श्लोक ३५/३: इंद्रियांच्या आकर्षणातून सुटायचा उपाय

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

श्रेयान्‌ स्वधर्मो विगुणः परधर्मात्‌ स्वनुष्ठितात्‌ ।

स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ गीता ३:३५ ॥

गेल्या श्लोकाचा गूढार्थ उलगडून बघताना आपण बघितले की स्वतःचा मूळ स्वभाव ओळखायचा असेल तर त्यावरील असलेले विषयासक्तीचे टरफल आपण इंद्रियांकडे दुर्लक्ष करण्याच्या सवयीने फोडायला हवे. परंतु अनेक वर्षांचा सहवास असल्याने आपल्या मनात विषयांबद्दलची ओढ इतकी खोलवर रुजलेली आहे की तीला मूळापासून काढणे कठीण झाले आहे. असे बघा, अत्यंत सुपीक जमिनीकडे फार काळ दुर्लक्ष केल्यावर जी तणांची वाढ होते ती काढणे फार कठीण होते कारण बाहेर दृश्यमान असलेली सर्व तणे जरी काढली तरी त्यांची जमिनीत खोलवर रुजलेल्या बीजांमुळे योग्य काळ आला की परत नवीन तणे येतातच. त्या बीजांप्रमाणेच आपल्या मनातील विषयांचे आकर्षण खोलवर रुजलेले आहे. त्यामुळे विषयासक्तीत आपली इतकी शक्ती खर्च होते की आपल्या मनाला शांततेचे पीक संपूर्णरीत्या कधीच मिळत नाही. आणि इंद्रियातीत शांततेचा उपभोग निरंतर (कधीकाळी नव्हे!) घेतल्याशिवाय स्वतःला आपल्या मूळ स्वरुपाची ओळख होणे अशक्य आहे. या वस्तुस्थितीची भगवंतांना जाणीव असल्याने ते अर्जुनाला आता आपल्या मनातील इंद्रियांना सुखप्राप्ती करुन देण्याची जी निरंतर ओढ लागलेली आहे तीचे निवारण करण्याचा उपाय सुचवित आहेत. भगवान म्हणत आहेत की: ‘स्वधर्माने वर्तन करणे, जरी त्यात गुणांचा अभाव वरकरणी दिसला तरी, सर्वश्रेष्ठ आहे. याउलट परधर्म कितीही गुणांनी भरलेला दिसला तरी स्वधर्मापेक्षा कनिष्ठच आहे आणि त्यानुसार वर्तन करणे अत्यंत भयावह आहे (कारण त्यायोगे आपण स्वरुपापासून दूर जातो). स्वधर्माचे पालन करताना देह जाण्याची पाळी आली तरी तो सोडू नये.’ श्रीमद्भगवद्गीतेच्या गेल्या काही श्लोकांतून विचारांची एक अशी शृंखला निर्माण होते: १. स्वधर्माने वर्तन केले की आपोआप इंद्रियांकडे दुर्लक्ष होईल. २. इंद्रियांवरील नजर हटली की त्यांच्या आकर्षणामागे लपलेले स्वरुप स्पष्ट होईल. ३. स्वरुपाचे ज्ञान झाले की मनातील हव्यासाचे निराकरण होईल ज्यायोगे अढळ शांतीचे अस्तित्व आपणास जाणवू शकेल आणि ४. त्यातून भगवंतांची भक्ती आणि सर्व प्राणिमात्रांवरील प्रेम जागृत होऊन मनुष्य जन्माचे सार्थक होईल.

भगवंताच्या प्राप्तीचा हा चौरस मार्ग सर्वांसमोर, जात-पात आणि धर्म यांचा विचार न करीता मोकळा ठेवलेला आहे. परंतु आपणच या मार्गावर न जाण्याचा हट्ट धरुन बसलेलो आहोत! इथे आपल्या मनात असा प्रश्न यायची शक्यता आहे की स्वधर्म म्हणजे नक्की काय? आधुनिक काळातील मानवाचा जीवन जगण्याचा उद्देश्य इतका बदललेला आहे की जुन्या रीतींप्रमाने वर्तन करणे आपला स्वधर्म असेल असे आपणास वाटत नाही. म्हणून स्वधर्म म्हणजे काय यावर आपण विचार करणे जरुरी आहे. श्री ज्ञानेश्वर माउलींनी आपणास स्वधर्माची व्याख्या अशी करुन दिली आहे: ‘म्हणोनि जे जे उचित। आणि अवसरेंकरुनी प्राप्त। ते कर्म हेतुरहित । आचरे तू ॥ ३:७८ ॥ देखे अनुक्रमाधारे । स्वधर्म जो आचरे । तो मोक्ष तेणे व्यापारे । निश्चित पावे ॥ ३:८०॥ स्वधर्म जो बापा। तोचि नित्ययज्ञ जाण पां। म्हणोनि वर्तता तेथ पापा संचारु नाही ॥ ३:८१ ॥’ स्वधर्माच्या या व्याख्येत हिंदूत्वाचीसुद्धा आवश्यकता नाही, मग ब्राह्मण, क्षत्रिय इत्यादी जातीनुसार वर्तन करण्याची मागणी असणे दूरच राहीले. माउली म्हणत आहे की आपल्यासमोर जे कर्म सहजरीत्या निर्माण होते ते जर उचित असले तर मनात कुठलाही हेतू न ठेवता पार पाडावे. असे वर्तन करणे यज्ञ करण्यासमान आहे. याचे कारण असे की या वागण्यामध्ये आपण स्वतःच्या इच्छा-आकांक्षांची आहुती क्षणोक्षणी देत आहोत. उदाहरणार्थ, ऑफीसमधून आल्यावर चहा पिऊन झाला की आता स्वस्थपणे बसावे असे आपण ठरवितो आणि त्याचवेळी मुलाने त्याच्याबरोबर वेळ घालविण्याची मागणी केली तर स्वतःच्या देहसुखाच्या इच्छेला तिलांजली देऊन त्याच्याबरोबर खेळणे हा त्यावेळचा स्वधर्म आहे. स्वधर्माची एक ठराविक व्याख्या नसून क्षणोक्षणी अत्यंत लहान-सहान गोष्टींमधून आपला स्वधर्म आपल्यासमोर प्रगट होत असतो हे लक्षात घ्या. इथे सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे खरा साधक जरी त्याच्या इच्छेप्रमाणे ऑफीसमधून परत आल्यावर विश्रांती मिळाली तरी त्याबाबत ‘तो विराम माझा हक्क होता’ अशी भावना मनात न आणता, आज भगवंताची इच्छा मला आराम देण्याची होती असा विचार करतो. म्हणजे मनाविरुद्ध वा मनाप्रमाणे घटना घडणे या दोन्हीबाबतीत तो भगवंताचा हात बघतो. भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण महान तपस्या करायला तयार असतो पण दैनंदिन जीवनातील अशा क्षुल्लक घटनांमध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वाकडे दुर्लक्ष करायला तयार होत नाही हे आपले दुर्दैव आहे. ज्याप्रमाणे समर्थ शत्रू असलेला मनुष्य सतत तलवार परजून तयार असतो त्याचप्रमाणे आपल्या अहंकाराचे निर्दलन करण्यासाठी आपण स्वतःच्या इच्छांकडे निरंतर दुर्लक्ष करुन जे पडेल ते काम करण्यास तयार राहीले पाहीजे. लक्षात घ्या की वरील उदाहरणात पालकाने स्वतःहून मुलाला खेळायला बोलाविले नव्हते. मुलाबरोबर खेळणे हे कर्म सहजपणे त्याच्यासमोर आले आणि अशा कर्मांकडे आपण निर्हेतुकपणे सामोरे गेलो पाहीजे. म्हणजे काय तर वरील उदाहरणात मुलाबरोबर (इच्छा नसताना, निव्वळ त्याच्याकरीता) खेळलो की मी चांगला पालक बनलो ही भावना आपल्या मनात आली नाही पाहीजे. भगवंताने माझा वेळ अशारीतीने व्यतीत करावयाचा ठरविला होता अशी भावना मनात उत्पन्न झाली पाहीजे. निरंतर असे वर्तन जो करतो त्याच्या सर्व पापांचा नाश होऊन मोक्षाचा मार्ग मोकळा होतो असे माउली आपणास वरील ओव्यांतून म्हणत आहे.

ज्या मानवाने जीवनात सतत असे वर्तन ठेवले आहे त्याचे जीवन कधीही साचेबद्ध होत नाही तर प्रत्येक क्षणी तो समोर आलेल्या कर्मांना सकारात्मक नजरेने सामोरा जात असतो. मग त्याने रामनवमीचा उत्सव केला नाही वा एकादशीचा उपवास केला नाही तरी काही बिघडत नाही. या कधीकाळी येणाऱ्या घटनांद्वारे भगवंताची प्राप्ती करण्याची आपली इच्छा ढगांच्या सावलीमधून उन्हापासून बचाव होईल अशी कल्पना करुन घर न बांधण्यासारखे हास्यास्पद आहे! भगवंताच्या उत्सवामध्ये सहर्ष सामील होणे हा एक आपल्या मनातील प्रेमाचा एक आपोआप झालेला परीणाम असायला हवा. ते मूळ धरुन त्यायोगे मनात प्रेम उत्पन्न होईल ही अपेक्षा म्हणजे घोड्यापुढे खटारा बांधल्यासारखे विपरीत वर्तन आहे. आपला स्वधर्म काय आहे हे बघण्यास दररोज आपल्या हातून घडणाऱ्या असंख्य गोष्टींमध्ये आपल्या इच्छांचा किती प्रभाव पडलेला आहे हे बघायला हवे. इथे आपणास निरंतर जागृत रहायला हवे आणि हेच अनुसंधान आपणास भगवंताकडे आपोआप घेऊन जाते. मग त्यासाठी वेगळी तपस्या वा साधना करावयाची काहीच गरज उरत नाही. भगवंतांच्या या सहज उपायाला ज्याने महत्व दिले त्याने सर्व साधले!

॥ हरिः ॐ ॥

One Response to श्लोक ३५/३: इंद्रियांच्या आकर्षणातून सुटायचा उपाय

  1. sopan म्हणतो आहे:

    swadharm defination is very good

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: