श्लोक ३७/३: संकुचित अस्तित्वाचा परिणाम

॥ ॐ सच्चिदानंद सद्‌गुरु श्री माधवनाथाय नमः ॥

श्रीभगवानुवाच:

काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।

महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम्‌ ॥ गीता ३७:३ ॥

अर्जुनाने गेल्या श्लोकात अत्यंत मार्मिकपणे असे विचारले की पाप आणि पुण्य यांतील फरक पूर्णपणे माहित असूनसुद्धा लोक पापाचरण का करतात? आपणा सर्वांच्या जीवनातसुद्धा जाणीवपूर्वक चुकीच्या रस्त्याने जाण्याची घटना अनेकदा घडून आलेली आहे. वरील श्लोकातून भगवान श्रीकृष्णांनी या वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण केलेले आहे. जेव्हा मी अनेकवेळा न करण्याचा प्रयत्न करुनही जेव्हा एक चूक (नित्य साधना न करण्याची चूक!) परत-परत करतो तेव्हा त्या वर्तनामागील कारण शोधताना मला असे वाटते की माझा स्वभावच असा विचित्र आहे. आणि एकदा स्वतःच्या (न बदलणाऱ्या) स्वभावावर खापर फोडले की मग दुसरे कारण बघायची जरुरी वाटत नाही. हे कारण बरोबर केव्हा असू शकेल? जर ही चूक फक्त मीच करत असलो तर. परंतु अत्यंत भिन्न स्वभावाच्या माणसांकडून हीच चूक जर पिढ्यानपिढ्या होत असेल तर निश्चितच त्यापैकी कुणा एकाचा स्वभाव त्या आचरणामागे कसा असू शकेल? जेव्हा एकच गोष्ट देश, काल आणि व्यक्ती या तीनपैकी कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नसते तेव्हा त्यामागे कुठलेतरी एक शाश्वत तत्व असते हे आपण लक्षात घेतले पाहीजे. म्हणूनच अर्जुनाने जेव्हा साधकांच्या दिशाभुलीचे कारण विचारले तेव्हा भगवंतांनी जे उत्तर दिलेले आहे ते असेच देश,काल आणि व्यक्तीच्या पलिकडील आहे. भगवान म्हणत आहेत: ‘अरे अर्जुना रजोगुणापासून उत्पन्न झालेली अभिलाषा (काम) कालांतराने क्रोधात पदार्पण करते. या अभिलाषेची कधीही तृप्ती होत नाही आणि (या अतृप्तीपोटी) ही पापाचरण करण्यास जगाला उद्युक्त करते. हा कामच सर्व जगाचा वैरी आहे.

ज्याप्रमाणे या सृष्टीतील कुठलाही रंग लाल, हिरवा आणि नीळ्या रंगांच्या मिश्रणातून निर्माण करता येतो, त्याचप्रमाणे आपल्या मनातील कुठलीही भावना सात्विक, राजसिक आणि तामसिक या तीन मूळ गुणांच्या मिश्रणानी निर्माण होते. सात्विक गुणात इतरांच्या भल्याचा विचार होतो (मग स्वतःला त्रास झाला तरी चालतो), राजसिक गुणात स्वतःच्या भल्याचा विचार होतो (यात इतरांचे नुकसान झाले तरी पर्वा नसते) आणि तामसिक गुणामध्ये स्वतःसकट सर्वांना अहितकारक विचार होतो. यातीनपैकी रजोगुणाचे प्राधान्य सर्वसामान्यपणे लोकांत आढळून येते. ज्याप्रमाणे नीळ्या रंगाचे फळ निसर्गात आढळत नाही, त्याचप्रमाणे बाकीच्या दोन गुणांपैकी एक प्रामुख्याने दिसणारे मानव विरळाच दिसतात. इथे अर्थात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणे अतिशय जरुरी आहे. ती म्हणजे हे गुण फक्त मानसिक भावनांच्या पातळीवरच बघायला हवेत, दृष्य घटनेत नव्हे. उदाहरणार्थ, एखाद्या कसायाने स्वतः उपाशी राहून स्वतःच्या (मांसाकरीता पाळलेल्या) बकरीला चारा आणला तर ते उदाहरण सात्विक वृत्तीचे नसून राजसिक वृत्तीचे आहे आणि एखाद्या आईने योग्य वळण लावण्यास मुलाला रागाने फटका दिला तर ते सात्विक वृत्ती दर्शविते, तामसिक नव्हे! बाह्य वर्तनातून आतील गुणांचे आकलन होतेच असे मानणे चुकीचे आहे. आपल्या वर्तनामागील हेतूवरुन आपण कुठल्या गुणामध्ये अडकलेलो आहोत हे ठरते. म्हणूनच अध्यात्मिक प्रवचने देण्यामागे (वा लेख लिहीण्यामागे!) स्वतःचा मोठेपणा वाढावा अशी सुप्त इच्छा असेल तर हे वर्तन राजसिकच ठरते. सद्‌गुरुंची आज्ञापालन करणे कर्तव्य आहे या एकाच भावनेतून जर परमार्थ प्रगट झाला तरच ते सात्विक वर्तन होते. असो. आता आपण मूळ मुद्यावर परत येऊया!

भगवान म्हणत आहेत की जेव्हा साधक राजसिक गुणांच्या कचाट्यात सापडतो तेव्हा तो पापकर्म करण्यास प्रवृत्त होतो. (इथे पाप या शब्दाची व्याख्या गीतेतील संदर्भानुसार ‘भगवंतास विसरणे’ अशीच केली पाहिजे. मग बाह्यक्रिया समाजसेवेची का असेना!). अर्जुनाच्या मनात ‘आपण राजसिक गुणात अडकलेलो आहोत हे कसे ओळखायचे?’ हा प्रश्न उद्भवणार हे जाणून भगवान म्हणत आहेत की मनात एखाद्या गोष्टीची अभिलाषा उत्पन्न जाली की समजावे आपण रजोगुणात आलेलो आहोत. आता आयुष्यभर मनाची कुठली ना कुठली इच्छा पूर्ण करण्यात आपण धन्यता मानत असल्याने मनातील इच्छा आपल्या सर्वनाशाला कारणीभूत कशा होतात अशी शंका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः भगवंतांनी इच्छा-इच्छांमध्ये फरक केलेला नाही (म्हणजे इतरांचे भले व्हावे ही इच्छा आणि फक्त माझे भले व्हावे ही इच्छा यात फरक ठेवलेला नाही) असे जेव्हा आपल्या बुद्धीला कळते तेव्हा आपल्या मनातील गोंधळ वाढण्याची शक्यता आहे हे जाणून श्रीकृष्णांनी असे स्पष्ट केले आहे की एखादी इच्छा आपल्या मनात घर करुन राहीली की तीचे रुपांतर क्रोधात होते. क्रोध तामसिक वृत्तीचे द्योतक आहे कारण सारासार विचार करण्याची शक्ती आपण क्रोधात गमावून बसतो. स्वतःच्य वर्तनावरील ताबा सुटून बेबंद वागतो (आणि नंतर पश्चात्ताप करतो!) यात ना आपले भले असते ना इतरांचे. म्हणून क्रोध (संतापाची परीसीमा म्हणजे क्रोध) तामसिक वृत्तीत मोडतो. याशिवय हा क्रोध राजसिक वृत्तीतून निर्माण झालेला असल्याने (म्हणजे क्रोधाचा हेतू सात्विक नसल्याने) त्याच्या प्रभावाखाली आपल्या अहंकाराचेच पोषण होते आणि अहंकारवृद्धी हे सर्वात मोठे पाप या जगात आहे.

तेव्हा मी परमार्थाच्या मार्गातून पदच्युत कसा झालो याचा शोध घ्यायला गेलो की त्याचे मूळ या संसारातील कुठल्यातरी वस्तू वा व्यक्तीबद्दल माझ्या मनात अभिलाषा उत्पन्न झाली असे आढळते. जोपर्यंत मी व्यावहारिक घटनांपासून वा मित्र-मंडळींपासून थोडाबहुत अलिप्त होतो तेव्हा माझी साधना व्यवस्थित चालू होती. आणि जेव्हा मी साधना चांगली चालू आहे असे गृहीत धरुन संसाराकडे आसक्तीने बघायला लागलो तेव्हा ना मला संसार मिळाला ना परमार्थ! या गोष्टीमध्ये स्वतःचा स्वभाव कारणीभूत नसून आपण स्वतःच्या मनाला दिलेले स्वातंत्र्य कारणीभूत आहे हे लक्षात येते. मनाचे सर्व चोचले पुरविणे केव्हाही योग्य नाही. आपले ध्यान सतत भगवंताकडे लावून जे कर्तव्य आहे ते अनासक्तीने करत राहणे याचे जोपर्यंत आपणास ओझे वाटते तोपर्यंत पदच्युतीचा धोका आहे. अशा वर्तनातच आपल्या मनाला गोडी वाटायला हवी आणि समाजात निव्वळ कर्तव्य म्हणून वावरायची वृत्ती व्हायला हवी. ही अवस्था म्हणजेच: तुका म्हणे देह भरला विठ्ठले । काम क्रोध केले घर रिते ॥ आणि एकदा काम-क्रोध निघून गेले की पापाचरण होणारच नाही. स्वानुभवाने भगवंताच्या सहवासाची गोडी ज्याने चाखलेली आहे त्यालाच हे शक्य आहे. बौद्धीक कसरती करुन ज्याने स्वतःच्या मनाला समजावले आहे तो अतिशय निसरड्या मार्गावर आहे. ज्यांना अनुभूती नाही ते पापाचरण केव्हा करतील याचा नेम नाही. त्यामुळे आपणा सर्वांचा कटाक्ष बुद्धीने परमार्थ जाणून घेण्यापेक्षा स्वानुभवाने कळून घेण्याकडे हवा. भगवंत हेच आपणास सांगत आहेत असे वाटते.

॥ हरिः ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: