श्लोक (२२ ते २४)/३: आधी करावे मग सांगावे

 ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन ।

नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ गीता ३:२२ ॥

यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः ।

मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ गीता ३:२३ ॥

उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्‌ ।

सङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥ गीता ३:२४ ॥

तृतीय अध्यायातील विसाव्या श्लोकात अर्जुनाला कर्मयोगाचे पालन करण्याची आवश्यकता समजावून सांगताना भगवान श्रीकृष्णांनी असे सांगितले की असे वागल्याने समाजाला योग्य मार्गदर्शन होईल. या मुद्याचे अधिक स्पष्टीकरण देण्यासाठी एकविसाव्या श्लोकात त्यांनी सर्वसामान्य लोकांची मानसिक स्थिती विषद केली. ते म्हणाले की लोकांना मान्यवर जनांचे अनुकरण करणे योग्य वाटते. इथे अर्जुनाच्या मनात अशी एक शंका उत्पन्न होऊ शकते लोकांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी स्वतः तसे वागायचे बंधन कशाला? मी कसेही वागीन पण लोकांना उपदेश योग्य तोच करीन. जर माझ्या सांगण्याप्रमाणे जनता वागणार असेल तर एवढे पुरेसे आहे. परंतु जगाची रीत तशी नाही! सर्वसामान्य लोकांना स्वतः काय योग्य आणि काय अयोग्य याचा निवाडा करण्यास वेळ नाही म्हणून त्यांनी अनुकरणाचा मार्ग निवडला असला तरी ते शब्दांचे अनुकरण न करीता वर्तनाचे अनुकरण करतात. जर वक्ता बरोबर सांगत असेल तर त्याने स्वतः तसे वागायला काय हरकत आहे? हा साधा आणि सरळ प्रश्न ते करतात. जर उपदेशकर्त्याचे वर्तन सल्ल्याशी सुसंगत नसेल तर ‘या माणसाचा स्वतःच्या बोलण्यावर विश्वास नाही. मग मी का म्हणून ठेवावा?’ असा रोखठोक प्रश्न ते विचारतात आणि अनुकरण करायचेच झाले तर वक्त्याच्या वर्तनाचे करतात. श्री रामकृष्ण परमहंस याबाबत एक फार सुंदर गोष्ट सांगायचे: एकदा एका वैद्याकडे, त्याची कीर्ती ऐकून, एक रुग्ण फार लांबचा प्रवास करुन स्वतःला दाखवायला आला. त्याच्या पोटाच्या तक्रारीचे संपूर्ण वर्णन ऐकल्यावर त्या वैद्याने दुसऱ्या दिवशी औषध घेण्यास यायला सांगितले. मग परत एवढा दूरून आलेल्या त्या रुग्णाला त्यांनी सांगितले की तू गूळ खाणे बंद कर, तुझे सर्व रोग हळू-हळू नाहीसे होतील. तेव्हा त्या रोग्याने तक्रारीच्या सुरात विचारले की हे तुम्हाला कालसुद्धा सांगता आले असते की. त्याकरीता मला परत यायला का लावले? तेव्हा वैद्य हसून म्हणाले की काल माझ्या दवाखान्यात औषधनिर्मितीसाठी गुळाच्या दहा ढेपा आलेल्या होत्या आणि तो समोर असताना मी गुळ खाऊ नकोस असे सांगितले असते तर तुझा त्यावर विश्वास बसला नसता! आज तो सर्व गुळ वापरुन संपल्यामुळे खोली रीकामी झाली आहे, म्हणून मी तुला हा सल्ला देऊ शकलो!

अगदी साध्या गोष्टीतसुद्धा आपण उपदेशकर्त्याचे वर्तन तपासून बघत असतो मग स्वतः उपदेश करताना इतरांनी तसे बघू नये ही आपली अपेक्षा कितपत रास्त आहे? स्वतः सिगारेट पिऊन मुलाला धूम्रपानाच्या दुष्परीणामावर भाष्य दिले तर परीणाम होईल का? वेळ मारुन नेण्याकरीता कित्येकवेळा मी अर्धसत्य बोलतो आणि माझ्या मुलाने वा सहकाऱ्याने वा पत्नीने माझ्याशी खरे बोलावे अशी अपेक्षा ठेवतो हे जेवढे चुकीचे आहे तेवढेच स्वतःचे वर्तन बेबंद ठेवून दुसऱ्यांकडून रास्त वर्तनाची अपेक्षा ठेवणे अयोग्य आहे. तेव्हा जनतेच्या मार्गदर्शनास उपदेशाची आवश्यकता नसून स्वतःच्या योग्य वर्तनाची म्हणजेच कर्मयोगाच्या पालनाची जरुरी आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेऊन दुसऱ्यांनी कसे वागावे याबाबत फारशी चर्चा न करीता स्वतःकडे बघावे. आधी स्वतः कर्मयोग करुन मग इतरांना उपदेश केल्याचा अजून एक परिणाम म्हणजे आपले वक्तव्य पुस्तकी रहात नाही. व्यावहारीक अनुभवांच्या खांचखळग्यांतून प्रवास करुन आल्याने आपल्या शब्दांचा पुस्तकी ताठा नाहीसा होऊन ते समोरील परीस्थितीला योग्य तोंड देण्याइतके लवचिक होतात! त्यामुळे अशा वक्त्याच्या शब्दांवर लोकांचा पटकन विश्वास बसतो. याशिवाय स्वानुभवाने प्राप्त झालेल्या शक्तिला ते जणू त्यांच्या शब्दांतून श्रोत्याला प्रदान करतात ज्यायोगे ऐकणाऱ्याला अनुकरण करण्यास ताकद येते. ही ताकद पूर्ण प्रमाणात श्रीकृष्णांकडे आहे कारण ते स्वतः सतत असे वर्तन करीत आहेत. या वस्तुस्थितीचे वर्णनच ते वरील श्लोकांतून करीत आहेत. भगवान म्हणत आहेत की: ‘अरे अर्जुना या तिन्ही लोकांमध्ये (भू, भव, स्वः) मला काही कर्तव्य उरलेली नाहीत. मी अजून नवे जिंकावे असे काही इथे उरलेले नाही आणि तरीसुद्धा मी निरंतर कर्मयोगाचे पालन करीत आहे (२२). अर्जुना, जर कधीकाळी मी (आता मला ज्ञान झालेले असल्याने) योग्य कर्म न करीता स्वस्थ बसून राहीलो तर सर्व लोक आपापल्या मतीप्रमाणे माझ्या स्वस्थ बसण्याचे अनुकरण करायला लागतील (२३). त्यामुळे (माझ्या मनात त्यांना योग्य मार्गदर्शन करायची इच्छा असली तरीसुद्धा) मी त्यांना संमोहातच पाडीन आणि त्यांना स्वतःच्या आयुष्याचे ध्येय अप्राप्त होईल. अशा परीस्थितीत जगाचा विनाश होण्यास वेळ लागणार नाही (२५).

इथे अजून एक गोष्ट बघण्यासारखी आहे. ती म्हणजे खुद्द भगवान श्रीकृष्णांनासुद्धा असे वाटत नाही की त्यांनी आत्तापर्यंत जसे वर्तन केले आहे त्याचा आदर्श जनता आपल्या मनात सतत ठेवील. आधीच्या इतिहासाचा विसर पडून ते सध्या कसे वागत आहेत त्याचेच अनुकरण होणार आहे याची पूर्ण जाणीव त्यांना आहे. म्हणून ते ‘मी कधीकाळी स्वस्थ बसलो’ तर काय होईल याचे वर्णन करीत आहेत. त्यांच्या अनुचित वर्तनाने सर्व जगाचा विनाश होईल कारण त्यांना सर्वच जनता मान्यवर समजते. आपल्या वर्तनाने निव्वळ आपल्याशी संबंध जोडून असलेल्याच्या जीवनात गोंधळ उत्पन्न होईल. पण आपल्याकरीता हीच सर्व दुनिया आहे. हो ना? अर्थात, जगामध्ये शिकागो, न्यूयॉर्क इत्यादी शहरे आहेत याची आपणास जाणीव आहे पण आपल्या जीवनात ती तशी सामाविष्ट नाहीत. मी आणि माझे सहोदर इतकीच आपल्या जीवनाची खरी व्याप्ती आहे आणि जर त्या सर्वांच्या जीवनात संमोह निर्माण झाला तर माझ्या सर्व जीवनात गोंधळ निर्माण झाला असेच आपण म्हटले पाहीजे. त्यामुळे जे वर्णन भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच्या अयोग्य वर्तनाबद्दल केले आहे ते आपणा सर्वांना लागू पडते. भगवंतांनी निर्माण केलेल्या या विश्वात आपण स्वतःचे एक जग निर्माण करु पहात आहोत (हेच आपल्या जीवनाचे ध्येय असते. हो की नाही?) आणि त्यामुळे आपणा सर्वांवर अत्यंत नैसर्गिकरीत्या कर्मयोगाचे पालन करण्याची जबाबदारी येते. नाहीतर आपण एक गदारोळाने भरलेले विश्व निर्माण करु आणि आपणासहित बाकी सर्वांना विनाशाच्या रस्त्यावर पाठवू. हे ज्याला हवे आहे त्यानेच कर्मयोगाचा मार्ग सोडावा!

॥ हरिः ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: