श्लोक (१४ आणि १५)/३: अव्यक्‍ताची व्यक्‍त खूण स्वधर्म

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

अन्नाद्भवंति भूतानि पर्जन्यादन्नसंभवः ।

यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ गीता ३:१४ ॥

कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्‌ ।

तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्‌ ॥ गीता ३:१५ ॥

संसारातील चंचलतेमागे एक स्थिर पार्श्वभूमी आहे (आणि त्या स्थिरतेच्या सापेक्षच आपणास चंचलता जाणविते) हे सनातन धर्माचे मूळ तत्व आहे. आपणा सर्वांच्या जीवनातील या स्थिरतेच्या प्रतिबिंबात बुडून जाणे म्हणजे अद्वैत प्रणाली होय. जोपर्यंत आपण चंचलतेमध्येच गुंतलेलो आहोत तोपर्यंत आपणास या स्थिरतेची, म्हणजेच अव्यक्त ब्रह्माची, कल्पना येणे शक्य होत नाही. चित्रपटगृहात जेव्हा सिनेमा चालू असतो तेव्हा आपणास त्यामागील पटाची विस्मृती होते तशी ही गोष्ट आहे. आणि ज्याप्रमाणे कधीनाकधी सिनेमा संपतो आणि आपणास परत मागील पटाचे दर्शन होते त्याचप्रमाणे आपण सर्वजण केव्हातरी या मायेच्या चित्रपटातून मुक्त होऊन भगवंतचरणी लीन होणार आहोत. भगवंताशी मिलन होण्यासाठी काही प्रयत्‍न करायलाच हवे असे अजिबात बंधन नाही. परंतु हे मिलन जर याच जन्मात हवे असेल तर आपल्यापरीने या भेटीबद्दलची उत्सुकता दाखविणे उपयुक्‍त ठरते. श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की एखाद्या श्रीमंत मनुष्याच्या एकुलत्या मुलाला त्याचा वाटा अठराव्या वर्षी मिळणारच आहे. परंतु पंधराव्या वर्षीच जर त्याला पैसे हवे असतील तर त्याला वडिलांजवळ सतत हट्ट करावा लागतो आणि मग त्याच्या निरंतरच्या भुणभुणीला कंटाळून त्याचे वडिल त्याला काही हिस्सा आधीच देतात. त्याप्रमाणे आपण भगवंतामागे भक्तीचा हट्ट करायला हवा. भगवंताशी भेट हा आपला जन्मसिद्ध वारसा असला तरी तो आपोआप मिळायला जो वेळ लागणार आहे त्याचा कंटाळा आला असेल तर आपणास साधनेचा आटापिटा करणे जरुरी आहे.

अशा रीतीने विचार करुन साधनेचे महत्व मनाला पटविले तरी नक्की साधना कशी करावी हा प्रश्न उरतोच. जरा नजर उघडून बघितले तर साधनेचे अनंत प्रकार आपणास दिसायला लागतात. कुणी एका ठिकाणी शांतपणे बसून ध्यान करायचा उपदेश करीत आहे तर कुणी नाम घेण्यास सांगत आहे (आणि कुठले नाम घ्यावे याकरीता ८४ लक्ष देव आहेत!) तर कुणी योगसाधनेचे महत्व सांगत आहे असे आढळते. आणि हे सर्व उपाय फक्त हिंदू धर्मातील आहेत, याशिवाय इतर अनेक धर्म आणि त्यांचे अनंत मार्ग आहेतच! आणि यातील एकही मार्ग चुकीचा असू शकत नाही कारण सर्व मार्ग एकाच भगवंताकडे घेऊन जातात (ज्याप्रमाणे कुठेही पडलेले पावसाचे पाणी एकाच समुद्राला जाऊन मिळते त्याचप्रमाणे कुठल्याही देवाला केलेला नमस्कार शेवटी कृष्णाला मिळतो अशा अर्थाचा ‘आकाशात्‌ पतितं तोयं ..’ हा श्लोक सर्वश्रुत आहे). त्यामुळे वरील मार्गांपैकी कुठल्याही एका मार्गावर जे अढळ चालत राहीले त्यांना भगवंत भेटणार यात शंका नाही. परंतु बहुतांशी लोक अनेक मार्ग दिसले की भांबावून जातात. हिरव्यागार कुरणात गेल्यावर पाडसाला कुठले गवत आधी खावे याबद्दल संभ्रम होऊन ते नुसतेच इकडे-तिकडे पळायला लागते तशी आपली अवस्था होते. अशावेळी एकाच मार्गावर अचल राहण्याकरीता आपल्या मनातील सर्व शंकांचे निरसन होणे अत्यावश्यक असते. जेव्हा स्वतःच्या योग्य मार्गाबद्दल आपली पूर्ण खात्री असते तेव्हा दुसरे मार्ग कितीही आकर्षक वाटले तरी आपण त्यांच्यानुसार वर्तन करण्यास उद्युक्त होत नाही. कर्मयोगाचा मार्ग कुठल्याही एका धर्माचा वा ठराविक क्रियेंचा किंवा मंत्रोच्चारांचा आधार घेत नसल्याने तो सर्व मार्गांचे मूळ आहे. म्हणूनच ‘मी सृष्टी बरोबर या यज्ञाची निर्मिती केली’ असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले (पहा गीता ३:१०). संसारातील सर्व जीवांना या यज्ञाचा शाश्वत आधार आहे. हा महत्वाचा मुद्दा आपल्या मनावर जितका बिंबेल तितका उपयुक्त आहे. म्हणून दहाव्या श्लोकात सांगितलेली ही वस्तुस्थिती परत एकदा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला वरील दोन श्लोकांतून समजावून सांगत आहेत. भगवान म्हणत आहेत की: ‘अन्नापासून जीवांची उत्पत्ती होते. पावसाने अन्न पिकते आणि पाऊस यज्ञामुळे पडतो आणि हा यज्ञ स्वधर्मरुप कर्मांच्या रुपात आहे (१४). स्वधर्मरुपी कर्मे वेदांनी प्रगट केली आहेत आणि वेद हे अक्षर, अव्यक्त ब्रह्मापासून उत्पन्न झाले असल्याने अव्यक्‍त ब्रह्माची उपस्थितीच जणू या स्वधर्मरुपी यज्ञात आहे (१५).’

अमूर्त भगवंताकडे जाण्यासाठी जे महाद्वार आपणा सर्वांसाठी निरंतर उघडलेले आहे ते म्हणजे स्वधर्म होय. जो मनुष्य स्वधर्माने सर्व आयुष्य जगत आहे तो बाकी सर्व साधकांपेक्षा उच्च अवस्थेत आहे. जी कर्मे आपणहून सामोरी येतात त्यांना स्वतः न गुंतता पार पाडत आयुष्य व्यतीत करणे म्हणजे स्वधर्माचे पालन करणे होय. मी आणि माझे यांच्यात गुंतलेल्या जीवाला हा यज्ञ अशक्य आहे आणि ज्याला अहंकाराचे नावसुद्धा ठाऊक नाही त्याचा हा सहज नैसर्गिक धर्म आहे. साधनेच्या कुठल्याही मार्गाने गेलो तरी शेवटी आपणा सर्वांना याच यज्ञाचे पालन करायचे आहे. या मार्गावर प्रतिबंध करणारा जो आपला संकुचित अहंकार आहे त्याचा विनाश व्हावा यासाठी आपले अथक प्रयत्‍न व्हायला हवेत. परंतु या साधनेचे फल म्हणून अहंकार कमी झाला की स्वधर्मरुपी यज्ञ सुरु करायला आपण विसरु नये म्हणून भगवंतांनी कर्मयोगाचे महत्व वरील श्लोकांतून आपणास सांगितले आहे. आपणा सर्वांचे अंतिम ध्येयच जणू आज सामोरे आले आहे असे वाटते.

॥ हरिः ॐ ॥

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: