदेखील नाही (म्हणजे ज्या बाबतीत ते अज्ञानरुपी निद्रेत आहेत) त्या सत्याच्या जाणिवेत संयमी मनुष्याने आपले चित्त ठेवलेले असते आणि ज्या नाशिवंत सुखाच्या ठिकाणी सर्व माणसे जागृत असतात त्या अनित्य स्थितीकडे मुनि बघतसुद्धा नाही (६९). 

बाह्यजगातील चित्रविचित्र वैविध्याला आपली इंद्रिये भुललेली आहेत. त्यामुळे त्यांना सतत काहीतरी नवीन विषय उपभोगण्याची लालसा लागलेली आहे. त्याच्या या मोहामुळे आपले चित्तदेखील नित्य नवीन विचारांच्या वावटळीत सापडलेले आहे आणि वादळातील असहाय्य नावेप्रमाणे ते भरकटत चाललेले आहे. परंतु या सतत बदलणाऱ्या विश्वामागे काहीतरी निश्चळ आणि शाश्वत पार्श्वभूमी आहे याची जाणीव ज्याला आहे त्याची नजर बाहेरील आतषबाजीकडे न जाता आतील सद्‍वस्तूवर जाते. ज्याप्रमाणे शेणाचे फळ खऱ्या फळाप्रमाणेच दिसत असले तरी अत्यंत क्षुधितावस्थेतसुद्धा आपण ते खायला जात नाही, त्याचप्रमाणे ज्ञानी मनुष्य कदापि व्यावहारिक सुखाच्या मागे धावणार नाही. स्थितप्रज्ञाची नजर जिथे आहे त्या वस्तूचे अस्तित्वसुद्धा आपणास अजूनपर्यंत माहित नाही याचे एकच कारण म्हणजे आपली नजर इंद्रियलोभांमुळे फार संकुचित झालेली आहे. वृद्धापकाळी डोळ्यात मोतीबिंदू पडतात आणि समोरील वस्तू दिसेनाशी होते त्याचप्रमाणे व्यावहारिक जगाच्या आसक्‍तीने आपल्या बुद्धीला झाकलेले आहे आणि समोरील भगवंत दिसेनासा झाला आहे. आणि जन्मजात भगवंतप्रेमी असलेली आपली बुद्धी स्वतःचे स्वरुप विसरुन इकडे-तिकडे भटकायला लागलेली आहे. ती जेव्हा आपल्या घरी परत येईल तेव्हाच आपण आपल्या निद्रितावस्थेमधून उठू. मग आपली नजर स्थितप्रज्ञ माणसाप्रमाणे भगवंताला पहायला शिकेल आणि सर्वकाळ त्यातच रमून जाईल. आपल्या झोपेतील स्वप्नातच जागृतावस्थेचे ज्ञान सद्‍गुरु रुपाने येऊन आपणास जागे करायचा प्रयत्‍न करीत आहे. गुरुमाउलींच्या शब्दांना आपण सतत ऐकत राहीलो तर जरुर आपणास जाग येईल.

॥ हरिः ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: