श्लोक (१९ आणि २०)/३: तटस्थता ठेवून कर्मे करा

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर ।

असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ गीता ३:१९ ॥

कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः ।

लोकसंग्रहमेवापि संपश्यन्कर्तुमर्हसि ॥ गीता ३:२० ॥

मागील दोन श्लोकांमधून कर्मांपासून सुटका झालेल्या माणसाचे वर्णन भगवंतांनी केले. जो मनुष्य या जगातील कुठल्याही वस्तूवर आणि आपल्या मनातील भावनांच्या गदारोळातील एकाही आवाजावर (स्वतःच्या सुखाकरीता) अवलंबून नाही तोच महामानव वा संत सुकलेल्या नारळाच्या कवचासारखा आपोआप कर्मांच्या खोबऱ्यापासून अलिप्त झाला आहे असे श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले. कर्मयोगाचे वर्णन करीत असताना मध्येच अशा संताचे वर्णन करण्यामागचा भगवंतांचा हेतू असा की कर्मयोगाचे पालन केल्याने आपली अवस्था अशी होईल ही भावना अर्जुनाच्या मनात उत्पन्न व्हावी. आपला हा हेतू ते आता अधिक स्पष्टपणे अर्जुनाला सांगत आहेत. कर्मयोगाचे महत्व सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत की: ‘(तू अजून संपूर्णपणे स्वतंत्र नाहीस,) म्हणून कशातही न गुंतता जी कर्मे समोर आलेली आहेत ती निरंतरपणे करीत रहा. मनात (कर्मफलांबद्दल) तटस्थता ठेऊन जो मनुष्य सतत कर्मे करीत असतो त्याला अंतिम स्वतंत्रता मिळते (१९). राजा जनक इत्यादी लोकांनी तटस्थतेने कर्मे करुनच परमार्थ प्राप्त करुन घेतला. (दुसरी गोष्ट म्हणजे) इतर लोकांचे भले होण्यासाठी तुला (योग्य मनोवृत्ती ठेऊन) कर्मे करणे अपरिहार्य आहे (२०).’

जोपर्यंत या जगाचे भान आहे तोपर्यंत आपणास कर्मे करणे भाग आहे. नुसते स्वस्थ बसायचे म्हटले तरी तेसुद्धा कर्मच आहे. आणि कर्मयोगाद्वारे जीवनात निरंतर सुरु असणारी कर्मे चालू असताना मनात कुठले विचार ठेवावे याचे ज्ञान होते. त्यामुळे कर्मयोगाचे महत्व आपल्या जीवनात काय असू शकेल याचे वेगळे वर्णन करण्याची जरुरी नाही. वरील श्लोकांमधून भगवान श्रीकृष्णांनी असक्त राहून कर्मे करणे म्हणजे कर्मयोग आहे आणि त्याचे पालन करुनच मनुष्य परमार्थाला प्राप्त करुन घेतो असे म्हटले आहे. आपल्या म्हणण्याचे पुष्टीकरण म्हणून त्यांनी जनक राजाचे उदाहरण दिले आहे. इथे ‘कर्मयोगाचे पालन करुन मोक्ष मिळवायचा असे मानले तर ज्यांनी कर्मयोगाचे फल मिळविले आहे अशा संतांनी कर्मयोग केला नाही तर चालेल का?’ हा प्रश्न उद्भवायची शक्यता आहे. त्याचे निराकरण करण्यासाठी विसाव्या श्लोकातील दुसऱ्या चरणात भगवान म्हणत आहेत की कर्मयोगाची फलश्रुती खऱ्या अर्थाने जरी प्राप्त झाली असेल तरीसुद्धा समाजाला मार्गदर्शन म्हणून कर्मयोगाचे पालन करणे जरुरी आहे. इथे समाजाला, म्हणजे स्वरुपाशिवाय वेगळ्या भासणाऱ्या विश्वाचा संदर्भ देण्यास एक सूक्ष्म कारण आहे. असे बघा, या जगात स्वतःशिवाय दुसरी कूठलीही वस्तू अस्तित्वात नाही अशी धारणा असेल तर आपोआप तटस्थतेनेच कर्मे होतात. ज्याप्रमाणे आईला आपली सर्व मुले एकसारखीच प्रिय असतात त्याचप्रमाणे सर्वकाही आपणच आहोत हे कळल्यावर जगातील सर्व गोष्टींबद्दल समान आपुलकी वाटते. विश्वातील सर्व गोष्टींबद्दलची साम्यावस्था म्हणजेच सक्रीय तटस्थता असल्याने अशा अवस्थेत आपल्या हातून आपोआपच कर्मयोग घडतो. म्हणजे काय, तर हातून जाणीवपूर्वक कर्मयोग करण्यासाठी या जगाचे आपल्याशिवाय वेगळे अस्तित्व आहे याचे भान असणे जरुरी आहे. ‘निरंतर कर्मयोग करुन मनात साम्यावस्था निर्माण झालेली आहे आणि तरीसुद्धा या जगाचे वेगळे भान आहे’ अशा स्थितीमध्ये स्वतःला मोक्ष मिळाला असला तरी इतरांकरीता कर्मयोग करावा असा भगवंतांचा आदेश आहे.

परंतु ही सगळी फार पुस्तकी गोष्ट झाली!! स्वतः तटस्थ राहून इतरांच्या भल्यासाठी कसे कर्म करावे याचे प्रात्यक्षिक उदाहरण बघितल्याशिवाय ते आचरणात आणणे आपणास शक्य नाही. याकरीता काय करावे? दैनंदिन जीवनात कर्मयोग कसा करावा याचे जिवंत उदाहरण बघायचे असेल तर संतांच्या जीवनाकडे आपण बघायला हवे कारण संत कधीही भगवंताच्या आज्ञेबाहेर जात नाहीत. म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ‘… परि तयांचे चरित्र । ऐकती जे ॥ ज्ञा २२६:१२ ॥ तेही प्राणापरौते । आवडती हे निरुते । जे भक्तचरित्राते । प्रशंसिती ॥ ज्ञा. २२७:१२ ॥’ ज्या संतांनी भगवंताच्या आज्ञेचे कधीही उल्लंघन न करण्याचे वचन घेतले आहे ते भगवंतांच्या वरील श्लोकांतून स्पष्टपणे दिलेल्या आदेशाबाहेर कसे जातील? इथे काही साधक असे म्हणतील की तसे असेल तर सर्व संतांचा उपदेश ‘कर्मयोग करा’ असा एकसारखा असायला हवा. परंतु कुणी संत योगसाधनेला महत्व देत आहे तर कुणी नामसाधनेला असे दिसून येते. संतांच्या उपदेशांमध्ये फरक असण्याचे कारण काय? याचे उत्तर असे की आपल्या परमदयाळू स्वभावामुळे संत नुसता भगवंताचा आदेश न सांगता त्या आदेशाचे पालन करण्यासाठी मनाची जी स्थिरता आवश्यक असते ती प्राप्त करण्याचे साधनही सांगत असतात.

लक्षात घ्या की प्रत्येक संताचा जन्म एका ठराविक मनोवृत्ति असलेल्या साधकांच्या भल्यासाठी झालेला असतो. सवयीचा परीणाम म्हणून आपल्या मनात ज्या वृत्तींनी आपली मुळे खोलवर रुजविली आहेत त्यांना संपूर्णपणे नष्ट केल्याशिवाय आपल्या हातून निरंतरपणे कर्मयोग घडणे शक्य नसते. जास्तीतजास्त आपल्या हातून काय घडेल? तर जेव्हा काही कारणाने आपल्या मनोवृत्ती दबल्या असतील तेव्हा काही काळ आपण कर्मयोगाचे पालन करु शकू. परंतु नंतर आपण परत आपल्या स्वभावाप्रमाणेच वर्तन करायला लागतो. जसे प्रत्येक रोगाला त्याचे ठराविक औषधच लागू पडते त्याचप्रमाणे आपल्या सवयींना लागू पडणारे औषध भिन्न असते. आणि म्हणून संतांचा उपदेश आपणास भिन्न दिसतो. परंतु कर्मयोगाचे ज्ञान होण्यास आपणास संतांच्या उपदेशांकडे बघावयाचे नसून त्यांच्या स्वतःच्या जीवनातील वर्तनाकडे लक्ष द्यायचे आहे. त्यांनी आपले जीवन कसे व्यतीत केले आहे हे सूक्ष्मपणे बघितल्यास सर्व संतांमधील समानता सहजपणे समोर येते. ती म्हणजे या विश्वातील कुठल्याही गोष्टीबद्दल त्यांच्या मनात असलेली तटस्थता. तुम्ही श्री गोंदवलेकर महाराजांच्या जीवनाकडे पहा वा श्री रमण महर्षींच्या चरित्रावर नजर टाका किंवा श्री रामकृष्ण परमहंसांच्या जीवनाचा अभ्यास करा. सर्वत्र एकच गोष्ट सगळीकडे स्पष्टपणे आपणास दिसून येईल. ती म्हणजे समोर आलेल्या कुठल्याही घटनेला त्यांनी विना आक्रोश आणि सहजपणे दिलेले तोंड! ‘जे काही होत आहे ते सर्व बरोबर आहे आणि ते अजून सुंदर करण्याची काहीही जरुरी नाही’ या गोष्टीवरील त्यांची अढळ निष्ठा स्पष्टपणे लक्षात येते. वस्तुस्थिती अशी आहे की सध्या आपण कुठल्याही मार्गाने भगवंताकडे जात असलो तरी शेवटी सर्व मार्ग या ‘सहज कर्म करणे’ या मार्गालाच येऊन मिळतात. एकदा आपल्या हातून होणारी कर्मे ‘योग’ म्हणून व्हायला लागली की आपले अनुसंधान निरंतर चालू रहाते. मग आपल्या देह-मनावर आधारित संकुचित अहंकाराचा संपूर्ण विनाश होतो आणि स्वतःच्या निर्गुण रुपात आपण सहजपणे विलीन होतो. भगवंतांनी निर्देश केलेली ‘परम अवस्था’ प्राप्त करुन घेतो. असे कर्मयोगाचे अनन्यसाधारण महत्व आहे! इति.

॥ हरिः ॐ ॥

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: