श्लोक ८/३: स्वधर्माला पर्याय नाही

 ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः ।

शरीरयात्राऽपि च ते न प्रसिद्‍ध्येदकर्मणः ॥ गीता ८:३ ॥

आपल्या जीवनातील कधी मानसिक अस्तित्वाला तर कधी सामाजिक रुपाला सोयीस्करपणे महत्व देत समोरील आणिबाणीचा प्रसंग पुढे ढकलण्यात समाधान मानण्याचा दांभिकपणा गेल्या श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दाखवून दिला. दुय्यम दर्जाचा माल विकणारा एखादा हुशार विक्रेता कुठलीतरी सबब शोधून समोरील ग्राहकाच्या तक्रारीला ज्याप्रमाणे टोलवितो त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील प्रत्येक कसोटीच्या क्षण तात्पुरता उपाय शोधून आपण पुढे ढकलतो. डोके दुखत आहे ना? एक गोळी घ्या. नक्की कुठल्या कारणाने डोके दुखत आहे याची कशाला माहिती हवी? आत्ताचे काम झाले ना, मग पुरेसे आहे! परंतु आयुष्यभर समोरील कचरा बाजूला ढकलत बसल्याने कधीतरी शेजारील जागा पूर्णपणे भरुन इतक्या सर्व दिवसांचा तो कचरा शेवटी आपल्या अंगावरच जसा येतो त्याचप्रमाणे आपणासमोर आत्तापर्यंत टाळलेली उदासीनता अचानक येते. बाह्य दृष्टीकोनातून आपले जीवन सुरळीत चाललेले आहे असे दिसत असूनही जीवनातील रस अचानक निघून जातो याचे कारण आत्तापर्यंत आलेल्या छोट्या दुःखांकडे कधीही सखोल नजरेने बघितलेले नाही हे आहे. भगवान कधीही कुणावर कारणाशिवाय दुःखाचा प्रसंग आणत नाही. आणि समोर आलेला कसोटीचा क्षणही अगदी जेव्हढा बिकट असावा तेव्हढाच असतो! जर आपण त्यातून योग्य धडा शिकलो नाही तर आणि तरच पुढील संकट येते आणि साहजिकपणे ते आधीपेक्षा अधिक दुःखदायक असते, कारण त्यापेक्षा कमी दुःखाबाबतची आपली असंवेदनाशीलता आपण पूर्ववर्तनावरुन स्पष्ट केलेली असते! अर्जुनासमोर कुरुक्षेत्रावरील संदेहाचे संकट समोर आले कारण युद्धभूमीवर यायच्या आधी कौरवांच्या हातून हजारो दुःखद अनुभव सोसूनही अजून त्याने आपल्या कुळाचा मोह संपूर्ण सोडला नव्हता. लक्षात घ्या की दुःख तेव्हाच सामोरे येते जेव्हा आपणास सुख म्हणजे काय याची पूर्ण जाणीव झालेली असते. वस्तुस्थिती अशी आहे की आनंद हा मूळातच अत्यंत स्वयंभू असल्याने त्याचे समीकरण कुणीही मांडू शकत नाही. म्हणूनच पैसा असला तर सुख मिळेल असे वाटले की कित्येक श्रीमंत माणसे दुःखी दिसतात, शारीरीक स्वास्थ्यात आनंद आहे अशी समजूत झाली की तारुण्याच्या उभारीत आक्रोश करणारे युवक डोळ्यासमोर येतात आणि पाठीमागे समर्थ आधार असला की जीवनाचे सार्थक झाले अशी खात्री पटली की आपल्या सद्‌गुरुंचे प्रेम लाभूनसुद्धा दैनंदिन जीवनात सुखी नसलेले साधक दृष्टीपत्यास येतात. अहो, या जगाच्या इतिहासात अशी एकही व्यक्‍ती दिसून येत नाही की जीने सुखाचे एक निश्चित समीकरण मांडले आहे. सर्व शास्त्रांचा आधार असलेले वेदसुद्धा सच्चिदानंद भगवंताबद्दल ‘हे नाही, हे नाही’ असेच म्हणतात, नक्की काय आहे हे सांगू शकत नाहीत!

सांगायचा मुद्दा असा आहे की सर्वसाधारण साधकाप्रमाणेच अर्जुनानेसुद्धा आपल्या नातेवाइकांशी लढण्याचा दुःखद प्रसंग आल्यावर त्यावर मूलभूत उपाय शोधण्यापेक्षा युद्धभूमीवरुन पलायन करण्याच तात्पुरता पर्याय शोधला. परंतु काही संकटे अशी असतात की त्यावर मूलभूत उपाय शोधावाच लागतो. उदाहरणार्थ, एक-दोनदा डोके दुखले तर अ‍ॅस्पिरीनची गोळी घेणे योग्य ठरते परंतु महीनोंमहीने दररोज डोके दुखायला लागले की डॉक्टरांमार्फत सर्व चाचण्या करुन डोकेदुखीचे मूळ कारण शोधणे भाग पडते. अर्जुनासमोर श्रीकृष्णांसारखा समर्थ वैद्य असल्याने त्याला तात्पुरते औषध न मिळता, कुठल्याही चाचणीशिवाय गीतारुपी अमृताची मात्रा मिळाली! त्यामुळे दांभिकपणा म्हणजे काय याचा पहिला धडा त्याला दिल्यावर भगवान श्रीकृष्ण त्याला कर्म सोडून देणे कसे अशक्य आहे अधिक स्पष्ट करुन देताना म्हणतात की: ‘(अर्जुना) तू आपले विहीत कर्म कर. निव्वळ अट्टाहासाने कर्म सोडून देण्यापेक्षा समोर आलेले कर्म करणे कधीही श्रेयस्कर आहे. आणि तसे पहायला गेले तर आपल्या शरीराच्या अस्तित्वाला जपण्यासही कर्मांची आवश्यकता आहेच. त्यामुळे कर्म करणे सोडून दिले तर शरीरही जिवंत राहणार नाही. (८)

अर्जुनाने युद्ध न करण्याचा विचार केला तेव्हा त्याच्या डोक्यात फक्‍त कुरुक्षेत्रावरील युद्धप्रसंग होता. परंतु भगवंतांची विचारसरणी बाह्य आवरणापुरती मर्यादीत नसल्याने त्यांनी अर्जुनाला त्याच्या उपायामागील मूलतत्व काय आहे हे इथे स्पष्ट केले आहे. युद्ध न करणे म्हणजे समोरील कर्म न करणे. मग ते आवडते कर्म असो वा नावडते! आणि कर्मच करायचे नाही तर श्वासोच्छवास करणेसुद्धा सोडायला हवे. तात्विकरीत्या देह सांभाळायला केलेली कर्मे आणि सुखाच्या प्राप्तीकरता केलेली कर्मे यात काहीही फरक नाही हे भगवंतांना इथे सुचवायचे आहे. भिन्न कर्मांतील फरक त्यांच्या ठराविक रुपांमध्ये असतो. ‘कर्म करणे’ या तत्वात त्याने फरक पडत नाही. बागेतील माळीसुद्धा कर्म करतो आणि अत्यंत आधुनिक विमानाचा वैमानिकही कर्मच करतो. अर्थात याचा अर्थ असा नाही की माळ्याने वैमानिकाचे काम करावे आणि वैमानिकाने बागकाम करावे! यात दोघांचीही चुकी आहे. ज्याप्रमाणे शरीर जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे त्याचप्रमाणे स्वधर्माचे पालन करणेसुद्धा प्रत्येक जीवाला अपरिहार्य आहे. अहिंसा या उच्च तत्वाकडे दुर्लक्ष करुन सिंहाने शिकार करायलाच हवी आणि कुलसंरक्षणाचे तत्व विसरुन अर्जुनाने युद्ध करायलाच हवे. आपल्या मनातील भावनांच्या प्रभावाखाली आपण कुठलीतरी कर्मे आनंदाने करतो तर काही करायचे टाळतो. हे सर्व बिनमहत्वाच्या कर्मांबाबत चालू शकते परंतु स्वधर्म पाळताना आपल्या भावनांची कदर करणे योग्य ठरत नाही. आपल्या जीवनात सर्वात महत्वाची आणि परमहितकारी वस्तू काय आहे तर स्वधर्म आणि स्वतःचे हित साधताना भावनेला थारा दिला नाही पाहीजे. खरा खेळाडू आज जावेसे वाटत नाही अशी सबब न देता दररोज सकाळी लवकर उठून सरावाला जातो आणि मगच आपल्या खेळात तरबेज होतो. त्याचप्रमाणे आपल्या भावनांना नक्की कुठपर्यंत महत्व द्यायला हवे हे आपणास कळले पाहीजे. भावनांना मर्यादा ओलांडायची परवानगी दिली की स्वहितकारक असलेले स्वधर्माचे गांडीव धनुष्य आपल्या हातून गळालेच असे समजा! परंतु नुसता स्वधर्म करुन भागत नाही. स्वधर्माने वागताना अंतर्गत मानसिक अवस्था कशी असावी यालाही निर्बंध आहेत आणि ही ग्यानबाची मेख भगवान श्रीकृष्ण पुढच्या श्लोकात अर्जुनाला स्पष्ट करुन सांगतील. ते आपण पुढे बघू. इति.

॥ हरिः ॐ ॥

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: