श्लोक ३४/३: सर्वांचा स्वभाव प्रेम करणे आहे!

 ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।

तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥ गीता ३४:३ ॥

 

गेल्या श्लोकामध्ये आपण असे बघितले की भगवंतावर अपार निष्ठा असणाऱ्या साधकांमध्येही श्रद्धावंत आणि मूढ असे जे दोन वर्ग पडतात ते केवळ त्यांच्या स्वभावामुळे. इथे असा एक प्रश्न निर्माण होतो की जर स्वभावानुसार आपली प्रगती किंवा अधोगती ठरत असेल आणि स्वभाव हा जन्मताच आपल्या बरोबर येत असेल तर मग साधनेचे महत्व काय? अध्यात्मिक प्रगती जन्मल्यावरच ठरत असेल तर उगीच साधनेच्या तपश्चर्येच्या कष्टांचे सोस कशाला भोगायचे?! अर्जुनाच्या मनातील हा प्रश्न जाणून भगवान त्याला वरील श्लोकातून उत्तर देत आहेत. भगवान म्हणत आहेत की: ‘मनुष्याची इंद्रिये त्यांच्या अनुभवांचे केंद्र असलेल्या विषयांकडे आकर्षित होतात किंवा तिटकारा करतात. त्यांच्या अशा वागण्याचा मानवाने आपल्या वर्तनावर परीणाम होऊ देऊ नये. इंद्रियांच्या इच्छा परमार्थाच्या मार्गावरील फार मोठे अडथळे आहेत.’ या शब्दांतून भगवंतांनी वरील प्रश्नाला कसे उत्तर दिले आहे ते आता आपण पाहू.

सर्वात आधी आपण स्वतःचा स्वभाव कसा ठरवितो ते पाहू. जेव्हा आपण ‘माझा स्वभाव अमुक-अमुक आहे’ असे म्हणतो तेव्हा आपण स्वतःला ज्ञात असलेल्या आपल्या सवयींबद्दल बोलत असतो. परंतु या सर्व सवयी आपल्या इंद्रिंयाना जे विषय प्रिय असतात त्यांवर अवलंबून असतात (उदाहरणार्थ, एखाद्याला गोड पदार्थांचे सेवन करणे पसंत असते तर कुणी एक सुगंधाचा वेडा असतो.) अगदी आपल्या मनातील समाजात कसे वागावे याचे जे नियम ठरविलेले असतात ते देखील आपणास कुठली व्यक्ती वा तत्व आवडते, म्हणजे मन या अकराव्या इंद्रियाला जे प्रिय आहे त्यावरच ठरलेले असते (मनाला शरीराचे इंद्रिय मानायला आधार: ‘इन्द्रियाणां मनश्चास्मि … गीता २२/१०). तेव्हा सांगायची गोष्ट म्हणजे इंद्रियांवर अवलंबून नसलेल्या स्वभावाची जाणीवसुद्धा अजून आपणास झालेली नाही. आपण मूळ स्वभावावर इंद्रियांच्या आकर्षण/द्वेषाने निर्माण झालेल्या कवचालाच स्वभाव मानत आहोत. आणि इंद्रियांच्या समाधानापुढे आपणास दुसरे काही दिसतच नसल्याने हे कवच अपारदर्शक बनले आहे! त्यामुळे स्वतःचा खरा स्वभाव काय आहे हे कळण्यास आपणास असे प्रयत्न करायला हवेत की ज्यायोगे स्वभावावरील आसक्तींचे कवच फुटेल. म्हणून भगवान आपणास असा सल्ला देत आहेत की इंद्रियांना त्यांच्या नैसर्गिक वृत्तींवर मोकळे सोडून मानवाने आपले चित्त त्यातून मोकळे केले पाहीजे. ज्याप्रमाणे शेजारील घरात नवीन रहायला आलेल्या माणसांच्या इच्छांबद्दल आपण तटस्थ असतो, त्यांना ना बदलायचा प्रयत्न करतो वा त्यांची पूर्तता करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो, त्याचप्रमाणे स्वतःच्या इंद्रियांच्या इच्छा-आकांक्षांबद्दल आपण तटस्थ रहायला शिकले पाहीजे! लक्षात घ्या की आपल्याच देहाच्या इंद्रियांना नवीन शेजाऱ्यासारखे मानण्यास काहीही हरकत नाही. कारण आपला देह हा जणू चिरंतर अस्तित्वात असलेल्या आपल्या आत्म्याजवळ नुकताच आलेला एक शेजारी आहे आणि ही सर्व इंद्रिये देहाशीच निगडीत आहेत!

एकदा आपल्या अंतःकरणाला इन्द्रियांच्या इच्छांकडे दुर्लक्ष करायची सवय लागली की आपल्या डोळ्यांवरील विषयांच्या आसक्तीचे झापड दूर होऊन आपले वर्तन स्वतःच्या मूळ स्वभावानुसार होऊ लागेल आणि आपण आपोआप श्रद्धावंत भक्त बनू. कारण आपणा सर्वांचा जन्मजात स्वभाव प्रेम करण्याचा आहे, भक्ती करण्याचा आहे. अगदी जंगली पशूसुद्धा जन्मल्यावर जी व्यक्ती समोर येईल तीला स्वभावतःच आपले मानायला लागतात याचे दुसरे कुठले कारण असू शकेल? नंतर, आयुष्यात टक्के-टोणपे खाल्यावर आपण काही व्यक्तींचा वा वस्तूंचा द्वेष आणि उरलेल्यांवर (आपोआप) प्रेम करायला लागतो आणि मग आपल्या अशा वागण्याला स्वभाव मानतो! लक्षात घ्या की प्रेम करायला कुणाला शिकवावे लागत नाही. प्रेम व्यक्त होण्यास जे अडथळे असतात त्यांना दूर केले की आपोआप मनातील जिव्हाळा दृष्य व्हायला लागतो. इंद्रियांच्या वर्तनात जे स्वतःला गुंतवितात ते आपल्यामधील जन्मजात प्रेमाला बाहेर येण्यास प्रतिबंध करतात. म्हणून भगवंतांनी आपणा सर्वांना स्वतःच्या इंद्रियांकडे दुर्लक्ष करण्याची साधना सांगितली आहे. अशा नजरेने बघितल्यास भगवंतांच्या वक्तव्यातून सुरुवातीला उद्भवलेल्या प्रश्नाचे संपूर्ण उत्तर मिळते.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर असे की स्वभावाला औषध नाही हे जरी खरे असले तरी आपला स्वभाव काय आहे हे जर आपण चुकीचे ठरविले असेल तर तो बदलायला मार्ग आहेत! मनाच्या ज्या ओढींमुळे आपण स्वभावाला जाणू शकत नाही ती आकर्षणे काढून टाका. बस, इतकेच पुरेसे आहे. बाकी काही करायची जरुरी नाही. विहीर खणताना आपण पाण्याच्या स्त्रोतावरील जमिनीचे आच्छादन कुदळीच्या प्रहारांनी दूर करतो. दुसरे काही करीत नाही. निर्मळ पाण्याचा झरा मग आपोआप दिसू लागतो. त्याचप्रमाणे आपणा सर्वांच्या हृदयातील प्रेमाचा नैसर्गिक झरा ज्या व्यावहारिक वर्तनांच्या सवयींने झाकला गेला आहे तो बघायचा असल्यास इंद्रियांवरील ममता तटस्थतेच्या कुदळीच्या निश्चययुक्त प्रहारांनी फोडून टाकली पाहीजे. इति.

 ॥ हरिः ॐ ॥

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: