श्लोक ( २५ आणि २६)/३: वेगळे असून वेगळेपणा नको!

 ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वंति भारत ।

कुर्याद्विद्वांस्तथाऽसक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्‌ ॥ गीता ३:२५ ॥

न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसंगिनाम्‌ ।

जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन्‌ ॥ गीता ३:२६ ॥

स्वतःच्या वर्तनाचे उदाहरण भगवान श्रीकृष्णांनी गेल्या श्लोकांतून अर्जुनाला दिले. ते म्हणाले की जर मी कधीकाळी उचित कर्म करण्याचे टाळले तर लोक माझ्याप्रमाणे वागायचा प्रयत्‍न करतील आणि स्वतःच्या आयुष्याचे ध्येय चुकतील. कर्मयोगाचे निरंतर पालन करण्याचा जो नियम प्रत्यक्ष भगवान जर पाळत असतील तर सामान्य लोकांना तो अपरिहार्य आहे यात शंकाच नाही. परंतु त्याहीपेक्षा ज्ञानी माणसांना या नियमाच्या बंधनाबाहेर न जाण्याची जबाबदारी जास्त आहे कारण इतरांसारखे ते आपल्या कामचुकारपणाला अज्ञानाची सबब देऊ शकत नाहीत. जगाचे रहाटगाडगे ज्या कर्मयोगावर आधारीत आहे त्याचे सर्व ज्ञान झाल्यावरसुद्धा जो त्याप्रमाणे आपले आचरण करीत नाही त्याचा अपराध सर्वसामान्यांपेक्षा अधिक आहे यात शंका नाही. कारण जेव्हा मनुष्याला ज्ञान होते त्याचबरोबर त्याप्रमाणे वागण्याचे बंधनही येते. याशिवाय अजून एक कारण म्हणजे ज्ञानी मनुष्याच्या मनात भगवंताविषयी आत्यंतिक आपुलकी असते आणि त्या प्रेमाच्या पोटी तो निरंतर भगवंताच्या अनुसंधानात रहात असतो. ज्या व्यक्तिबद्दल आपल्या मनात पराकोटीचे प्रेम आहे त्या व्यक्तिच्या मनाप्रमाणे आपण वागणे आपले कर्तव्य आहे. म्हणूनसुद्धा ज्ञानी मनुष्याचे कर्मयोगाचे पालन करण्याचे बंधन अधिक दृढ आहे. वरील श्लोकांतून ज्ञानी मानवाच्या मनातील आपल्याबद्दल असलेल्या या प्रेमाचाच आधार भगवंतांनी घेतला आहे असे वाटते. आपणास दिसत असलेली सर्व सृष्टी भगवंताचेच दृष्य रुप आहे. म्हणून जेव्हढी आपली स्वतःच्या देह-मनावर आस्था असते तेव्हढेच प्रेम भगवंताच्या मनात या चराचरातील सर्व जीवांवर आहे. सर्वसामान्यांच्या मनातील चांगले-वाईट ही वर्गवारी भगवंतांच्या मनात नसल्याने या सर्वांचे कल्याणच व्हावे अशी त्यांची सतत इच्छा असते. त्यामुळे त्यांचे सान्निध्य प्राप्त झालेल्या महामानवांनीसुद्धा असेच वर्तन करावे अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे. ते म्हणत आहेत की: ‘फलापेक्षा मनात ठेवणाऱ्या अज्ञानी जनांना जेव्हढी कर्माबद्दलची आस्था असते त्याच आस्थेने स्वतः असक्त राहून ज्ञानी मनुष्याने कर्मे केली पाहीजेत कारण त्यायोगे सामान्य लोकांना योग्य मार्गदर्शन होते(२५). कर्मांत (फलापेक्षेमुळे) गुरफटलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत (तत्वज्ञान सांगून) गोंधळ उत्पन्न न करीता कर्मांच्या अपेक्षित फलांबद्दल आसक्ति न ठेवता, माझे अनुसंधान न सोडता ज्ञानी पुरुषांनी स्वतः सतत सर्व कर्मांना योग्य रीतीने पार पाडावे(२६).’

एकदा कर्मफलांच्या अपेक्षेमुळे आपण भगवंतांपासून दूर जात आहोत हे कळले की मनुष्याच्या मनात कर्मांबद्दल तिटकारा उत्पन्न व्हायचा संभव असतो. परंतु भगवंताचा वियोग व्हायचे कारण कर्मांत नसून आपल्या मनातील कर्मांची परीणीती योग्य व्हयलाच हवी या अट्टाहासात आहे हे आपण विसरायला नको. मुळातून कर्मे करणे थांबविले की सर्व फलांची अपेक्षासुद्धा जाईल असे म्हणणे अयोग्य आहे. कारण जाणीवपूर्वक कर्म न करणे हेसुद्धा एक कर्मच आहे आणि ते कर्म न करण्याचे कर्म केल्याने आपल्या मनात भगवंताबद्दल प्रेम उत्पन्न होईल ही आपली त्या कर्मफलाची अपेक्षा आहे! तेव्हा कर्मांना दूर सारुन आपण कर्म करणे आणि फलाची इच्छा ठेवणे या दुश्चक्रातून मुक्त होत नाही. मग मनात वैराग्य उत्पन्न झालेल्या साधकाने करावे तरी काय? या प्रश्नाचे उत्तर वरील श्लोकांतून भगवान देत आहेत. कुठलाही प्रयास न करीता जी कर्मे आपणहून आपल्यासमोर दत्त म्हणून उभी राहतात त्यांना सकारात्मक नजरेने सामोरे जाणे आणि असे कर्म करीत असताना त्यांच्या फलांबद्दलची अपेक्षा न ठेवणे असा दुपेडी मार्ग भगवंतांनी सांगितलेला आहे हे. या मार्गाने चालताना ज्ञानी माणसाचे बाह्य वर्तन सर्वसामान्य माणसांप्रमाणेच दिसते. त्याचा वेगळेपणा स्थूल नजरेने बघितल्यास कधीच दिसत नाही. ‘मी फक्त एकदाच जेवतो. तेसुद्धा एक ग्लास गाईचे दूध आणि काही फळे. बाकी काही आहार मी कधीच करीत नाही.’ असे ना कधी भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे आणि कुणा ज्ञानी मनुष्याने तसे म्हणावे अशी त्यांची अपेक्षा नाही. लोकांमध्ये लोकांसारखेच राहून स्वतःचा वेगळेपणा जो जतन करतो तो खरा धन्य. कारण असा वेगळेपणा ठेवण्याचे कारण निर्गुण भगवंतच असू शकते. इतर कुठले कारण असते (एखाद्या व्यक्तिबद्दलचे अतीव प्रेम, एखाद्या तत्वाबद्दलचे पराकोटीचे आकर्षण इत्यादी) तर त्या मनुष्याचे वेगळेपण या जगातच व्यक्त झाले असते. व्यवहारात कुठेही वेगळेपणा न दिसता स्वतःला वेगळे ठेवणे केवळ ज्ञानी मनुष्यालाच शक्य आहे कारण त्याच्या वेगळेपणाचे कारण या जगापलिकडील आहे. खरे म्हणजे जगापासून आपण भिन्न आहोत ही भावनासुद्धा ज्ञानी मनुष्याच्या मनात येत नाही. ‘जे मला मिळाले आहे ते तुम्हांला अगदी सहज मिळू शकते’ असेच उद्गार त्यांच्या मुखातून सतत बाहेर येतात. आपणास ज्ञान होत नाही याचे एक मुख्य कारण म्हणजे आपली जगावेगळे काहीतरी दिव्य करायची इच्छा आहे. भगवंताजवळ जाणे हेसुद्धा आपण इतरांपेक्षा उच्च बनण्याचे साधन बनविण्याचा प्रयत्न करतो आणि जी माणसे असा प्रयत्न करीत नाहीत त्यांना या मार्गावर वळविण्याचा अट्टाहास ठेवतो. परंतु भगवंतांनी इथे स्पष्टपणे सांगितले आहे की इतरांना उपदेशात्मक भाषणे देणे चुकीचे आहे. स्वतःच्या वर्तनाचा आदर्श इतरांसमोर ठेवणे आणि त्यांच्याबद्दल अतीव सहनुभूती मनात ठेवणे हा मार्गच भगवंतांनी सर्व ज्ञानी मनुष्यांना सांगितला आहे. सर्व विश्वात संपूर्णपणे मिसळूनसुद्धा स्वतः वेगळे रहा ही भगवंताची शिकवण अतिशय सूक्ष्म आहे. अर्जुनासारखे आपले मन नविन विचार ग्रहण करण्यासारखे संवेदनशील झाले तरच आपण ही विशाल विचारसरणी आचरणात आणू शकतो.

॥ हरिः ॐ ॥

Advertisements

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s