श्लोक ७०/२: आत्मानंदातील संपूर्णता

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्‌ ।

तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥ गीता ७०:२ ॥

एखादी गोष्ट अप्राप्य कशी होते? सर्वसाधारणपणे आपण असे समजतो की ती वस्तू अशा ठिकाणी आहे की तिथे पोहोचणे फार कठीण आहे. उदाहरणार्थ कैलास पर्वतावर भगवान श्रीशंकर आहेत हे कळून आपल्यासारख्यांना फायदा होत नाही कारण कैलास पर्वतावर चढणे तर सोडाच, त्याच्या पायथ्याशी पोहोचणेही आपणास असंभव वाटते. परमार्थातील अंतिम स्थिती, म्हणजे निरंतर भगवंताबरोबर सान्निध्यसुद्धा आपणास अशक्य वाटते कारण स्वरुपज्ञानाकरीता आवश्यक असलेली साधना करु शकणार नाही याची आपणास खात्री असते. ज्याप्रमाणे भगवान शंकरांचे दर्शन कैलास पर्वतावर चढण्याच्या अटीमुळे अप्राप्य आहे त्याचप्रमाणे सतत जवळ असलेल्या स्वरुपाचे ज्ञान त्याकरीता कराव्या लागणाऱ्या साधनेमुळे अशक्य आहे असे आपणास वाटते. परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे.

अगदी जवळ असूनही वस्तूला हात न लावण्याचे अजून एक कारण आहे. ते म्हणजे भिती. कल्पना करा की आपल्यासमोर आवडते पक्वान्न आणून ठेवलेले आहे आणि पोटात खूप भूकही लागलेली आहे. पण असे असूनही जर तुम्हाला असे वाटले की समोरील अन्नात काळकूट मिसळलेले आहे तर तुम्ही त्याला हात तरी लावाल का? या उदाहरणातील अगदी समोर असलेल्या स्वादीष्ट पक्वान्नाचा उपभोग घेण्यास शारिरीक कष्टांचा नाही तर मनातील पूर्वग्रहांचा अडथळा आहे. अशावेळी दहाजणांनी ‘अरे खा रे’ म्हणून आग्रह केला तरी आपला हात पुढे होत नाही! हेच कारण आपण स्वरुपानुसंधानात निरंतर मग्न न राहण्यामागे आहे. जे साधक ‘आम्हाला साधना करायला वेळ मिळत नाही म्हणून आमची प्रगती होत नाही’ असे म्हणतात त्यांना हा मुद्दा कळणे अत्यावश्यक आहे. अहो, स्वरुपानुसंधान हा आपला स्वभाव आहे आणि स्वभावानुसार वागायला काहीही करावे लागत नसते. आपल्या मनातील निरनिराळ्या भयांमुळे आपण स्वतःच्या स्वभावाप्रमाणे वर्तन करायला बिचकतो. साधना होत नाही म्हणून आनंद मिळत नाही ही सबब देणे योग्य नाही कारण आपले मूळरुपच आनंदमयी आहे!

इथे काही साधक अशी शंका काढतील की आम्ही आनंदमय असलो तर आम्हांस दुःखाची जाणीव का होते? आणि निव्वळ आम्हालाच होते असे नसून या जगातील (काही सन्मान्य अपवाद सोडून) सर्वांनाच दुःखाला तोंड द्यावे लागत आहे असे दिसते. तर याचे स्पष्टीकरण काय?

भावनाविवश न होता जरा शांतपणे या प्रश्नावर विचार केला तर असे दिसून येते की प्रत्येक दुःखाच्या आधी एक इच्छा आणि त्या कामनेची परीपूर्णता करण्याचा ध्यास असतो. उदाहरणार्थ, भूक लागली की भोजन मिळायला हा आग्रह उपवासाला दुःख म्हणते. आपल्या कुटुंबियांचे भौतिक कल्याण सतत होत रहावे, त्यांना कशाचीही तोशिस पडू नये हा ध्यास त्यांच्या व्यावहारिक अडचणींना आपले दुःख मानते. पैसा हवा ही कामना गरीबीला दुःख मानते आणि तंदुरुस्त असावे ही भावना शारिरीक दुखण्याला मानसिक दुःख मानते. आपणास कुणी कठोर शब्द बोलू नयेत ही इच्छा कर्तबगारी नसण्यात दुःख मानते आणि एखादी व्यक्‍ती जवळ असावी ही वासना विरहाला वेदना समजते. कुठलेही, म्हणजे अगदी कुठलेही दुःख घ्या. त्याआधी एखादी इच्छा आणि तीच्या पूर्ततेचा हव्यास असलाच पाहिजे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपणास दुःख जाणवते त्याचा अर्थ आपण आनंदमय नाही असे नसून आपण कामनेच्या अधीन आहोत असा आहे. स्वतःची चूक कधीच दिसत नसल्याने आपले दुःख आपल्या वर्तनामुळे आले आहे असे न समजता ते दुःख नैसर्गिक आहे, आपोआप आलेले आहे असे समजायला लागतो. पावसचे महाराज स्वामी स्वरुपानंद म्हणतात ‘उत्तरासारखे येते प्रत्युत्तर । करावा विचार आपणाशी । स्वामी म्हणे होसी सर्वथैव जाण । तुझा तू कारण सुख-दुःखा ॥

स्वरुपानंद निरंतर उपभोगायला हवा तर मनातील कामनांच्या पूर्ततेचा ध्यास सोडायला हवा आणि इच्छा आकांक्षांच्या सफलतेशिवाय जगणे अत्यंत निरस आणि उदास असेल ही भिती आपणास कामनाविरहीत होऊ देत नाही. म्हणजे परत आपण सुरुवातीच्या मुद्यावर आलो की स्वरुपानुसंधान नसण्याला मानसिक पूर्वग्रह कारणीभूत आहेत, साधना न करणे नाही!! ज्ञानी मनुष्याला या सत्याची, या वस्तुस्थितीची पूर्ण जाणीव असल्याने त्याच्या मनात अचानक इच्छा निर्माण झाल्या तरी त्यांच्या पूर्णतेमध्ये तो स्वतःची उन्नती होईल असे मानत नाही आणि इच्छापूर्तीच्या असफलतेमध्ये आपणास कमीपणा आला असेही समजत नाही. भगवान अर्जुनाला हीच गोष्ट वरील श्लोकामध्ये समजावून सांगत आहेत. ते म्हणत आहेत की ‘ज्याप्रमाणे नित्य परिपूर्ण आणि स्थिर असलेला समुद्र (नद्यांनी आणलेल्या) पाण्याकडे बघतो त्याचप्रमाणे जो मनुष्य (त्याच्या सदोदित सुखी असलेल्या) मनात आलेल्या कामनांकडे बघतो त्यालाच शाश्वत शांति प्राप्त होते. ज्याच्या मनात कामना पूर्ण करायची आकांक्षा आहे त्याला कधीही शांति प्राप्त होत नाही (७०)’ एकदा स्वरुपाचे ज्ञान झाले की मनातील सर्व कामनांचा नाश होतो असे नसून निरंतर उद्भवणाऱ्या इच्छांकडे तटस्थपणे पहायला येते असे भगवंतांना सांगायचे आहे. इच्छांपासून मुक्ती प्राप्त करणे म्हणजे त्यांची अनुपस्थिती नसून त्यांचे महत्व निघून जाणे आहे. भगवंताच्या इच्छेने त्या पूर्ण झाल्या तरी आनंद आहे आणि त्याच्याच मर्जीप्रमाणे इच्छा अपूर्ण राहील्या तरी आनंद आहे. हा आनंदमय जीवन जगण्याचा अर्थ आहे. जोपर्यंत आपण ठराविक कामनांमध्ये अडकलेलो आहोत तो पर्यंत हा निर्भेळ आनंद आपण उपभोगू शकत नाही.

॥ हरिः ॐ ॥

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: