श्लोक ३३/३: स्वभावाला औषध नाही!

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेः ज्ञानवानपि ।

प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥ गीता ३३:३ ॥

 गेल्या काही श्लोकांमध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की ‘मी-माझे इत्यादी संकुचित मानसिक भाव सोडून, माझ्या अनुसंधानात सतत राहून समोर आलेली कर्मे करण्यातच जीवनाचे सार्थक आहे. या माझ्या वक्तव्यावर विश्वास ठेवून जे आपले आयुष्य जगायचा प्रयत्‍न करतात ते खरे श्रद्धावंत आहेत आणि वाचाळपणे या मताची निंदा करुन आपले जीवन (स्वतःच्या संकुचित व्यक्तिमत्वाचा विकास करण्यातच) जे व्यतीत करतात ते अत्यंत मूढ आहेत आणि त्यांचा पूर्ण विनाशच पुढे लिहीलेला आहे (श्लोक ३० ते ३२).’

वरील भाष्यातून भगवंतांनी आपले वक्तव्य पूर्ण लक्ष देऊन ऐकणाऱ्यांतसुद्धा दोन वर्ग असतात असे सूचित केले आहे. (ज्या लोकांना भगवंतांचे मत माहीतच नाही त्यांचा या श्लोकांमध्ये विचार केलेला नाही हे स्पष्टच आहे.) जर भगवंतांच्या मताची माहिती होणे ही ज्ञानाची व्याख्या मानली तर वरील श्लोकांमध्ये ज्ञानी माणसांत ‘श्रद्धावंत’ आणि ‘मूढ’ असे दोन वर्ग असतात असे दिसून येते! आता भगवंतावर श्रद्धा असल्याखेरीज या दोन्ही वर्गांतील लोकांनी त्याचे वक्तव्य ऐकण्यात आपला बहुमूल्य वेळ खर्च केला असता का? (भगवंतांच्या वक्तव्याची निंदा करण्यासाठीआधी त्यावर विचार करणे जरुरी आहे. म्हणून मूढ-ज्ञानी(!) सुद्धा श्रीकृष्णांच्या उपदेशावर सखोल विचार करतात हे लक्षात घेणे जरुरी आहे.) म्हणजे याचा अर्थ असा की जीवनातील एका क्षणी या दोन्ही वर्गांतील मानवांची भगवंतावर श्रद्धा होती. परंतु ‘मी-माझेपण’ टाकून दे असे भगवंतांनी सांगितल्यावर नंतर त्यांनी आयुष्यात कसे वर्तन केले यावर त्यांची पुढील प्रगती ठरते! सर्वसाधारणपणे भगवंतावर श्रद्धा बसली की जीवनाचे सार्थक झाले असा विचार लोकांमध्ये आढळून येतो. परंतु वरील श्लोकांतून भगवंतांनी असे स्पष्ट केले आहे की श्रद्धासुद्धा कालानुसार बदलत असते. ज्याप्रमाणे व्यवहारात मित्रांवरचा आपला विश्वास त्यांच्या वर्तनानुसार कमी-जास्त होतो, त्याचप्रमाणे आपली भगवंतावरील श्रद्धासुद्धा त्यांच्या उपदेशानुसार वृद्धींगत होते वा अस्त पावते असा निष्कर्ष आपण भगवान श्रीकृष्णांच्या वरील वक्तव्यातून काढू शकतो. आता श्रद्धायुक्त लोकांमध्ये असे दोन परस्पर विरुद्ध वर्ग कसे निर्माण होतात हा प्रश्न उद्भवतो. वरील श्लोकातून भगवंतांनी या संदेहाचे निराकरण केले आहे असे वाटते. ते कसे हे आता आपण पाहू.

भगवान म्हणत आहेत की: ‘सत्याचे ज्ञान (निव्वळ बुद्धीने) करुन घेणारा मानवसुद्धा स्वतःच्या स्वभावानुसारच वर्तन करतो. आपल्या मूल स्वभावानुसार वर्तन करणे असेच सर्व प्राणीमात्र जीवन जगतात. अशावेळी जबरदस्ती करुन आपले वर्तन बदलविण्याचा प्रयत्‍न करुन काय मिळेल? (३३)’ थोडक्यात म्हणजे ज्यांना जन्मजातच मी-माझेपणात स्वारस्य नसते ते माझे बोलणे ऐकून त्यावर विश्वास ठेवतात. याउलट ज्यांना स्वकर्तृत्वाचा अभिमान आहे, आपण कष्ट करुन जे मिळविले आहे त्याबद्दल जीवापाड प्रेम आहे ते आपला अहंकार सोडायची वेळ आली की कच खातात. भगवंतावरील श्रद्धा या दोन्ही वर्गांतील लोकांची एकसारखीच असली तरी एकाला स्वस्वभावानुसार वर्तन करायला मिळते तर दुसऱ्याला स्वतःला अत्यंत मूलभूतपणे बदलायची पाळी येते. आणि या वस्तुस्थितीने सध्या श्रद्धायुक्त असलेल्यांमध्ये दोन पराकोटीचे भिन्न वर्ग निर्माण होतात.

आपण एखाद्या गोष्टीवर वा व्यक्तीवर श्रद्धा आहे असे म्हणतो तेव्हा आपल्या म्हणण्यातील सत्यत्व ओळखायचे कसे? या प्रश्नाचे उत्तर आहे: आपल्या वर्तनावरुन. श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे की व्यावहारीक जीवन एका प्रयोगशाळेसारखे आहे. आपल्या मनातील भाव किती खोलवर रुजलेले आहेत हे कळण्याकरीता या प्रयोगशाळेतील आपले वर्तन बघणे हाच एक मार्ग आहे. त्यामुळे जर सातत्याने (कधीकाळी नव्हे!) स्वतःच्या वागण्यातून आपल्या प्रतिज्ञापनाचे सहजपणे निदर्शन आपण करु शकलो तर आपल्या मनातील भावनेत तथ्य आहे, नाहीतर नाही असे मानायला हवे. आणि जेव्हा आपल्या मनातील इच्छा आणि आदर्श वर्तन यात संघर्ष नसतो तेव्हा आपण स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागलो की तत्वांचे पुरस्करण करण्यासाठी वागलो हे कळणे कठीण आहे. त्यामुळे स्वतःच्या तत्वांकरीता आपल्या इच्छेविरुद्ध जेव्हा वागायची वेळ येते तेव्हा आपण कसे वागतो याचे निरीक्षण करणे जरुरी आहे. भगवंतांनी ‘माझ्यावर श्रद्धा ठेव, मग तुझे सर्व कष्ट मी भोगीन’ असे म्हटले की आपण सर्व त्यांच्यावर श्रद्धा ठेवूच! परंतु माझ्या सांगण्यामुळे तू आत्तापर्यंत स्वकष्टांनी जे काही मिळविले आहेस त्यावरील मालकी हक्क सोडून दे असे त्यांनी सांगितले तर फक्त काहीजणच त्याप्रमाणे वागण्यास तयार होतात. बहुतांशी लोक ‘हे काही आपणास जमणार नाही’ असा विचार करुन परत पाऊली आपल्या पूर्वजीवनाकडे परत जातात. आपल्या भक्तजनांमध्ये हा जो फरक आहे तो या श्लोकांतून भगवंतांना सूचित करायचा आहे.

जेव्हा आपल्या श्रद्धास्थानाने दिलेल्या आदेशाबद्दल मनात कुतर्क यायला लागतात तेव्हा मनुष्याने अतिशय सावध रहायला हवे. मानवाची बुद्धी आपली सर्व शक्ती एखादी गोष्ट समजण्यास प्रथम तीचे तुकडे करुन आनि नंतर स्वतः केलेले भाग परत जोडून ती वस्तू निर्माण करण्यात व्यतीत करते. असे जेव्हा बुद्धीला करता येते तेव्हाच आपण म्हणतो की ‘मला ती गोष्ट कळली’. (उदाहरणार्थ, श्रीकृष्ण म्हणजे कोण? तर कारागृहात जन्म झालेली, गोकुळात संगोपन झालेली, गोपिकांशी लीला करुन कंसवध करुन कुरुक्षेत्रात गीतेचा उपदेश अर्जुनाला सांगणारी व्यक्ती. या क्रियेमध्ये श्रीकृष्णांच्या व्यक्तिमत्वाचे तुकडे करुन ते परत जोडले गेले!) परंतु ज्याप्रमाणे ‘टॅनग्रॅम’ नावाच्या चायनीज खेळामध्ये एका चौरसाचे सात तुकडे करुन ते परत आपण ज्या पद्धतीने जोडतो त्यापद्धतीवर अवलंबून वेगवेगळे आकार निर्माण होतात (आणि मूल चौरसाचा आकार मिळविणे अशक्य होते!) त्याचप्रमाणे या बुद्धीच्या खेळात आपण मूळ गोष्ट केव्हा हरवितो हे कळत नाही. त्याशिवाय या कार्यामध्ये काही तुकडे वगळले गेले तर सांगायलाच नको! आणि आपण स्वतः निर्माण केलेल्या वस्तूचे नाविन्य ओळखत नाही, ती म्हणजेच आधीची गोष्ट असेच मानतो. भगवंतांच्या वक्तव्यावर आपल्या मनात संदेह उत्पन्न व्हायला आपल्या बुद्धीचा खेळ कारणीभुत आहे. म्हणुन मनातील शंकेवर विश्वास ठेवण्याआधी आपण सावध होऊन संदेह उत्पन्न व्हायला काय कारण असू शकेल यावर विचार करायला हवा. परंतु आपले हे कार्य ‘स्वभाव’ असल्याने ते आपण कसे बदलू शकू ही शंका आहेच! स्वभावाला औषध नाही मग काय करावे? यावर भगवान पुढील श्लोकांत भाष्य करतील ते आपण नंतर बघूच!

॥ हरिः ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: