श्लोक (२७ ते २९)/३: स्वानुभवानेच विचारांत फरक पडतो

 ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः ।

अहंकारविमूढात्मा कर्ताऽहमिति मन्यते ॥ गीता ३:२७ ॥

तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः ।

गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥ गीता ३:२८ ॥

प्रकृतेर्गुणसंमूढाः सज्जंते गुणकर्मसु ।

तानकृत्स्नविदो मंदान्कृत्स्नविन्न विचालयेत्‌ ॥ गीता ३:२९ ॥

ज्ञानी पुरुषांनी सर्वसामान्य लोकांप्रमाणेच व्यवहार करावा असा स्पष्ट आदेश भगवंतांनी अर्जुनाला गेल्या दोन श्लोकांतून दिला. स्वतःमधील फरक (बाह्य कर्मांतून दिसून न येता) कर्मांमागील हेतूशून्यतेतूनच लोकांना दिसावा अशी आज्ञाच जणू या श्लोकांतून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनामार्फत सर्व साधकांना दिली आहे. ज्या माणसाची मूल प्रवृत्ती सात्विक आहे त्यालाच या आदेशाचे खरे महत्व कळेल. सर्वसाधारणपणे मनुष्य असा विचार करतो की आपल्यातील फरक लोकांना जाणवेल अशी आपली बाह्य कर्मे असावीत. उदाहरणार्थ आपण वैष्णव आहोत याची जाणीव होण्यास मनुष्य गळ्यात तुळशीमाळा आणि कपाळावर गंध लावायला सुरुवात करायला मागेपुढे बघत नाही. कचेरीत वरीष्ठ माणसे आपले स्थान दाखविण्यास कनिष्ठांवर उगाचच अरेरावी करतात किंवा त्यांच्या गुणांचे कौतुक अगदी मोजून-मापून करतात. या जगाची ही वहिवाटच आहे. परंतु आपल्यातील फरक अशा पद्धतीने दाखविल्याचा अट्टाहास ठेवला तर एक अतिशय सूक्ष्म परिणाम लोकांवर होतो. तो म्हणजे आपले असे वेगळे वागणे हाच आपल्यात पडलेला फरक आहे अशी इतरांची समजूत होणे.

या गोष्टीवर जरा विचार करा. भगवान विष्णूंबद्दल मनात प्रेम उत्पन्न होणे म्हणजे खरे वैष्णव होणे होय. कपाळावार टीळा लावून आणि गळ्यात तुळशीमाळा घालून कुणी वैष्णव होत नाही. परंतु या बाह्य उपाधींची इतकी सवय सर्वसामान्य लोकांना झाली आहे की जीन्स पैंट व शर्ट घातलेल्या माणसाने मांसाहार करीत असताना मी वैष्णव आहे असे सांगितले तर पटतच नाही! ‘तू वैष्णव असशील तर असे वर्तन का करतोस?’ हा त्यांचा प्रश्न असतो. याचा अर्थ असा की ‘मनातील भगवंतावरील प्रेम’ या मूलभूत अमूर्त घटनेला जनता बाह्य उपचारांनी समजायचा प्रयत्‍न करण्यास उद्युक्त होते. याउलट कुठलेही बाह्य उपचार न करीता वेळ येईल तेव्हा स्वतःच्या तटस्थतेनी इतरांना आपल्या मनातील खरे प्रेम कशावर आहे हे दाखविले तर वैष्णव म्हणजे काय याची खरी कल्पना निदान काही लोकांना तरी येऊ शकते. या गोष्टीचे उदाहरण म्हणजे श्री गोंदवलेकर महाराजांकडे बघा. एकदा त्यांचे आपल्या भाऊबंदांशी जमिनीच्या वाटणीवरुन कडाक्याचे भांडण चाललेले होते. त्यांचा गोरापान चेहरा अगदी लालबुंद होऊन कपाळावरील आणि मानेवरील शिरा तट्ट फुगलेल्या होत्या आणि जोरात वाद चाललेला होता. याचवेळी महाराजांचे सत्‌शिष्य श्री भाउसाहेब केळकर आपल्या खोलीत श्रीज्ञानेश्वरी वाचत होते आणि एका ओवीच्या अर्थाबद्दल त्यांच्या मनात शंका उत्पन्न झाली. त्या शंकेचे निवारण करण्यास ते महाराजांकडे आले आणि त्यांचा उग्र अवतार बघून गप्प उभे राहीले. केळकरांना महाराजांनी बघितले आणि लगेच आपला वाद थांबवून अगदी हळू आवाजात केळकरांच्या कानात त्या ओवीचा अर्थ त्यांनी सांगितला. केळकरांच्या मनातील शंकेचे निरसन झालेले दिसताच त्यांनी परत आपला आवाज चढवून भांडण सुरु केले! श्री केळकरांनी नंतर असे सांगितले की इतका रागाने तापलेला मनुष्य क्षणात इतका शांत होऊन परमार्थाचे तत्व सांगू शकतो हे प्रत्यक्ष बघूनसुद्धा माझा विश्वास बसला नाही! जेव्हा वेळ येते तेव्हा ज्ञानी मनुष्य व्यावहारीक जगाबद्दलची आपली तटस्थता प्रत्यक्ष कृतीने दाखवून देतो. आणि इतर वेळी आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करुन तो स्वतःच्या ज्ञानाची किंमत कधीही कमी करीत नाही.

असे बघा, आपल्याकडील अमूल्य वस्तूची खरी किंमत लोकांसमोर ठेवणे त्या वस्तूच्या प्राप्तीबरोबर आलेली जबाबदारी आहे. स्वतःच्या चित्तातील ज्ञानाचे खरे रुप कुठलीही तडजोड न करीता लोकांसमोर आणायचे असेल तर संसारातील कुठल्याही गोष्टीचा आधार घेणे अयोग्य आहे. आधीच लोकांचे चित्त संसारात अडकलेले असते. त्यात व्यावहारीक गोष्टींचा संतांनी वापर केला तर ते प्रेम अधिकच वृद्धींगत होईल यात शंका नाही. ही गोष्ट अधिक स्पष्ट करण्यासाठीच जणू भगवान वरील श्लोकांतून म्हणत आहेत की: ‘(खरे म्हणजे) संसारातील जे काही कर्म होते ते सर्व प्रकृतीच्या तीन गुणांमुळे होत असते. परंतु अहंकाराने मूढ झालेला पुरुष स्वतःला त्या कर्मांचा कर्ता समजतो (२७). परंतु ज्ञानी माणसाची नजर अहंकाराने दूषित झालेली नसल्याने तो प्रकृतीचे त्रिगुण आणि कर्म हे आपल्यापासून भिन्न आहेत हे जाणतो व स्वतःकडे कर्तृत्वाचा भाव आणत नाही (२८). अहंकाराच्या प्रभावाने विचारशून्य झालेले मानव स्वतःकडे कर्तेपणा घेतात आणि कर्मांमध्ये गुरफटतात. अशा लोकांना ज्ञानी पुरुषांनी तत्वज्ञान (शाब्दीक पद्धतीने) सांगून बिघडवू नये(२९).

निव्वळ वाद घालून वा गूढ तत्वज्ञानाचे शाब्दीक रुप दाखवून आपण लोकांची मूल विचारसरणी बदलू शकत नाही. तसे होत असते तर या जगात धूम्रपान करणाऱ्यांची संख्या इतकी जास्त असती का? धूम्रपानाचे दुष्परीणाम पूर्ण पटल्याने कुणी आपल्या या सवयीचा त्याग करीत नाही. पण एकदा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यूशी सामना करावा लागला की मग ही सवय आपोआप सुटते. ज्ञानी मनुष्य आपल्या अस्तित्वाने व्यावहारीक जीवांना सर्वसामान्य जीवन जगण्याच्या सवयीच्या मृत्यूशी भेट घडवून देतात! त्यांच्या ज्ञानाची ही खरी किंमत आहे. श्री भाऊमहाराज केळकरांना ज्याप्रमाणे गोंदवलेकर महाराजांनी ‘स्वतःवर रागाचे प्रभुत्व असणारच’ या सर्वसामान्य विचारसरणीचा मृत्यू दाखविला त्याचप्रमाणे सर्व विकारांत राहूनसुद्धा अलिप्त राहणे कसे शक्य आहे हे ज्ञानी मनुष्य लोकांना दाखवितो. ज्या कुणा भाग्यवंताला या शाश्वत सत्याचा दंश होतो तो स्वानुभवाने शहाणा होतो आणि योग्य मार्गाला लागतो. नाहीतर श्री गोंदवलेकर महाराजांचा मोठेपणा त्यांनी गोंदवल्यात चालविलेल्या निरंतर अन्नछत्रातच बघणारे थोडे आहेत काय? संतांजवळ राहूनसुद्धा आपण त्यांच्यांकडून काय घेतो यावर विचार करणे स्वतःच्या हिताकरीता अत्यावश्यक आहे. संत इतके अपेक्षारहित असतात की त्यांचे चांगलेच गुण आपण घेतले पाहीजेत याचासुद्धा आग्रह ते धरीत नाहीत. ज्ञानी मनुष्याने उगाच जगाच्या भल्यासाठी जिवापाड प्रयत्‍न करण्यापेक्षा स्वतः तटस्थ राहून इतरांपुढे आदर्श वर्तनाचा धडा राहील असे वर्तन करावे अशी भगवंताची आज्ञा वरील श्लोकांतून स्पष्ट होत आहे असे वाटते. इति.

॥ हरिः ॐ ॥

One Response to श्लोक (२७ ते २९)/३: स्वानुभवानेच विचारांत फरक पडतो

  1. anant inamdar म्हणतो आहे:

    24/9 CHYE NIRUPAN AADHI VACHALE
    TYACHE SHANKA NIRSAN JAHALE

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: