श्लोक (४ आणि ५)/३: कर्मांतून सुटका म्हणजे काय?

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ।

न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥ गीता ४:३ ॥

न हि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्‌ ।

कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥ गीता ५:३ ॥

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला मागील श्लोकात सांगितले की ज्ञानयोगी बनणे जरी जीवनाचे अंतिम ध्येय असले तरी ते लगेच हस्तगत होईल असे नाही. आषाढी वारीस आळंदीहून प्रस्थान होत असतानाच आपणास पंढरपूरच्या विठोबाकडे जायचे आहे हे माहीत असले तरी आधी पुणे, फलटण इत्यादी पल्ले गाठावे लागतात त्यानंतरच पंढरीला पाय लागतो. त्याचप्रमाणे ज्ञानयोगी बनण्यासाठी मनाची भगवंतावर निश्चळ निष्ठा असणे पुरेसे आहे हे कळले तरी ती मानसिक स्थैर्यता मिळविण्यासाठी कर्मयोगाची वाट आपणास चोखाळावी लागते. आणि ज्याप्रमाणे वारी करताना माउलींच्या पालखीचा रस्ता संपूर्णपणे माहीत असणे जरुरी असते त्याचप्रमाणे आपणास कर्मयोग म्हणजे काय याचे ज्ञान असणे जरुरी आहे. कर्मयोगाची फलश्रुती म्हणजे स्वतःचे निर्गुण अविनाशी अस्तित्व दिसून त्यावरील आपले ममत्व वृद्धींगत होणे. एकदा स्वरुपाला जाणून घेतले की आपल्या संकुचित अहंकाराचा लोप होऊन आपण वैश्विक एकात्मता पाहण्यात रंगून जातो. आणि आपल्या देहाद्वारे भगवंत कुठल्या क्रिया घडवून आणत आहेत हे कळले तरी उदासीन राहतो. या अवस्थेची ओढ अर्जुनाला साहजिकपणे लागली कारण सध्या समोर असलेले युद्ध लढणे त्याला नको होते. परंतु एखादी गोष्ट नको आहे म्हणून तीचा त्याग केला तर ती दान केली असे आपण म्हणू शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्या मनाविरुद्ध कर्म करणे भाग पडत असले तर ते न करणे म्हणजे ज्यामुळे समाधि प्राप्त होते असा संन्यास होत नाही. कारण आपल्या अशा त्यागाचा पाया संकुचित अहंकार आहे, मनाला सांभाळणे हे आहे. अशा कुचकामी पायावर स्थितप्रज्ञरुपी भव्य इमारत उभी राहू शकत नाही! त्याशिवाय दुसरा मुद्दा म्हणजे मी ठराविक कर्मे करणार नाही हा आपला आग्रहसुद्धा एक कर्मच आहे की! त्यामुळे अशा पळपुटेपणाने आपण कर्मत्याग न करीता फक्‍त कर्मनिवड करीत आहोत असे दिसून येते. वरील श्लोकांतून भगवान अर्जुनाला या सत्याची जाणीव करुन देत आहेत असे वाटते. ते म्हणत आहेत की: ‘कर्म न करण्याने कर्मांपासून सुटका प्राप्त होते असे नव्हे. निव्वळ कर्मांचा त्याग करण्याने कधीही साम्यावस्था प्राप्त होत नाही (४). अरे, जीवनातील एक क्षणही असा नाही की ज्यात कर्म करणे थांबले आहे. जोपर्यंत प्रकृतिच्या सात्विक, राजसिक आणि तामसिक या त्रिगुणी पाशांमध्ये आपण अडकलेलो आहोत तोपर्यंत आपल्याहातून कर्म हे घडणारच. (५)

लक्षात घ्या की आलस्याने कर्म करण्याबद्दल विरक्ती येणे आणि मनातील तटस्थतेमुळे कर्मांबद्दल उदासीन असणे यांमध्ये जमीन आणि अस्मान इतका फरक आहे. त्याचप्रमाणे गोष्टीचा तिटकारा येऊन त्याग करणे आणि तीच्या अस्तित्वाबद्दल तटस्थ असल्याने ती आपोआप आपल्या हातून गळून जाणे या दोन गोष्टींची तुलनासुद्धा हो‍उ शकत नाही. मनात निरंतर स्वरुपाचे ध्यान असले की आपण प्रकृतिच्या त्रिगुणी खेळापासून मुक्त होतो आणि फक्त तेव्हाच आपल्या हातून कर्म घडत नाही. जोपर्यंत आपण सत्व-रज-तम यापैकी एका गुणात अडकलेलो आहोत तोपर्यंत ते गुण आपल्याकडून कुठलेना कुठले कर्म करुन घेणारच असे भगवान म्हणत आहेत. कर्मबंधांतून मुक्त व्हायचे असेल तर आपणास स्वतःच्या स्वयंभू, अविनाशी अस्तित्वाचे ज्ञान व्हायला हवे (पहा: गीता श्लोक २१, अध्याय २). त्याशिवाय कर्मांचा त्याग घडणे अशक्य आहे. अर्जुनाला युद्ध करु नये असे वाटले त्याचे कारण त्याला स्वरुपाचे ज्ञान झाले असे नसून स्वतःच्या नातेवाईकांच्या संभाव्य मृत्यूची त्याला प्रकर्षाने जाणीव झाली हे आहे. याचा अर्थ असा की कर्मत्याग करण्याची त्याची तयारी ज्ञानावर आधारीत नसून मायेवर अवलंबून आहे. स्वतःच्या नकळत मायेच्या अतर्क्य खेळामध्ये तो अजूनच गुरफटला जात आहे! आणि ही गोष्ट आपणा सर्वांच्या जीवनात वारंवार दिसून येते. जी माणसे निव्वळ व्यावहारीक जीवनात यशस्वी होण्यात धन्यता मानतात त्यांची गोष्ट सोडूनच द्या. अशी माणसे अगदी स्पष्टपणे प्रकृतिच्या राजसिक गुणात अडकलेली आहेत. जी माणसे सतत आळशीपणाने कर्मे टाळतात ती तामसिक गुणाच्या आधीन आहेत हे दिसून येते. परंतु या दोन्हीपेक्षा सूक्ष्म बंध सात्विक गुणाचे आहेत. स्वतःला कष्ट झाले तरीसुद्धा दुसऱ्यांना मदत करण्याचा अट्टाहास ज्यांनी घेतला आहे तेसुद्धा अजून प्रकृतिच्या बंधातच आहेत हे लक्षात घ्या. स्वतःच्या देह-मनावर आधारीत असलेला कुठलाही अट्टाहास चुकीचा आहे हे ध्यानात घेणे जरुरी आहे.

सध्या आपली विचारसरणी स्वतःच्या मनातील विचार व आपल्या बुद्धीची झेप यावर संपूर्णपणे अवलंबून आहे. या दोन गोष्टींशिवाय जीवन जगण्यास आपणास दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही. कर्मयोगाने आपणास जीवन जगण्यास एक नवीन पर्याय दिसून येतो. आपणास “प्रत्येक कर्म हे ते करण्यातच समाप्त होत आहे” याची निःसंदेह जाणीव होणे हे कर्मयोगाचे अंतिम फल आहे. सध्या वरकरणी दिसणाऱ्या कार्यकारण भावात आपण गुंतलेलो आहोत. उदाहरणार्थ, आज आपण परीक्षेत गुण मिळाले म्हणून चांगली नोकरी मिळाली असे म्हणतो आणि त्या नोकरीमुळे जीवन व्यवस्थित चालू आहे असा निष्कर्ष काढतो. आणि आपल्या इतकेच गुण मिळविलेल्या मुलाला आपल्यासारखी नोकरी मिळत नाही आणि आपल्याहून अधिक मानाची चाकरी करणारा सुखी दिसत नाही या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करतो. सध्या केलेल्या एका कर्मातून दुसरे कर्म निघत आहे असे आपण समजतो कारण त्यातून आपणास जीवनावर ताबा मिळविला आहे असे वाटते. परंतु स्वतःचा जीवनावर ताबा आहे असे समजणे हे निव्वळ अहंकाराचे लक्षण आहे हे आपणास कळत नाही. कर्मांची एक शृखला आपण निर्माण केली असल्याने आपण त्यात स्वतःला बांधून घेतो. एकदा या माळेतून कर्मे मुक्त झाली की आपले मन भुतकाळांतील कर्मामध्ये अडकत नाही आणि आत्ता समोर आलेले कर्म स्वयंभू आहे, भगवंतमय आहे याची जाणीव आपणास होते. हे ज्ञान होण्यास समोरील कर्मांना योग्य मनोभूमिका ठेवून सामोरे जाणे जरुरी आहे. त्यांच्यापासून जबरदस्तीने दूर जाणे संपूर्णपणे चुकीचे आहे. आणि हाच सल्ला भगवान वरील श्लोकांतून अर्जुनास देत आहेत. इति.

॥ हरिः ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: