श्लोक ३०/३: कर्मबंधनांतून सुटायचे रहस्य

 ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा ।

निराशीर्निर्ममो भूत्वा युद्ध्यस्व विगतज्वरः ॥ गीता ३:३० ॥

 

गेल्या काही श्लोकांमधून ज्ञानी मनुष्याची जीवनाकडे बघायची नजर सर्वसामान्य लोकांपेक्षा किती भिन्न असते हे सांगितल्यावर आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्वतः कसे वागावे याचे स्पष्ट मार्गदर्शन करीत आहेत. या श्लोकातून जो सल्ला दिला गेला आहे तो केवळ अर्जुनाकरीता नसून आपणा सर्वांकरीता आहे. भगवान म्हणत आहेत की: ‘स्वतःच्या आत्मस्वरुपावर नजर दृढ ठेवून आपली सर्व कर्मे तू मला अर्पण कर आणि (या जगात काही मिळवावे याबद्दलच्या) आशेचा संपूर्ण नायनाट करुन, कुठल्याही व्यक्ति वा वस्तूबद्दलची ममता दूर करुन मनाच्या दुःखरहित अवस्थेत निःशंकपणे लढ (३०).’

सर्वसाधारणपणे आपणा सर्वांना असे ज्ञान असते की आपल्या सर्वदुःखांचे मूळ आपल्या कर्मांतच असते. या वस्तुस्थितीला मान्य करुन जीवनात अखंड सुख मिळविण्याचा आपण सर्वजण प्रयत्‍न करीत असतो. आणि आपला असा उद्योग म्हणजे कर्मयोग असे आपण समजतो. त्यामुळे कर्मयोग म्हणजे नक्की काय याबद्दल जेव्हढी मते आहेत तेवढी मते इतर कुठल्या योगाबद्दल असतील असे वाटत नाही. परंतु आपल्यापरीने कर्मयोगाचे पालन करुनही जेव्हा दुःख समोर उभे राहते तेव्हा आपणास धक्का बसतो आणि असे वाटते की आपल्यापरीने दुःख टाळायचे सर्व प्रयत्‍न करुनसुद्धा सुख का निघून जाते? अशावेळी आपली भगवंतावर जितकी श्रद्धा असते त्याप्रमाणे आपण नवीन मार्ग शोधतो. अढळ विश्वास असणारा मनुष्य म्हणतो की जरुर या दुःखातून पुढे सुख निर्माण होणार आहे. ‘जे काही होत असते ते सर्व चांगल्याकरीताच होत असते’ या शब्दांचा आधार घेऊन अशी व्यक्ती आपले प्रयत्न चालू ठेवते. ज्यांची श्रद्धा एवढी दृढ नसते ते म्हणतात की कितीही प्रयत्न केले तरी दुःख टळत नसेल तर मग उगाच कर्मयोगाचा वा भगवंताच्या भक्तिचा सोस का बाळगावा. विषयसुखांत रममाण होऊन शक्य तितकी सुखे आत्ताच उपभोगून घेण्यात काय वावगे आहे? बहुतांशी लोक या दोन टोकाच्या भूमिकांमध्ये कुठेतरी अडकून कधी भक्ती तर कधी भुक्ती करत आपले जीवन सुसह्य करायचा प्रयत्न करतात. परंतु या सगळ्या खटापटीमध्ये आपला जगण्याचा मूळ दृष्टीकोन बदलत नाही. दुःखांना जितके टाळता येईल तितके टाळावे ही आपली मूळ भूमिका जशीच्या तशी राहते. जास्तीत जास्त पुढे सुख मिळविण्याकरीता आज दुःख सहन करायला आपण तयार असतो. पण कुठल्याही प्राप्तीची हमी न देता दुःख उगाचच जवळ येऊ नये असेच आपणा सर्वांना आयुष्यभर वाटते. आणि जीवनाकडे बघायची ही दृष्टी इतकी सर्वमान्य आहे की यात काही चुकीचे असू शकेल असा विचारसुद्धा आपल्या डोक्यात येत नाही. त्यामुळे संतांच्या जीवनाकडे आपण बघितले तरीसुद्धा आपणास असे वाटते की त्यांनी जे साधनेचे कष्ट घेतले होते तेसुद्धा पुढील प्राप्तीकरीता (म्हणजे भगवंताच्या निरंतर सान्निध्याकरीता) घेतले होते. (यापेक्षा अधिक चुकीची गोष्ट असू शकत नाही. भगवंतांच्या इच्छेने संतांना कष्ट सोसावे लागतात. ज्याच्यामुळे त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या लोकांचे कष्ट आपोआप कमी होतात. श्री रामकृष्ण परमहंस आपल्या शिष्यांना नेहमी म्हणायचे की मी एवढे साधनेचे कष्ट सोसले आहेत कारण की त्यामुळे तुमची प्रगती कमी प्रयत्नांत होईल.)

परंतु आपली जीवनाकडे बघायची अशी दृष्टी असेल तर वरील श्लोकातून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ‘निराशी’ होऊन युद्ध लढ असे सांगत आहेत त्याचे आपण कसे समर्थन करणार? मनातील सर्व आशेचे संपूर्ण निराकरण होणे म्हणजे निराशी होणे. मनातील आशा कधीही पूर्ण होणार नाहीत याची निःसंदेह खात्री झाली की मनाची जी उदास, नकारात्मक अवस्था होते त्याला सर्वसामान्यपणे निराश या शब्दाने सांगायचा प्रयत्‍न करतात. परंतु भगवंतांनी वापरलेला हा शब्द अतिशय सकारात्मक आहे. त्या शब्दांत अर्जुनाकडून सक्रियपणे घनघोर युद्ध यशस्वीपणे लढवून घेण्याची शक्ति आहे हे जाणून घेणे अतिशय जरुरी आहे. असे सकारात्मक निराश होण्याचे कारण म्हणून भगवंतांनी अर्जुनाला वरील श्लोकातून असे सांगितलेले आहे की स्वतःचे आत्मस्वरुप काय आहे याचा कधीही विसर पडू देऊ नकोस. ज्याप्रमाणे हातचलाखी करणारा मनुष्य आपणास बोलण्यात गुंतवून हळूच हातातील पत्ता बदलतो त्याप्रमाणे या संसारातील अनुभव आपल्या चित्ताला स्वरुपाचे विस्मरण पाडून आपली स्वानंद उपभोगायची सहज अवस्था बदलवून सुख किंवा दुःख या द्वंद्वात आपणास ढकलतात. स्वरुपाचे विस्मरण झाल्यावर जी अवस्था होते तीचेच वर्णन वरील श्लोकाच्या दुसऱ्या चरणात केलेले आहे असे वाटते. भगवान म्हणत आहेत की भविष्यात काय होईल याची अपेक्षा (म्हणजे आशा) मनातून काढ, सध्या समोर असलेल्या व्यक्तिंबद्दलच्या ममतेचा विनाश कर आणि आत्तापर्यंत झालेल्या वा पुढे होणाऱ्या मनाविरुद्ध घटनांबद्दलचा खेद (म्हणजे शोक) मनातून काढून टाक. या सर्व गोष्टी आपल्या देहावर आणि मानसिक भावनांवर आधारीत आहेत हे स्पष्टच आहे. नवजात बालकाला किंवा अहंकार संपूर्ण नष्ट झाला आहे अशा संतांना या तिन्ही गोष्टींचा अर्थसुद्धा कळणार नाही! आपण स्वतःला अर्जुन म्हणवितो पण आपण नक्की कोण आहे याची जाणीव जर अर्जुनाला असती तर त्याच्या जीवनात या गोष्टी आल्याच नसत्या. आणि जेव्हा त्याची नजर स्वरुपावरुन आपल्या देह-मनावर स्थिर होते तेव्हाच यांच्या जंजाळात तो अडकतो.

कर्मयोग म्हणजे नक्की काय हे इथे भगवान श्रीकृष्णांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे असे वाटते. कुठलेही कर्म करीत असताना सतत आत्मरुपी भगवंताच्या अनुसंधानात असणे म्हणजे कर्मयोग होय. आपल्याहातून नक्की कुठले कर्म किती व्यावहारिक कुशलतेने होत आहे याचा इथे अजिबात संबंध नाही हे लक्षात घ्या. कर्म करुन झाल्यावर ते भगवंतांची इच्छा होती म्हणून झाले असे म्हणण्यातसुद्धा कर्मयोग नाही आणि जे काही होते ते सर्व भल्याकरीत्याच होते यावर विश्वास ठेऊन कर्म करण्यातही कर्मयोग नाही. कर्मयोग हा नेहमी वर्तमानकाळात सक्रीय असतो हे ध्यानात घ्या. भविष्यातील आश्वासने आणि भुतकाळातील व्यक्तींवर/तत्वावर विश्वास ठेवण्यात कर्मयोग कधीही सापडत नाही. आपल्यासमोर मायारुपी जादूगर प्रकृतीचे सर्व खेळ दाखवित असताना सतत आपल्या स्वरुपाकडे लक्ष ठेवणे हा कर्मयोग आहे आणि केवळ यातूनच कर्मबंधनाच्या पाशांतून सुटका होते. हे प्रत्यक्ष भगवंतांचे सांगणे आहे आणि पुढील श्लोकांतून स्वतः भगवान श्रीकृष्ण असे आपणास सांगतील. ते आपण पुढच्या वेळी बघूच! इति.

॥ हरिः ॐ ॥

2 Responses to श्लोक ३०/३: कर्मबंधनांतून सुटायचे रहस्य

 1. anant inamdar म्हणतो आहे:

  DHANYAVAD…

  ADDL SUGGESTED READING

  GONDAWALEKAR MAHARAJANCHI PRAVACHANE

  ANANT

 2. Shrinivas Deshpande म्हणतो आहे:

  Shridhar,
  Nice meeting you here.
  Understaning the core thoughts of geeta become a pleasureful expiriance trough your pravachans
  Raja

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: