श्लोक १६/३: इंद्रियप्रेमात गुरफटल्याचे दुष्परीणाम

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः ।

अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥ गीता ३:१६ ॥

भगवान श्रीकृष्णांनी गेल्या दोन श्लोकांतून अर्जुनाला अत्यंत संक्षिप्तपणे या जगाचे रहाटगाडगे कसे चालू आहे ते सांगितले. त्यातून मानवाचा स्वधर्मरुपी यज्ञ या जगाची व्यवस्था सुरळीत ठेवण्यास कसा कार्यरत आहे हे स्पष्ट होते. आपणहून समोर आलेल्या कुठल्याही कर्मांना सकारात्मक नजरेने सामोरे जाणे हा आपणा सर्वांचा स्वधर्म आहे. स्वधर्माची ही व्याख्या आपल्या मानसिक पातळीवर आहे हे लक्षात घेणे जरुरी आहे. आपल्या भोवताली कुठली परीस्थिती आहे यावर कुठल्या प्रकारची कर्मे सामोरी येतात हे ठरत असते. त्यामुळे बाह्य नजरेत आपण प्रत्येकजण अतिशय भिन्न कर्मे करीत असलो तरी आपणा सर्वांचा स्वधर्म एकच आहे आणि तो म्हणजे व्यावहारिक जगातील सर्व कर्मांना मानसिक तटस्थतेने सामोरे जाणे. स्वधर्माचे पालन करण्याकरीता ‘आपण सर्वजण भगवंताची हत्यारे आहोत आणि आपला वापर करुन भगवान या जगाचे पालन करीत आहेत’ अशी कल्पना आपण करु शकतो. आपल्याच मनातील ही कल्पना असल्याने पारमार्थिक सत्याचे संपूर्ण प्रतिबिंब या विचारात नाही. परंतु असे असले तरी आपल्या हातून स्वधर्म घडण्यास या कल्पनेचा फायदा होत असल्याने भगवंताबद्दलची ही भावना ताज्य ठरत नाही. या विचारामधील भगवंत स्वतःच्या इच्छेने या जगाला चालवित असल्याने सगुणात्मक आहे. त्यामुळे असा विचार मनात सतत ठेवणे म्हणजेच निर्गुण भगवंताची सगुण भक्‍ती करणे होय. श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की ‘अहंकार ठेवायचाच असेल तर मी भक्त आहे असा अहंकार ठेवावा. त्याने आपले सर्वात कमी नुकसान होते.’ एकदा भगवंताच्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी घडत आहेत ही भावना मनात स्थिर झाली की भोवतालच्या परीस्थितीला एक ठराविक आकार द्यायचा आपला प्रयास थांबतो. मग ज्याप्रमाणे स्वयंपाकघरातील सुरी कधी ताज्या लुसलुशीत पालेभाजीला चिरण्यासाठी वापरली जाते तर कधी कच्च्या करकरीत कैरीचे लोणच्यासाठी तुकडे करण्यास वापरली जाते त्याचप्रमाणे आपल्या इंद्रियांचा कधी सुख उपभोगण्यासाठी भगवान वापर करतात तर कधी दुःखाचे घाव सोसण्यासाठी अशी भावना निर्माण होते. त्यामुळे स्वतःच्या मनाला आपण इंद्रियांच्या भोगामध्ये गुंतून देत नाही. आणि एकदा शरीरभोगांपासून मन अलिप्त झाले की सुख आणि दुःख या दोन्ही घटनांना आपण सहजपणे सामोरे जाऊ शकतो. आणि हेच आपले कर्तव्य आहे, हीच भगवंताची आपणाकडून अपेक्षा आहे.

स्वतःच्या पायावर उभे नसलेल्या मुलाने पालकाच्या आज्ञेचे पालन न करणे ज्याप्रमाणे त्याज्य मानले जाते त्याचप्रमाणे आपल्या हातून भगवंतांच्या अपेक्षेनुसार वर्तन न करणे पाप समजले जाते. किंबहुना या जगात ही एकच गोष्ट पाप आहे असे आपण समजू शकतो. वरील श्लोकामध्ये हीच गोष्ट भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहेत असे वाटते. भगवान म्हणत आहेत की ‘हे अर्जुना, स्वधर्माचे पालन न केल्याने जो (मी घालून दिलेल्या) जगाच्या रहाटगाडग्याप्रमाणे चालत नाही तो पापी आहे. तो इंद्रियसुखामध्येच समाधान मानणारा आहे, (आणि म्हणून) त्याचे जीवन व्यर्थ गेले (असे निःसंशय समजण्यास हरकत नाही) (१६).

वरील श्लोकातून भगवंतांनी ‘स्वधर्माचे पालन न करणे’ अशी पापाची व्याख्याच केली आहे असे वाटते. इतकेच नाही, तर सर्व पापाचे ‘इंद्रियभोगांमध्ये गुंतणे’ हे एकच मूळ आहे असेही त्यांनी सांगतले आहे. कारण आपण इंद्रियसुखात मग्न असतो तेव्हाच आपल्या हातून प्रमाद घडतो असे भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे आपल्या मन हेसुद्धा गीतेमध्ये इंद्रिय मानले आहे. तेव्हा आपण स्वतःच्या मनातील विचारांनुसार वर्तन करणेसुद्धा भगवंतांना मान्य नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. नाहीतर आपण स्वतःच्या हट्टाकरीता कित्येकवेळा आपल्या शारिरीक इंद्रियांना त्रास देतो, त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही. पण म्हणून आपले वागणे योग्य असेलच असे आपण म्हणू शकत नाही. इथे आपला हट्ट सामाजिक वा नैतिक दृष्टीकोनातून किती योग्य आहे याचा संबंध नाही हे ध्यानात घ्या. स्वधर्माने वर्तन केले असता मनात आपोआप एक निरव शांतता निर्माण होते आणि जोपर्यंत या शांततेचा आस्वाद आपण घेत नाही तोपर्यंत आपले काहीतरी चुकत आहे असे समजण्यास हरकत नाही. भूतकाळात आपल्या हातून कसेही वर्तन घडले असले तरीसुद्धा आपणास या शांततेचा लाभ घेता येतो (वाल्या कोळ्याचे महर्षी वाल्मिकींत रुपांतर होणे हे याच वस्तुस्थितीचे द्योतक आहे). जेव्हा संसाराच्या रहाटगाडग्यात आपल्या हातून भगवंताला अपेक्षित वर्तन घडते तेव्हा हे विश्वचक्र सहज, घर्षणरहित फिरून आपणास लगेच शांति देते. ही शांति भविष्यात कधीतरी उधार मिळणारी नसून आत्ता याक्षणी रोकडी मिळणार आहे. ज्याने अशा शांतीचा उपभोग घेतला नाही त्याचे जीवन व्यर्थ गेले असे भगवान म्हणत आहेत. या वक्तव्याबद्दल कुणाचे दुमत असणे शक्यच नाही!

॥ हरिः ॐ ॥

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: