श्लोक ३६/३: अध्यात्मिक मार्ग कसा चुकतो?

॥ ॐ सच्चिदानंद सद्‌गुरु श्री माधवनाथाय नमः ॥

अर्जुन उवाच:

अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः ।

अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ गीता ३:३६ ॥

 

गेल्या काही श्लोकांवर विचार करताना आपण असे बघितले की सर्व भूतमात्रांचा मूळ स्वभाव प्रेम करणे हाच आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रेमरुपी झरा वहात आहे आणि या झऱ्याचा उगम म्हणजेच स्वरुपी स्थित असलेला भगवंत आहे. अर्थात, प्रत्यक्ष व्यवहारात आपण असे बघतो की सर्व लोकांचे वागणे प्रेमळ असत नाही. म्हणजे प्रेम या कल्पनेची उदात्त, पुस्तकी व्याख्या सोडाच, पण प्रेम म्हणजे काय? या प्रश्नाचे त्या माणसांकडूनच जे उत्तर येईल त्यानुसारदेखील त्यांचे वर्तन होत आहे असे आढळत नाही. आपण कसे वागायला हवे याचे पूर्ण ज्ञान असूनदेखील माणसे त्याप्रमाणे वागतीलच याची खात्री देता येत नाही. जर स्वतःच्या संकुचित व्यक्तिमत्वाच्या भल्यासाठी आपण तत्वांच्या विरुद्ध वागतो असे म्हटले तरी ते बरोबर आहे असे वाटत नाही! कारण कित्येकवेळा अभ्यास करणे जरुरी आहे हे जाणूनसुद्धा मुले टवाळक्या करतात किंवा आता कचेरीत काम करायलाच हवे हे माहित असूनही मी संगणकावर कुठल्यातरी बालीश खेळात रमतो याचे स्पष्टीकरण काय? जर व्यावहारिक गोष्टींत (जिथे लाभ काय होणार आहे हे स्पष्ट दिसत असते) जर आपले वागणे अकलनीय असेल तर पारमार्थिक मार्गावर चालताना (जिथे नक्की लाभ काय होणार आहे हेसुद्धा संपुणपणे माहित नसते, नुसती एक अंधुक अशी श्रद्धापूर्ण जाणीव असते) आपण जाणून-बुजून खाचखळग्यात पडतो यात आश्चर्य काय? अर्जुन अत्यंत चाणाक्ष असल्याने आपल्या या अगम्य वर्तनाची त्याला पूर्ण जाणीव होती. म्हणून जेव्हा त्याने भगवंतांच्या मुखातून स्वधर्माने वागले तर सर्व फळे (व्यावहारिक आणि पारमार्थिक) काहीही कष्ट न करीता आपोआप हस्तगत होतात असे ऐकले तेव्हा त्याने वरील श्लोकातून एक मार्मिक प्रश्न विचारला. अर्जुन म्हणत आहे की: ‘(पुण्य आणि पाप यातील फरक पूर्ण जाणल्याने) पाप न करण्याची प्रबळ इच्छा असलेला मानवसुद्धा कसा पापे करतो? जणू एखादी शक्ती त्याला जबरदस्ती करुन पापाचरणात ढकलत आहे असे दिसून येते. अशी कुठली शक्ती आहे?

वर सांगितल्याप्रमाणे अर्जुनाचा हा प्रश्न आपल्या दैनंदिन जीवनातही लागू पडतो. खरोखर, मुद्दाम चुक करुन काय होते हे पाहू असे पाहण्याची एक खोड आपणांत का आहे? कदाचित मानवाच्या जैविक विकासासाठी (evolutionसाठी) ही कुतुहलशक्ती जरुरी असेल! मानवाच्या सुरुवातीच्या काळात कदाचित असे घडले असेल की त्याकाळच्या सर्वसामान्य समजेच्या विरुद्ध वर्तन करणाऱ्यांचा निभाव जास्त घडला असेल आणि त्यामुळे आपल्या जीन्समध्येच निरनिराळे प्रयोग करण्याची वृत्ती गुंफलेली असेल. परंतु सध्याच्या काळात बुद्धीने आपण आपल्यामधील या वृत्तीवर ताबा का मिळवू शकत नाही? शिवाय सकाळी उठल्यावर दात घासणे इत्यादी क्रिया आपण विनातक्रार आयुष्यभर करतोच की. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत नावीन्य आणायचा आपला प्रयत्न आहे असे आपण म्हणू शकत नाही. याउलट, ज्यांची गुरुंवर पूर्ण श्रद्धा आहे आणि ज्यांची संसारावरील आसक्ती क्षीण झालेली आहे असे साधकसुद्धा गुरुंच्या उपदेशानुसार तंतोतंत वागतीलच असे ठामपणे आपण सांगू शकत नाही. अर्जुनाच्या प्रश्नामध्ये अशा साधकांचाच उल्लेख आहे. ज्यांना परमार्थ माहित नाही वा माहित असूनही ज्यांना त्यामध्ये रस वाटत नाही अशा लोकांनी चुका केल्या तर आपण समजू शकतो. परंतु सदा सावधान राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रामाणिक साधकांच्या हातूनही जाणतेपणाने चुका का व्हाव्या? आपण सर्वांनी या प्रश्नावर स्वतः विचार करणे जरुरी आहे. भगवान अर्जुनाला काय उत्तर देतील ते आपण पुढच्यावेळी पाहूच!

॥ हरिः ॐ ॥

Advertisements

One Response to श्लोक ३६/३: अध्यात्मिक मार्ग कसा चुकतो?

  1. rama म्हणतो आहे:

    waiting for next posting

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: