श्लोक (३१ आणि ३२)/३: कुठेतरी विश्वास ठेवा!

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः ।

श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥ गीता ३: ३१ ॥

ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम्‌ ।

सर्वज्ञानविमूढांस्तान्‌ विद्धि नष्टानचेतसः ॥ गीता ३:३२ ॥

गेल्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला असे सांगितले की मनातून ‘काहीतरी मिळवायचे आहे’ या आशेला पूर्णपणे काढून माझ्या अनुसंधानात निरंतर राहून खुशाल युद्ध कर (म्हणजे तुला वरकरणी अयोग्य वाटणारे वर्तनसुद्धा निर्धास्तपणे कर). मनाची अशी धारणा ठेवलीस तर तुला कुठल्याही गोष्टीचा खेद करायची वेळ येणार नाही. भगवंतांच्या या वक्तव्याने आपल्या मनाला धक्का बसण्याची शक्यता आहे कारण आयुष्यभर बाह्यवर्तनाकडे लक्ष ठेवून ते सुनियंत्रित करण्याकडे आपला कटाक्ष असतो. आपल्या आणि भगवंताच्या जवळीकीचा व ‘योग्य-अयोग्य वागणे’ याच्याशी संबंध नसला तर समाज बेबंद वर्तन करण्यास मोकळा राहील या शंकेने आपले मन व्यापले जाण्याची शक्यता आहे. आणि एकदा मनात शंकेचा अतिशय सूक्ष्म किडा जरी घुसला तरी कालांतराने तो व्यापक रुप धारण करतो आणि आपल्या हातून भगवंतांच्या सांगण्याप्रमाणे वर्तन होऊ शकत नाही. म्हणून या गोष्टीवर आपण थोडा विचार करणे जरुरी आहे.

भगवंतांच्या सांगण्यामध्ये एक सूक्ष्म गोष्ट दडलेली आहे. ती म्हणजे आपल्या हातून कर्म होत असताना मनात सतत भगवंताचे स्मरण हवे. भगवंताचे (आणि संतांचे) एक खास वैशिष्ट आहे ते म्हणजे ज्याक्षणी आपणास त्यांचे स्मरण होते त्याचक्षणी ते आपणास त्यांच्याएवढे थोर बनवितात. माउलींच्या भाषेत सांगायचे म्हणजे: ‘विपाये आठविला चित्ता । दे आपुली योग्यता ॥’. त्यामुळे जर सतत भगवंताच्या अनुसंधानात असणे ही गोष्ट आपणास जमली तर आपल्या हातून कर्मे होत नसून प्रत्यक्ष भगवान ती कर्मे घडवून आणत असतो असे सिद्ध होते. मग इथे बेबंद वागण्याचा संबंधच येऊ शकत नाही! ज्याप्रमाणे एखादी आई मुलाला योग्य वळण लावण्याकरीता कधीकधी उग्र रुप धारण करते त्याचप्रमाणे आपल्या हातून कदाचित वरकरणी अयोग्य वाटणारी कर्मे घडू शकतील. परंतु तशा वागण्यातही स्वतःच्या अहंकाराचा लवलेशही नसल्याने असे कर्मसुद्धा कुठलाही खेद उत्पन्न करु शकत नाही. आपण सर्वसाधारणपणे मनातील घडामोडींकडे दुर्लक्ष करुन बाह्यवर्तनाला कर्म असे नाव देतो. समाजात वावरताना असा संकुचित अर्थ योग्यही आहे कारण इतरांना फक्त आपली बाह्य कर्मे दिसतात. परंतु परमार्थामध्ये कर्म हा शब्द खूप व्यापक आहे. ज्याप्रमाणे फळांना बाहेरुन साल असते त्याचप्रमाणे आपले बाह्यवर्तन हे संपूर्ण कर्माचे निव्वळ कवच आहे असे मानायला हरकत नाही. आणि ज्याप्रमाणे फळाची चव त्याच्या सालीवरुन नाही तर आतील गरावर निश्चित होते त्याचप्रमाणे आपल्या कर्माची खरी अध्यात्मिक योग्यता बाह्य वर्तनावरुन नाही तर आपल्या मनातील भावनांवर ठरत असते. असे जर नसते, तर सर्व खाटकांना पशू संवर्धनाचे पुण्य प्राप्त झाले असते! परंतु त्यांच्या मनातील हेतू ‘पशूचे वर्धन झाल्यावर त्याच्या मांसाला विकावे’ हा असतो. त्यामुळे त्यांच्या पशूला खाद्य पुरविण्याच्या कर्मात सहिष्णुता नसून निव्वळ व्यवहार असतो आणि त्यामुळे पुण्ण्याचा त्या कर्माशी दुरान्वयानेसुद्धा संबंध नसतो. तेव्हा बाह्य वर्तन व्यवस्थित असले पाहीजे यावर आपले जे बारीक लक्ष आहे ते काढून मनातील हेतू ‘भगवंताबद्दलचे प्रेम दाखवायचे आहे’ असा आहे की नाही यावर असली पाहीजे. ज्याकडे ही नजर आहे त्याने सर्व साधले. असे भगवंताचे म्हणणे आहे.

आता काही गोष्टी अशा असतात की त्या करणे योग्य आहे हे आपण करण्यापूर्वीच सिद्ध करु शकतो. (उदाहरणार्थ खूप भूक लागलेली असताना घरी जाऊन भोजन करावे अशी भावना योग्यच आहे!) परंतु भगवंताचे वरील वक्तव्य खरे आहे की नाही हे प्रत्यक्ष वर्तन केल्याशिवाय कळत नाही. कारण ते मानसिक भावना योग्य ठेवली तर पुण्य मिळेल असे अदृश्य गोष्टीबद्दल आहे. इथे भगवंतांच्या बोलण्यावर करण्याआधी विश्वास बसणे जरुरी आहे. स्वतः मेल्याशिवाय़ ज्याप्रमाणे स्वर्ग दिसू शकत नाही त्याचप्रमाणे इथे आधी वर्तन केल्याशिवाय परीणाम दिसत नाही. याठीकाणी श्रद्धेला महत्व प्राप्त होते. नाहीतर बुद्धीचा वापर करुन ‘असे कसे होईल? कर्मांपासून मुक्ति मिळविणे एवढे सोपे असणे कसे शक्य आहे?’ इत्यादी आक्षेप कुणीही घेऊ शकतो. म्हणून भगवान आता आपल्या मनातील विश्वासाला आवाहन करुन जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते म्हणत आहेत की: ‘कुठलीही असूयायुक्त शंका मनात न ठेवता जे (भाग्यवान) लोक माझ्या सांगण्याप्रमाणे वर्तन करतील, तेसुद्धा (माझ्याप्रमाणे) सर्व कर्मबंधनांतून मुक्त होतात (३१). (याउलट) जी माणसे माझ्या सांगण्यावर अविश्वास ठेऊन, त्याच्यावर विनाकारण टीका करुन, माझ्या सांगण्यानुसार वर्तन करीत नाहीत, त्यांची बुद्धी विपरीत झालेली असून ती दुःखाच्या खाईत खिचपत पडतात (३२).’

भगवंतांच्या सांगण्यावर मनापासून विश्वास बसणे ही फार मोठी सद्‌गुरु कृपा आहे. किंबहुना याशिवाय दुसरी कुठली कृपा असूच शकत नाही असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. आपल्या (संकुचित) विचारसरणीला जे योग्य वाटते त्यावर विश्वास ठेवणे सहज शक्य आहे. परंतु जेव्हा आपणास अयोग्य वाटणारी गोष्ट योग्य आहे असे सांगण्यात येते तेव्हा कितीजणांचा विश्वास बसतो? अर्जुनाने अनेक कारणे देऊन कुरुक्षेत्रावरील युद्ध करणे कसे चुकीचे आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न केलेला होता. त्या पार्श्वभूमीवर आता भगवान त्याला सांगत आहेत की तू खुशाल युद्ध कर. त्याने कुठलेही पाप उत्पन्न होणार नाही. यावर अर्जुनाचा विश्वास बसतो यातच त्याच्या योग्यतेचे दर्शन होते. अर्जुनासमोर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण उभे होते म्हणून तो भाग्यवान ठरत नाही. तर त्याचा भगवंतांच्या उपदेशावर विश्वास बसतो म्हणून तो भाग्यवान आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात भगवान वेगवेगळे रुप धारण करुन योग्य काय आहे याचा सल्ला आपणास देतच असतात. परंतु आपल्या मनाला न पटणाऱ्या किती उपदेशांवर आपला विश्वास बसतो? (मग त्यानुसार वर्तन करणे तर दूरच राहीले!) यातच आपल्या जीवनातील दुःखाचे मूळ दडलेले आहे. जर आपली बुद्धी भ्रष्ट झालेली असेल तर दुःखाशिवाय आपल्या जीवनात काय पुढे येणार? स्वतःच्या मनातील भावनांकडे ज्याला सातत्याने दुर्लक्ष करता येते त्यालाच भगवंताजवळ जाणे शक्य आहे. अशा व्यक्तीलासुद्धा जर भगवान काय म्हणत आहेत याबद्दल आस्था नसेल तर त्याने आपल्याजवळील या दुर्लभ गोष्टीचा दुरुपयोग केला असेच म्हटले पाहीजे. (उदाहरणार्थ: घरातील इतरांचे मन सांभाळण्यासाठी स्वतःचे मन मारणारी गृहीणीला मानसिक शांति मिळतेच असे नाही.) स्वतःजवळ योग्यता असणे जरुरी आहेच, परंतु त्या योग्यतेचा सदुपयोग करण्याची बुद्धी जवळ असणेसुद्धा तितकेच जरुरी आहे. आणि हा सदुपयोग होण्यासाठी भगवंतावर विश्वास ठेवणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच स्वतः भगवान श्रीकृष्ण अशा भक्तांना ‘श्रद्धावन्तो, अनसूयन्तो’ या विशेषणांनी संबोधित आहेत. आपल्याबद्दल भगवान असेच उद्‌गार काढतील असे वर्तन आपण का करु नये?

॥ हरिः ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: