श्लोक (१७ आणि १८)/३: कर्मयोगाची परीपूर्णता म्हणजे खरी स्वतंत्रता

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः ।

आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ॥ गीता ३:१७ ॥

नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन ।

न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥ गीता ३:१८ ॥

गेल्या श्लोकामध्ये भगवंतांनी कर्मयोगाचे पालन न करणे म्हणजे पाप करणे होय असे सांगितले. परंतु हे केवळ नकारात्मक प्रोत्साहन आहे. आता ते आपणास कर्मयोगाची फलश्रुती सांगून कर्मयोग करण्यास सकारात्मक कारणे देत आहेत. असे बघा, एखादी कृती करण्यापूर्वी आपल्या मनात जर स्वतःच्या वर्तनांबद्दल संदेह असला तर आपल्या हातून कर्म व्यवस्थित घडत नाही. विशेषतः करावयाचे काम जर लगेच संपणारे नसेल तर मनातील शंकांना फोफावायला खूप संधी मिळून शेवटी आपल्या हातून कर्म घडणे थांबते. उदाहरणाने ही गोष्ट अधिक स्पष्ट होइल. अशी कल्पना करा की एके दिवशी आपण स्वतःच्या शारीरीक अस्वास्थाबद्दल कंटाळा येऊन आपण तब्येत सुधारण्यासाठी नियमित काही व्यायाम करावयाचे वा सध्याचे आपले सिगारेट ओढणे थांबवायचे वा तळकट पदार्थ न खाता फक्त पौष्टीक आहार सेवन करावयाचे ठरविले, तर किती दिवस आपला निर्धार टिकतो? तब्येत व्यवस्थित होइपर्यंत! एकदा शरीर ठीक झाले की आपण म्हणतो एक दिवस आपला नियम मोडला तरी काही हरकत नाही. मग हळू हळू आपला संपूर्ण नियमच केव्हा मोडीत निघतो ते आपणास कळत नाही. इथे काही साधक म्हणतील की आमचा स्वभावातच ‘चंचलता’ हा दोष असल्याने एकाच मार्गावर अचल चालणे आम्हांस जमत नाही. आमचे जीवन असेच चालणार. परंतु ही गोष्ट आपल्या दररोज स्नान करण्याच्या नियमाबद्दल घडत नाही हे लक्षत घ्या. तेव्हा एखादा नियम आयुष्यभर पाळणे आपल्या स्वभावात नाही असे कुणीच म्हणू शकत नाही. स्वतःच्या स्वभावाला दोष देण्यापेक्षा ‘दररोज स्नान केलेच पाहीजे’ या नियमाबद्दल ज्याप्रमाणे आपल्या मनात निःसंदेह निष्ठा आहे त्याप्रमाणे बाकी नियमांबद्दल नाही असे आपण म्हटले पाहीजे. एकदा ही गोष्ट कळली की आपली आयुष्यभर कर्मयोग करण्याबद्दलची निष्ठा कशी वाढेल यावर आपण विचार करायला लागू. ज्याप्रमाणे स्नान न करणे चुकीचे आहे हे आपणास माहीत आहे त्याचप्रमाणे नियमित स्नानाचे फायदेही आपणास माहीती असल्याने नित्य स्नान करण्यास आपण चुकत नाही. या दृष्टीने बघितल्यास, मागील श्लोकामधून कर्मयोग न करणे चुकीचे आहे असे सांगून भगवंतांनी आपणास कर्मयोग करण्याचे अर्धे महत्व सांगितले आहे. आता कर्मयोग केल्याने कसा फायदा होतो ते सांगून ते आपल्या मनातील कर्मयोगात आयुष्य व्यतीत करण्याबद्दलच्या श्रद्धेला निरंतर स्थिर होण्यास मदत करीत आहेत.

भगवान म्हणत आहेत की: ‘जो मनुष्य स्वतःमधील आनंदात रममाण असतो, ज्याला स्वरुपानंदाव्यतिरीक्त इतर कुठल्याही गोष्टीचे आकर्षण वाटत नाही आणि जो स्वरुपात निमग्न राहण्यामध्येच आयुष्याचे सार्थक मानतो त्याची सर्व कर्मे नष्ट होतात (१७). अशा माणसाला आत्तापर्यंत घडलेल्या वा भविष्यात घडू शकणाऱ्या कुठल्याही कर्मातून लाभ होणार नाही (याची खात्री असते). (आणि म्हणून) तो स्वतःच्या लाभाकरीता या विश्वातील कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नसतो (१८).’ इथे वरकरणी असे दिसते की भगवान कुठला महामानव कर्मयोग करण्याच्या बंधनातून सुटतो असे सांगत आहेत. परंतु याचाच अर्थ असा की ही कर्मयोगाची फलश्रुती आहे. असे म्हणण्याचे कारण म्हणजे या श्लोकांतून आपण कर्मयोग कुठपर्यंत करावा? या प्रश्नाचे उत्तर ‘जोपर्यंत आपली अवस्था वरील साधकाप्रमाणे होत नाही तोपर्यंत’ असे आहे हे स्पष्ट होते. आणि जर कर्मयोग केल्याने आपली अवस्था अशी होणार नसेल तर अशी अवस्था कशी निर्माण होईल याचे वेगळे वर्णन भगवंतांनी जरुर केले असते. परंतु त्यांनी कर्मयोगा व्यतिरीक्त इतर कुठलाही मार्ग इथे सांगितलेला नाही. याचाच अर्थ असा की पराकोटीचा कर्मयोग करुन आपली अवस्था काय होईल याचेच हे वर्णन आहे असे आपण मानायला हरकत नाही.

वेगळ्या शब्दांत वरील श्लोकांबद्दल बोलायचे झाले तर भगवान असे म्हणत आहेत की जो मनुष्य खऱ्या अर्थाने या विश्वापासून स्वतंत्र आहे त्याला या संसारात कर्मयोग करण्याचे बंधन रहात नाही. म्हणजे काय तर कर्मयोगामुळे आपल्या जीवनात खरी स्वतंत्रता येते असे त्यांना म्हणावयाचे आहे. जरा विचार केला तर असे जाणविते की आयुष्यभर आपण स्वतंत्रतेकरीताच झगडत आहोत. लहानपणी पालकांच्या नियमांपासून स्वतंत्रता हवी असते, मोठेपणी दुसऱ्यांवर आर्थिकरीत्या अवलंबून असण्यापासून स्वतंत्रता हवी असते, मग स्वतःच्या नोकरीतील बंधनांपासून सुटका हवी असते तर कधी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांपासून मोकळीक हवी असते. परंतु आपली स्वतंत्रतेची व्याख्या फार संकुचित असते. लहानपणी पालकांपासून सुटका हवी असते कारण मग मित्रांबरोबर कुठेही भटकायला आपण मोकळे असतो. मोठेपणी स्वतःच्या पायावर उभे राहीले की आपल्या मनाप्रमाणे पैसे खर्च करायला आपण मोकळे होतो. जरा विचार केल्यावर असे दिसते की आपली स्वतंत्रतेची व्याख्या ‘सध्याच्या बंधनांतून सुटका होऊन आपल्या मनाला हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टीत अडकणे’ अशी असते. खऱ्या अर्थाने जगापासून मुक्तता आपणास नको असते. सध्या नकोशा वाटणाऱ्या बंधनांतून हव्याशा पाशात गुरफटणे यात आपण कृतकृतत्या मानत आहोत! दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर आपली स्वतंत्रता नेहमी कुठल्यातरी ठराविक पाशांपासून असते, सगळ्याच बंधनांतून नसते. भारताला १९४७ साली स्वतंत्रता मिळाली असे आपण म्हणतो. परंतु ती फक्त ब्रिटीशांपासून मिळालेली स्वतंत्रता होती. पांढऱ्या त्वचेची माणसे आपणास हुकुम सोडत नाहीत पण आता आपलीच माणसे सत्तेवर बसून हवी ती फर्माने सोडत आपले शोषण करीतच आहेत की! त्याचप्रमाणे आपण कुणापासूनतरी सुटका मिळवायचा प्रयत्‍न करत असतो आणि दुसऱ्या माणसाच्या वा तत्वाच्या सत्तेखाली जात असतो. परंतु कर्मयोग केल्याने जी स्वतंत्रता येते ती कुठल्यातरी पाशाच्या सापेक्ष नसून संपूर्ण असते. ‘परके लोक गेले आणि स्वकीय नेते आले’ किंवा ‘पालक गेले आणि जीवनसहकारीच्या मनाची मर्जी राखणे आले’ अशी अर्धवट स्वतंत्रता कर्मयोगानी मिळत नाही. भगवान म्हणत आहेत की या विश्वातील कुठल्याही घडामोडींनी आपल्या स्वरुपात वृद्धी होणार नाही (कारण ते स्वयंभू रीतीने परीपूर्ण आहे) याची खात्री झाल्याने जी स्वतंत्रता येते त्या संपूर्ण मुक्ततेत स्वच्छंद विहार करणाऱ्या अवस्थेत कर्मयोगाची परीणीती होते. लक्षात घ्या की ‘स्वतंत्रता’ हा शब्द खऱ्या अर्थाने निव्वळ संतांनाच लागू होतो. जर स्वतःची अवस्था अशी करुन घ्यावयाची असेल तर कर्मयोगाचे निरंतर पालन करणे अपरिहार्य आहे. हे भगवंतांचे सांगणे आहे.

॥ हरिः ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: